कथा- अखेर तीने करुन दाखवले
कथा- अखेर तीने करुन दाखवले
अखेर तीने करुन दाखवले.....
जीवनात अशक्य असे काहीच नसते.जर आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केलीकी ते सहजसाध्य होते.समाजात वावरताना अनेक अडचणींशी सामना करणाऱ्या व्यक्ती आपणास दिसतात. अशातच अध्ययन अक्षम विद्यार्थीही येतात. त्यांना बोललेलं सर्व समजतं पण कृती करताना अडथळा येतो.श्रुती अशीच एक अध्ययन अक्षम विद्यार्थीनी. प्रथम दर्शनीच ते लक्षात यायचं . जेंव्हा प्रथम ती शाळेत आली,तेंव्हा ती थोडी बुजलेलीच वाटत होती. ती आधी ज्या शाळेत शिकत होती त्या शाळेतील काही मुली तिच्याबरोबर होत्या. त्यामुळे तिला एकदम नवीन वाटतं नव्हतं.पण इतर गावातील मुलीही होत्या.त्यांना श्रुतीचे वागणं ,बोलणं वेगळं वाटायचं.त्या तिला हसायच्या ,तेंव्हा आम्ही सगळ्या शिक्षिकांनी सर्व विद्यार्थीनींना सूचना दिल्या.
का कुणास ठाऊक ,पण माझे तिच्याकडे लक्ष असायचं.तिसुद्धा सारखं माझ्या भोवतालीच फीरायची. एकदा तिला जवळ घेऊन विचारले, " श्रुती काय चाललयं तुझं ?" ती माझ्याकडे पाहिले व व माझ्या डोळ्यातील आश्वासक भाव बघत अडखळत म्हणाली," ताय नाही." तिला क चा उच्चार करता येत नव्हता.मी समजून घेतलं.हळूहळू तीच्यात व माझ्यात जवळीकता वाढू लागली.तिची भीती मोडली. ती सरळ आता स्टाफरुममध्ये येऊ लागली.मुलींच्या पेक्षा ती शिक्षकांच्या केबिनमध्ये च जात रहायची. तालव्य स्वर तिला नीट उच्चारता येत नव्हते.मी आले की,मॅलम ,मॅलम करत पळत यायची. आपल्या मनातील सगळ्या गोष्टी ती माझ्याशी बोलत असे.
अशातच शाळेतील विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम जवळ आला होता.सांस्कृतिक विभाग माझ्याकडे असल्यामुळे गाणी निवडणे,सराव घेणे चालू झाले. श्रुती नेहमी आजूबाजूला असायचीच.एकदा तिच्या मनात काय आले काय माहित , ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली," मॅलम मीपण दान्स कलणाल." क्षणभर मला काही सुचेना. मनात प्रश्न निर्माण झाला की ही कशी नाचणार? हीला सरळ चालता येत नाही, चालताना दोन्ही गुडघे एकत्र येतात.नाचायचा तर प्रश्नच नव्हता.सुरवातीला मी दुर्लक्ष केलं पण ती मला पुन्हा पुन्हा विचारु लागली. मग मला खात्री झाली की हीला नक्कीच नाचायचं आहे. मी म्हटलं," खरचं तू नाचणार ? कुठल्या गाण्यावर नाचणार ?" तीने मलाच प्रश्न विचारला ," तुतलं घेऊ ?" आता परत मलाच प्रश्न पडला की हीला कोणता नाच द्यायचा. हीच्याबरोबर कोण नाचणार..... माझ्या डोळ्यासमोर बालगीतं आली पण तिने ती,"हे नतो,ते नतो " करत नाकारली.
तीच्या वर्गातील मुलींनी कठपुतली नाच बसवला होता. त्यामध्ये जास्त हालचाली नव्हत्या.मी ठरवलं की हीला या नाचामध्ये घ्यायचं.श्रुतीला विचारले,"श्रुती तू नाचात जातेस का ?" तीने लगेच ," हो" म्हटलं.आता प्रश्न होता त्या मुलींना तयार करायचं...मी त्या मुलींना बोलावले व विचारले, " तुम्ही श्रुतीला तुम
च्या नाचामध्ये घेता का ?" असं विचारल्यावर सगळ्या एकदम ओरडल्या ," काय ? श्रुती!!! आणि आमच्या नाचात ? अहो मॅडम ,तिला कुठे नाचायला येतयं ?" त्यांची प्रतिक्रिया साहजिकच होती.मी त्यातल्या प्रमुख मुलीला समजावलं, " हे बघ वृषाली,अगं तिला नाचायची ईच्छा आहे,तूमच्या नाचात जास्त हालचाली नाहीत,फीरायचं नाही. तेंव्हा तिला ते सहज जमेल." ती म्हणाली, "तरीपण मॅडम ,आमचा नाच पडणार मग " मी म्हटलं," अगं तस काही होत नाही, उलट श्रुतीमुळे तुमचा नाच एक वेगळा नाच होईल." शेवटी एकदा त्या तयार झाल्या. सरावाला सुरवात झाली. सुरवातीला नाराज असणाऱ्या मुली आता श्रुतीचा प्रतिसाद बघून तीला समजावून घेऊ लागल्या.त्यांच्या सरावाला ,श्रुतीच्या नाचाला पहायला मुली गर्दी करच लागल्या.सगळ्यांना ते एक आकर्षणच निर्माण झाले होते. मला वाटले होते सुरवातीला थोडा सराव करुन ती सोडून देईल,पण तसे काय झाले नाही.
अखेरीस तो दिवस ऊगवला.....मला अजूनी विश्वास वाटत नव्हता. सूत्रसंचलन माझ्याकडे होतं.मी टेबलाजवळ बसून माईक हातात घेऊन बोलत होते. तेवढ्यात श्रुती पांढरा टि-शर्ट,काळी पँन्ट व डोळ्याला गॉगल लावून आली.माझ्याजवळ येऊन ऊभी राहीली.मी तीची मानसिकता तयार करत होते.खात्री करून घेण्यासाठी मी मी म्हटलं," मग काय श्रुती? नाचणार म्हणआज तू ?" ती म्हणाली," मग नातायला नतो ताय? गँदलींग हाय आणि?" तिचा तो आत्मविश्वास पाहून मला खूप आनंद झाला. तिला विचारले," श्रुती,तूला कुणी तयार केलं ?" ती म्हणाली," मम्मीनं." मी पाहिले प्रेक्षकांत तीची आई व बहीण बसले होते.
शेवटी एकदा त्यांच्या नाचाचे नांव व कलाकार यांची नांवे मी घेतली.त्यावेळी माझ्या मनात एक वेगळेच भाव व शरीरात एक वेगळीच लहर जाणवली.श्रुतीचे नांव ऐकताच सर्व मुलीं उत्साहाने टाळ्या वाजवू लागल्या. मला वाटले आता श्रुती घाबरणार. मी तिला स्टेजवर नेलं.बाकीच्या मुलींना सांगितलं की," हे बघा, श्रुती जरी चुकली तरी तिच्याकडे दुर्लक्ष करुन तुम्ही तुमचा नाच चालूच ठेवा,तिला काय सांगू नका ." सर्वांना आमच्यातलं नातं माहिती होतं.मुली म्हणाल्या," मॅडम , तुमची श्रुती आता नाच करणार की !!!" नाचाला सुरवात झाली आणि सगळ्या मुली मोठ्याने " श्रुती..... श्रुती... श्रुती...." असं ओरडायला लागल्या. वातावरणात एक प्रकारचे वेगळेपण व ऊत्साह जाणवू लागला.मला फोटो काढायचा मोह आवरता आला नाही. दोनचार फोटो काढले.श्रुती बाकीच्या मुलींच्या कडे बघून नाचू लागली.
मी परत माझ्या जागेवर आले.मला माझ्या भावना आवरता आल्या नाहीत. माझ्या डोळ्यातून आसवं गळू लागली.त्या अश्रूधारा मी थोपवू शकत नव्हते.त्या आसवांतून माझा आनंदच वहात होता....शेवटपर्यंत टाळयांचा गजर थांबला नाही. अशारितीने नाच पार पडला. श्रुतीने अखेर करुन दाखवलचं....