तिच्या घरी सुखी राहूदे
तिच्या घरी सुखी राहूदे


सूर्य मावळतीला चालला होती .पिवळा सोनेरी प्रकाशाला अंधाराची किनार लाभत होती.कडुसं पडायला लागलं होतं.शेतावरची कामं आवरुन आयाबाया गावाकडं बिगीबिगी जायला निघाल्या. शेतकरी गडी आपली औजारं सावरत बैलगाडी हाकू लागली.बैलं दुडकत गावाकडं निघाली.त्यांच्या गळ्यातील घुंगुरमाळा गोड आवाज काढू लागल्या.घुंगरांच्या आवाजाने त्यांच्या चालीला एक लय आली होती .घरी जायची सर्वांनाच घाई होती.दिवस बुडायच्या आत गावशिवारात एकेकजण येत होता.गडी माणसं मधेच पारावर टेकत होती अन् गप्पा मारण्यात दिवसभराचा शिण घालवत होती .बाया हातपाय धुवून जरा अंगणात टेकल्या.ज्यांच्या सुना होत्या त्यांना आयताच चहा मिळाला.ज्यांच्या नव्हत्या त्यांनी थोड्यावेळाने करुन पीला.मग सुरु झाली संध्याकाळच्या स्वैपाकाची तयारी.जेवणखाण झालं की मग सगळ्या आयाबाया अंगणात येऊन बसायच्या मग त्यांचा ऊशीरपर्यंत गप्पांचा फड रंगायचा.
गावात सातवीपर्यंतच शाळाअसल्यामुळं बऱ्याच मुलींना सातवीनंतर घरीच रहावं लागे.घरकाम करावं लागे.त्यासुद्धा आनंदाने कामं शिकायच्या.एकमेकांच्या घरी जाणयेणं असायचं .सुशी , पिंकी , कमली ,शरी शबाना , आशिया अशा सर्वजण आपसात खेळत.मुलंही त्यांच्याबरोबर खेळायची.सगळच आलबेल चाललेलं.त्यांच्यातीलच एक म्हणजे सातवी झालेली
शबाना अल्लड वयातील पोर.घरच्या परिस्थिती मुळं जास्त शिक्षण घेता न आल्यामुळं घरीच आईला कामात मदत करत असे.कशाची दगदग ना घाईगडबड , त्यामुळे निवांत सगळे चालायचे . दुपारचा वेळ कामाची आवराआवर झाल्यावर सगळे आरामात असायचे , कुणी वामकुक्षी घ्यायचे.पडवीत झोपायचे.
शबाना मग कधी घरात दूरदर्शनवर कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवी कींवा शेजारच्या काकूंच्या घरी जाई.सुनील वीस वर्षाचा देखणा तरुण.बोलायलाही छान होता.तसे दोघेही अल्लड वयातीलच .दोघेही एकमेकांशी बोलायची . गप्पा मारायची. हळूहळू दोघांना एकमेकांबरोबर बोलणं , सहवास चांगला वाटू लागला .मग दोघांच्या नजरेची भाषा व भावनांची देवाणघेवाण नकळत सुरु झाली. दोघेही हळूहळू एकमेकांकडे ओढले जाऊ लागले. सुनील च्या घरी शबाना चे येणेजाणे वाढलं.
माळ्यावर पिकायला टाकलेलं आंबा जसा हळूहळू पिकतो व त्याची गोडी वाढते अगदी तसच सुनील आणि शबाना च प्रेम गोड होत होतं..जशी झाडावरच्या चिंचे ची गोडी एखाद्या मुलीला लागावी तशी गोडी सुनील ला लागत होती..गावातून हिंडून फिरून दमून आलेला सुनील शबाना दिसली की अगदी चिंचेच्या झाडासारखा मोहरून जायचा.. खेड्यातल हे उनाड प्रेम मोगऱ्यारखं फुलत होतं
सुनिल ची आई विधवा स्त्री , चार घरची भांडी , धुणी करुन मुलांना तीने वाढवले होतं .तीला आपल्या मुलांकडून खूप अपेक्षा होत्या. बापाचे छत्र नसलं की धाक दाखवायला कुणी नसलं तर मग मुलं अंदाज घेतात व नकळत ती वाईट मार्गाला लागतात. त्यांच्यावर योग्य वेळी अंकुश नाही ठेवला तर कालांतराने ती निर्ढावतात व नंतर हाताबाहेर गेले की आवरता आवरत नाहीत.पण आईने जर योग्य वेळी खंबीर होऊन कडक निर्णय घेतले तर मुलांना जरब बसते.याचाच फायदा सुनील च्या लहान भावाने घेतला.तो वाईट संगतीला लागला . चोऱ्या माऱ्या करु लागला. पोलीस एकदादोनदा घरी येऊन गेलं.आजूबाजूला बदनामी झाली.सुनील ने त्याला वडीलकीच्या नात्याने खूप समजावून सांगितलं, पण सारे व्यर्थ गेलं.
