Rani More

Horror Drama

4.7  

Rani More

Horror Drama

सस्पेन्स ऑफ द लव व्हिलेज

सस्पेन्स ऑफ द लव व्हिलेज

7 mins
1.9K


आएगा... आएगा... आएगा आनेवाला आएगा... आएगा... अमर गाणं ऐकण्यात तल्लीन झाला होता.

"साहेब, गजरा घ्या ना दहा रुपयाला एक, वीसला तीन घ्या, साहेब घ्या ना, मॅडम खुश होतील घ्या ना साहेब..."

सिग्नलवर गाड़ी थांबली होती. एक किडकिडीत बांध्याची मुलगी अमरला गजरा घेण्याबाबत विनवत होती. आज सकाळीच सायलीसोबत झालेला वाद, आणि रागाने लालबुंद झालेली सायली अमरला आठवली. फुलं खूप आवडतात सायलीला घेऊ या गजरा खुश होईल, आणि सगळं विसरून दरवळून येईल मिठीत सायलीच्या वेलीसारखी... नुसत्या कल्पनेनेही अमर रोमांचित झाला.


सायली आणि अमर लवबर्ड. एकमेकांत हरवलेले एकमेकांना जपणारे. वर्ष झालं लग्नाला तरीही त्यांच्यातलं नवेपण टिकून होतं. कधीतरी वाद होत पण लगेच मिटतही. वादाचं कारण एकच, अमरचं पुस्तकं वाचणं... आणि वाचता वाचता त्यातच हरवून जाणं. जणू व्यसनच जडलं होतं त्याला. सायलीला खटकणारा हा एकच मुद्दा होता. मुलीची खिड़कीच्या काचेवर टकटक चालू होती. अमरने तिच्याकडून गजरे घेतले आणि पैसे देण्यासाठी खिशात हात घातला पण वॉलेट काही सापडेना. बहुतेक ऑफिसच्या ड्रॉवरमध्येच राहिलं होतं. त्याने वरच्या खिश्यातले सुट्टे पैसे त्या मुलीला देऊन गजरे घेतले आणि गाड़ी रिवर्सला घेतली. खिड़कीतून येणारा गार वारा, गजऱ्याचा मंद सुवास... अमर सायलीच्या आठवणीत हरवून गेला.


आपलंच चुकलं पण एकदा पुस्तक हातात घेतलं की विसर पडतो आपल्याला आजूबाजूचा, कोणी डिस्टर्ब केलं तर चालतच नाही, मग तिची चिड़चिड होते. पण सकाळी वाचत होतो ते पुस्तकच तसं होतं. आपण तर प्रेमातच पडलो त्या पुस्तकाच्या काय त्या प्रेमनगरीचं वर्णन... अहाहा, किती जिवंत वाटत होती सगळी पात्रं, जणू वावरत होती आजूबाजूला आणि मी ही त्यांच्यातलाच एक... आणि ती... ती... कांचनबाला... संगमवरी मूर्तीसारखं तिचं कोरीव सौदंर्य... तिचे पाणीदार डोळे, नशीली नजर... उफ... अमरने निश्वास टाकला... किती जवळ पोचलो होतो आपण "सस्पेंस ऑफ़ लव विलेज"च्या... रहस्य उलगडणार इतक्यात... सायलीने डिस्टर्ब केलं. ताबाच नाही राहिला मग स्वतःवर आणि दुखावलं आपण सायलीला. ते काही नाही आज फ़क़्त तिला वेळ द्यायचा, जेवणही बाहेरून न्यायचं. त्यानंतर तिची आवडती चॉकलेट आइस्क्रीम... मग तिची माफ़ी मागायची सकाळच्या वादाबद्दल. तिच्या केसात आपल्या हाताने गजरा माळायचा, आणि मग... अमरच्या अंगावर रोमांच उभे राहिले. 


तो सरावाने ऑफिसजवळ पोचला. गाडीतून उतरून त्याने वर पाहिले आणि तो शॉक झाला. त्याच्या केबिनमधे लाइट चालू होते.

त्याने वॉचमनला आवाज़ दिला. "गणपत, वर कोण गेलं होतं माझ्या केबिनमध्ये?"

"कोण नाय सायेब तुम्ही गेल्याधरनं म्या इथच बसलुय"

"लाइट कोणी लावली"

"लाइट...? नाय बा...बंदच तर हाय" गणपत वर बघत बोलला.

त्याने विचित्र नजरेने अमरकड़े पाहिले. अमर डोळे विस्फारुन वर बघत होता, "ते बघ खिड़कित कोणीतरी आहे." 

