तुम्ही चुकीच्या खोलीत आहात
तुम्ही चुकीच्या खोलीत आहात


'जरा आजूबाजूला बघ.'
त्याच्या बॉस मनधरणी करत होता, त्याने कंपनी सोडण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करावा म्हणून!
'तुझे सहकारी तुझ्या इतके हुशार नाहीत. तू फार कमी वेळात पदाची शिडी वरपर्यंत चढशील. आम्ही पदाधिकारी पण खुश आहोत तुझ्या कामावर.'
आदित्य, एका नामांकित विद्यापीठातून व्यवस्थापनाचे शिक्षण घेतलेला हुशार तरुण. त्याने ती ८५ वर्षे जुनी व अग्रगण्य कंपनी ६ महिन्यातच सोडण्याचा निर्णय घेतला होता. बॉस चे म्हणणे लक्ष्य देऊन ऐकत असताना त्याला 'देजा वू ' झाल्यासारखे वाटले. आदित्यला त्याच्या शाळेतल्या दिवसांची आठवण झाली जेंव्हा तो शाळेतला 'टॉपर' होता.
'आम्हाला यात कसलीही शंका नाही की तू नेहमी असाच प्रथम क्रमांकावर राहणार.' त्याचे मुख्याध्यापक म्हणत होते.
१२ वर्षाच्या आदित्यसाठी ही खूप मोठी शाबासकी होती. फुललेली छाती आणि चेहऱ्यावर हास्य घेऊन तो पळत पळत घरी आला. क्षणाचाही विलंब न करता त्याने आईला मिठी मारली आणि मुख्याध्यापकांनी त्याची केलेली स्तुती आईपर्यँत पोचवली. आई कडून तो आनंद आणि अभिमानाची अपेक्षा करत होता पण तिचा चेहरा काहीतरी वेगळच बोलत होता.
मिनिटाभराने तिने अगदी सहजच विचारलं, 'तुला या शाळेत टॉपर बनून राहायचंय तर?'
'हो तर! मी आहे आणि राहणारचं.'
'मग मी तसं होऊ देणार नाही' आई क्षणार्धात बोलली.
आईच्या ह्या प्रतिक्रियेमुळे आदित्य हादरून गेला.
'ह्या शाळेतलं तुझं हे शेवटचं वर्ष. पुढच्या वर्षीपासून तू 'भारत विद्यालय' मधून शिक्षण घ्यायचंस.' त्याच्या दहावी पास आईने तिचा हा अनपेक्षित निर्णय सुनावला.
आदित्यला काही कळेनासं झालं. तो खुश होता की शहरातल्या अग्रगण्यं शाळेत तो शिकणार आहे जिथे अभ्यासाबरोबर शिस्त, कला, क्रीडा ह्यांना पण भरपूर महत्व दिले जाते. पण त्याला एक आंतरिक भीती वाटत होती - भारत विद्यालयातील चुणचुणीत व अष्टपैलू विद्यार्थ्यांमध्ये आपला 'टॉपर' चा शिक्का मिटतो कि काय ह्याची.
आईने हि भीती त्याच्या डोळ्यात पहिली आणि तिने अर्धा गढ जिंकला.
नंतर जेंव्हा आदित्य भारत विद्यालयात ६० विद्यार्थ्यांमध्ये १६वा आला, आईने आवर्जून विचारलं - 'काय टॉपर, कसं वाटतं १६व्या क्रमांकावर?'
आदित्य एकदम शांत. एक शब्द पण बोलू शकला नाही तो! ३ वर्षं लागली त्याला पहिल्या ५ मध्ये स्थान मिळवायला.
'आई, आता मी सांगू शकतो कि कसं वाटलं मला.'
आदित्यला त्याच्या आईच्या दूरदृष्टी व धाडसी निर्णयाची जाणीव झाली.
'मी इथे तुझ्या पगाराबाबत बोलायला नाही बसलोय, ते मी पाहून घेईन' बॉस च्या प्रेरक बोलण्याने आदित्य भानावर आला.
'तुला कळतंय का मी काय बोलतोय ते? मला खात्री आहे कि तू तुझे व्यावसायिक उद्धिष्ट इथे फार लवकर साध्य करू शकशील. मला इथे तुझ्या वयाची अगदी २- ३ जणच दिसतात जे तुझ्याएवढी बुद्धिमान आहेत. तुझ्यासाठी ह्या कंपनीत तसेच ह्या उद्योग क्षेत्रात प्रगती करने तू जिथे जाऊ इच्छितोस त्यापेक्षा तुलनेने सोपे आहे.'
आदित्य लक्षपूर्वक ऐकत होता.
'मी माझ्या निर्णयाचा नक्कीच पुनर्विचार करेल सर.' असं बोलणार होता तो! पण बोलून गेला - 'माझा निर्णय झालाय सर!'
बॉस ने त्यांचे प्रयत्न थांबवले, आदित्यला शुभेच्छा दिल्या आणि संवाद संपला.
डोळ्यात एक नवी चमक घेऊन आदित्य केबिन बाहेर आला. पटकन त्याने आपला मोबाइल घेतला आणि आईला फोन केला.
'आई, इथले बॉस म्हणतात कि मी इथे सर्वात हुशार आहे. इथेच थांबलो तर खूप वरपर्यंत पोचेल.'
'तुझा काय निर्णय ठरलाय मग?' पन्नाशी गाठलेल्या त्याच्या आईने विचारले.
'थँक्स आई! १२ वर्षाचा असताना मला शिकवलेल्या आयुष्याच्या धडयाबद्दल. मी ही कंपनी सोडतोय आणि तिथे जातोय जिथे मी सर्वात हुशार नक्कीच नसेल.'
पाचशे किलोमीटर एकमेकांपासून दूर असलेल्या दोघांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य उमटले. आदित्यच्या, कारण आईला तिच्या मुलाला कसं घडवायचं होत हे त्याला कळालं म्हणून आणि आईच्या, कारण तिने लावलेल्या रोपट्याचं आज १४ वर्षांनी फळं मिळालं म्हणून!
तरुण आदित्यने आईची शिकवण पक्की मनाशी बांधली कि - जर एका खोलीत तुम्ही सर्वांत हुशार आहात, तर तुम्ही चुकीच्या खोलीत आहात!