ती फक्त माझीच...!
ती फक्त माझीच...!
सानिका आणि विनयला जणू आकाश ठेंगणे झाले होते... कारणच तसे होते.... डॉक्टरने सानिकाला ती गोड बातमी दिली होती...सानिका आई होणार होती !
दोघांनाही आपल्या होणाऱ्या बाळाचे वेध लागले होते...सानिकाला तर काय करू आणि काय नको असे झाले होते...लग्नानंतर तब्बल सहा वर्षांनी शेवटी हा आनंदाचा क्षण आला होता त्यामुळे दोघांचेही आई वडील सुद्धा अगदी खुश होते...देवाचे आभार मानून सानिका अगदी मजेत सगळ्यांकडून डोहाळे पुरवून घेत होती.दिवस पूर्ण भरले आणि सानिकाने एका गोंडस परीला जन्म दिला !
तिच्या येण्याने घरात आनंद आला होता म्हणून सगळ्यांनी मिळून तिचे ' आनंदी ' असे थाटात बरसे केले.आनंदी म्हणजे सनिकाचा जीव की प्राण होती.नोकरीला राम राम ठोकून आता ती फक्त आंनदीचा विचार करणार होती.सानिका आनंदीला जीवापाड जपायची. विनयची आणि आई बाबांची सुध्दा तिचं अवस्था होती.सगळं घर ' आनंदीमय ' झालं होतं.
आनंदी हळूहळू बाळसे धरत होती...थोडी मोठी होऊ लागली तरी तश्या तिच्या हालचाली मंद होत्या...जरा ' गुटगुटीत आहे ' ' काही मुलं असतात स्लो ' अश्या विचारांनी सानिका मनाची समजूत घालायची.आनंदी दहा महिन्यांची झाली आणि शेवटी मनावर दगड ठेवून सानिका - विनय तिला डॉक्टरकडे घेऊन गेले...बऱ्याच तपासण्या झाल्या..
शेवटी एकदा ती भयंकर बातमी डॉक्टरांच्या तपासणीत निदान झाली...आनंदी एक ' स्पेशल ' मुलगी होती...तिची मानसिक आणि शारीरिक वाढ सामान्य मुलांच्या तुलनेत नेहेमीच खूप कमी असणार होती...
दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली ! डॉक्टर च बोलणं जणू काही काळजावर घाव घालत होतं... सानिकाचा तर विश्र्वासच बसत नव्हता.अनेक डॉक्टरच्या वाऱ्या झाल्या पण सानिका मतिमंद होती हे एक सत्य होतं , यावर सगळ्या डॉक्टरांचं एकमत होतं.
' असं का झालं ? '
' आपणच का ? '
' काय चुकलं ? कसं चुकलं ? '
' डॉक्टरांची चूक झाली की दैवाची ? '
एक ना अनेक प्रश्नांनी सानिकाच मन पोखरून निघालं होतं...ती सैरभैर झाली...पण आनंदीला बघून तिने निर्णय घेतला....शेवटी सत्य स्वीकारण्या शिवाय पर्याय नव्हता...मन घट्ट करण गरजेचं होतं...घरातला सगळा आनंद एका क्षणात निघून गेला होतं.
आनंदी हळू हळू मोठी होऊ लागली होती.तिची वाढ खूपच कमी होती .तिला खूप जपावं लागे...विनय , आई बाबा यांना आनंदी बद्दल प्रेम होतेच पण तिचं वागणं , असंबद्ध बोलणं यामुळे हळूहळू ती त्यांच्यापासून दुरावत चालली होती.
" सानिका अगं आता आनंदी मोठी होतेय , तिचं तिला करायची सवय लावून द्यायला हवी .आणि आता वंश हवा ना घराला ...जरा मनावर घ्या बरं..आनंदीच काय ती वाढेल...तिला एखाद्या आश्रमात किंवा संस्थेत ठेवता येईल .अश्या मुलांना चागलं शिकवतात असं काळे वहिनी सांगत होत्या...जरा करा चौकशी...आधीच खूप उशीर झालाय..." आईंच बोलणं ऐकून सानिकाला खूप वाईट वाटलं...
