अंतरंग
अंतरंग
'नमस्कार मित्रांनो...
शून्यातून विश्व निर्माण केलेल्या आपल्याच माणसांचा कौतुकसोहळा म्हणजे आपला कार्यक्रम - जगात भारी
हे विश्व निर्माण करताना त्यांनी जे असाध्य, साध्य करून दाखवलं त्याची प्रेरणा म्हणजे - जगात भारी
आणि अशा ह्या अवलियांना आपल्या मराठमोळ्या प्रेमाची पोचपावती म्हणजे - जगात भारी!'
(टाळ्यांचा कडकडाट)
आता जास्त वेळ न घालविता मी तुमचा मित्र सारंग जाधव आमंत्रित करतो - नुकताच राष्ट्रीय पुरस्कार प्रदान झालेल्या अभिनेत्री रेवती ह्यांना.
(टाळ्यांचा कडकडाट)
'हॅलो रेवती, 'जगात भारी' मध्ये तुझं हार्दिक हार्दिक स्वागत.'
'धन्यवाद सारंग'
'मी ना आजवर बावन्न भाग चित्रित केलेत 'जगात भारी' चे पण आज नेमकं कुठून सुरु करावं काहीच कळत नाहीये. म्हणजे आम्ही सर्वांनी तुला विविध मालिकांमधून, चित्रपटांमधून बऱ्याचशा भूमिका करताना पाहिलं आहे. पण, आता चक्क राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी! कौतुकास्पद तर आहेच शिवाय अचंबित करणारं आहे.'
'सारंग, मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय. मागील ८ वर्षांपासून चित्रपटश्रुष्टीत वावरणारी रेवती आज अचानक राष्ट्रीय पुरस्काराच्या माध्यमातून सर्वांच्या नजरेत पडते ह्यात आश्चर्च्य तर वाटणारच.'
'हो. आणि तुला हा पुरस्कार हिंदी चित्रपटासाठी मिळाल्यामुळे भारतभर ह्याची दखल घेतली जातीये. बरं सर्वात प्रथम आम्हाला तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे कि पुरस्कार सोहळ्याचा अनुभव कसा होता?'
'अप्रतिम! एखाद्या कलाकाराची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जावी आणि राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान व्हावा हे सगळं खूप रोमांचक होत. आजवर अनेक अवॉर्ड्स शो ला गेलीये पण राष्ट्रीय पुरस्काराची गोष्टच वेगळी. इथे तो झगमगाट नव्हता, पण सगळं एकदम प्रेरणादायी होतं. घासून गुळगुळीत झालेले विनोद मारनारे निवेदक नव्हते, कलेची किंमत कळणारे जाणते लोक होते. आपली कला मनोरंजनापूर्ती मर्यादित न ठेवता तिला थेट लोकांच्या मनात भिनवणारे कलोपासक होते.'
'वाह! कधी वाटलं होत का इतक्या पटकन हे सगळं होईल? कि तू मनाशी ठरवलेलं?'
'मला नाही वाटत असं आपण कधी मनाशी ठरवून असतो कि मला अमुक- तमुक पुरस्कार मिळवायचाय. मला जे काम मिळत गेलं ते मी प्रामाणिकपणे करत राहिले.'
'पुरस्कार प्रदान होत असताना नेमक्या काय भावना होत्या?'
'भावना दाटून आल्या होत्या. कारण हा प्रवास इतका सोपा नव्हता. अगदी लहानपणीपासून ते त्या दिवसापर्यंतचा. प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष येतो परंतु माझा संघर्ष आधी स्वतःशी आणि नंतर समाजाशी होता. आज इथे ह्या कार्यक्रमात तुला कदाचित विचारावं वाटतं नसेल पण माझ्यासारखी काळ्या कांतीची स्त्री जी रूढार्थाने देखणी नाही, जिची योग्यता तिच्या कलेवरून नाही तर दिसण्यावरून केली जाते, अशा अभिनेत्रीला लोक 'हिरोईन' म्हणताना कचरतात.'
