अपराधी
अपराधी


साहेब...
ओ साहेब..
काहीतरी द्या ओ....
२-५ रूपये. पोरीनं सकाळ पासन काहीच खाल्लं नाही व.
ओ बाई, देवाच्या नावानं द्या काहीतरी...
सोनी अन् तिची माय त्यांच्या रोजच्या 'कामात' व्यस्त होत्या. भीक मागण्याच्या!
आज सकाळपासनं काहीच हाती लागलं नव्हतं.
'ए सोने, इथंच काय फेऱ्या मारायली, जा कि जरा फलाटावर जाऊन बघ. ५-१० रुपये घेतल्याबगर वापस आलीस तर हाणतेच बघ तुला'
छोटी सोनी एक बोट तोंडात घालत फलाटाकडं निघाली. ठाणे स्टेशन वर भीक मागणे हीच तिची दिनचर्या.
फलाटाकडे निघालेली सोनी काही वेळात तिच्या आईच्या नजरेपासून दूर झाली. आई पण भीक मागण्यात व्यस्त. नुकत्याच आलेल्या लोकल मधून भरमसाठ माणसं उतरली आणि सोनी त्या गर्दीत हात पुढे करून पैसे मागू लागली.
'ओ बाईसाहेब..
काहीतरी द्या ओ.... काल राती पासन काहीच नाही खाल्लं.'
या गर्दीत फलाट क्रमांक २ वरच्या कल्याण लोकल ची भर पडली आणि स्टेशनवरं मुंग्यासारखी माणसं जमा झाली. ह्याच गर्दीत कुणीतरी सोनी च्या मागून आला आणि तिला अलगद उचलून गर्दीतून पसार झाला, सोनीला काही कळायच्या आतच. झालेली गर्दी मिनिटाभरात ओसरली पण सोनी काही आई जवळ परत आली नाही.
'हातात पैक पडलं नसल म्हणून थांबली असल तिथंच' तिची आई पुटपुटली.
आईच्या हातावर एकाने वडापाव टेकवला होता. 'एवढं खाऊन तरी घेऊ, ऑफिस वाल्याच्या लोंढा अजून तासभर येतच राहील' अश्या विचाराने सोनीची आई तिला बघत बघत फलाटावर आली. दोन्ही फलाट बघून झाले पणसोनी काही दिसेना. सोनीच्या आईला काहीच कळेना. 'रोजचंच काम हे, पोरगी गेली कुठं असल?' बघता बघता २ तास निघुन गेले. आता मात्र सोनीच्या आईला राहवेना. आपल्या २-३ सोबतीच्यांना घेऊन तिने पूर्ण ठाणे स्टेशन पिंजून काढल. सोनी काही दिसेना.
'घाबरायचं काही काम नाही, चुकून एखाद्या गाडीत शिरली असेल पोर. आपण रेल्वे पोलिसाला कळवू. ते लगेच सगळीकडं सांगतील न पोरगी काढतील शोधून' त्यांच्यातला एक जण बोलला. 'व्हय, बराबर हाय' असं म्हणत सगळे पोलिसाला कळवायला गेले. सोनी च वर्णन कळवलं. पोलीस त्यांनाच ऐकवायला लागले.
'लेकरं सांभाळता येत नाहीत तर काढता कशाला, भीक मागायला?'
'साहेब, बघा कि जरा पोरगी दुसऱ्या कोणत्या स्टेशनवर असल.' सोनीची आई काकलुतीनं म्हणाली.
पोलिसांनी रेल्वे मध्ये फोनाफोनी केली तेंव्हा काहीतरी भलतीच माहिती त्यांच्या हाती लागली. आज दिवसभरात मुंबई आणि उपनगरांमधून अशी भीक मागणारी सात लहान पोर गायब झाल्याची नोंद झालीये. हा मामला काहीतरी गंभीर आहे हे रेल्वे पोलिसांच्या लक्षात आलं. त्यांनी आणखी विलंब न करता ठाणे पोलिसांना हि बाब कळवली. ठाणे-कल्याण-मुंबई-नवी मुंबई, सर्व जागच्या पोलीस स्टेशन ची चक्र फिरू लागली. पत्रकारांच्या कानावर पण हि माहिती आली न क्षणभरात याची 'ब्रेकिंग न्यूज' झाली. पोलीस, पत्रकार आणि अधिकारी व नेते मंडळी पण ह्यात लक्ष घालू लागली कारण हा लहान पोर गायब व्हायचा आकडा आता सोळा वर पोचला होता. तीन दिवसात आठ स्टेशन वरून सोळा भीक मागणारी लहान पोर गायब होतात हि बाब बरीच गंभीर होती. असं तर ह्या गरीब भिकारी पोरांच्या गायब होण्याने कुणालाही फरक नसता पडला पण एका न्यूज चॅनेल वाल्याने ह्या सगळ्या घटनेचा 'फेसबुक लाईव्ह' टेलिकास्ट केला होता आणि आता हे लोन फेसबुक, ट्विटर, वव्हाट्सअँप च्या माध्यमाने सगळीकडे पसरलं होत. किडनॅपिंग पासून 'चाईल्ड सेक्स ट्रॅफिकिंग' पर्यंत ज्याला जी शंका येईल त्याने ती बोलून दाखवली. एवढ्यावरच हे सगळं थांबलं नाही तर चॅनेल वाल्यांनी ह्यावर चर्चासत्र भरवले. पब्लिक ओपिनियन घ्यायला सुरवात केली.
