Buy Books worth Rs 500/- & Get 1 Book Free! Click Here!
Buy Books worth Rs 500/- & Get 1 Book Free! Click Here!

Sunita madhukar patil

Inspirational Others


4.5  

Sunita madhukar patil

Inspirational Others


सुनेची चौकट

सुनेची चौकट

3 mins 331 3 mins 331

खरंतर रेवाला एवढ्यात सासुबाई व्हायचे नव्हते . राहून राहून सारखे तिला वाटत होते, आपण मस्त संपूर्ण घरावर स्वतंत्रपणे राज्य करत आहोत, सगळीकडे आपलंच अधिपत्य आहे. सगळीकडे आपलीच हुकूमशाही चालतेय. लग्नानंतर अचानक दुसर कोणीतरी येणार आणि मध्ये मध्ये लुडबूड करणार. वास्तविक पाहता अमितच्या लग्नाचे कोणतेच प्रयोजन किंवा विचार नव्हता. पण एक दिवस पठ्ठ्याने अचानक मुलगी समोर उभी केली आणि मग काय वर्षभरातच त्याला बोहल्यावर उभा करावा लागला आणि नाजूक अवनी घरात माप ओलांडून आली.

लग्न होताच रेवाने दोघांनाही निक्षून सांगून टाकलं, "तुम्हाला दुसरा वेगळा फ्लॅट घेऊन देतो तिथे तुम्ही तुमचा नवीन राजराणीचा संसार थाटा. पण छे!!! कसलं काय. अमित आणि अवनी दोघेही ह्या गोष्टीला तयार होईनात. मग काय शेवटी तिने कशीबशी मनाची तयारी केली आणि सासूच्या भूमिकेत शिरली. ते ही, बिचारी सून आपल्या आईबाबांच घर सोडून इथे आली आहे. त्यांची कमी तिला जाणवू द्यायची नाही आणि सुनेला मुलीसारखीच समजायचे म्हणजे ती आपोआप सर्वांमध्ये या घरामध्ये सामावली जाईल या विचारानेच. पण जसा जसा काळ पुढे सरकत गेला आणि हळूहळू तिच्या लक्षात आले की सासु होणे म्हणजे देखील एक प्रकारचं दिव्यच आहे. सर्व प्रथम तर मुलगी मानणे म्हणजे काय हे आधी शिकायला पाहिजे आणि हे काय तितकी सहज, सोपी गोष्ट नाही.

कारण होतं अस की आपण जेव्हा सुनेला आपल्या मुलीसारखे वागवतो ना तेंव्हा त्याचा एक वेगळा अभिमान म्हणा अथवा एक गुर्मी मनामध्ये जागृत होते आणि त्याप्रमाणे अपेक्षाचं ओझं आपण तिच्यावर लादत जातो. रेवाचं ही असचं झालं. तिने भराभर आपल्या चांगुलपणाची आणि तिच्या अवगुणांची यादी डोक्यात तयार केली. मी किती चांगली आहे तिला मुलगी मानते पण तिला याची जाणीव आणि कदर नाही, तिला घराविषयी, घरातील लोकांविषयी काहीच वाटत नाही. निव्वळ स्वार्थी आहे. कारण सुनेने करायच्या कर्तव्यांची यादी तिच्याकडे तयारच होती.

रेवाने सून या शब्दाला एका चौकटीत बांधलं होतं आणि त्या चौकटीतच ती सुनेला शोधत होती. त्या चौकटीत जर ती बसली तर ती खूप चांगली, सर्वगुणसंपन्न सून असणार होती आणि जर ती चौकटीबाहेर गेली की मग स्वार्थी, अडाणी, आई बापाने काही शिकवलं नाही अशी अनेक लेबलं तिच्याजवळ तयारच होती.  सामाजिक बदल कितीही झाला तरी लग्नसंस्थेच्या पारंपरिक चौकटी लवचिक होताना मात्र दिसत नाहीत. आणि या चौकटींचा सर्वाधिक जाच घरचा उंबरठा ओलांडून येणाऱ्या सुनेला भोगावा लागतो. घरातल्या लेकींना मोकळीढाकळी वागणूक मिळते. शिकण्यापासून ते करिअर निवडण्यापर्यंतची सगळी मोकळीक दिलेली असते पण जेंव्हा आई बाप सासू-सासऱ्यांच्या भूमिकेत शिरतात तेंव्हा मात्र मुलीने आदर्श सुनेचे सगळे गुण एका झटक्यात आत्मसात करावे अशी अपेक्षा तिच्याकडून केली जाते. पण हळुहळु रेवाला समजलं की जोपर्यंत सुनेची चौकट ही आपल्या लेकीच्या चौकटीसारखी सुंदर आणि सुबक आपण बनवत नाही, तोपर्यंत ती सुनेची लेक बनू शकणार नाही.

ही उपरती होताच रेवाने सुनेच्या चौकटीची डागडुजी करायला सुरूवात केली. या कामात तिने अमितची म्हणजेच आपल्या लेकाची, अवनीच्या आईबाबांची, तिच्या भावंडांची मदत घेतली. 

अमितच्या लग्नाला जवळजवळ तीन चार वर्षे होत आली पण ती सुनेची चौकट काही लेकीच्या चौकटीसारखी नीट, सुबक बनलेली नाही पण तिचे प्रयत्न अजून चालूच आहेत. तिने निर्धारच केलाय जोपर्यंत ती चौकट हवी तशी पूर्ण होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. सासूचा मुलगा हा सुनेचा नवरा होतो आणि एक असुरक्षिततेची भावना मनात घर करू लागते. आतापर्यंत गृहिणी म्हणून घरसंसार सांभाळणारी सून भविष्यात जाऊन सासू बनते. सून असतानाची होणारी तिच्या मनाची घुसमट ही सासू अध्यायाचा स्वीकार करताना मनाच्या कुठल्या तरी कोप-यात जतन करून ठेवलेली बाहेर पडते. नवीन घरात प्रवेश केल्यानंतर सासूप्रमाणे सुनेलाही नव्या संसाराची गणितं जुळवावी लागतात. अनवी मात्र ही गणित कशी सोडवायची हे चांगलच जाणून होती आणि म्हणूनच अवनी रेवामध्ये आईला पाहत होती. 

दोघींचे विचार सारखे, स्वभाव थोडेफार सारखेच अगदीच जुळतात असं काही नाही पण आहेत. कधीकधी रेवा तिच्यावर चिडलीच तर ती पण कधी राग मनात धरत नाही किंवा तिला उलटूनही बोलत नाही. ती सर्वार्थाने रेवाची लेक बनली आहे. आता बघुयात तिची सुनेची चौकट कधी लेकीच्या चौकटीच रूप घेते ते!!!


© copyright

© all rights reserved.

या कथेच्या प्रकाशनाचे आणि वितरणाचे सारे हक्क लेखिकेकडे राखीव. कथेत अथवा कथेच्या नावात किंवा कथा लेखिकेच्या नावाशिवाय आढळून आल्यास तो कॉपी राईट कायद्याचा भंग मानला जाईल. कथा जशीच्या तशी शेअर करण्यास काहीही हरकत नाही.


Rate this content
Log in

More marathi story from Sunita madhukar patil

Similar marathi story from Inspirational