झपाटलेली रात्र....!!
झपाटलेली रात्र....!!
जेमतेम 2010 सालची ही घटना. मुंबईला नोकरीला असताना कामानिमित्त मला संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढावा लागत असे. कारण माझे शिक्षण मार्केटिंग क्षेत्रात झाल्यामुळे विक्री अधिकारी असा जाॅब मिळाला होता. एके दिवशी बाॅसने मला सातारा जिल्ह्यातील लोणंद एम.आय.डी.सी. येथे जाण्यास सांगितले. मी पण तयारी करुन निघालो व सिंहगड एक्सप्रेस पकडून रात्री १० ला पुण्याला पोहचलो व तिथून रिक्षा पकडून स्वारगेट बस स्टॅण्डला गेलो व लोणंद बस पकडली...
रात्री १ वाजता लोणंदला पोहचलो व रिक्षावाल्यास हाॅटेलची विचारपूस केली. त्याने मला, बसा साहेब मी घेऊन जातो हाॅटेलला, असे बोलला. मी ही चटकन त्याला हो म्हणालो व निघालो. त्याने मला हाॅटेलवर पोहचवलं व निघून गेला. मी पण हाॅटेलवर रुम बुक करुन रुमच्या चाव्या घेतल्या...
हाॅटेल म्हणजे जुनी पुराणी अजीर्ण झालेली माडी होती. लाकडी पायऱ्या चढून तिसऱ्या मजल्यावर जात असताना कुणीतरी माझा पाठलाग केल्यासारखे भासत होते. रात्रीच्या स्मशानशांततेत पायऱ्यांचा आवाज पूर्ण इमारतीत घुमत होता. डीम लाईट असल्याने पॅसेजमधील लाईट चालू बंद होत होते. रातकिड्यांची किरकिर स्पष्ट कानावर पडत होती. रुमवर पोहचलो, दरवाजा उघडला. खूप दिवसापासून बंद असावा. कर्रकर्र आवाजात उघडला तसा कोंदट वास आला. लाईट चालू करताच पैंजण छमछम वाजल्याचा भास झाला. रुमवर बॅग ठेवली व बेडवर बसलो तसे वटवाघूळ कानाला स्पर्श करून बाहेर उडाले. अंगाचे थरके झाले. स्वतःला सावरुन बेडवर झोपलो पण जुनाट पंख्याचा आवाज कुणीतरी माझ्या मागे धावतंय असा येत होता. कुठेतरी डोळा लागला तसा पंख्याचा आवाज बंद झाला बघतो तर लाईट गेली होती. मोबाईलची बॅटरी पण संपली होती. काळाकुट्ट गडद अंधार, हाॅटेल रिसेप्शनला फोन करण्यास पण चान्स नाही. अचानक टाॅयलेटचा दरवाजा आतूनच कुणीतरी वाजवत होते पण मी माझ्या हाताने दरवाजा बाहेरून लावला होता. हे सर्व माझे मन विचलीत करत होते. पारव्यांचा आवाज मधूनच येत होता व घुमत होता. दरवाजा वाजण्याचे चालूच होते पण माझे धाडस होईना. कारण काळाकु्ट्ट अंधार त्यात कुणी मला पैशासाठी मारले तर या भीतीने झोपून राहण्याचे ठरवले व बळजबरीने झोपलो. प्रवास करुन थकलेलो असल्याने झोप लागली. तितक्यात जागते रहो असा जोरदार आवाज आला. माझ्या काळजात धस्स झालं व डोळे उघडले. दरवाजाचा आवाज सारखा येतच होता व त्यात कुठेतरी झोप लागताच जागते रहो...!!
अचानक सर्व आवाज बंद झाले व लाईट आली. मी ताड्कन उठून खाली पळत गेलो व रुम मालकास हा प्रकार सांगितला. तो आश्चर्यचकीत होऊन माझ्याकडे बघत होतां माझ्यासोबत वरती आला व टाॅयलेटचा दरवाजा उघडला. आतमध्ये कुणीही नव्हते व लाईट गेलीच नाही हे ही त्याने सांगितले. मी तर घाबरुन गेलो व त्वरित रुम सोडला सकाळचे पाच वाजले होते. बाहेर येऊन तोंडावर पाणी मारले व थोडे चालत जाऊन एका चहाच्या टपरीवर थांबलो व चहा घेतला. माझ्या डोक्यातून ती रात्र जात नव्हती. पैसे देताना चहावाल्या बाबांना विचारलं, बाबा पुण्याला जाण्यासाठी गाडी किती वाजता भेटेल.
बाबा म्हणाले, सात वाजता व दोन तास वाट बघावी लागणार म्हणून बाबांशी गप्पा मारत बसलो. माझ्या मनांत शंकांचं काहूर माजलं होतं, जिभ अडखळत मी बाबांना घडलेला प्रकार सांगितला. परंतु, बाबांचे उत्तर ऐकून माझे हातपाय गळाले व घाम फुटला...
सदर हाॅटेल पाच वर्षापासून बंद असून विक्रीसाठी आहे. तिथे पाच वर्षांपूर्वी मालक व त्याची बायको दोघांचाही मर्डर झालाय. त्यांचा खूप जीव होता त्या हाॅटेलमध्ये, पण तुमच्यासारख्या बाहेरील माणसाने त्यांचा खून केलाय. त्यामुळे बाहेरील माणूस अमावस्येचे रात्री गावात आल्यास त्याला ती दोघे हाॅटेलवर घेऊन जातात, पण त्यांचा खुनी नसल्यास सोडून देतात. माझा तर विश्वासच बसत नव्हता, हे जोपर्यंत त्यांचा खुनी सापडत नाही तोपर्यंत चालूच राहणार...!!
मला सर्व मनकहाणी वाटत होती. बसस्टँडला पोहचताच रिक्षा चालकाची चौकशी केली व रिक्षा नंबर इतर रिक्षावाल्यांना विचारला असता ही रिक्षा या स्टॅण्डवर नाही असे समजले. मी पुर्णत: भयभीत झालो होतो. पुण्याची बस लागली व बसमध्ये बसलो व बस निघाली तितक्यात एक माणूस पाणी बाॅटल घ्या म्हणून विनंती करत होता. मी त्याच्याकडे न बघता पाणीबाॅटल घेतली. बस निघाली मी त्याला देण्यासाठी पैसे काढले पण बस थोडी पुढे आली होती. खिडकीतून डोकावून बघितले तर रात्रीचा रिक्षावाला होता व माझ्याकडे बघून हसला व बाय करता पाठीमागं वळला. मग मीही त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत पुढील प्रवासाला निघालो. सोबतीला आठवण रात्रीच्या अनोळखी माणसांची????