" आहो आई , हे काय बोलताय ? आपली आनंदी वेगळी आहे बाकी मुलांपेक्षा .तिला आपण आपलं मानलं पाहिजे.तिला आपल्या प्रेमाची आणि आधाराची खूप गरज आहे.दुसऱ्या मुलाचा मी विचारही करू शकत नाही ...मी सगळं करीन आनंदीच ..."
विनयचे सुद्धा हेच मत होते.." आईंच्या बोलण्यात तथ्य आहे ग ...खरंच आपण आता दुसरा चांस घ्यायला हवा.एक नॉर्मल मुल हवंच की आपल्याला.आणि स्वतःकडे बघ जरा...काय अवस्था झालीय तुझी.इतकी शिकलेली करियर ओरिएंटेड मुलगी तू आणि आता बघ , आनंदी शिवाय कसलाच विचार नाही करत तू.माझी सुद्धा पर्वा नाही तुला अलीकडे..असा कसा संसार चालेल आपला ? मलाही हक्क आहे ना आनंदात जगण्याचा ...मला दुसरं नॉर्मल मुल हवंय सानु..."
" हे काय बोलतोयस तू विनय ? तुझी कोणीच नाही का आनंदी ? आपण प्रयत्न केला तर नक्की फरक पडेल...तिला आपली गरज असताना तिच्याकडे दुर्लक्ष करायचं ? ती पूर्णपणे डीपेंड आहे आपल्यावर...मला माफ कर पण आनंदी हेच माझं सर्वस्व आहे..." विनयच्या बोलण्याने सानिकाच्या मनावर अनेक आघात झाले पण सानिका आपल्या मतावर ठाम राहिली.
एक कर्तृत्ववान मुलगी लग्नाआधी वडिलांच्या इंटेरियर डिझाईनच्या व्यवसायात यशस्वी पणें साथ देणारी आणि त्यातच आपलं करिअर करणारी ! लग्नानंतर सुद्धा अगदी यशस्वीपणे विनयच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी...पण आता पूर्णपणे आनंदीमय झाली होती...
विनयची चीड चीड सुरू होती.सानिकाने दुसऱ्या मुलाचा विचार न करण्याचा ठाम निर्णय घेतल्यामुळे आई सुद्धा नाराज होत्या.सगळ्यांनी मिळून सानिकाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता...कोणीच तिला मदत करत करत नव्हतं...एकटीने आनंदीला सांभाळणं तसं अवघडच होतं पण सानिकाने हे शिवधनुष्य पेलण्याचा ठाम निर्णय घेतला होता.आपल्या आनंदी च जग आनंदी करण्यासाठी काहीही करण्याची तिची तयारी होती.
सानिकाने आता आनंदीसाठी शाळा आणि कौन्सेलर शोधायला सुरुवात केली...तिच्या प्रयत्नांना यश आले आणि आनंदीला एका चागल्या संस्थेत प्रवेश मिळाला.तिथे मार्गदर्शन करणारे अनेक मान्यवरही नेहेमी येऊन स्पेशल मुलांना काय शिकवायच , कसं शिकवायच , त्यांच्याशी कसं वागायचं याची माहिती द्यायचे.सुरुवातीला तिथे येणारा विनय आता आनंदीच्या कुठल्याच गोष्टीत रस घेईनासा झाला.सानिका एकटीच सगळं करत राहिली.
दिवस जात होते... सानिकाच्या प्रयत्नांमुळे आनंदीची प्रगती खूप चांगली होती.पण आता नवीन नवीन डॉक्टर आणि कौन्सेलर यांची ट्रीटमेंट घेण्यासाठी खूप खर्च येत होता.इतके दिवस विनय नाखुशीने का होईना पण पैसे देत होता.पण " आता मला शक्य नाही इतके पैसे पुरवण...एकट्याच्या पगारात कसं काय जमणार ? तू सुद्धा काहीच करत नाही आणि तसही सनिकाची इतकी ट्रीटमेंट करून काय फायदा ? ती काय नॉर्मल होणार आहे...वेळीच सावर सानिका आणि हे सगळं बंद कर...तिला एखाद्या चांगल्या संस्थेत घेऊया आपण.तिथे तिच्यासारखी मुलं असतील .उगीच काहीतरी आपेक्षा ठेऊ नकोस तिच्याकडून . पदरी निराशाच पडणार आणि त्याचा त्रास फक्त तुला होणार. माझ्याच्याने आता हे झेपणार नाही...काय तो डिसिजन घे..." विनयच्या बोलण्याने सानिकाच्या मनावर झालेल्या जखमा भरण्यासारख्या नव्हत्या.
आता आनंदी फक्त आणि फक्त आपली जवाबदारी आहे यावर शिक्कमोर्तब झालं ! सानिका खूप रडली...छोटी आनंदी तिला पाहून बावरली...तिचे डोळे पुसत ती सानिकाला हस म्हणून सांगत होती आणि सानिकाला जवळ घेऊन थोपटत होती...आनंदीला बघून सानिकाने आपलं दुःख विसरलं.आता पुढे काय ? हा यक्षप्रश्न तिच्यापुढे उभा होता.
तिने ' आपुलकी ' संस्थेतल्या जोशी काकूंना आपली अडचण सांगितली...त्यांच्या संस्थेत सध्या त्यांनी सानिकाला तात्पुरती नोकरी देण्याची तयारी दाखवली ! एक आशेचा किरण सापडला...सानिका संस्थेत रमली ! आनंदी मुळे तिला तशी तिला बरीच माहिती होती त्यामुळे ती हळूहळू नवीन लोकांना कौन्सेलिंग सुद्धा करू लागली. घरातलं वातावरण खूपच गढूळ होऊ लागलं होतं...सतत होणारा त्रास आणि टोमणे यांना कंटाळून शेवटी सानिका आनंदीला घेऊन संस्थेत रहायला गेली. माहेरचे कोणीच नसल्यामुळे सानिकाला कोणाचाच आधार नव्हता.
जोशी काकूंच्या आधाराने आता सानिका आणि आनंदीच आयुष्य अगदी बदलून गेलं होतं. संस्थेचे ट्रस्टी राजे यांनी नवीनच एक बंगला आणि अजून एक आश्रम बांधला होता ,आता फक्त इंटेरियर बाकी होतं त्यासाठी ते नवीन डिझायनर शोधत होते. कोणाचच काम त्यांना पसंत पडत नव्हतं....सानिकाला हे कळलं आणि तिने आपले विचार राजे काकांना सांगितले...त्यांना सनिकाचे विचार आवडले , त्याप्रमाणे डिझाईन तयार कर असे सांगितल्यावर सानिका नव्या जोमाने कामाला लागली आणि डिझाईन पूर्ण करून तिने राजे काकांना दाखवले.ते तिला अगदी मुलीप्रमाणे वागवत होते. सनिकाच्या डिझाईन्स बघून राजे काका खूपच खुश झाले त्यांना त्यांच्या मनासारखं काम करून देणारं कोणीतरी मिळालं होतं...
पुढचे काही दिवस सानिका अगदी झपाटल्यासारख काम करत होती.स्वतः जातीने प्रत्येक गोष्ट तिने करवून घेतली होती.बंगला आणि नवीन संस्था तयार झाल्यावर एक मोठा उद्ध घटनाचा सोहळा आयोजित केला होता .जो तो सानिकाच्या कामाची तारीफ करत होता.राजे काकांनी सानिकाची ओळख अनेक मोठ्या व्यक्तींशी करून दिली...आज सानिका खूपच आनंदी होती.आपण पुन्हा एकदा काहीतरी करू शकतो ही जाणीव खूप सुखावणारी होती...काही दिवसातच सानिकाला नवीन कामांच्या ऑर्डर्स येऊ लागल्या...आनंदी सुद्धा आता ' आपुलकी ' मध्ये रमली होती.अनेक गोष्टी शिकत बरीचशी स्वावलंबी बनली होती त्यामुळे सानिका कामावर लक्ष केंद्रित करू शकत होती.आणि लवकरच सानिकाच्या कामाला सगळ्यांची पसंती मिळून तिला छान ऑर्डर्स मिळू लागल्या.पैसेही चांगले मिळू लागले.आता आनंदीला हवी ती ट्रीटमेंट मिळू शकणार होती.