'हो म्हणजे तसंच काहीतरी. चित्रपटसृष्टी मध्ये गोऱ्या-गुमट्याचं पारडं नेहमीच जड राहील आहे. काळ्या-सावळ्याच्या हाती एका विशिष्ट धाटणीचेच रोल येतात, किंबहुना, दर्शकपण ह्या 'देखण्यांना' झुकतं माप देतात हे सत्य आहे. हे असं सगळं असताना, तू तुझी वाट कशी शोधून काढलीस?'
'अगदी खरं बोललास सारंग. पण हि परिस्थिती केवळ सिनेसृष्टीत आहे असं नाही. मला आठवतं अगदी लहान असल्यापासून माझ्या 'काळी' असल्याची जाणीव मला पावलोपावली करून दिली जायची. आमचे नातेवाईक, घरी येणारे-जाणारे मला 'काळूबाई' च म्हणायचे. शाळेत कुणी मैत्री करण्यात स्वारस्य दाखवत नसत. आवड आणि गुण असून देखील मला नाटक, नृत्य ह्यात संधी मिळत नव्हती. माझ्या रंगाचा आणि माझ्या गुणांचा सरळ संबंध लावला जायचा. आमच्या छोट्या शहारातील कॉलेजमध्ये काही वेगळं घडलं नाही. माझा हा रंग नेहमी माझ्या कर्तृत्वाच्या आड आला. माझा संघर्ष समाजाशी तर होताच पण त्यापेक्षा मोठा संघर्ष स्वतःशी होता. खूप दुःख व्हायचं तेंव्हा, आजही होत.'
'आम्हाला कळतोय तुझा संघर्ष रेवती. ह्या अशा सगळ्या वातावरणात वाढलेली तू, अभिनय क्षेत्रात प्रवास कसा सुरु केलास?'
'कॉलेज मध्ये नाटकांमध्ये जे काही छोटे मोठे काम मिळत होत ते करत करत मुंबई गाठली. मग इथे कधी मालिका कधी वेब सिरीज तर कधी नाटकांमधून मिळतील त्या भूमिका केल्या. ३-४ मराठी चित्रपट पण केले. मला वाटते 'आलबेल' ह्या चित्रपटापासून मराठी प्रेक्षक मला ओळखायला लागले. परंतु त्यात पण माझी व्यक्तिरेखा एका ग्रामीण तरुणीची होती. नंतर हिंदीमध्ये पण काम केलं. पंकज त्रिपाठी म्हणतात तसं माझ्या क्राफ्ट वर पकड मिळवली. उत्तम अभिनय हा आपल्या अंतरंगात होणाऱ्या एका विशिष्ट रासायनिक प्रक्रियेचा परिणाम आहे असं मला वाटते. त्यामुळे प्रत्येक भूमिकेच्या वेळी एक समाधान मिळत गेलं आणि मी काम करत गेले. मग एकेदिवशी मला श्रीराम राघवन सरांच्या ऑफिस मधून कॉल आला. मी ऑडिशन आहे असं समजून लगेच पोचले. तिकडे गेल्यावर प्रत्यक्ष राघवन सर भेटले आणि म्हणाले - 'रेवती, मुझे आपका काम काफी अच्छा लगा. इसबार कुछ बडा करते है. मेरी अगली फिल्म के लिये जो एक किरदार लिखा है वो काफ़ी पेचीदा है. मुझे लगता है तुम इसको सहजता से कर लोगी.' मी होकारार्थी मान डोलावली. 'तो, बनोगी मेरी लीड एक्टरेस?' राघवन सर म्हणाले. ऑडिशन आहे समजून तिथे गेलेली मी हे सगळं ऐकून थोडी बावचळले. आता अशी संधी मिळत असताना - स्क्रिप्ट कुठे आहे? अजून डिटेल्स मिळतील का? बाकी कलाकार कोण आहेत? हे असे प्रश्न विचारणे म्हणजे मूर्खपणा झाला असता. मी क्षणार्धात होकार दिला आणिरेस्ट इस हिस्टरी! त्याच चित्रपटातल्या भूमिकेसाठी मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.'