याचा परिणाम व्हायचा तोच झाला. त्याप्रसंगानंतर असा झाला की शबाना च्या घरचं तीला त्या घरी पाठवनासे झाले. आता दोघांच्या भेटी होत नव्हत्या.दोघांच्या ही नकळत प्रीतफुलाचा सुगंध दरवळत होता.त्यांना एकमेकांची ओढ लागली होती. पण भेटणार कसं ? प्रश्न निर्माण झाला. मग काहीतरी कारण काढून शबाना बाहेर जाऊन ऊभं राहू लागली. माळावर , देवळाच्या मागं एकमेकांशी भेट घेऊ लागले.मावळतीच्या सूर्याला साक्षी ठेवून आणाभाका,शपथा घेतल्या जाऊ लागल्या.मोगऱ्याच्या फुलासारखं शबाना सुनीलला मोहवू लागली.तोपण वेड्यासारखं तीच्या मागं मागं करु लागला." शबाना, मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही गं " असे तो तिला म्हणायचा.शबाना मोहरुन जायचीव म्हणायची, " सुनील, मला तरी तुझ्याशिवाय कुठं गमतं रे ? "पण शबाना मला भिती वाटते,आपलं हे प्रेम जर घरच्यांना समजले तर कसं होईल ? " सुनील च्या या प्रश्नावर शबाना ही घाबरायची व म्हणायची, " मग आपण काय आणि कसं करायचे रे ? " त्यांच्या मनात आलेले विचार काही निराधार नव्हते.त्यांच्यातील हे प्रेम हळूहळू सगळ्यांच्या लक्षात यायला लागले.
शबाना च्या घरच्या लोकांच्या नजरेस ही गोष्ट आली.मग काय तीच्यावर बंधनांचा डोंगर आला." अजिबात घराच्या बाहेर जायचं नाही तू." तिचे वडील शबानाला ओरडले.सतत पाळत ठेवणं आलं.पण दोघांमधला प्रेमांकुर अजूनच रुजत होता.प्रेम हे स्प्रींगाप्रमाणे असतं.त्याला जेवढं दाबाल तेवढं ते जास्त वेगाने ऊसळतं.तसेच दोघांचही झालं.एकमेकाबद्दलची अनावर ओढ शांत बसू देत नव्हती. भर ऊनात तापून आल्यावर सावलीची अपेक्षा आसते व ती नाही मिळाली की तगमग जास्तच वाढते.अगदी तसच या दोघांचही झालेलं .समाजबंधनामुळे ते भेटू शकत नव्हते.थोडं जरी बाहेर गेलं की आई ओरडायची ," बाहेर काय काम आहे ? आत ये आधी " नजर चुकवून कधीतरी ती बाहेर आली व ते घरच्यांना दिसले की मग तिला मारहाण होऊ लागली. जवळच घर असल्यामुळे सुनिलला हे सर्व समजत होतं.पाण्याविना तडफडणाऱ्या माशांप्रमाणे दोघांचीही हालत झाली होती. एकदिवस सुनील ने धाडस करुन एक चिठ्ठी लिहली व शबानाच्या घरात दुपारी कोण बाहेर नाही हे पाहून शबाना बाहेरच्या खोलीत असताना टाकून दिली. शबानाच्या मनात ती चिठ्ठी पाहून आनंद झाला. त्यात सुनील ने आपला फोन नंबर दिला होता.घरात सगळे विश्रांती घेत होते. शबानाने घाबरत हळू आवाजात फोन केला."हॅलो,मी शबाना" .सुनील शबानाच्या आवाजाने आनंदित झाला.तो म्हणाला, " शबाना,अगं तुझ्या आवाजाने माझे कान तृप्त झाले बघ.कशी आहेस ? " शबानाच्या भावनांचा बांध तुटला व ती रडू लागली.सुनीललापण रडू येऊ लागले.बराच वेळ बोलल्यानंतर मग त्यांनी घेतला एक भयंकर निर्णय .घरातून पळून जाण्याचा.!!!दिवस ठरला ,!! वेळ ठरली . !!
शबाना आईबरोबर बाहेर गावी गेली होती . शबानाने फोनवर सुनीलला सांगितले होते.त्यांचे सर्व ठरले होते.ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी सुनील गाडी घेऊन ऊभा राहीला.खूप वेळ तो वाट पहात उभा होता.फोन तरी कसा करायचा ? फोन तीच्याकडे नव्हता .संपर्क कसा साधणार ? त्याने खूप वेळ वाट पाहीली.शेवटी तो तिथून जायला निघाला.तेवढ्यात फोन वाजला. गडबडीने सुनील ने फोन उचलला.फोन शबानाचा होता.तिने " आपण ठरवलेल्या ठिकाणी मी आले आहे, तू कुठायसं? " त्याचे नियोजन सगळे कोलमडले होते.तरीपण त्यांनी नियोजन केले.दोघांची भेट झाली .आता वेळ घालवण्यात अर्थ नव्हता . दोघांनी मिळून गाव सोडून जायचे ठरवले व तातडीने निघाले... धाडशी निर्णय ! कुठे जायचे ? काय खायचे ? सर्व प्रश्न गौण होते यावेळी.
