Manik Nagave

Others

4.3  

Manik Nagave

Others

मुंबईचा पाऊस व परतीचा प्रवास

मुंबईचा पाऊस व परतीचा प्रवास

15 mins
909


निमित्त होतं कविसंमेलनाला जायचं. एक महिना रेल्वेचं बुकिंग केलेलं. माझ्या सहकारी शिक्षिका सौ.अनुपमा पोतदार व मी असे दोघीच जाणार होतो. त्यांचं माहेर कल्याण. कल्याणलाच कवी संमेलनाचा कार्यक्रम असल्याने एका दगडात दोन पक्षी मारणे होणार होते. त्याही त्यांच्या माहेरी सर्वांना भेटू शकत होत्या व माझेही कविसंमेलन होणार होते. आरक्षण झाल्यामुळे आम्ही निश्चिंत होतो. जुलै महिना होता. अजून एवढा पाऊस नव्हता. पण जायचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला तसतसा पावसानंही जोर घेतला. हवामान खात्याने अंदाज वर्तवला की जुलैच्या शेवटच्या आठवड्यात अतिवृष्टी होणार आहे. मनात शंकेची पाल चुकचुकली. पण बघू या म्हणून आम्ही शांत राहिलो. शेवटी जायचा 26 जुलै हा दिवस जवळ आला. फोन करून संयोजकांना तसेच रेल्वे स्टेशनवर जाऊन चौकशी केली. पण दोन्हीकडून सकारात्मक उत्तर आल्यामुळे आम्ही निवांत झालो. दुसर्‍या दिवशी पेपरमध्ये बातमी आली की, मुंबईमध्ये अतिवृष्टीचा इशारा... आता आली का पंचाईत? काय करावे बरे? परत चौकशी करणे सुरू झाले. सकारात्मक उत्तरे आल्यामुळे आम्ही प्रवासाचे निश्चित केले. रेल्वेमध्ये बसण्याआधीही चौकशी केली की रेल्वे मुंबईपर्यंत जाते का? कारण बातमीही तशीच होती पुण्याच्या पुढे रेल्वे बंद करण्यात आली आहे. चौकशीअंती रेल्वे जाईल असे सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही रात्री साडेदहाच्या महालक्ष्मी एक्स्प्रेसने निघालो. प्रवास सुरू झाला. बारा वाजेपर्यंत गप्पा मारत बसलो. का कोणास ठावुक मनात शंकाकुशंका येत होत्या.

मी पोतदार मॅडमना विचारले, "काय हो काय व्यवस्थित पोहोचू ना?"

त्या म्हणाल्या, "काय कळेना, गाडीपण वेग घेत नाही." शेवटी थोडे जागे, थोडी झोप असं करत आम्ही झोपी गेलो. साडेतीनच्या सुमारास रेल्वेत हालचाल जाणवू लागली. चर्चा ऐकू येऊ लागली, "रेल्वे पुण्याच्या पुढे जाणार नाही" खाडकन डोळे उघडले. " हे काय ऐकतोय आपण?" एकएक करत सर्वजण जागे झाले.

"काय झाले?, काय झाले?", एकमेकांना विचारू लागले. परत तेच उत्तर आले.

मी म्हणाले, "तुम्हाला कसे काय कळाले?" 

ती व्यक्ती म्हणाली, "मेसेज आलाय तसा मोबाईलवर." 