आनंदी ट्रीटमेंटला चांगला प्रतिसाद देऊ लागली आणि तिची प्रगती बघून सानिका खूप खुश होती.
दिवस चालले होते आनंदी मोठी होत होती...अनेक गोष्टी ती शिकत होती.बऱ्याच गोष्टी शिकणे तिला अवघड जात होते पण रंगात ती खूप छान रमायची...तिची आवड बघून सानिकाने तिला तिची आवड जोपासण्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न केले . मदतीला ' आपुलकी ' चे अनेक शिक्षक , कौन्सेलर आणि राजे काका , कुलकर्णी काकू यांचा पाठिंबा होताच...
आनंदी खूप सुंदर सुंदर चित्रे काढायची आणि त्यात तिला अनेक प्रकारे मार्गदर्शन मिळत गेले आणि आनंदी आता एक उत्तम आर्टिस्ट म्हणून स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करू लागली होती...
आनंदी चे पहिले आर्ट एग्जीबिशन भरले होते.सानिकाने आज मुद्दाम विनयला सगळ्या घरच्यांसह आमंत्रण दिले होते. मधल्या काळात विनयने काही वेळा फक्त फोन करून जुजबी चौकशी केली होती पण आनंदी बद्दल त्याला काहीच वाटत नाही हे उघड होते.त्याला नेहेमीच आनंदीची लाज वाटायची...
" ही सानिका अतीच करते...काय दिवे लावणार आहे ती मतिमंद मुलगी. उभ्या आडव्या रेघा मारणे याशिवाय काहीच नसेल त्या चित्रांमध्ये...तिचे कौतुक फक्त सानिकाला , बाकी सगळे लोक हसत असतील ...उगीच जाऊन स्वतःची लाज काढण्यापेक्षा ओळख न दाखवलेली बरी..." असा विचार करून विनय तिकडे गेला पण कुठलीही ओळख न दाखवता दूर उभा राहून बघत होता..अनेक बडी , प्रसिद्ध मंडळी जमली होती.सगळे जण आनंदीच खूप कौतुक करत होते. चित्रं भराभर विकली जाऊ लागली...बघता बघता आनंदी लाखो रुपयांची मालकीण झाली...!
विनयचा स्वतःवर विश्वास बसेना ! तो धावत आनंदी कडे गेला..." आनंदी बाळा मी तुझा बाबा ...! किती सुंदर काढलीस ग चित्रं आज मला तुझा खूप अभिमान वाटतोय..."
" सानिका अगं हीच का आपली आनंदी ...अगदी बदलवून टाकलस तू तिला...खरंच आज माझा ऊर आनंदाने भरून आलाय..."
आनंदी बावरली...सानिका विनयला घेऊन बाहेर आली...विनय ने सानिकाचा हात हातात घेतला...तिने तो सोडवून घेतला...
" सानू मी चुकलो ग , खरंच खूप मोठी चूक झाली माझी ! मला माफ कर आणि आता तुम्ही दोघी आपल्या घरी चला .मागचं सगळं विसरून जाऊया.आणि आपल्या आनंदीला आपण खूप प्रेम आणि आधार देऊया..."
" सॉरी आता ते शक्य नाही...आनंदी फक्त माझी , आहे हो फक्त माझी...आमच्या दोघींचं एक सुंदर जग आहे आणि त्यात आम्ही दोघी अगदी आनंदात आहोत.यापुढे आम्हाला भेटण्याचा किंवा संपर्ग करण्याचा प्रयत्न करू नकोस.आज तुला मी इथे बोलावलं ये फक्त तुला खरी आनंदी दाखवण्यासाठी..." सानिका निघून गेली...आनंदीच्या आणि तिच्या जगात...जिथे ती फक्त तिची होती...!!