'सर्व स्टेशन CCTV च्या नजरेखाली आहेत ना साहेब, त्यात बघा ना काही हाती लागतंय का?' ह्या सर्व प्रकरणाचा ज्याने सोशल मीडिया वर वणवा पसरवला होता तो प्रभाकर पानसे, 'सत्य मीडिया' चा रिपोर्टर अत्यंत बारीकीने ह्या प्रकरणाचा मागोवा घेत पोलिसांच्या चिंतेत भर टाकत होता.
'ए रिपोर्टर, जेवढं करतोय न तेच खूप आहे. आम्ही काय करायचं ते आम्ही बघू' पोलिसांनी त्याला दम भरला. हे असे लहान भिकारी पोर एकदम गायब झाल्याने त्यांची पण झोप उडालेली. बरं एवढ्या सगळ्यात किती माणसांचा हात असेल त्यांना कळेना. हे सगळं एकट्या दुकट्याचं काम नाही. आणि खरंच 'चाईल्ड सेक्स ट्रॅफिकिंग' चा मामला असेल तर किती मोठ्या लेवल पर्यंत हे काम झालं असेल असा विचार करून रेल्वे पोलीस पण करा दबकूनच होती.
इकडे सर्व लेकरांच्या माय बापाची अवस्था खराब. खायला अन्न अन प्यायला पाणी नाही. पोटाची लेकरं दिसत नाहीत. सगळा आक्रोश!
मुंबई पोलिसांनीं सगळे CCTV फुटेज पण पहिले, ह्या लेकरांना उचलणारे फक्त पुरुष नव्हते तर बायका पण होत्या. सगळे वेगवेगळ्या वेशभूषेत आणि तोंडाला रुमाल अथवा स्कार्फ बांधलेले. शोध घ्यायचा तरी कसा?
हे प्रकरण बड्या राज्यकर्त्या नेते मंडळींनी जागीच दाबलं, विरोधकानीं आवाज तर केला पण, 'आम्हाला येत्या निवडणुकीत सत्ता द्या, आम्ही या प्रकरणाचा छडा लावू ' इतकाच. महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असल्याने हे प्रकरण बाजूला ठेवणे हेच सत्ताधारी व विरोधकांच्या हिताचं होत. आणि हा त्यांचा मतदार वर्ग नसल्याने तसच घडलं. सगळ्या प्रकरणाची अफरातफर करून पोलिस, नेते मंडळी आणि मीडियावाले शांत झाले. सगळं लक्ष पुन्हा निवडणुकांवर केंद्रित झालं.
पण प्रभाकर ने जिद्द सोडली नव्हती. गरीब लहान लेकरांच्या अश्या प्रकारे गायब होण्याने त्याला चैन पडेना. त्याने त्याच्या पद्धतीने शोध सुरूच ठेवला. त्याने अपहरण झालेल्या सर्व लहान मुलांचे वर्णन त्यांच्या आई वडिलांकडून ऐकून रेखाचित्र बनवून घेतले होते.
'ह्यांचा शोध मी लावणारच आणि त्या अपराध्याला तुरुंगाची हवा खायला लावणार' असा विचार सतत त्याच्या डोक्यात फिरत असे.
सहा महिने निघून गेले. ते गरीब बिचारे मायबाप आज पण आपल्या आपल्या स्टेशन वर भिकच मागत होते, आपल्या लेकरांच्या परतण्याची आशा करत!
दरम्यान प्रभाकर कामानिमित्त गडचिरोली जिल्ह्यात फिरत होता. कोरची तालुक्याच्या बाजारात फिरताना त्याला एक लहान मुलगी दिसली. कोपऱ्यावरच्या दुकानातून काहीतरी घेऊन तिने आपल्या पिशवित टाकलं आणि पटपट चालत निघाली. प्रभाकर चमकला! त्याने पटकन त्याच्या मोबाइल मधले सोनी चे रेखाचित्र काढले. त्याचा संशय बळावला. ती छोटी मुलगी ६ महिन्यांपूर्वी गायब झालेली सोनी तर नाही ना?