लागलीच मोबाईल काढला व पाहिलं तर काय!!!! मेसेज अडीचलाच येऊन पडला होता. अतिवृष्टी व पाणी साठल्यामुळे रेल्वे पुण्याच्या पुढे जाऊ शकणार नाही. काळजात धस्स झालं!!! हे काय आणि नवीन? आम्ही दोघी प्रथमच एकट्याने रेल्वे प्रवास करीत होतो. आता काय करायचे? दोघींच्याकडेही उत्तर नव्हते. हळूहळू थांबत, थांबत सकाळी सात वाजता एकदाची रेल्वे पुण्यात पोहोचली व घोषणा झाली रेल्वे पुढे जाऊ शकणार नाही, प्रवाशांनी उतरून घ्यावं... आता आमचा नाईलाज होता. बॅगा घेऊन खाली उतरल्याशिवाय पर्याय नव्हता. पाऊस चालूच होता. पुढे काय? परत जावं का पुढे जावं? काही कळेना. स्टेशनवरील महिला कक्षामध्ये गेलो व विचार करू लागलो. फ्रेश होऊ या म्हटलं, बाथरूममध्ये गेले तर तेथे पाणीसुद्धा नव्हते. थोडा वेळ तसेच शांत बसलो. काही वेळाने काही प्रवासी मुंबईला निघाले होते. आम्हीही जायचे ठरवले. स्टेशनच्या बाहेर बस मिळेल असे सांगण्यात आले. तेवढ्यात मोबाईलवर मेसेज आला की बदलापूरजवळ महालक्ष्मी एक्सप्रेस पाण्यात अडकलेली आहे. चहुबाजूंनी पाणी वेढलेले फोटो, व्हिडिओ प्रसारीत होऊ लागले. उलटसुलट बातम्यांना ऊत आला. सर्वांचे चेहरे चिंताक्रांत दिसू लागले. उल्हास नदीने रौद्ररूप धारण केले होते. वांगणीला महालक्ष्मी एक्सप्रेस बंद पडल्यामुळे पुढे जाऊ शकत नव्हती, त्यामुळे सर्व वाहतूक ठप्प झाली होती. संयोजकांशी संपर्क साधत होते. त्यांनी बसने या असे सुचवले. तेवढ्यात एकजण चौकशी सेंटरमधून हातात तिकिटाचे कागद घेऊन आला. त्याला विचारल्यावर कळले की, तिकिटाचे पैसे परत देत आहेत. तिथे जाऊन चौकशी केली असता कळले की ऑनलाईन तिकीट बुक करणाऱ्यांना पैसे परत मिळणार नाहीत. ऑनलाईन प्रयत्न करा. तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील. ऑनलाईन बुकिंगचा तोटा लक्षात आला पण काही वेळाने त्यांना कळविल्यानंतर त्यांनी प्रामाणिकपणे पैसे खात्यात वर्ग केले. थोडे हायसे वाटले.

तिथे कार्यालयात चौकशी केली की आता मुंबईला कसे जायचे? तर ते म्हणाले, "आता लातूर एक्सप्रेस येईल ती जाईल पनवेलमार्गे", त्यांना आम्ही परत परत विचारले, "जाईल ना नक्की?" ते हो म्हणताच परत तिकीट काढलं. बाहेर आलो, आता रेल्वे कुठे थांबणार हे कुठे माहीत होतं... शेजारी एका व्यक्तीला विचारल्यावर त्याने सांगितले, "आता बोर्डावर दिसेल तिकडे लक्ष ठेवा."  हे सर्व आमच्यासाठी नवीनच होतं. दुसरा उपाय नव्हता. हताशपणे बोर्डाकडे पाहात बसलो. थोड्या वेळाने बोर्डावर लातूर एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 3 वर लागेल असे जाहीर केले. परत प्रश्न, "आता तिथे कसं पोहोचायचं?" प्रश्नांवर प्रश्न मनात रुंजी घालू लागले. ‘आलिया भोगासी असावे सादर…’ असे म्हणून बॅगा उचलल्या तर काय... बॅगेचे एका बाजूचे बंद तुटले व बॅग लोंबकळू लागली. घाईगडबडीत जाताना आपल्या लहान मुलाला हाताला धरून आई ओढत जाते ते दृश्य डोळ्यासमोर दिसू लागले. हसावे की रडावे कळेना...

मी मॅडमना म्हटलं, "अहो हे बघा बंद तुटले, आता काय करायचे?"

त्या म्हणाल्या, "दुष्काळात धोंडा महिना, टाचणीने बसते का पहा" सुदैवाने टाचणी होती जवळ ती बंदाला धरून पर्सला लावली. तात्पुरती उपाययोजना झाली. आता महत्त्वाचं काम होतं ते प्लॅटफॉर्म शोधायचं. तिथे एक जोडी उभी होती त्यांना विचारलं, " अहो प्लॅटफॉर्म नंबर 3 कुठाय? व तिथे कसं जायचं?"