'मस्त!. म्हणजे हा होता तुझा टूर्निन्ग पॉईंट. तुझा दॅट वन मोमेन्ट!'
'नाही सारंग. मला नाही वाटत कि हा माझा दॅट वन मोमेन्ट होता. म्हणजे चटकन घेतलेला तो निर्णय माझ्यासाठी नक्कीच अमूल्य ठरला पण माझ्या आयुष्यात तो मोमेन्ट खूप आधीच आलेला. मी ६वी त असेल तेंवा. मला नुकत्याच एका डान्स मध्ये पहिल्या रांगेतून शेवटच्या रांगेत ढकलण्यात आलं होत. कारण, मी देखणी नाही. माझ्याच वर्गातल्या एका गोऱ्या मुलीने मला रिप्लेस केलेलं. मला अश्रू अनावर झाले आणि रंगीत तालीम झाली कि मी लगेच शाळेजवळच्या मैदानात जाऊन बसले. तिथे लहान वयाची मुलं-मुली क्रिकेट आणि हॉकीचा सराव करत होती. त्यांचा खेळ पाहण्यात मला विशेष रस ह्यासाठी वाटायचा कारण खेळामध्ये रंगाला महत्व नसतं. कुणी काळं असो अथवा गोरं, हि सगळी मुलं आणि त्यांचे प्रशिक्षक केवळ कौशल्याची किंमत करायचे. मला झालेलं दुःख विसरता यावं म्हणून मी ह्यांचा सराव पाहण्यात गुंतले. मैदानाजवळच एक छोटंसं मार्केट होत जिथं मला एक गॅस चा फुगेवाला फुगे विकताना दिसला. ह्या परिसरात वावरणारे लोक एकतर खेळात मग्न होते किंवा खरेदीमध्ये. मग ह्याच्याकडून फुगे विकत घ्यायला फुरसत कुणाला. पण हा फुगेवाला हुशार होता. मी पाहिलं कि तो दर अर्ध्या-पाऊण तासाला एक फुगा हवेत सोडून द्यायचा. तो फुगा पाहून त्याच्याकडे फुगे घ्यायला गर्दी जमा व्हायची. ती गर्दी ओसरली कि परत तो आणखी एक फुगा हवेत सोडायचा. परत लोक फुगे घ्यायला जमा व्हायचे. लाल, पिवळा, पांढरा निळा, हिरवा, गुलाबी असे एकापाठोपाठ बरेच फुगे त्याने दिवसभरात हवेत सोडले आणि आपला धंदा चालवला. आवडलं मला. संध्याकाळी मी त्याच्याकडे गेले आणि म्हणाले - 'दादा, आयड्या तर एक नंबर आहे तुझी. पण मला सांग, तू पिवळा, निळा, लाल, हिरवा, पांढरा असे सगळे फुगे घेतलेस जे उंच उडाले. तू काळा फुगा नाही घेतलास. का रे? फुगा काळा असला तर तो उंच उडू शकत नाही का?' माझ्या प्रश्नाचा कसलाही संदर्भ नसलेल्या त्या फुगेवाल्याने पटकन एक काळा फुगा उचलला आणि गॅस भरून उंच हवेत सोडून दिला. मला म्हणाला - 'ताई बाई, फुगा काही त्याच्या बाहेरच्या रंगामुळे उंच जात नसतो, तर त्याच्या मध्ये भरलेल्या गॅसमुळे जात असतो.' तो फुगा पाहून त्याच्याकडे आणखी ग्राहक आले. हवेत उंच उडालेला तो काळा फुगा मला मोठी शिकवण देऊन गेला -
यशस्वी माणसं आयुष्यात खूप वर जातात ते त्यांच्या रंगामुळे नाही तर अंतरंगात असलेल्या गुणांमुळे!
बस्स! तो होता माझा दॅट वन मोमेन्ट जेंव्हा मी ठरवलं कि आता आपण मोठी हिरोईन बनवूनच दाखवायचं आणि मग माझा जिद्दीचा प्रवास सुरु झाला.