तांत्रिक - भाग ५
तांत्रिक - भाग ५
धर्मा किरिक तांत्रिकाच्या झोपडीतून बाहेर पडला. त्यानं आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच अशी अनुभूती घेतली होती. त्याच धुंदीत जणू तो समोरचा रस्ता कातरत होता. पावलं अडखळत होती. मन अजूनही भाणावर नव्हतं तरीही तो अमावस्येच्या त्या काळोखे अंधारात धुसर दिसणाऱ्या वाटेवरून पुढे पुढे जात होता. हळदी कुंकवाने माखलेलं त्याचं शरीर अजूनच भयावह वाटत होतं. तो तसाच जात होता काही अंतरावर रस्त्याच्या बाजूला बसलेले त्याचे मित्र त्याला येताना पाहत होते. किसना म्हणाला "हा धर्माला बघ" धर्माची आकृती त्यांच्या अगदी जवळ येऊन ठेपली पण धर्मा तसाच पुढे चालत जात होता. त्याचे डोळे जणू कुठे शून्यात हरवलेले होते. त्याच्या मित्रांनी त्याला हाक मारली " ए धर्मा आम्ही इथे बसलोय आणि एकटाच गपचूप कुठे चाललास ? आम्हाला विसरलास का काय?झालं तर काय?" असं म्हणताच धर्मानं वळून पाहिलं तसं मित्रांच्या काळजात धक्क झालं. धर्माचा चेहरा लालबुंद झाला होता. त्याच्या शरीराची परिभाषा बदलली होती. मुलांना क्षणभर वाटलं की हा धर्माचा आहे की आणखी कोण? तसा सकरा धाडस करून पुढे गेला त्यांन घाबरतच धर्माला खांद्याला धरून हलवलं तरी सुद्धा धर्माचे डोळे नीट उघडत नव्हते.
एखाद्या नशेत तर्र माणसासारखं त्याचं वागणं होतं. तसा किसना म्हणाला "याला आम्ही सांगालतो त्या इंगळ्या सारख्या किरीक्या कडे जाऊ नको! तर आता काय अवतार करून घेऊन आलाय बघ ह्यो! तसं सकरा म्हणाला "अरे ह्याच्यावर जणू त्यांनं जादूच केली बघ!" तसा किसना म्हणाला "याला घेऊन असच पुढे चला वाटेतल्या त्या पाटलाच्या विहिरीवर थांबू तिथलं पाणी थोडं याच्या तोंडावर मारूया" धर्मा काहीतरी तोंडातल्या तोंडात पटपटत होता. पण बाकीच्यांना त्याचा अर्थ लागत नव्हता. सगळ्यांचीच दातखिळी बसण्याची वेळ आली होती पण, तरीसुद्धा त्यांनी मित्रा खातर ही जोखीम उचलली होती.
तसेच पुढे आल्यानंतर रस्त्याला लागून पाटलाच्या विहिरीवर ते थांबले. त्यांनी विहिरीतले पाणी आणून धर्माला पार भिजवलं! जसं त्याच्या अंगावरचं कुंकवाचं मळभ निघून गेलं तसा धर्मा बोलू लागला "किरिक मांत्रिक लय भारी! लय भारी! माझ्या जिवाभावांनो लय भारी! मला अशी दुनिया दाखवली मानलं त्याला! आपला आता त्योच माझा गुरु होणार!" तसा किसना म्हणाला "त्या गुरूच्या नादान तुझा पाक बावचळा झालाय! अरे मर्दा सारखा मर्द तू बाळू वस्तादाचा खास !आणि आता हे काय नादाला लागलास" तसा धर्मा म्हणाला "ते तुम्हाला कळायचं नाही! चला आपण घरी जाऊया" तसे सारे जण म्हणाले "घरी जायचं आहे पण तिथं काय काय झालं!" धर्मा म्हणला "ते सांगता यायचं नाही. सबुतीनं सांगतो तुम्हाला. सगळं मला बी अजून सगळं समजलेलं नाही!" किसना म्हणाला "तुला काय समजलं काय नाही ते तुलाच माहीत! खरं तुझी ही परिस्थिती बघून आम्हाला काहीतरी वेगळंच वाटलयं पण असो अंधार खूप झालाय आधी घर गाठू या तू सुखरूप परत आलास यातच सगळं आलं. उद्या बोलूया सविस्तर." किसनाच्या या समजुतीच्या भाषेवर सर्वांनी मान डोलवली आणि सगळे घरी आले.