ते म्हणाले, "चला आमच्याबरोबर आम्ही तिकडे चाललोय." असे म्हणून ते जिन्याच्या पायर्‍या चढून वर जाऊ लागले. मी बॅग काखेत घेतली दोघीही त्यांच्या पाठीमागे निघालो. ते दोघे तरुण असल्यामुळे भरभर पायर्‍या चढून पुढे जाऊ लागले. त्यांना आम्ही येतोय की नाही याचं काहीच सोयरसुतक नव्हतं. त्यांना गाठण्यासाठी आम्हाला वेग वाढवण्यावाचून पर्यायच नव्हता. पण या पळापळीने मला धाप लागू लागली, चांगलीच दमछाक झाली. आयुष्यात असा प्रसंग कधी आमच्यावर आला नव्हता. पण म्हणतात ना... वेळ आली की सर्व काही सुचते. सकारात्मकता जागी होती. आमची अवस्था पाहून आम्हाला हसू येत होते. हे आम्हाला कसं शक्य होत आहे हेच आम्हाला कळत नव्हतं. मनात थोडी भीती होती. तसेच हसत निघालो. जिना संपला. व पलीकडून उतरून प्लॅटफॉर्मवर गेलो. ते दोघे थोडे थांबले व हाच प्लॅटफॉर्म सांगून पुढे जाऊ लागले. रेल्वेचा डबा कुठे लागतो हे कुठे माहीत होतं? तिथे एक कॉलेजकुमार उभा होता. त्याला विचारलं," अरे लातूर एक्सप्रेस इथे थांबते का?" त्यावर तो म्हणाला," हाँ यहींपर ठहरती है, आप वहाँ जाकर खडे रहो, वहाँपर लेडिज डिब्बा लगता है।" त्याने हिंदीत सांगितले.

थोड्या वेळातच रेल्वे आली व धडधड करत पुढे गेली. अगदी शेवटचे तीनच डबे आमच्या समोर उभे होते. तो म्हणाला, "आंटी तुम उस डिब्बे में बैठो।" त्याला काय वाटले कोणास ठाऊक आम्हाला महिलांचा डबा दाखवून तो दुसऱ्या डब्यामध्ये चढला. आम्हीही बाकीचा काहीही विचार न करता त्या शेवटच्या डब्यांमध्ये चढलो. एखादा पराक्रम केल्यासारखे वाटले. पण क्षणभरच... कारण आत जाऊन पाहतो तो काय !!! अगदी छोटासा डबा होता तो.आधीच चार-पाच महिला निवांत बसून होत्या. खिडकीकडे दोन जागा मोकळ्या होत्या तिथे आम्ही बसलो. पावसाचे पाणी आत येत असल्यामुळे बसायची जागा, व खाली सर्वत्र ओलच होती. थोडी कोरडी जागा होती त्या ठिकाणी बॅगा ठेवल्या व बाकावर बसलो. मग मोबाईल हाती घेतला व मेसेज बघितला. संयोजकांचा मेसेज होता कोणत्याही परिस्थितीमध्ये रेल्वेने येऊ नका, आहे तिथे रेल्वे सोडा व बसने या.रेल्वे तर सुरू झाली होती, द्विधा मनस्थिती निर्माण झाली. नुकताच आईचा फोन येऊन गेला होता. आधी तिला फोन लावला व सर्व परिस्थिती सांगितली. पुराच्या, पावसाच्या, पाण्यात अडकलेल्या रेल्वेच्या बातम्या सर्वत्र पोचल्या होत्या. सर्वांचे फोन येऊ लागले, " काय, कुठे आहात? कसे आहात? काही धोका नाही ना? सर्वांना उत्तर देत आम्हीच आता अशाश्वततेकडे निघालो होतो. एका ओळखीच्या साहित्यिकांचा फोन आला, "ताई तुम्ही कुठे आहात?" मी म्हटलं रेल्वेत आहे. ते म्हणाले, "अहो ताई, मी तुम्हाला बसनेच या म्हणून सांगितलं होतं. आता पहिलं कोणतं स्टेशन येईल तिथे उतरून घ्या". मी मॅडमना म्हटलं, "आता हो काय करायचं? कोठे उतरायचं? तुमच्या कोण ओळखीचे आहेत का बघा. त्यांना विचारू या," त्या म्हणाल्या, "खंडाळ्यापर्यंत बघू,' त्यांचे एक नातेवाईक खंडाळ्याला होते त्यांना त्यांनी फोन करून चौकशी केली तर ते म्हणाले, "इथे अजिबात उतरु नका कारण येथून मुंबईला किंवा परत पुण्याला जायला वाहन मिळणारच नाही. तुम्हाला रेल्वेशिवाय पर्याय नाही." आता तर काहीच समजेना. कर्जतपर्यंत जायचं ठरलं.

