तिची वेदना
तिची वेदना
"फाट्यावर मारते मी दुनियेला,
×××गेली सगळी दुनियादारी,
मी मला हवं तसं जगते"
असं बेमुर्वतपणाने म्हणणारी ती....
यशस्वी बिजनेस वूमन.
भर गर्दीच्या रस्तावर सुसाट गाडी पळवणे असो
किंवा पुरुषांची मक्तेदारी वाटेल अश्या पुरूष गर्दीत एकटीने हॉटेलात जाऊन मनसोक्त खाणं असो,
हवी ती फॅशन करणं, कुणाचीही तमा न बाळगता मनात येईल ते फाडकन बोलणं. सगळं जग स्वार्थी आहे म्हणत प्रत्येकाला नावं ठेवणं हा जणू तिचा जन्मसिद्ध अधिकार होता.पैसा होता,प्रतिष्ठा होती, थोडक्यात ती 40 शीची असली,वेल सेटेड असली तरी टॉम बॉय ह्या संज्ञेत चपखल बसत होती.
कुणालाही जमेत न धरणारी ती कशी कोण जाणे पण माझ्याशी कनेक्टेड होती.काही चांगलं वाईट झालं की माझा फोन खणखणलाच पाहिजे.खरं तर तिच्या बेफिकीर आणि आकांडतांडव करणाऱ्या वृत्तीमुळे तिचा फोन म्हणजे मला संकट वाटायचं पण म्हणून मी तिला कधी टाळलं नाही.
त्या दिवशी असाच फोन खणखणला. तिचं नाव बघताच ..
"अरे देवा! आता आज काय नवीन"
म्हणत मी डोक्यावर हाथ मारला. ऑफिसमध्ये बरंच काम पेंडिंग होतं आणि तब्येत पण जरा नरम होती. फोन घ्यावा की न घ्यावा अश्या द्विधा मनस्थितीत मी होते. तर तिने सपाटाच लावला कॉलचा शेवटी मनाबरोबर कान घट्ट केले नि चौथा कॉल रिसीव केला.
पण अपेक्षेविरुद्ध सन्नाटा... नेटवर्क गेलं की काय?
पण "जिदगी कैसी है पहेली हाये......
तिच्या घरातल्या एफ.एम. चा आवाज येत होता.
"हॅलो...अग काय झालं?
"........................"
आता बोलणार आहेस का
बोल काही तरी की ठेऊ फोन"
असं बोलल्याबरोबर मला हुंदक्याच्या आवाज ऐकू आला.
ही चक्क रडतेय. मी स्वतःला चिमटा काढला आणि रिसिव्ह केलेला नंबर पुन्हा चेक केला.
हुंदक्याच्या आवाज वाढला होता
"काय झालंय बोलशील का?"
"माझी आई गेली ग......हार्ट अटॅक...."
"काय"
शॉकिंग न्युज होती. तिची आई जाणं हे एकवेळ नॉर्मल होतं
पण ह्यापेक्षा जास्त शॉकिंग होतं ते तिचं रडणं.
"तू ताबडतोब घरी ये पण आई गेलीय हे कोणाला सांगू नको लोकांच्या भेटीगाठी, सहानुभूती अँड ऑल फॉर्मलिटी नकोयेत मला". ती मुळपदावर आली होती पण आवाज खुपच बोचरा दुखावलेला वाटत होता. साहजिकच होतं जन्मदात्री होती. पण आई जिवन्त असताना तिनं दुनियेप्रमाणेच आईलाही फाट्यावरच मारलं होतं. मला तिच्या रडण्याने वाईट वाटण्यापेक्षा रागच आला. तरीही म
ी माझ्या स्वभावाप्रमाणे हाफडे टाकून तिच्या घरी पोचले.
तिचा चेहरा उतरला होता,डोळे सुजले होते. चालण्यात नेहमीचा रुबाब नव्हता.काय बोलावं,कशी सुरवात करावी मला काहीच समजत नव्हतं.
मी मुकपणे तिचे खांदे थोपटले आणि बांध कोसळावा तशी ती माझ्या मिठीत कोसळली.तिने जे सांगितलं ते ऐकून मी बधिर झाले.
आईला हार्टअटॅक आला समजल्यावर ती नवरा आणि मुलगी रातोरात निघाली. जाईपर्यंत सगळा खेळ खल्लास झाला होता. सगळं आटोपून येईपर्यंत दुसऱ्या दिवसाची रात्र झाली. मुलगी उपाशी आहे म्हणून तिने नवऱ्याला काही तरी खायला घ्यायला सांगितले तर तो गुलाबजाम चिकन सँडविच आणि आइसक्रीम घेऊन आला होता. वडापाव किंवा चहा बिस्कीट ची अपेक्षा असलेली ती ते पदार्थ पाहून कोलमडून गेली होती. किती नाकारलं तरी आईविना आलेलं पोरकेपण डोळे कोरडे होऊ देत नव्हतं. नवरा व मुलीला खायला देऊन अन्नाला नमस्कार करून फक्त पाणी पिऊन ती झोपली.झोप डोळ्यातून कधीच हद्दपार झाली होती. लहानपणापासुनच्या आईच्या आठवणी फेर धरून नाचत होत्या. शिक्षण अर्धवट ठेऊन मनाविरुद्ध लग्न झाल्यापासून आपण बंडखोर झालो आईला धिक्कारलं ह्या गोष्टीचं प्रचंड गिल्ट येत होतं. आणि एवढ्यात नवऱ्याच्या स्पर्श जाणवला सांत्वन करण्यासाठी आला म्हणून तिला अजूनच जोरात हुंदका आला पण नाही तो स्पर्श तिच्या ओळखीचा होता जो तिला आज तरी नको होता. पण दुनियेला फाट्यावर मारणारी ती दुनियानी बनवलेल्या रूढीना नाही फाट्यावर मारू शकली.नवऱ्याच्या तथाकथित मालकी हक्काने स्वतःचे शरीर तृप्त होईपर्यंत आणि मन भरेपर्यंत त्याने तिचा चोळामोळा केला. आणि डाराडूर झोपून गेला
आजही काहीच घडले नाही अश्या थाटात तो नेहमीसारखा ऑफिसला निघून गेला .
"आई आज एकदाच मेली ग मला पोरकं करून गेली जळून गेली पण मी अशीच रोज मरते....स्वतःचं अस्तित्व नष्ट होताना चितेवर चढते रोज जळते पण निदान आज तरी.......माझी आई गेलीय ग......माझी आई...गेलीय"
ती माझ्या मिठीत धाय मोकलून रडत होती,आक्रोश करत होती. आई गेली हे दुःख डोंगरएव्हढं होतं पण स्वतः आर्थीक,सामाजिक पातळीवर इंडिपेंडन्ट असूनही एक स्त्री म्हणून स्वतःचं अस्तित्व असं दुय्यम पातळीवर असणं तिला खलत होतं आणि तिच्याएव्हढंच मलाही. आपण स्त्री मुक्तीचे गोडवे गातो. स्त्रीपुरुष एक समान असल्याच्या दावा करतो. पण फोल आहे सगळं
अश्या किती *ती* असतील. ज्या राजरोसपणे रोज अत्याचाराला बळी पडत असतील.आणि जगाच्या दृष्टीने तो अत्याचार नसून तिचं कर्तव्य असेल....