स्वप्नांची होडी
स्वप्नांची होडी
शारदा, श्रुतीच्या घरी स्वैयंपाकाला येणारी बाई. एकदम अचंबित करणारं व्यक्तिमत्व. तिच्याकडे पाहून कुणाला क्षणभरही वाटणार नाही कि ती दुसऱ्यांकडे स्वैयंपाकाचं काम करते. अगदी महागडी वगैरे नाही पण नीटनेटकी साडी, व्यवस्थित घातलेली वेणी, त्यावर साजेसा अलंकार आणि छानशी पर्स असं आवरून शारदा मोजक्याच घरी काम करायची. तिचा नवरा एका महाविद्यालयात 'कनिष्ठ लिपिक' म्हणून कार्यरत होता. एक चवथीतला मुलगा अन एक पहिलीत जाणारी मुलगी. सासू सासरे ह्यांच्याकडे राहायला नसले तरी घरी नातेवाईकांची बरीच रेलचेल असायची. कदाचित शारदाच्या सुगरण असल्यामुळे! चविष्ट आणि रुचकर असे जेवण बनवायची शारदा. तिच्या हातच्या स्वैयंपाकात मायेची चव यायची. करायचं म्हणून काम, अशा हिशोबाने तिने कधीच स्वैयंपाक केला नाही. जेवढं मन लावून जेवण बनवायची तेवढंच मन लावून ते वाढायची. ह्यामुळेच बाकीच्या बायकांपेक्षा तिला पैसे जास्त मिळायचे. त्यांचा संसार तसा बेताचाच. छोट्या चाळीतलं घर. सर्वांना काठोकाठ पुरतील एवढ्याच वस्तू. लागतील तेवढेच कपडे. कितीही आर्थिक चणचण आली तरी नवरा-बायको कमावतात आणि लेकरांच्या गरजा पूर्ण होतील ह्याची काळजी घेतात.
आज खूप मुसळधार पाऊस पडत होता. शारदा श्रुतीच्या घरीच सकाळचा स्वैयंपाक आटोपून पाऊस थांबायची वाट पाहत होती. श्रुती पण आज घरीच होती, आरामाचा दिवस होता तो तिचा. कानात हेडफोन्स, मांडीवर पुस्तक आणि हातात कॉफी चा मग. श्रुती बेडरूममधून हॉलमध्ये आली. शारदाला पाहून तिने विचारलं- 'काय गं, काय म्हणतात लेकरं?'
'छान आहेत ताई. शाळा- क्लास मध्ये दिवस जातो त्यांचा.'
'घरी पण काही अभ्यास घेतात कि नाही ग त्यांचे बाबा? '
'ते सकाळी लवकर जातात आणि संध्याकाळी कॉलेज नंतर रिअल इस्टेट ची दलाली करतात. त्यांचा फारसा वेळच मिळत नाही.'
'मग कसं ग जमतो लेकरांचा अभ्यास?'
'मी आहे ना, मी घेते त्यांचा अभ्यास'
'जमतो तुला त्यांचा अभ्यास घ्यायला?'
'हो मग! अहो ताई पदवीधर आहे मी' शारदा अभिमानाने म्हणाली.
'काय बोलतेस! अच्छा तरीच सोसायटी च्या सर्व नोटिसेस कळतात तुला. सॉरी हा, मला वाटायचं तू जास्त शिकलेली नसावी' श्रुतीला शारदाच्या शिक्षणाची पुष्टी झाली.
'हो ताई'
' ए... एवढं शिकलीयेस तर हे असं घरकाम का करतेस. म्हणजे छान करतेस तू स्वैयंपाक पण मग नौकरी का नाही करत? तुझा नवरा नाही करू देत का नौकरी तुला?' श्रुती तिचे अंदाज बांधायला लागली.
'नाही ओ ताई, त्यांचं तसं काही म्हणणं नाही. ते तर म्हणतात, चांगली नौकरीच कर ना. असं घरकाम कशाला करतेस?'