एवढ्यात गेटजवळच्या झाडावर जोरात फड़फड झाली. एक टिटवी कर्णकर्कश आवाजात ओरडत गेली. ह्या अचानक झालेल्या आवाजाने अमरच्या अंगातून एक शीतलहर दौडत गेली. त्याला एकट्याला वर जायची हिम्मत होईना. 

तो म्हणाला,"गणपत चल जरा वर माझ्याबरोबर."

पण गणपत बहुतेक राउंडला निघुन गेला होता. अमर एकटाच वर गेला. लॉक काढून त्याने हळूहळू सावधपणे दार उघडले. त्याने आत पाऊल टाकले आणि लाइट गेली. तो घाबरुन मागे फिरला इतक्यात दरवाजा धाड़कन बंद झाला. "क....कोण...आहे..?"

वेगळाच सुगंध दरवळला... एक खळाळतं हास्य आणि पैजणांची किणकिण खिड़कीत गुंजली आणि...

"आएगा... आएगा... आएगा आनेवाला आएगा..." कोणीतरी आर्त स्वरात गात होतं.

अमर घामाघुम झाला. एवढ्यात काहीतरी बिलबिलित गार वस्तुचा पायाला स्पर्श झाला. त्याने थरथरत्या हाताने मोबाईल काढून टॉर्च ऑन केला. पायाजवळ फुलदानी आणि फुलं पडली होती. तो खिड़कीकड़े पाहू लागला. पड़दा हलत होता. जणू नुकतचं कोणीतरी पडदा सारून बाहेर गेलं होतं. अमर सगळं बळ एकवटून खिड़किकडे गेला. तिथे कोणीच नव्हतं. ग्रिलवर काहीतरी हलत होतं, अमरने टॉर्चच्या उजेडात पाहिलं, एक पांढराशुभ्र रुमाल आणि त्यावर लालभड़क रंगात विणलेलं k अक्षर. त्याने बाहेर पाहिलं समोर त्याची गाड़ी होती आणि त्यात कोणीतरी बसलं होतं. तो वळला इतक्यात पावलांचा आवाज़ आला. जोरात दरवाजा उघडला प्रकाशाचा झोत अमरच्या डोळ्यावर आला. क्षणभर त्याचे डोळे दिपले. एक अस्फुट किंकाळी त्याच्या तोंडातून बाहेर पडली. समोर गणपत उभा होता. 

"सायेब तुम्ही? काय झालं सायेब? अंधारात काय करत व्हता..? तुमच्या केबिनमधे हालचाल दिसली, म्हणून मी वर आलु लाइट लावूनश्यान बगावं म्हणून"  

"अरे गणपत, असं काय करतोस आता आलो ना मी तुझ्याशी बोलून वर"  

"नाही बा मी तर आताच आलु कामावर, नाईट ड्युटी हाय माझी आज, ते जाऊ द्या, तुम्ही कशापाई आलासा परत हाफिसात" "मी...मी... मी... कशाला आलो? अरे हां... माझं वॉलेट विसरलं बहुतेक ड्रॉवरमध्ये ते न्यायला आलोय", असं म्हणत अमरने टेबलाकडे पाहिलं आणि तो पाहातच राहिला. टेबलावर ते पुस्तक उघडून ठेवलं होतं. त्यावर पांढराशुभ्र रुमाल होता आणि लालभड़क रंगातलं विणलेलं के अक्षर. तो पुन्हा खिड़कीजवळ आला... ग्रिलवर काहीच नव्हतं.

"तुम्हाला बरं वाटना का सायेब डॉक्टरला फोन करू का" अमरची चलबिचल पाहून गणपत हबकला होता.

"नाही... नाही...नको..नको...मी ठीक आहे."

अमरने ड्रॉवरमधून वॉलेट घेतलं. थोडा विचार केला, ते पुस्तक घेतलं आणि गणपतला केबिन लॉक करायला सांगून तो खाली आला. 


आपण खूपच इन्वॉल्व होतो एखाद्या कथेत आणि म्हणून आपल्याला असे चित्रविचित्र भास होतात, असा विचार करत तो गाड़ीपाशी आला. दार उघडून तो आत बसला आणि एक वेगळाच सुगंध जाणवला त्याला. दूर कुठून तरी गाण्याचा आवाज़ येत होता. "आएगा... आएगा... आएगा आनेवाला आएगा..." पण निव्वळ भास आहे असं म्हणून त्याने दुर्लक्ष केले. 