पण रात्री किसनाला झोप लागतच नव्हती! आज धर्माचा एकंदर प्रकार पाहून त्याला त्याची काळजी वाटून राहिली होती! पण काय करावे हे सुचत नव्हतं. सकाळ झाली तसा किसना बाळू वस्ताद कडे गेला. वस्ताद शेतावर होता तर त्याने त्याचं शेत गाठलं आणि बाळूला म्हणाला "वस्ताद महत्त्वाचं काम हाय जरा मी काय सांगतो ते ऐका" तसा बाळू म्हणाला "अरे तालमीत जायचं सोडून इकडे कशाला आलास !मी येणार होतो की नंतर" तसा किसना म्हणाला "तालमीत बोलायसारखी गोष्ट नाही म्हणून तर इथं आलोय" बाळू वस्ताद म्हणाला "असं बर ये त्या बाजूला त्या उंबरा खाली बसू "असं म्हणून दोघे उंबराच्या छायेत आले तसा किसनाने धर्माचा सगळा किस्सा सांगितला. थोड्या वेळासाठी बाळू वस्तादाला काही सूचना असं झालं! बाळू म्हणाला "तरी त्या धर्माला मी बजावलं होतं त्याचा नाद करू नकोस! त्या तांत्रिकानं काय डाव टाकला आहे तेच कळत नाही? असो तू मला सांगायला आलास ते लई बेस केलं! आता एक लक्षात ठेव ज्या ज्या वेळी धर्मा तुम्हाला किरीकच्या बाबतीत काय सांगल बोलल ते मला गुपचूप येऊन सांगायचं एवढं कर बाकीचं मी बघतो आणि आता जा मी नंतर येतो तालमीवर" असं बाळू ना त्याला समजावलं.
किसना तालमीवर आला. साऱ्या पोरांची कसरत चाललेली होती. धर्माच्या चेहऱ्यावर मात्र वेगळ्या छटा होत्या. त्याच्या डोळ्यात आक्रमकपणा दिसत होता. आपला मित्र कुठल्यातरी दिशेत हरवत चाललाय असंच किसनाला वाटलं. थोडा वेळ गेला आणि बाळू वस्ताद तिथे पोहोचला. त्यानं एकवार सगळ्यांच्याकडे पाहिलं! तालमीतली सगळी परिस्थिती पाहिली आणि धर्माला सुद्धा पाहिलं. तसा तो धर्माला म्हणाला "धर्मा अरे कसं काय?कसरत कशी काय चालल्या?" तसा धर्मा म्हणाला "एक नंबर चालल्या की आम्ही काय तर नुसता बसून जात नाही! मेहनत करतोय मेहनत!" त्याच्या बोलण्यातला अक्कडपणा बाळूला जाणवत होता.
बाळू म्हणाला "चल उतर आखाड्यात! एकदा होऊ दे माझ्याबरोबर !बघूया तरी तुझी कसरत कशी आहे ते!" सारी मुलं या गोष्टीकडे बघत होती. साऱ्यांना आश्चर्य वाटत होतं! कारण कधी बाळू पैलवानांन असं कोणाला आव्हान दिलं नव्हतं! तो शक्यतो प्रेमाने सांगायचा .त्याच्यापुढे कोणीही आगाऊपणा करत नव्हते पण धर्मांन आज ते पाऊल उचललं होतं. तसा धर्मांन आखाड्यात उडी मारली बाळूला पाहत तो म्हणाला "या वस्ताद! एकदा बघुयात तरी!" मुलं आखाड्यातून बाजूला झाली बाळू वस्ताद आणि धर्मा यांच्या लढा सुरू झाला. एरवी वस्ताद मुलांना डाव शिकवायचे पण आज गोष्ट वेगळीच होती. धर्मा वस्ताद वर डाव टाकायला पाहत होता. बाळू वस्तादाने दोन्ही हात पसरून धर्माला आव्हान दिलं तसा धर्मा बाळू वस्ताद वर जोरात चाल करून गेला. दोघांच्या मध्ये रेटारेटी जोरात सुरू झाली! कधी बाळू वरचढ तर कधी धर्मा वरचढ बाळू हळूहळू वस्तादाचा डाव त्याच्यावर टाकून बघत होता पण धर्मा प्रत्येक वेळी त्यातून निसटत होता.