बाहेर धो धो पाऊस कोसळत होता. वातावरण कुंद व ढगाळलेले झाले होते. आकाश जणू धरतीवर आल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे रेल्वेचा वेग अतिशय कमी होता. थोड्या थोड्या वेळाने रेल्वे थांबत,थांबत पुढे जात होती. खंबाटकी घाटातून रेल्वे निघाली होती. सारखे बोगदे लागत होते. बोगद्यातून जाताना अंधार पडला की जीव घाबराघुबरा व्हायचा. काही वेळेला एका बाजूला खोल दरी दिसायची व धडकी भरायची. डोळे गच्च मिटून घ्यावे असे वाटायचे. एक चित्तथरारक अनुभव आम्ही अनुभवत होतो. असल्या भयानक वातावरणात पाण्याचे ओहोळ, डोंगरदरीतून वाहणारे छोटे-मोठे धबधबे डोळ्यांना सुखावत होते. पावसाचे तुषार अंगावर येत होते. असा अनुभव आम्हाला कधीच घेता आला नसता. रेल्वे अतिशय संथ गतीने पुढे पुढे सरकत होती. गाडीला अजिबात वेग नव्हता. मनात शंकेची पाल चुकचुकली. ही गाडीपण मुंबईपर्यंत जाण्याची शक्यता कमी दिसू लागली. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी आमची गत झाली. आम्ही पुढे पण जाऊ शकत नव्हतो व मागे पण जाऊ शकत नव्हतो. पाऊस काही थांबायचे नावच घेत नव्हता. रेल्वे जसजशी पुढे जात होती तसतसे रुळावर पाणी दिसू लागले. जाताना तर पाण्याचा एवढा मोठा लोट होता की जणू रेल्वे धबधब्याखालून चालली आहे की काय असे वाटत होते. एकदा तर असा प्रसंग आला की पुढे मार्ग नसल्यामुळे किंवा कसल्यातरी कारणाने रेल्वे हळूहळू थांबली. आमचा डबा शेवटचा असल्यामुळे डबा एका दरीवरच उभा राहिला. ते दृश्य पाहिलं आणि काळजाचा ठोकाच चुकला. बाप रे!!! नको नको ते विचार मनात यायला लागले. आम्ही दोघींनी एकमेकांना धीर दिला. डब्यातील इतर महिला निवांत होत्या. त्यांनाही फोन येत होते पण त्यांच्यापैकी यावर उपाय सुचवणारी एकही नव्हती. आम्हाला असं वाटायला लागलं की त्या मुलाचे ऐकून आम्ही या महिलांच्या डब्यात उगीचच चढलो. पुरुषांच्या डब्यात बसलो असतो तर काही माहिती तरी मिळाली असती. पण आता याचा काहीही उपयोग होणार नव्हता. शांत बसून राहण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता. बराच वेळ गाडी तिथे उभी असल्यामुळे बाहेरचे दृष्य बघू लागलो. आणि अचानक मनात विचार आला आणि माझे मलाच आश्चर्य वाटले कारण या प्रवासामध्ये मी एकदाही फोटो काढले नव्हते. कारण फोटो काढायला सुचलंच नव्हतं, तशी मानसिकताही नव्हती. कोणत्याही गोष्टीला जेव्हा पर्याय राहत नाही तेव्हा मग मनुष्य कोणतीही गोष्ट आहे तसा स्वीकारतो. तसेच आमचेही झाले.

आता आम्ही रेल्वेतून उतरुही शकत नव्हतो व डबाही बदलू शकत नव्हतो. मग आमचं बाहेरच्या निसर्गाकडे लक्ष गेलं. दरीकडे पाहू लागलो. घनदाट दरी हिरवीगार दिसत होती. त्यातून वाहणारे ओहोळ, कोसळणारे धबधबे आम्हाला खुणावू लागले. मला कविता सुचू लागल्या. पण जवळ कागद नसल्यामुळे मी शांत बसले. थोड्या वेळाने मी मोबाईलवर दोन-चार फोटो घेतले. तेवढ्यात रेल्वे पुन्हा सुरू झाली व त्या दरीवरून पुढे गेली आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. आता कर्जतपर्यंत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. पण गाडी तिथपर्यंत जाईल की नाही शंका वाटू लागली. संततधार चालूच होती. मुंबईहून येणारी महालक्ष्मी एक्सप्रेस पाण्यात अडकलेली होती व आम्हीही महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईला निघालो असल्यामुळे दोघींच्याही घरातील सर्वजण घाबरले होते. सर्वांना फोन करून तशी परिस्थिती नाही, आम्ही सुरक्षित आहोत हे सांगत होतो. पण बराच वेळ झाला त्यामुळे फोनही लागत नव्हते. सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