'मी पण तेच म्हणते. का नाही करत तू नौकरी.' हातातला कॉफी मग खाली ठेवत आणि हेडफोन्स बाजूला करत श्रुती बोलली.
खिडकीतून बाहेरचा पाऊस पाहत शारदाची नजर स्थिर झाली, नमलेल्या आवाजात ती बोलत होती.
'ते कसं आहे न ताई, ठीकठाक नौकरी करून महिन्याचा पगार घरी यावा एवढं तर शिकलीये मी. नौकरी मध्ये रुबाब असतो, स्थैर्य असते हे सगळं खरं असलं तरी स्वतःच्या हाताने अन्न बनवून सर्वांना खाऊ घालायचं काम पण छानच वाटत मला. आई लवकर सोडून गेली न माझी मला आणि बाबांना एकटी, म्हणून हि स्वैयंपाकाची हौस लागली. वडिलांना शिक्षणाचं फार गोडं होत. स्वतः घरगडी म्हणून कामाला होते पण माझ्या शिक्षणाबाबत खूप आग्रही होते. घरातली परिस्थिती जेमतेम असताना वडिलांनी मला शिकवलं. मी पण जमेल तसं शिक्षण पूर्ण करत गेले आणि पुढे शहरात येऊन कला शाखेत पदवी मिळवली.'
'वाह! छानचं कि...पण मग नौकरीसाठी कधी प्रयत्नच केले नाहीत का?' श्रुतीने कुतूहलाने विचारणा केली.
'प्रयत्न? नौकरीच करून पहिली ताई. कॉलेज संपले कि लगेच. बाबा ज्यांच्याकडे कामाला होते त्या शेठजींच्या ओळखीने मला एका अंतर्वस्त्रं बनवणाऱ्या कंपनीत दर्जा विभागात काम मिळाले. दोन-चार महिन्यात चांगलं काम शिकले मी. बाबांना हातभार लागावा एवढा पगार मिळत होता मला. त्यातूनच लग्नाचे पैसे जमवायला सुरवात केली. अगदीच नवीन विश्व होत ते, कापडाचं. कपडे नवीन, यंत्र नवीन आणि माणसं पण. 'उत्तम दर्जा ची अंतवस्त्र निर्माण करणे हेच आपले एकमेव उद्दिष्ट आहे. ते मिळवण्यासाठी आपण कोणत्याच बाबतीत मागे-पुढे नाही पाहिलं पाहिजे' असं आमचे विभाग प्रमुख नेहमी म्हणायचे. ते जवळ जवळ बाबांच्या वयाचे होते. एकदम प्रभावी वाटायचं मला ते. कामावर चांगलाच जम बसला होता माझा. आमचा पगार महिन्याच्या शेवटच्या दिवशी चेक ने मिळायचा सर्वांना.
एकदा विभाग प्रमुखांनी मला त्यांच्या केबिन मध्ये बोलावलं आणि म्हणाले - 'तुझं काम चांगलं चालू आहे. अशीच मेहनत करत राहा. तरक्की करशील. पण एक लक्षात ठेव, नुसतं कामच चांगलं असून प्रगती करता येत नाही. कामासोबत बाकी अजून गोष्टी पण असतात.'
'म्हणजे नेमकं काय सर?' मी विचारलं.
'वेळ आली कि सांगेल तुला'
'बरं, सर निघू मी आता?'
'हो निघ. आणि हो, दोन महत्वाच्या गोष्टी. यानंतर तू पगाराचा चेक घ्यायला नेहमी इकडे माझ्या केबिन मधेच यायचं. म्हणजे कामाच्या प्रगती बद्दल आपलं बोलणं होत राहील आणि आता टापटीप कपडे घालायचे तू. आपल्या कंपनीला आणि तुझ्या कामाला साजेशे.'
'बरं सर. चालेल' एवढा मोठा माणूस माझ्या कामाची स्तुती करतोय हे पाहून मी भारावून गेले आणि शिवाय शिकायला पण खूप काही मिळेल या विचाराने मी होकार दिला.
पुढं काम चा
लत राहीलं. पगाराचा दिवस आला. दिवाळी तोंडावर होती म्हणून पगार आणि बोनस असं दोन्हीही मिळणार होत. आज सगळे नटून थटून आले होते. मी पण छानशी साडी नेसली होती. आधी मी चेक घ्यायचा लाईन मध्ये उभी राहिले मग मला आठवलं कि माझा चेक तर सरांच्या केबिन मधून घ्यायचाय. पटकन सरांच्या केबिन जवळ गेले.
'सर, आत येऊ का?'
'अरे, शारदा. आत्ता मी थोडा बिझी आहे. तासाभराने येशील?'
'चालेल सर' मी घड्याळात ५ वाजलेले पहिले.
'नाहीतर एक काम कर ना, तू ७ वाजताच ये. मी पूर्णपणे मोकळा असेल म्हणजे आपलं नीट बोलणं होईल.'
'उशीर होईल सर मला घरी जायला'
'अगं, डोन्ट वरी. मी सोडेल तुला घरी माझ्या कार मध्ये'
'ठीक आहे सर' असं म्हणून मी नंतर यायला तयार झाले.
७ वाजेपर्यंत सगळे सहकारी घरी निघालेलं. चिडीचुप्प होत सगळीकडे. मी वेळेवर सरांच्या केबिन मध्ये गेले. सर एकटेच होते.
'शारदा, छान दिसतीयेस आज.'
'थँक यु सर'
'बस बस. निवांत बस. तुझा पगार आणि बोनस असा दोन्हीचा चेक तयार आहे माझ्याकडे. पण तो देण्याआधी मला तुला काही बोलायचंय'
'बोला ना सर'
'कसं आहे न शारदा, नौकरीमध्ये प्रगती फक्त चांगल्या कामाने मिळत नाही तर चांगले नातेसंबद्ध पण टिकवावे लागतात. आणि ते टिकवताना व्यावसायिक आयुष्य आणि खाजगी आयुष्य ह्यांची मिसळ होऊ शकते. पण ते मनावर नाही घेतलं पाहिजे. कामात प्रगती झाली तर खाजगी आयुष्य पण सुधारतेच ना! असंही आपण लोकांसाठी अत्यंत खाजगी अशी वस्त्र बनवतो नाही का!'
'हो सर.' मला त्यांच्या बोलण्याचा अर्थ कळला नसला तरी होकारार्थी मान डोलावली.
'कामात आपण स्वतःला वाहून घेतलं पाहिजे.' सर बोलत होते.
'ज्यावेळी मी तुझ्या जागेवर होतो, कित्येक अंडरवियर स्वतः वापरून दर्जा ठरवायचो. तसंच तू पण केलं पाहिजेस. तुझी ब्रा ची साईझ कॉमन आहे. भरपूर ट्रायल्स घेता येतील तुला' असं बोलताना त्यांची नजर माझ्या छातीकडे आणि चेहृऱ्यावर एक विक्षिप्त हास्य होत.
त्यांचे हे बोलणे ऐकून मी बावरले. मला काही सुचतच नव्हते. तेवढ्यात सर त्यांच्या खुर्चीतून उठून माझ्याकडे आले. माझ्या माथ्यावर घाम आलेला.
'हे बघ शारदा, आपण सगळे आता खूप मॉडर्न होत चाललेलो आहोत. अश्या क्षेत्रात काम करायचं म्हणजे वागण्या- बोलण्याची थोडी मोकळीक पाहिजेच ना. तू तरुण आहेस, हुशार आहेस आणि शिवाय सुंदर हि आहेस. तुला एवढी पुढे नेऊन ठेवीन कि कधीच पैश्याची कमी पडणार नाही' असे म्हणत त्यांनी माझा हात धरला. त्यांच्या श्वासाची गती बदललेली वासनेने आणि माझ्या श्वासाची, भीतीने.
'सर! मी खूप गरीब घरची साधी मुलगी आहे ओ. मी तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे. खूप आदर करते मी तुमचा. हे सगळं काय बोलताय.' मी थरथरत बोलले.
'छे! हे असं वयाचं काय घेऊन बसलीयेस? आणि तुझी गरिबी लवकरच संपेल हि शाश्वती माझी. बघ, तुझ्या बोनस चा चेक रिकामा ठेवलाय मी. तू माझ्याशी जेवढं मनमोकळं वागशील तेवढी त्यावरची किंमत वाढत जाईल.' असं बोलत बोलत त्यांचा हात माझ्या हातापासून खांद्याकडे गेला.
मी पूर्णपणे गळून गेले होते. अंग थरथर कापत होत अन डोळ्यांसमोर फक्त अंधार. खूप जोराने ओरडावं वाटत होत मला पण आवाजच निघेना. आवाज निघाला जरी असता तरी ऐकायला कुणीच नव्हतं तिकडे.
'सर प्लीज' एवढंच निघालं माझ्या तोंडातून.
माझ्या भावनांचा कसलाही विचार न करत त्याने माझ्या उघड्या पोटावर दुसरा हात ठेवला आणि मला कचकन त्याच्याकडे ओढून घेतलं. माझ्या ओठांवर त्याचे ओठ ठेवणार तेवढ्यात मी सगळी शक्ती एकवटून त्याला कचकन चावले आणि धडपडत तिथून पळ काढला. अंधाऱ्या फॅक्टरी मधून कशीबशी बाहेर पडले आणि तशीच पळत सुटले. घामाघूम अंगाने ढसाढसा रडतं रस्त्याने पळत होते. माझ्यासोबत ५ मिनिटांपूर्वी नेमकं काय घडलं हेच मला कळेना. थोडीशी पुढे गेल्यावर एक ऑटो मिळाला आणि मी तडक घर गाठलं.
चाळीमध्ये दिवाळीची तयारी चालू होती आणि बाबा घराबाहेर दिवे लावत होते. उद्या त्या दिव्यात जे तेल पडेल ते माझ्या पगारातून येणारं होत आणि तो पगार मी ऑफिसमध्येच सोडून आले होते. बाबांना पाहून मी स्वतःला आवरलं. 'मी आलेच' एवढंच म्हणत मी पटकन घरात घुसले. पर्स फेकून दिली आणि बाथरूम मध्ये गेले. बकेट मध्ये जेवढं पाणी होत तेवढं सगळं अंगावर ओतून घेतलं साडी तशीच ठेवून. जिवाच्या आकांताने रडले ओ मी दिवाळीच्या आदल्या रात्री.
हि सगळी हकीकत सांगता सांगता शारदाचे डोळे पाणावलेले श्रुतीने पहिले.
'बस ताई, तो दिवस आणि आजचा दिवस. बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलंय. त्या रात्री माझ्या स्वप्नांची होडी मोठ्या साहेबाच्या वासनेच्या पुरात वाहून गेली. बाबांना सांगितलं की मला लग्न करायचय, मुलगा शोधा. दिवाळीच्या पंधरवड्यात माझं लग्न उरकलं. परत कधीच मी त्या फॅक्टरीचा रस्ता धरला नाही. तो पगार, तो बोनस, ते काम, तो साहेब आणि त्याची वासना. सगळीच मागे सोडून मी सासरी निघून आले. ह्यांनी कधी विचारलंच नौकरीचं तरी मी तब्येतीच कारण देते. ११ वर्षे झाली संसाराला. नवरा समंजस भेटला. लेकरं मोठी होतायेत. माझं काम छान चाललंय पण आजही कुणी त्या वयाचा पुरुष दिसला की थरकाप उडतो ओ माझा. म्हणून कधी परत नोकरीची वाट धरलीच नाही. बस हा घाव मनात घेऊन जगतीये'
श्रुती स्तब्ध झाली होती. बरसत होता तो पाऊस आणि शारदाच्या यातना!