बाळूलाही जाणवलं धर्मा वेगळ्याच धुंदीत आहे. कारण त्याचा आक्रमकपणा काही वेगळाच होता. तो झुंज देत होता पण जणू त्याच्यातून एक ही वेगळी शक्ती काम करत होती. त्याच्या डोळ्यातून जणू अंगारे निघत होते. त्याला त्याचा राग अनावर होत होता. अश्रूंच्या धारा लागल्या होत्या! पण तो मागे हटत नव्हता! एक वेळ बाळू वस्तादच चितपट होतो की काय अशी परिस्थिती आली! पण वस्तादाने पुन्हा डाव सावरला! बाळूला धर्माच्या अंगाचा स्पर्श सुद्धा वेगळाच वाटत होता. बाळूनं पवित्रा बदलत धर्माला पोटावर झोपवत मागवून घट्ट पकडलं धर्माचे दोन्ही हात पाठीवरती घडी घालावी तशी एकत्र केली आणि बाळू वस्ताद काय त्याला हळू देत नव्हता! बाळू धर्माच्या अंगावर काही आहे का हे पाहत होता इतक्यात लंगोटीच्या एका बाजूस त्याला बारीक प्लास्टिकचे सुरळी करून काही बांधल्यासारखे वाटले. त्यांन हात घातला तसा धर्मा खालून किंचाळू लागला! बाळूला बाजूला करून पाहू लागला पण बाळूनं त्याला तसाच दबवत ती सुरळी झटक्या सरशी बाजूला केली! तसा धर्मा एकदम शांत झाला.
आधीचा त्याचा प्रतिकार करण्याचा प्रकार पूर्णपणे संपला जणू तो भानावर आला. त्याला असं शांत झालेलं पाहून बाळू क्षणात बाजूला झाला त्यानं धर्माला विचारलं "मगाशी कसला उसळत होतास! आणि ही कसली पुढी आहे जी बाजूला केल्यानंतर तू शांत झालास" तसा धर्मा म्हणला "वस्ताद तुमच्या ताकती पुढ माझी ताकद कशी चालणार? मी बघितलं पण वस्ताद ते वस्तादच! म्हणून मी शांत झालो" तसा बाळू म्हणाला "त्या प्लास्टिकच्या सुरळीत ठेवलेस काय? धर्मा म्हणाला "देवाच्याअंगार्याची पुढीलआहे ती !त्यांना काय होतय वस्ताद" असं म्हणत धर्मानं वेळ मारून नेली. त्या प्लास्टिकच्या सुरळीत किरीक तांत्रिकाने दिलेली अंगार्र्ची पुडी होती. धर्मांना ती अलगद हाताच्या मुठीत धरली आणि तो बाजूला झाला तसा बाळू म्हणाला "माझ्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न करतोय असं मला वाटतंय" धर्मा म्हनाला "नाही वा! तुमच्या पासून कशाला काय लपवू?" तसा बाळू म्हणाला "ठीक आहे इथून पुढे जपून रहा कितीही केलास तरी वस्ताद आपला एक डाव राखून असतो हे विसरू नकोस!" धर्मा हो हो म्हणत बाजूला झाला हा काय प्रकार आहे हे बाळूच्याही लक्षात आलं होतं पण पुन्हा कधीतरी आपण याचा उलगडा करू असा विचार करत बाळू निघून गेला.
कसरती झाल्यानंतर धर्माच्याही लक्षात आलं की त्या अंगार्याच्या मुळं त्याला किती ताकद मिळत होती! त्याला तांत्रिकाच्या बोलण्यात तथ्य वाटू लागलं. आपण चुकीच्या मार्गाने जातोय हे न पाहता आपल्याला हितच सबूत मिळाला! आता आपण कोणालाह कुस्तीत हरवू शकतो! असं त्याला वाटू लागलं ! किसना हे सारं पाहत होता. आजचा ह्यो किस्सा पाहून किसनालाही काय करावं काय नाही नये असं वाटत होतं. त्यानं धर्माला सांगितलं "आजवर बाळू वस्ताद पुढं डोळं वर् न करणारा तू असा कसा त्याला भिडलास?" तसा धर्मा म्हणाला "कुस्तीत वस्तादाचा काय संबंध !आपला डाव सुधारायचा असेल तर कोणाशी भिडायलाच पाहिजे" धर्माच हे बोलणं किसनाला त्याचातला उदामपणा दाखवत होतं. पण त्याला बाळू वस्ताराचे शब्द सुद्धा आठवत होते. किसनान ही ठरवलं की आपण धर्माला धोका होऊ द्यायचं नाही! शेवटी तो आपला मित्र आहे; असा विचार करत किसना शांत राहिला.