हातात असलेला गरम चहाचा कप त्याने तसाच टेबल वर ठेवला, चहावाल्याच्या हातात पैसे दिले आणि त्या लहान मुलीच्या मागे पळत पळत गेला.
ती छोटी पोरगी बस मध्ये चढली, प्रभाकर तिच्या मागे मागेच बस मध्ये बसला.
'एक आंबेखारी च तिकीट द्या' तिने कंडक्टर कडून तिकीट घेतले.
'एवढी लहान पोरगी एकटी कसा प्रवास करते, हीचा पाठलाग केला पाहिजे' प्रभाकर ने पण आंबेखारी च तिकीट काढल. तो जितक्या वेळा त्या मुलीला त्याच्याकडे असलेल्या रेखाचित्राशी तोलत होता त्याचा संशय बळावत होता कि हीच तर सोनी आहे.
ते दोघेही स्टॉप वर उतरले. प्रभाकर तिच्या मागे मागे जाताना हाच विचार करत होता कि ती अपहरण झालेली सर्व मुले आज त्याच्या हाती लागणार. त्याने संशय खरा ठरताच कुणाकुणाला फोन करायचा ते ठरवलं पण होत.
ती लहान मुलगी चालत चालत एका पडीकश्या पण मोठ्या घराकडे जात होती. त्या घरात शिरण्यासाठी ती डावीकडे वळाली आणि प्रभाकर भिंतीचा आडोसा घेऊन उभा राहिला. आत नेमकं काय चालू असेल ह्याचा मागोवा घ्यायला लागला.
थोड्याच वेळात,
'करुणाकरा करुणा तुझी
असता मला भय कोठले?
मार्गावरी पुढती सदा
पाहीन मी तव पाउले
सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी भीतीविना,
तिमिरातूनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना
सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना
तिमिरातूनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना'
ह्या ओळी त्याच्या कानावर पडल्या आणि त्याने काही कळेनासे झाले. तो पळत पळतच त्या घरात घुसला.
समोरच दृश्य पाहून तो सुन्न झाला. तो एकेक चेहरा त्याच्याजवळ असलेल्या रेखाचित्राशी जुळत होता. पण प्रभाकरचा काहीतरी काळंबेरं असण्याचा संशय सपशेल खोटा ठरला होता.
ती गायब झालेली सर्व मुले एका सुरात कुसुमाग्रज लिखित प्रार्थना मनोभावे गात होते. फक्त ते ३-४ जण नव्हते तर आणखी काही अनोळखी चेहरे पण होते. स्वच्छ कपडे, प्रफुल्लित चेहरा, त्यावर स्मितहास्य, त्यांच्यासमोर एक तरुण स्री आणि एक काळा फळा ज्यावर गणितं लिहिली होती. शाळा होती ती!
दोन मिनिटं प्रभाकर स्तब्धच होता.
'नमस्कार, काय हवयं आपल्याला?' त्या तरुण स्री च्या प्रश्नाने प्रभाकर भानावर आला.
'तुम्ही कोण?' त्याने तिला उलट प्रश्न केला.
'मी अश्विनी, ह्या मुलांची शिक्षिका'
'खोटं बोलताय तुम्ही, ह्या सर्व मुलांना पळवून आणलात तुम्ही, अपहरण केलंय त्यांचं आणि आता शिक्षक असल्याचा आव आणताय'
अश्विनी ला प्रभाकर ची चलबिचल लक्षात आली.
'ह्यांना होय? हो आम्हीच आणलंय! ' ती अगदी सहज बोलून गेली
'अपहरण म्हणतात त्याला. गुन्हा केलाय तुम्ही! प्रभाकर उद्गारला
तत्क्षणी, प्रार्थना संपवून गणितं सोडवायला घेतलेल्या त्या मुलांकडे त्याचे लक्ष गेले आणि प्रभाकर गोंधळून गेला.
'ह्या मुलांना होते त्या अवस्थेत न सोडून, शिक्षणाची आस लावणं आणि खंबीरपणे उभे करणं हा जर गुन्हा असेल तर केलाय आम्ही गुन्हा' अश्विनी ठामपणे म्हणाली.
हि मुलं कशी इथे आणल्या गेली? कशी थांबली? अश्विनी आणि तिचे सहकारी नेमके कोण? त्यांचा नेमका उद्देश काय? ह्या सगळ्या प्रश्नांच्या गराड्यात प्रभाकर गुंतून गेला.
ह्या मुलांना त्यांच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवणारे त्यांचे माय-बाप, त्यांची अशी दयनीय अवस्था बदलण्यासाठी तसूभरही प्रयत्न न करणारे राज्यकर्ते कि त्यांचे अपहरण करून त्यांना सुशिक्षित आणि सक्षम बनविण्याचा विडा उचलणारे हे युवक... नेमकं अपराधी कोण? ह्या यक्ष प्रश्नासकट प्रभाकरने काढता पाय घेतला.