जावे उंटांच्या गावी
जावे उंटांच्या गावी
वैभू आणि श्रेयाचा आज शेवटचा पेपर होता. कधी एकदा पेपर देतो आणि खेळायला जातो असे झाले होते. मीना दोघींना शाळेतून घ्यायला आली. आईला पाहताच वैभू जोरात म्हणाली, "आई मी आज मनसोक्त खेळणार आहे. मला अजिबात घरी बोलवायचे नाही. " मीना म्हणाली, "अग, श्रेया तुझा पेपर कसा गेला. १० दिवसांनी दहावीचे क्लासेस सुरू होतील तुझे. " "हो ग आई मला पेपर चांगले गेले आहेत तु काळजी करू नकोस. "
घरी आल्यावर पाहतो तर काय नितीन लवकर घरी आला होता. तो एअर इंडिया कंपनी त इंजिनिअर म्हणून काम करत होता. मीना आणि मुली घरात आल्याबरोबर तो जोरात म्हणाला, "श्रेया, वैभू कसा गेला पेपर? तुम्ही सुट्टीत काय करायचे ठरवले आहे? "" बाबा, मी तर खेळणार आहे. ", वैभू पटकन म्हणाली आणि डोळ्यचे पाते न लवते तोच ती पटकन कपडे बदलून पसार झाली. मीना नितिन पहातच राहिले. शेवटी न राहवून मीनाने नितीन ला विचारले, " आज लवकर कसे घरी आलात? ", " अगं तेच तर सांगणार होतो. आपण उदया सकाळी दुबई ला जाणार आहोत. विमानात जागा शिल्लक आहेत असे कळले आहे पण आत्ताच कुणाला सांगू नका कारण आपल्याकडे जागा असतील तरच आपण जाऊ शकतो.चला पटापट तयारीला लागा. " हे ऐकून श्रेया खूप खुश झाली "बाबा आपण किती वाजता निघणार? "" श्रेया आपण पहाटे 3 वाजता निघणार आहोत. तिकिट मिळण्यासाठी आपल्याला ३ तास तरी लवकर जावे लागणार."
श्रेया आपली व वैभू चे कपडे एका बॅगेत भरू लागली. मीना पण कपडे बॅगेत भरू लागली. दोघीही खुश होत्या. बाबांनी वैभू ला हाक मारली. वैभू थोडी वैतागून, "काय हो बाबा कशाला बोलावले? तुम्हाला सांगितले होते ना कि आजपासून मी मनसोक्त खेळणार आहे. " बाबा हसून म्हणाले, "मग तू उंटांचे राज्य पहायला येणार नाही. " वैभू आश्चर्याने बाबांकडे पाहून म्हणाली, "म्हणजे काय बाबा? "" अगं आपण उदया सकाळी दुबई ला जात आहोत तिकीट मिळाले तर, म्हणून तू कुणाला सांगू नकोस. "वैभू आनंदाने उडया मारू लागली. " आई मला वेफर्स पाहिजेत प्रवासात खाण्यासाठी, मला पैसे दे ना, मी दीदी साठी आणि माझ्या साठी दुकानातून घेऊन येते""अग श्रेया वैभू बरोबर जाऊन औषधे पण घेऊन ये प्रवासात लागतील. " आई म्हणाली. दोघीही उत्साहाने प्रवासासाठी लागणा-या वस्तू आणायला गेल्या. बॅग भरून झाली. वैभू आणि श्रेया ला रात्री झोपच येत नव्हती.
पहाटे लवकर उठून सगळे विमानतळावर आले. नितीन ने तिकीटे मिळाल्यानंतर निश्वास सोडला. सगळयांना तिकिटे मिळाली म्हणून खूप आनंद झाला. विमानात बसल्यावर श्रेया व वैभू ढगांची रांग बघून हसत होते. मध्येच काळे ढग आले की विमान डगमगू लागले तेंव्हा वैभू रडायला लागली. आईच्या कुशीत शिरली. जेंव्हा जेवण आले तेंव्हा आवडीचा केक बघून खुश झाली.
दुबई विमानतळावर उतरल्यावर टॅक्सी ने सगळे हाॅटेल मध्ये उतरले. लवकर आंघोळ करून नितीन ने अबुधाबी जाण्यासाठी एक टॅक्सी मागविली. अबुधाबी ला पोहचल्यावर तिथली मोठी मशीद, कार ग्राऊंड, समुद्र किनारा हया गोष्टी पाहिल्या. दुसऱ्या दिवशी वाळवंट सफारी केली. तेंव्हा सर्वांना खूपच मजा आली. श्रेयाने हातावर गरूडाला पकडले. बॅले नृत्य आणि रूचकर जेवणाचा सगळ्यांनी आस्वाद घेतला. तिसऱ्या दिवशी दुबई मधील माॅल ,बुज॓ खलिफा पाहिला.
आज परतीचा प्रवास होता. नितीन तिकिटे घेऊन तिकीट काऊंटर वर गेला पण एकच विमान असल्याने खूपच गर्दी होती. शेवटी तिकीट मिळाले नाही. ती विमानतळावर ची रात्र भयानक होती. संपूर्ण वातावरण वातानुकूलित होते. हाॅटेल मध्ये परत जाण्याचा प्रश्नच नव्हता कारण पैसे खूप कमी होते. खाण्याचे सामानही संपले होते. श्रेया, वैभू बरोबर सगळयांना थंडी वाजत होती. पोटात काही नसल्याने झोप येत नव्हती. नितीन ही हतबल होता. थोडया श्या पैशात मिळणा-या दोन पराठयाचा सगळयांनी चटटामटटा केला. थंडी चे कपडे नसल्याने उपलब्ध असलेले कपडे एकमकांवर घालून छोटयाशा जागेवर सर्वजण बसून झोपले. त्या दिवशी श्रेया व वैभू नेआई बाबांची खूप काळजी घेतली. अन्नाचे व कुटुंबातील नात्यांचे महत्त्व सर्वांना पटले.
दुसऱ्या दिवशी ही विमानात जागा कमी होत्या त्यामुळे मॅनेजरने उदया प्रयत्न करायला सांगितले अश्यावेळी वैभू रडायला लागली. " नाही, काका आम्हाला तिकीटे दया तुम्ही. मला बरं वाटतं नाही आहे. "वैभू चे रडणे थांबत नव्हते मॅनेजर ला दया आली. " बाळा जागा झाली की मी तुला नक्की देईन पण तू रडणे थांबव. " शेवटी दैवयोगाने सर्वांना तिकीटे मिळाली.
घरी पोहचल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. मीना आणि नितीन ला हया प्रवासात आपल्या मुलींचे नविन रूप पहायला मिळाले. मुलींच्या चेहऱ्यावर दुबई पहायला मिळाल्याचा आनंद दिसत होता. असाही एक प्रवासाचा अनुभव मिळेल असे कधीच कुणाला वाटले नव्हते. उंट जसा पाण्यासाठी वाळवंटात धडपड करतो तसाच काहीसा अनुभव कुटुंबाला मिळाला. हया अनुभवाने कुटुंबातील ऋणानुबंध अजून घटट झाले.