रस्त्यात त्याने सायलीचं आवडतं मटर पनीर ,शाही पुलाव आणि चॉकलेट आइस्क्रीम घेतलं. फ़ोन करावा का... नको... सरप्राइज देऊ मस्त. सायलीचा हसरा चेहरा डोळ्यासमोर आला नि नकळत त्याच्या तोंडातून शीळ बाहेर पडली. पुस्तक सायलीला दिसता कामा नये म्हणून एकदा त्या कांचनबालाचं मुखपृष्ठ डोळे भरून पाहिलं आणि त्याने ते पुस्तक गाड़ीतच ठेवलं. आवाज़ येऊ नये म्हणून गाड़ी गेटच्या बाहेरच ठेवून लॅच कीने दार उघडून चोरपावलांनी तो आत आला. 


घरात नीरव शांतता होती. मॅडम बहुतेक रागाने झोपल्यात अजून... आता घालवतो राग... म्हणत त्याने सायलीला हाक मारली. सायली... बेबी... शोना... कुठं... आहे जान... माझी... हॉल, बेडरूम, किचन सगळीकडे पाहिले. सायली कुठेच नव्हती. 

"अरे यार, कुठे गेली ही अशी न सांगता..." फ़ोन करण्यासाठी त्याने मोबाईल काढला आणि त्याने पाहिलं सायलीचे 15 मिसकॉल.

"ओह्ह्ह्ह शीट... एवढं कसं समजलं नाही आपल्याला."

"फोनची रिंगपण ऐकू येत नाही ना तुला?, किती वाजले बघितलंस का? ऑफिसमधे पण वाचत बसलास ना, मी जाते आईकड़े तू बस पुस्तकंच वाचत"... सायलीचा दोन तासापूर्वीचा मेसेज होता.

"सॉरी ना जानु" त्याने रिप्लाय दिला.

पण ती ऑनलाइन नव्हती. त्याने कॉल केला पण... "ज्या नंबरवर आपण संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे." कस्टमर केअरवाली मुलगी बडबडत राहिली.  

अमर हताश होऊन बसून राहिला. जेवणाचं पार्सल गार झालं होतं. जेवण्याची इच्छा मेली होती.

"सायली काय यार, किती रागावतेस, I love U So much... miss u Lott baby." तो भावूक होऊन खूप वेळ तिच्या फ़ोटोशी बोलत राहिला.

झोप येत नव्हती. शेवटी तो गाडीतून पुस्तक आणण्यासाठी बाहेर गेला. त्याने दार उघडले, गाडीत बसला, ड्रायविंग व्हीलसमोर सिग्नलवर सायलीसाठी घेतलेले गजरे होते ते ही केविलवाणे झाले होते. त्याने ते गजरे ओंजळीत घेऊन त्याचा गंध भरभरून श्वासात घेतला आणि अंधारात बुडालेल्या आपल्या घराकड़े पाहिलं आणि त्याच्या काळजाचा ठोका चुकला. बेडरूमच्या खिड़कीत कोणीतरी उभं होतं. त्याने डोळे घट्ट मिटले... सायली miss You yar... i need you so much. भास होऊ लागलेत मला तुझे मी येतोय तुला न्यायला and god promise पुन्हा तू समोर असलीस की पुस्तकांना हातसुद्धा नाही लावणार.


त्याची गाड़ी देवगढ़ला सायलीच्या घराकडे सुसाट वेगाने धावु लागली. अमरच्या डोळ्यापुढे सायलीची विविध रूपं तरळत होती. अचानक करकचून ब्रेक लागल्यासारखी गाड़ी थांबली. एक तरुण स्त्री रस्त्याच्या मधोमध उभी होती.

गाडी थांबताच ती धावत गाडीजवळ आली आणि हात जोडून म्हणाली, "मला जरा पुढच्या गावात सोडा लय उपकार होतील," अमरला दया आली तिची. त्याने दार उघडून तिला आत घेतले आणि तोच तो चिरपरिचित सुगंध दरवळला.

"एवढ्या रात्री कुठे निघालाय... कुठे जायचंय तुम्हाला" 

"बाराव्याला गेले होते. वाट चुकले नि सगळा घोळ झाला, मला पुढच्या गावात सोडा. पण तुम्ही कुठं चाललाय."

"देवगढला, सासरवाडीला चाललोय, बायकोला आणायला."

"अहो पण इकडं देवगढ़ नाही. आमचं गाव शेवटचं ह्या रस्तावरचं" बोलता बोलता तिने डोक्यावरचा पदर काढला.