आमच्या आईने तर हायच खाल्ली होती. तिचा रक्तदाब वाढला. दवाखान्यात नेले गेले. तिथे गेल्यानंतर ई.सी.जी., कार्डिओग्राम काढायला सांगितले. वडिलांचा फोन आला मी त्यांना फोनवर सांगितले की, आम्ही सुरक्षित आहोत म्हणून तिला सांगा मग पहिल्यांदा घरातील टीव्ही बंद करायला सांगितला. कारण पुन्हा पुन्हा त्याच त्याच बातम्या ऐकून कोणीही घाबरले असते. मी आईकडे फोन द्यायला सांगितला व तिला म्हणाले "आम्ही सुरक्षित आहोत तू काळजी करू नकोस, आम्ही आता पुढे प्रवासाला मुंबईला जात नाही. आम्ही आता परतीच्या प्रवासाला लागणार आहोत". तेव्हा तिला थोडी शांत झाली. मॅडमच्या घरचेसुद्धा फोन करत होते. त्यांनाही त्या समजावत होत्या. पण आमची मने मात्र दोलायमान झालेली होती. आता काय करायचे? पुढे जायचे की मागे फिरायचे? पाऊस धुवांधार चालू होता, लवकर थांबेल असे वाटत नव्हते. शेवटी एकदा कर्जत स्टेशन आले. हुश्श्य!!! पुढे जागा नसल्यामुळे गाडी हळूहळू पुढे सरकत स्टेशनजवळ थांबली. काही डबे स्टेशनच्या बाहेर होते. आमचा डबा तर सर्वांत शेवटी होता. रेल्वे आता पुढे जाणार नाही असे दिसू लागले. कर्जत तर आले होते पण गाडी प्लॅटफॉर्मच्या बाहेर उभी होती. बाहेर येउन पाहिले तर उतरायला काहीच नव्हते. पलीकडच्या डब्यातून लोक उतरू लागले. त्यांच्याकडून समजलं गाडी पुढे जाऊ शकत नाही. सर्वांनी खाली उतरा. खाली उतरा म्हणणे सोपे होते पण आम्ही कसे उतरणार? बाहेर येऊन पाहिले तर तिथे स्टेशनमास्तर उभे होते. त्यांना विचारलं, "अहो, काय झालं?" ते म्हणाले, "पावसामुळे सर्व मार्ग बंद झाले आहेत, त्यामुळे गाडी पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही आता खाली उतरा."

खाली पाहिले तर पायऱ्या कुठे दिसेनात. मी त्यांना म्हणाले, "आम्ही कसे उतरणार?" स्टेशन मास्तर चांगले होते ते म्हणाले, "उतरा खाली, मी मदत करतो." बॅगा घेऊन दरवाज्यात आलो. खाली उभ्या असलेल्या स्टेशन मास्तरांच्याकडे बॅगा दिल्या. त्यांनी त्या घेऊन खाली ठेवल्या. आता आम्ही उतरणार!! रेल्वेच्या पायऱ्या एकाखाली एक असल्यामुळे त्या मला दिसेचनात. एखादा गड उतरण्यासारखे काम होते ते. रेल्वेकडे तोंड करून खांबाना धरून हळूहळू एकाएका पायरीवर अंदाजाने पाय ठेवत शेवटी एकदाचे खाली उतरलो. आता पलीकडे जायचे तर एक मोठा नाला ओलांडून जायचे होते. आलिया भोगासी असावे सादर असे म्हणत बॅगा उचलल्या व स्टेशन मास्तरांच्या सहाय्याने पलीकडे गेलो. पावसात भिजतच स्टेशनमध्ये गेलो. स्टेशनवर आल्यावर कळाले आता रेल्वेचा प्रवास बंद. मागेही नाही व पुढेही नाही. बसच्या प्रवासाशिवाय गत्यंतर नव्हते. बस स्टॅण्ड कुठे आहे याची चौकशी केली असता पलीकडे या जिन्यावरून जा, असं सांगण्यात आलं. परत ते जीने चढणे-उतरणे आलं... आता मनाचा निर्धार पक्का केला. विषाची परीक्षा जास्त बघायला नको, असे ठरवले व मुंबईला रामराम ठोकू या व आपण परतीच्या प्रवासाला लागू या असे नक्की झाले.

त्याप्रमाणे चौकशी करत स्टेशनच्या बाहेर येऊन उभ्या राहिलो. "बस कुठे थांबते?" विचारल्यानंतर, "हे काय पलीकडेच" असे सांगण्यात आले. सर्वजणच निघाले होते त्यामुळे आम्हीही निघालो. एका हातात बॅगा दुसऱ्या हातात छत्री घेऊन निघालो. बाहेर येऊन पाहतो तर काय स्टॅण्ड काही दिसेना. फक्त रिक्षा, वडापच्या गाड्या दिसू लागल्या. त्या सर्व पनवेल, खोपोलीला जाणाऱ्या होत्या. बरेचजण त्या गाड्यांतून निघून जाऊ लागले. आम्हाला काय कल्पनाच नव्हती त्यामुळे आम्ही बसने जायचं ठरवलं. पण बस काही दिसेना. पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले. एकाला विचारलं, "बस स्टॅण्ड कुठे आहे?" तर त्याने एका दिशेला हात करून सांगितले, 'ते बघा पुढे दिसतंय ना त्या झाडाजवळ तिथे जा.'  म्हटलं,"जवळ आहे का?" हो आहे असे म्हणून तो निघून गेला. त्याने दाखवलेल्या वाटेने निघालो. पाऊस प्रचंड होता. आमची अवस्था तर बघण्यासारखी झाली होती. बॅगा व छत्री सांभाळत रस्त्यावरच्या पावसाने साचलेल्या घोट्याएवढ्या पाण्यातून निघालो. जवळ पंधरा ते वीस मिनिटे चाललो तरी स्टॅण्ड दिसेना. तसेच चालत राहिलो. निम्मे कपडे पाण्याने भिजलेले होते. या अशा अवस्थेत व परिस्थितीमध्ये आम्ही आमची सकारात्मकता जागृत ठेवली होती व स्वतःवरच हसत आम्ही पुढे निघालो. थोडं पुढे गेल्यानंतर एक एसटी वळताना दिसली. थोडं हायसं वाटलं. आता परतीचा निर्णय पक्का झाला असल्यामुळे आमच्यावरचा बराच तणाव कमी झाला होता. आम्हाला आता मजा वाटू लागली होती. एका थरारक, रोमांचकारी सहलीचा आस्वाद घेतोय, असं वाटू लागलं. डॉक्टर चप्पल असल्यामुळे भिजल्यामुळे ती खूप जड झाली होती. कारण त्यात पाणी भरले होते. तसेच एकदाचे पाय ओढतओढत कर्जत स्टँडवर पोहोचलो. हुश्श!!!! आले एकदाचे स्टॅंड असे वाटले. पण अजून परीक्षा बाकी होती कारण स्टँडवर चौकशी केली असता पनवेलला गाड्या आहेत पण पुण्याकडे जायला गाड्या जास्त नाहीत. खोपोलीपर्यंत जावं लागेल. आत्ताच एक गाडी गेली दुसरी गाडी भरली तर सोडणार असे सांगितले गेले. आता स्टँडवर बसण्याशिवाय पर्याय नव्हता. बसावं म्हटलं तर सगळीकडेच ओल होती, कारण पाऊस कसाही कोसळत होता. माणसाबरोबर कुत्र्यांनीही तिथेच आसरा घेतला होता. त्यामुळे ते चावतील या भीतीने एका बाजूला कोपऱ्यात एकच जागा मिळाली तिथे बसलो. मुंबईकडे जाणाऱ्या दोन-तीन बसेस गेल्या पण खोपोलीला जाणारी बस काही भरेना. अर्धा तास बसून होतो. सकाळपासून उपाशीच आहोत याची जाणीव अजिबात झाली नव्हती. आता शांत बसल्यानंतर भुकेची संवेदना जाणवली. दुपारचा एक वाजला होता. जवळपास कुठेही हॉटेल नव्हते. आमच्याच झालेल्या फजितीवर हसत होतो. एवढ्या जवळ येऊन त्यांना आईला, माहेरच्या माणसांना भेटता आले नाही याचे दुःख होते, तर मला संमेलनाला हजर राहता येणार नाही म्हणून दुःख वाटत होते. पण तिथली ती भयानक परिस्थिती पाहता आम्ही घेतलेला निर्णय हा योग्य होता असे वाटून थोडे हायसे वाटले.

जवळजवळ अर्धा-पाऊण तासाने एक बस भरली. बसमध्ये सर्वत्र ओलच

होती. सर्व कपडे ओले झाल्यामुळे त्या ओलीचे आता मला काहीच वाटत नव्हते. आमचा

खोपोलीकडे जाण्याचा प्रवास सुरू झाला. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे बसचालकाला ही बस

चालवणे अवघड जात होते. रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. पावसाचे कोसळणे

चालूच होते. तास-दीड तासांमध्ये खोपोली आले. स्टॅंडवर न जाता बस अलीकडेच थांबली. इथेच उतरा, असे सांगण्यात आले. खाली उतरलो, स्टँडची चौकशी केली व चालू लागलो. पाच मिनिटाच्या अंतरावर स्टँड होते. पावसाच्या

धारा झेलत व बॅगा सांभाळत स्टँडवर पोहोचलो. तिथेही तीच अवस्था...

सगळीकडे ओलच ओल. पुण्याला जाणाऱ्या गाडीची चौकशी केली असता एक तास थांबावे लागेल, असे सांगण्यात आले. पावसाचा जोर थोडा कमी आलेला होता.

पोटात भुकेची जाणीव होऊ लागली. मग आम्ही दोघी स्टँडच्या समोरच असलेल्या एका

हॉटेलमध्ये गेलो व तिथे इडलीवडा खाल्ला. थोडे बरे वाटायला लागले. तिथून परत येऊन

परत स्टॅंडवर बसलो. पोटातही अन्न गेले होते व आता आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला

होता त्यामुळे आम्ही निवांत होतो. तासाभराने आलेली प्रत्येक गाडी कोणती आहे हे पाहण्यासाठी धावपळ सुरु झाली कारण स्टँडचा आवार मोठा असल्यामुळे

व बसायची जागा थोडी लांब असल्यामुळे, बसेस आडव्या लागत असल्यामुळे गावाच्या नावाची पाटी दिसत नव्हती. पोतदार मॅडम

अंगाने हलक्या असल्यामुळे त्या पळत जाऊन गाडी बघायच्या व मी सामान सांभाळत स्टॅंडवर बसलेली असायची. एकदाची

पुण्याला जाणारी बस आली. मॅडमनी तिथूनच खूण केली. मी गडबडीने दोघींच्या बॅगा घेऊन

बाहेर पडू लागले ते दृश्य पाहण्यासारखे होते. तेवढ्यात मॅडमही आल्या व त्यांनी

आपल्या बॅगा घेतल्या व आम्ही

दोघी बसकडे निघालो. बसच्या बाहेर खूप गर्दी होती. आम्हाला तर वाटायला लागले आज

जायला तरी मिळते की नाही कोणास ठाऊक. अखेरीस अनेक कसरती करत आम्ही बसमध्ये जाण्यामध्ये यशस्वी झालो. मनाला खूप आनंद झाला, पण तो थोडा काळच टिकला. कारण बसमध्ये इतकी गर्दी होती की

बसायला तर सोडाच दोन्ही पायावर उभे राहता येते की नाही असे वाटू लागले. दुसरी बस

कधी आहे हे माहिती नव्हते. त्यामुळे आहे हे स्वीकारून प्रवास करायचा ठरला. बस सुरू

झाली. त्या गर्दीमध्ये बॅगा सावरत उभे होतो. तास-दीड तास तो प्रवास चालू होता. कधी एका पायावर कधी दुसऱ्या

पायावर स्वतःचा भार देत, उभे होतो. चपलांमध्ये पाणी गेल्यामुळे जसा भार त्यावर पडेल तसे त्यातले पाणी इकडेतिकडे जाणवत

होते. अर्धा तास उभे राहिल्यानंतर पायाने बंड पुकारायला सुरू केले. हळूहळू पाय

दुखू लागले. गुडघ्यामध्ये कळा येऊ लागल्या. पण हे सर्व सहनच करावे लागणार होते.

जागा मिळते का हे दीनवान्यापणे इकडेतिकडे

पहात होतो, पण आमची दया कुणालाही आली नाही. जवळजवळ दीड तास हा त्रास सहन करत आम्ही उभे

होतो. एकदाचे लोणावळा स्टॅंड आले. तिथे बरीच गर्दी कमी झाली. मग आम्हाला बसायला जागा मिळाली. स्वर्गसुख

मिळाल्याचा आनंद झाला. एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला सहजासहजी मिळत नाही व जेव्हा

ती मिळते तेव्हा त्या गोष्टीचा आनंद खूपच मोठा असतो, अवर्णनीय असतो, त्याची अनुभूती आली. तिथे थोडा वेळ बस थांबणार होती. मी

खाली उतरले. लोणावळा चिक्की, शेंगदाण्याच्या दोन पुड्या घेऊन परत आले तर बस लवकर लक्षातच येईना. अरे

बापरे!!! पोटात एकदम भीतीचा गोळा आला. मग परत एक एक बसमध्ये पाहात मी जाऊ लागले. चार-पाच बस सोडल्यानंतर आमच्या

बसमधील ओळखीचे चेहरे दिसले मग बरे वाटले. एखाद्या गर्दीत आईचा हात सुटून बाजूला

गेलेल्या लहान मुलांची जी मानसिक अवस्था होते तशीच माझी झाली होती. बसमध्ये जाऊन

बसले. चिक्कीची पाकिटे गावाकडे नेता येतील म्हणून बॅगेत ठेवले. शेंगदाण्याची एक

पुडी मॅडमला दिली व मी एक घेतली व खायला सुरुवात केली. बस पुन्हा सुरु झाली. शेजारी एक खेडवळ आपल्या लहान नातीला घेऊन बसला होता.

तिलाही थोडे शेंगदाणे दिले. आपल्या आजोबांच्याकडे पाहात तिने ते घेतले. तिच्या चेहऱ्यावर हसू आले. पाहून बरे

वाटले. संध्याकाळ होत होती. पोतदार मॅडमचे खूप नातेवाईक पुण्यात होते. सर्वांचे

फोन झाले. प्रत्येक जण आम्हाला त्यांच्या घरी बोलवत होता. शेवटी त्यांच्या

मामाच्या घरी जायचे ठरले. पाऊस आता बऱ्यापैकी कमी झालेला होता.

बसने पुण्यात प्रवेश केला. संध्याकाळचे सहा वाजले होते. बसमधून खाली उतरलो. रिक्षा केली व तडक त्यांच्या मामांचे घर गाठले. मामांनी हसतच आमचे स्वागत केले. मामी शेजारी गेल्या होत्या. त्यांना फोन करुन मामांनी बोलवून घेतले. थोड्या वेळाने मामी आल्या. त्यांनी आमचे हसत स्वागत केले. आमची विचारपूस केली. आम्ही सुखरूप आलो याचाच त्यांना खूप आनंद होता. मामांना बघून मला माझ्या वडिलांची आठवण झाली कारण तेही तसेच शांत संयमी हसऱ्या चेहऱ्याचे वाटले. प्रथम गरमागरम पाण्याने स्नान केले. मामींनी वाफाळता चहा व गरम पोहे दिले. आता आम्ही निवांत होतो. दोघींनीही आपापल्या घरच्या लोकांना फोन करून आम्ही पुण्यामध्ये सुरक्षित पोहोचलो आहोत काळजी नसावी, असा निरोप पोहोचवला. एका बेडरूममध्ये आम्हाला जागा देण्यात आली. मग आम्ही आमच्या बॅगा उघडल्या. पाहतो तर काय... बॅगेतील तळाकडील कपडे सगळे भिजलेले होते. ते सर्व बाजूला काढले व वाळत टाकले. थोड्या वेळाने मॅडम यांचे मामेभाऊ व मामेबहीण आले. मॅडमची मुलगीही पुण्यामध्ये नोकरीला होती. तीही भेटायला आली. त्यांच्याशी गप्पा मारत बसलो. टीव्हीवर बातम्या पहिल्या. रात्री मामींनी छान जेवण केले. थोडा वेळ गप्पा मारून झाल्या व निद्राधीन झालो. सकाळी लवकर उठून जायचे होते पण मामींनी खूप आग्रह करून आम्हाला जेवण घालून मगच सोडलं. दुधाची तहान ताकावर भागवणे असे म्हणतात त्याची प्रचिती आली. कारण मॅडम आईला भेटायला निघाल्या होत्या आईला न भेटता मामाला तरी भेटायला मिळाले याचे समाधान वेगळेच होते. तिथून आम्ही मॅडमच्या बहिणीच्या घरी गेलो. त्यांनी आमचे स्वागत छानपैकी केले. त्यांचा पाहुणचार घेऊन तिथून आम्ही रिक्षाने स्वारगेटला आलो. तिथे शिवशाही बस उभीच होती. मॅडमची मुलगी आम्हाला सोडायला आली होती. तिने तिकीट काढून दिले. आम्ही बसमध्ये बसलो व तिला जड अंत:करणाने निरोप दिला व आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. 

त्या दिवशीच काव्यसंमेलन होते. व्हाट्सअपच्या माध्यमातून मी ते संमेलन ऑनलाइन पाहात होते. कविता ऐकत होते. नुकताच पाऊस झाल्यामुळे हवेत सर्वत्र गारवा होता. झाडे प्रफुल्लित दिसत होती. हिरवीगार पाने सळसळत होती. फांद्या आनंदाने डोलत होत्या. घाटामध्ये डोंगरावरून पाण्याचे ओहोळ, छोटे-मोठे धबधबे डोळ्याला सुखावत होते. मनही आनंदाने गात होते. त्या निसर्गाचे एक-दोन फोटो काढले, तेवढेच काय ते त्या प्रवासातील फोटो. रात्री साडेआठ वाजता जयसिंगपूर स्टॅंडवर आलो. खाली उतरून स्टॅंडवर आल्यानंतर जणू काही एक महान कार्य करून आल्याची अनुभूती आली. असा हा आमचा परतीचा प्रवास, मुंबईचा पाऊस व रेल्वेचा प्रवास आमच्या कायमच लक्षात राहील.


Rate this content
Log in