असाच पंधरा दिवसाचा कालावधी लोटला आणि पुन्हा एक दिवस तालमीत सराव सुरू असताना किरीक तांत्रिक समोरच्या वाटेवरून जात होता. धर्मांनं त्याला पाहिलं आणि तो कसरत सोडून किरीक तांत्रिका कडे गेला तसा किरीक तांत्रिक त्याला जवळ घेत हळू आवाजात म्हणाला "उद्या रात्री माझ्याकडे ये! महत्त्वाचं काम आहे" धर्मानं त्याचा ऐकलं आणि तो पुन्हा तालमीत आला किरीक तसाच पुढे निघून गेला. किसना हे सारे पाहतच होता! किसनानही पाहून न पाहिल्यासारखं करत कसरतीला जोर लावला. त्या दिवशी तालीम बंद झाल्यावर किसना थेट बाळू वस्तादा कडे गेला. त्यांन बाळूला सारं सांगितलं तसा बाळू म्हणाला धर्मा एका वेगळ्या वाटला चाललाय! पण त्याला वाचवणं आपलं काम हे हाय एक काम कर त्याच्यावर पाळत ठेव तो मात्रिकाकडे चालला की तू ही आड बाजून त्याला न कळू देता त्याच्या मागोमाग जा! आणि बघ काय होतंय ते!" किस्ना म्हणाला "वस्ताद तुम्ही बी चला की! मी एकलाच कसा जाऊ! तसा बाळू म्हणाला "मी आलो की त्याला वेगळं वळण लागेल! तू काही घाबरू नकोस आज जाऊन बघ काय परिस्थिती आहे आणि मला भेट ! घाबरू नकोस जा "तशी किसनाने मान हलवलं आणि तो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी धर्मा घरातून बाहेर पडण्याची वाट पाहत बसला.
अजून पूर्ण अंधार झाला नव्हता, झुंजूमुंजू होत असतानाच धर्माला त्यांन जाताना पाहिलं तसं थोडं अंतर ठेवत तो त्याच्या मागोमाग चालत चालत निघाला! धर्माला आपला कोणी माघ काढत आहे याची कल्पनाच नव्हती तो सरळ किरिक तांत्रिकाच्या झोपडीकडे गेला. तसा किसना थोड्या अंतरावर थांबत आपले कान आणि डोळे झोपडीकडे लावून बसला. धर्मा गेला झोपडीत तसा तांत्रिकाच्या मंत्रांचा आवाज चालूच होता. धर्मांनं कीरिक तांत्रिकाला तालमीत झालेली हकीकत सांगितली. तसा किरीक म्हणाला "मी तुला सांगितलं नव्हतं का ती पुडी जपून बांधून ठेव !ती जोपर्यंत तुझ्याबरोबर आहे तोपर्यंत तुला कोण हरवू शकत नाही". तसा धर्मा म्हणाला नीट गच्च बांधली होती पण काय माहिती कशी निसटून बाहेर आली! असो पण तुमच्या शक्तीचा मला अंदाज आला !लय भारी काम आहे! त्या दिवशी वस्तादला मी चितपटच केल असतं! पुढल्या डावात बघू !"तसा किरीक तांत्रिक म्हणाला "बाळू काय हाय तुझ्या पुढ? पुढे बघ तुझी ताकद कशी वाढत जाते ते!" तसा धर्मा म्हणाला "मला का बोलावलं? तर तसा किरीक तांत्रिक म्हणाला "हे बघ तू जसं तालमीत कसरत करतोस तशी ही तंत्र मंत्र विद्या शिकायला मलाही काही काही विधी कराव्या लागतात त्यासाठी उद्याच्या अमावास्येच्या भर मध्यान रात्री मला मसनवटीतून पुढे त्या पल्याड माळाच्या जंगलात जायचंय! तू चल माझ्याबरोबर!" कसं तसा धर्मा म्हणाला "तुम्ही काय हुकूम करशीला ते! मी येतोच" काही अंतरावर असलेल्या किसनाच्या कानावर पुसटसा आवाज पडत होता पण मित्रा विषयीची त्याची तळमळ त्याला स्पष्ट ऐकू देत होती. किरीक तांत्रिकाचा प्लॅन किसनला समजला आणि किसना येथून हळूच बाजू बाजूने निघून गेला. धर्मा सुद्धा रस्त्याने आपल्या घरी परतला. दुसऱ्या दिवशी सकाळी किसनाने बाळूला सारी हकीकत सांगितली बाळू म्हणाला "शाबास किसना! तू खरा जातिवंत मित्र हाईस! आता तुला त्यांच्याबरोबर जायला हवं!" तसा किसना म्हणाला "मी नाही बा! त्याच्या झोपडी पर्यंत कसं गेलतो !माझा जीव तोंडातून बाहेर आलता !त्या माळात! त्या जंगलात! मी एकला काय जाणार नाही बा !तसा बाळू म्हणाला "तु काही काळजी करू नकोस आपण मिळूनच जाऊ"
(क्रमश:)