"Ohhhhh myyyyyy Goddddd..., हेच ते पाणीदार डोळे...,हीच ती नशीली नजर..., हेच ते संगमरवरी शिल्प..., I can't belive this..." 

अमर फ़क़्त पुरुषी नजरेने तिला न्याहाळत नजरेनेच तिला पीत राहिला.

"काय बघताय असं? ती बावरून सावरायला गेली आणि तिचा पदर खांद्यावरुन घसरला. त्याबरोबर अमरचा इरादा नि नियतपण घसरली.

"घरात कोण कोण आहे तुमच्या" अमरने अंदाज घेतला. 

"कुणीच नाही मी एकटीच" ती लाजत म्हणाली.

"चला मग वाट दाखवा तुमच्या गावाची... तुम्हाला घरीच सोडून जातो पुढे."

आजची रात्र हिच्याबरोबर काढू, सायलीला समजावू उद्या, अमरमधला पुरुष आता अलर्ट झाला होता. पुढच्या कल्पनेने त्याला गदगुल्या झाल्या.

"बरं... बरं... हिकडं घ्या गाड़ी डाव्या अंगाला आहे गाव माझं" ती त्याच्या उजव्या अंगाला खेटत म्हणाली.

त्याने लेफ्ट टर्न घेतला आणि... तो समोर पाहू लागला आणि पाहातच राहिला. शुभ्र् चांदणं जणू आकाशातून खाली उतरलं होतं, रस्त्याच्या दुतर्फा नारळाची झाडं देवदूतासारखी उभी होती. डोंगरावरून दुधासारखे झरे वाहात होते. अगदी चित्रात भासावी अशी टुमदार घरं, त्या भोवतीच्या बागा... सगळं मंत्रमुग्ध करणारं. खटकणारी एकच गोष्ट म्हणजे मनुष्य चाहूल कुठेच नव्हती. सगळं निर्जीव शापित सौदंर्य, हे पाहिलंय... आपण अनुभवलंय आधी पण कधी? कुठे?

येस्सस्सस्सस्स, "सस्पेंस ऑफ़ द लव विलेज" 

"अगदी बरोबर ओळखलंत तुम्ही" तिने मध्येच त्याची विचारधारा तोडली.


तो विचित्र नजरेने तिच्याकडे पाहू लागला. आपण मनातल्या मनात बोललेलं हिला कसं कळलं? त्याला काहीच सुचेना. त्याने ब्रेक दाबला पण गाड़ी जणू हवेत चालली होती... आउट ऑफ़ कण्ट्रोल. तिच्या हातात पांढरशुभ्र रुमाल होता त्यावर लालभडक रंगात विणलेलं k अक्षर. तिच्या डोळ्यांत वेगळीच चमक होती. एक दहशत... पॉवर ऑफ़ कण्ट्रोल. अमर भीतीने जागीच गोठला.

ती किरट्या आवाजात म्हणाली, "ऐक, तुला रहस्य उलगडायचं होतं ना ह्या गावाचं हे सुंदर पण शापित गाव, वर्षातून एकदाच जिवंत होतं चैत्रपोर्णिमेला, हे सगळं वैभव एकच दिवस असतं... एरवी फ़क़्त ओसाड़ माळरान. ह्या एक दिवसाच्या राज्यासाठी दरवर्षी नरबळी द्यावा लागतो. कांचनबालावर ही जबाबदारी असते नरबळी आणायची. दरवर्षी एक वाटसरू वाट चुकून इथे येतो किंवा आणला जातो पण तो कधीच...परत जात नाही. बोलताबोलता तिने अमरला घट्ट मिठी मारली... "पण... मग... तुम्ही... मी... मला..." अमरच्या घशाला कोरड पडली.

"मी कांचनबाला...", ती विकट हसत म्हणाली "...आणि आज चैत्रपोर्णिमा आहे ना..."

तिचे तीक्ष्ण दात अमरच्या मानेत घुसले. अमर तड़फड़त होता.

रक्तरंजित तोंडाने कांचनबाला गात होती. "आएगा... आएगा... आएगा आनेवाला... आएगा... आएगा..."


पुस्तक वाचता वाचता झोप लागलेला अमर तोंडावर पडलेलं पुस्तक घट्ट धरून ओरडत होता

'सोड मला, सोड... कांचनबाला...

दूर कुठेतरी गाणं वाजत होतं... "आयेगा... आयेगा... आयेगा... आनेवाला...


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror