Manik Nagave

Inspirational

5.0  

Manik Nagave

Inspirational

जीवनातील गुरुंचे महत्त्व , संस्कार व संस्कृती

जीवनातील गुरुंचे महत्त्व , संस्कार व संस्कृती

2 mins
3.1K


 गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा,

गुरुःसाक्षात परब्रम्हं तस्मैश्री गुरवेनमः 

   गुरु ब्रम्हा, विष्णू, महेश आहे. अशा गुरुंना वंदन.  गुरुची महानता अवर्णनीय आहे. अज्ञानाचा अंधःकार दूर करुन ज्ञानाच्या प्रकाशाची वाट गुरु दाखवतो. 

  प्राचीन काळी गुरुगृही शिष्य अध्ययनासाठी, विद्या ग्रहण करण्यासाठी  जात असे. तेथे त्याला शिक्षणासोबत सर्व प्रकारची कामे करावी लागत. त्यामुळे आपोआपच नैतिक मूल्य व श्रमप्रतिष्ठा हे गुण अंगी बाणले जायचे. गुरुंना तेव्हा राजदरबारीही मान होता. 

   गुरु ज्योतिसारखा आहे, कारण तो सन्मार्ग दाखवतो. शिष्याच्या हृदयात ज्ञानाचा प्रकाश पसरवतो.गुरु म्हणजे जो "लघु" नाही. गुरु संस्काराची खाण आहे. 

  आई  ही पहीली गुरु असते. साने गुरुजींनी आपल्या आईलाच गुरुस्थानी मानले होते . त्यांनी  "श्यामची आई" हे मातृप्रेमाचे महन्मंगल स्त्रोत्र असलेले व संस्कारमोतींनी  भरलेले पुस्तक लिहून आईला परमोच्चस्थानी नेऊन ठेवले व तिला सा-या जगात प्रसिध्द व अजरामर केले. आपल्या आईचे संस्कार अंगी बाणवले व त्याप्रमाणे ते वागले. 

   निसर्गातील प्रत्येक गोष्ट ही गुरुचे म्हणजेच शिकवण्याचे व संस्काराचे काम करते. पशुपक्षी, वृक्षवल्ली आपले गुरुच आहेत. ते आपल्याला दातृत्व शिकवतात.आपल्या दोन्ही हातांनी भरभरून देतात. वृक्ष आपल्याला "जगा व जगू द्या" हा संदेश देतात. ग्रंथही आपले गुरुच आहेत. ते आपल्याला जीवनात सफलता प्राप्त करण्याचा मार्ग सांगतात. चांगल्या वाईटाची जाणीव करुन देतात. ज्यांच्याकडून आपल्याला घेण्याची भावना होते ते सर्व आपले गुरुच असतात. तसे पहायला गेले तर मुंगी व भुंगा हे दोघेही आपले गुरुच आहेत. कारण ते आपल्याला सतत कार्यरत राहण्याचा संदेश देतात.

 

  गुरुवरील आपले प्रेम व निष्ठा प्रकट करण्याकरीता गुरुंचा सत्कारच करायला पाहीजे असे नाही , तर गुरुच्या शिकवणुकीचा अंगीकार केला म्हणजे गुरुचा सम्मान केल्यासारखे आहे.

 

   गुरु संस्कारदेवता आहे.आपल्या आचरणाने आपल्या शिष्यांवर संस्काराचे काम तो करीत असतो.आजच्या युगात जरी अनेक साधने आली तरी गुरुचे महत्व काही कमी झाले नाही.कारण ती साधने चालवायला , शंकांचे निरसन करायला गुरुची गरज आहेच.अद्ययावत ज्ञानाने युक्त गुरु शिष्यांचा विकास सहज घडवून आणू शकतो.शिष्यानेही गुरुची शिकवण अंमलात आणून आपल्यातील चुका जर बाजूला केल्या तर गुरुज्ञान सत्कारणी लागेल.

    अशा या गुरुच्या चरणी लीन होऊया व आदरभावे वंदन करुया.

 

   


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational