सुडाचा प्रवास...
सुडाचा प्रवास...
देवांशची बायको दिवाळीनिम्मित माहेरी गेली होती. त्याची बायको मितालीचे माहेर धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील दहिवद हे छोटेसे खेडेगाव. देवांश बायकोला घेण्यासाठी मुंबईवरून निघाला. रेल्वेने तो नासिकपर्यंत आला व नंतर शिरपूर बसमध्ये बसला. देवांश रात्रीच्या ९ च्या सुमारास शिरपूर बस स्थानकाला पोहचला. तिथून दहिवदला जाण्यासाठी त्याला रिक्षा भेटत नव्हती. वैतागून तो स्टॅन्डच्या बाजूला असलेल्या टपरीवर चहा पिण्यासाठी गेला व तेथील चहावाल्यास म्हणाला की, दहिवदला जाण्यासाठी दुसरे काही साधन नाही का?
त्यावर चहावाला म्हणाला, नवीन दिसताय साहेब. रात्रीचे कुणी जात नाही साहेब तिकडं. जीव भ्यास त्या रोडले. त्यात आज अमावश्या शे... असे तो त्याच्या भाषेत बोलला.
देवांश शिक्षित असल्याने असल्या गोष्टी मानत नव्हता. तिथून चहा पिवून पायी जाण्याचा निर्णय त्याने घेतला. बायकोला फोन करावा तर फोन डिस्चार्ज झाला होता...
शिरपूरपासून 5 किमीचा प्रवास, रात्रीचे ११ वाजले होते. देवांश मुंबई-आग्रा हायवेने पुढे निघाला. पाठीमागून येणाऱ्या गाड्यांना हात करत करत पुढे चालत होता. पायाचे तुकडे पडावे एवढा देवांश थकला होता. रातकिड्यांची किर्रकिर्र स्पष्ट ऐकू येत होती. दूरवरून कुठेतरी गाडीच्या हाॅर्नचा आवाज येत होता. अचानक सुसाट पाठीमागून गाडी भरधाव वेगाने येवून क्षणात दिसेनाशी होत होती. देवांशला कुणीतरी पाठीमागून पाठलाग करताना भासत होते. अचानक कुणीतरी बाईने ‘साहेब येऊ द्या की मला?’ असा आवाज दिल्याचा त्याला भास झाला तसा त्याच्या अंगावर काटा ऊभा राहिला. कुणीतरी त्याच्या हाताला धरुन चालत आहे असे त्याला जाणवत होते. स्मशानशांतता पसरली होती. कुठुनतरी कुत्रे विचित्र किंचाळ्या मारत होती. त्याच्या पायातील बुटांमुळे चालताना टक टक आवाज रात्रीची शांतता भंग करत होता आणि मधूनच ‘साहेब येऊ द्या की मला?’ असा सुंदर लेडीजचा आवाज. तिच्या आवाजावरून ती खूप सुंदर असावी असे देवांशला मनोमन वाटत होते पण आजुबाजूस बघितल्यावर तिथे चिटपाखरुही नव्हते. जवळपास देवांश गावाच्या जवळ आला होता. तितक्यात त्याच्या गळ्यात नाजूक हात कुणीतरी टाकला. तो त्याने भीतीने झटकला. तेवढ्यात ‘राहू द्या की’ असा नेहेमीच्या बाईचा आवाज आला, देवांश प्रचंड घाबरला व घामाघूम झाला...
देवांश देवाकडे प्रार्थना करु लागला व मला वाचव अशा डोळू मिटून याचना करु लागला. डोळ्याची पापणी उघडताचा त्याच्यासमोर खूप भयानक अपघात झाला व जोराचा कान सुन्न करेल असा आवाज झाला. देवांश तिथे जावून बघतो तर एक सुंदर लेडीज साक्षी जीवाच्या आकांताने रडत होती ती रक्ताने पूर्ण माखली होती, ‘मला वाचवा’ असे म्हणत होती. कदाचित तिला हायवेने येणाऱ्या गाडीने धडक दिली होती व गाडी निघून गेली होती. देवांशने क्षणाचाही विलंब न लावता तिच्याजवळ मदतीला गेला व तुम्ही कुठे राहता, तुमचा पत्ता द्या, मी नवीन आहे मला काही माहिती नाही, इथे जवळ हाॅस्पिटल कुठे आहे मी तुम्हाला उपचारासाठी घेवून जातो...
त्यावर ती म्हणाली की, इथून हाॅस्पिटल दूर आहे व जाण्यास गाडीही भेटणार नाही. त्यापेक्षा गावात माझ्या घरी जा माझ्या भावास निखिल कामत याला निरोप द्या. इथून पाच मिनिटांच्या अंतरावर माझे घर आहे..
देवांश घाईघाईने दहिवद गावात पोहचला व निखिलचे घर शोधून त्याला घडलेला अपघात सांगितला व त्वरित त्याला जाण्यास सांगितले. निखिल पटकन गाडी घेवून घराच्या बाहेर पडला. निखिलच्या घरातील एक वयोवृद्ध गृहस्थ देवांशकडे आले व विचारपूस करु लागले.
साहेब कुठुन आलात व कुठे जायचे आहे?
देवांशने मितालीच्या घरचा पत्ता सांगितला आणि मला तिथे सोडून देता का, असे म्हणाला.
त्यावर ते बाबा म्हणाले, रात्रीचे २ वाजले आहेत. इथून १ मैल हाय. सकाळला जा आराम करा इकडंच, असे म्हणाला...
देवांशने काही विचार न करता होकार दिला व झोपी गेला. दिवसभरच्या प्रवासाने थकल्यामुळे त्याला झोप आवरत नव्हती व ती लेडीजही त्याच्या डोळयासमोरुन जात नव्हती. तिचा विचार करता करता त्याचा कधी डोळा लागला त्याला समजलेच नाही.
साहेब उठा की आठ वाजलेत, निखिलने आवाज दिला तसा देवांश खडबडून जागा झाला व उठल्याबरोबर तुमची बहीण बरी आहे का? कुठे ॲडमीट आहे विचारपूस करु लागला.
निखिल बोलला की, सगळं ठीक आहे, या बसा हाॅलमध्ये.
देवांशही सोफ्यावर जाऊन बसला व तितक्यात त्याची नजर भिंतीवरील हार घातलेल्या फोटोवर गेली. तसा तो उठून उभा राहीला. कारण फोटोत रात्रीची लेडीज होती व मृत्यू दिनांक ५ वर्ष अगोदरचा तसा तो अचंबित झाला...
निखिल कथा सांगू लागला- साहेब, आमची बहीण साक्षी पाच वर्षांपूर्वी या जगातून निघून गेलीय. पाच वर्षांपूर्वी या गावाच्या बाजूच्याच हायवेने ती एकटी घरी येत असताना तिच्यावर काही नराधमांनी बलात्कार केला व नंतर गाडीने धडक देवून मरणाच्या दारी सोडून निघून गेले. तिने जीवाच्या आकांताने मदत मागितली, पण कुणीही तिच्या मदतीला धावून आले नाही व ती मरण पावली. तेव्हापासून तिचा अतृप्त आत्मा भटकतोय व दर अमावस्येला येणाऱ्या व जाणाऱ्या लोकांना तो अपघात दर्शवते व जो मदत करेल त्याला आमच्या घरी पाठवते, जो मदत करत नाही अथवा तिच्याकडे वासनंध नजरेने बघतो त्याला ती देवाघरी पाठवते. जोपर्यंत तिचे खुनी तिला सापडत नाही तोपर्यंत तिचा सुडाचा प्रवास चालू राहील. तुम्ही सज्जन आहात म्हणून वाचलात... असे सांगून देवांशला त्याच्या सासरवाडीच्या घरी सोडून निखिल निघून गेला...
देवांश घडलेल्या प्रसंगांने हादरून लवकर आवरुन मुंबईकडे बायकोला घेवून निघाला. हायवेला येताच त्याला रस्त्यालगत खूप गर्दी दिसली. तसा तो काय झाले म्हणून बघण्यासाठी गेला तर दोन तरुण मृत्यूमुखी पडलेले होते व पंचनामा चालू होता. देवांशला बघून काळजात धस्स झालं कारण काल रात्री याच जागेवर त्याला साक्षीसोबतचा प्रसंग आठवला.
तितक्यात मितालीने आवाज दिला, अहो बस आली, चला लवकर.
देवांश पटकन जावून बसमध्ये बसला.
तोच ‘सांभाळून जा साहेब’ म्हणून साक्षी त्याला हसतमुखाने बाय करत होती...
साक्षीने त्या दोन तरुणांचा जीव घेतला होता व यापुढेही अनेकांचा जीव घेत राहील जोपर्यंत तिचा सूड पूर्ण होत नाही...