शबानाच्या आईनच्या थोड्या वेळाने लक्षात आले की शबाना दिसत नाही. " शबाना, शबाना " तिने हाका मारल्या. पण काहीच पत्युत्तर नव्हते.ती घाबरली व आरडाओरडा करु लागली.घरातले सगळे शोधू लागले.तिने मग आपल्या नवऱ्याला कळविलं. ती डोकं बडवून घेऊ लागली.तीचा तो आकांत ऐकायला शबाना कुठं होती ? ती निघाली होती एका अनिश्चित अशा प्रवासाला.!!गांव तसं छोटच होत पण एका कार्यक्रमामुळे आज थोडी गर्दी होती.शबानाचे वडील आपल्या मित्रांना सोबत घेऊन आले.शोधाशोध झाली, पण व्यर्थ ! शेवटी रितसर पोलीसांत तक्रार नोंदवण्यात आली.
पोलिसांनी तपास सुरु केला.तपासचक्रे वेगात फीरु लागली.विविध ठिकाणी चौकशा सुरु झाल्या.शक्यता वाटणाऱ्या सर्व ठिकाणी शोधून झाले. इकडे शबाना व सुनील एकमेकांना पहात नजरेस नजर भिडवून भविष्यातील स्वप्ने रंगवत होते." सुनील आपल्याला पकडले तर काय करायचे रे? "शबानाने विचारले. सुनील म्हणाला, " हे बघ शबाना, काही झाले तरी तू विचार बदलायचा नाही. दोघांनी एकच उत्तर द्यायचे." दोघांचेही काय बोलायचे हे ठरले. पण हे जास्त काळ टीकले नाही. दोनचार दिवसातच पोलिसांनी त्या दोघांना शोधून काढले.सुनील च्या एका मित्राच्या घरातून दोघांना पकडून आणलं गेलं.दोघेही एकमेकांना सोडायला तयार नव्हतं.शबानाचे वडील ,त्यांचे मित्र व नातेवाईकांच्याबरोबर पोलीसस्टेशनमध्ये आले.त्यांचा तो अवतार पाहील्यावर शबानाने सांगितलं की, " मी जर घरी गेले तर मला वडील मारून टाकतील.मला सुनीलबरोबरच रहायचे आहे." पोलीसांनी समजावून सांगितले. वडीलांच्या समोर तीला आश्वस्त केल.खूप मिनतवाऱ्या करुन शेवटी ती घरी जायला तयार झाली.तीचं लग्न सुनीलबरोबरच करु पण नंतर ,असे सांगून तीला घरी नेण्यात आलं.
शबाना तर घरी गेली.मात्र सुनीलला अज्ञान मुलीला पळवल्याबद्दल शिक्षा झाली. तुरुंगवास झाला.त्याच सारे भविष्य अंधारात बुडाले.पण आता ऊपयोग काय ?भावनेच्या भरात आपण काय केलं हे सुनील ला कळतं होतं पण आता वेळ निघून गेली होती.त्याच्या नोकरीवर पण गदा आली.प्रेम पोटाला घालत नाही हे परत एकदा सिद्ध झालं. तो तुरुंगात असतानाच काही महीन्यानंतर शबानाचे त्यांच्याच जातीत लग्न लावून दिल गेलं.तीने खूप विरोध केला पण काय ऊपयोग झाला नाही. सुनीलला हे जेव्हा कळाले तेव्हा त्याला खूप दूःख झाले. पण तो समझदार होता.त्याने शबानाला आपल्या मनातच ठेवले.त्याचे प्रदर्शन केलं नाही. तेवढा शहाणपणा दाखवला.दुधाने पोळले की ताक पण फुंकून पितात,तसेच त्याचे झाले होते.त्याला आयुष्यात एक चांगला अनुभवाचा धडा मिळाला होता.
मध्ये एकदा दोनदा शबानाने सुनीलला फोन करुन बोलण्याचा प्रयत्न केला पण यावेळी सुनील ठाम राहिला. त्याला आपल्याबरोबर शबानाचे आयुष्य बरबाद करायचे नव्हते.तो म्हणाला, "हे बघ शबाना, तुझे आता लग्न झाले आहे.तुला तुझ्या संसारात लक्ष घातले पाहिजे. मी तुला असे सांगत नाही की तू मला विसर म्हणून.ते शक्य ही नाही. मीही तूला कधीच विसरणार नाही. पण आतापर्यंत आपले मार्ग वेगवेगळे झाले आहेत.मी सुखी असेनही नसेनही पण निदान तू तरी तुझ्या घरी तू सुखी रहा " सुनील चे बोलणे ऐकून शबानाच्या हृदयात एक सल उठली.तिलाही ते पटले.मनाशी निर्धार करुन तिने डोळ्यात आलेले अश्रू पुसले.मनाच्या एका कोपऱ्यात सुनीलला कायमचे बसवून ती संसारात रमली.