Madhuri Sharma

Inspirational

4.5  

Madhuri Sharma

Inspirational

सोपं नसतं

सोपं नसतं

4 mins
314


 आई नेहमी म्हणायची 'तू' स्वत: आई झालीस की कळेल आणि तेव्हा तिच्या असं बोलण्याचा कधीच इतका विचार मी केला नाही. पण आज जेव्हा मी स्वत: आई होण्याचा प्रवास सुरु केला तेव्हा 'खरंच' आई होणं सोपं नाही हे पटलं‌. आईचं काळीज, आईची भूमिका, आईची काळजी, आई शेवटी आई असते, ही सर्व माझ्या साठी नूसती वाक्यांपूरती मर्यादित न राहता या सर्वांचा खरा अर्थ आज मी समजू शकते. आजवर एक मुलगी म्हणुन मी जे-जे काही अनुभवलं ते-ते सगळं आता माझं येणारं बाळ अनुभवणार आहे. आणि जे माझ्या आईच्या वाटल्या आलं ते सर्व माझ्या वाट्याला येणार आहे.

       आजवर मी मारलेली 'आई ' अशी हाक आता कोणीतरी मला मारणार आहे. 'आई' अशी हाक आल्यावर मग त्या हाकेला मी प्रतिसाद देणार आहे‌. माझ्या येणाऱ्या बाळाने माझ्याशी हुज्जत घातली की मी तीच वाक्य त्याला/तिला ऐकवणार जे माझ्या आईने मला ऐकवले आहेत. माझं बालपण मला माझ्या येणाऱ्या बाळाच्या रूपात पून्हा जगता येईल. त्याचं वागणं बोलणं माझ्यासाठी एका प्रकारचा आरशाच असेल. माझी आई जशी रोज माझ्यासाठी झटायची, जास्तीचे कष्ट घ्यायची ते-ते सर्व मला करावं लागणार आहे आणि या सर्वांचा खोलवर विचार केला की कळतं आई होणं सोपं नसतं.

माझ्या आईने कधीच कसलाच हिशेब ठेवला नाही. तिने कधीच बोलून दाखवलं नाही की तिने माझ्यासाठी काय-काय केलं आणि आज जेव्हा मी स्वत:ला तिच्या जागेवर बघते तेव्हा कळतं किती केलंय तिने माझ्यासाठी!!! माझा हा आई होण्याचा प्रवास चांगलाच कान उघडणीचा ठरत आहे माझ्यासाठी.

जो पर्यंत मी जेवायचे नाही तोपर्यंत तिच कशातच मन लागत नसे. तिची 'ती' माझ्यासाठी असलेली काळजी किती नैसर्गिक आणि निरागस आहे याचं महत्त्व आज मला कळत आहे. पण आज स्वत:ला तिच्या जागेवर बघतांना तिला समजून घ्यायला मला किती उशीर झाला याची खंत वाटते. तिचं ही मन आहे याची जाणीवच झाली नाही. यापेक्षा मोठं वाईट काय असेल. घराबरोबरच घरातली माणसं तिने एकटीने कशी सांभाळली असतील?

त्यावेळी तिला नक्कीच एका सपोर्ट सिस्टिमची गरज होती. पण दुर्दैवाने मला ते कधीच कळलं नाही. आणि आज जेव्हा या सर्वांची जाणीव होत आहे तेव्हा फार उशीर झाला आहे. आजही जेव्हापासून तिला कळलंय तिचं प्रमोशन होणार आहे अर्थात ती आजी होणार आहे, तिची माझ्यासाठीची काळजी आणि प्रेम सर्व काही वाढलं आहे. आणि हे सर्व ती जेव्हा आणखी उत्साहाने माझ्यासाठी करते तेव्हा अपराधीपणाची भावना माझ्यात वाढतच जाते.

                 आई ही नेहमी आईच असावी तिलाही स्वत:च असं एक व्यक्तिमत्त्व आहे, तिचा स्वतंत्र स्वभाव आहे, तिचे स्वत:चे विचार आहेत, तिचं स्वत:च काही आयुष्य आहे हे कधी जाणवलंच नाही. तिचं अस्तित्व म्हणजे म्हणजे ती फक्त माझी 'आई' आहे एवढंच वाटत राहिलं नेहमी मला, कसं जमलं असेल तिला हे सर्वं, मला तिच्यासारखं हे असं वागता येणारच नाही. ती आई म्हणुन नेहमी खंबीर राहिली‌. तिला कितीही राग आला असला तरी तिने घरातलं वातावरण खराब होऊ नये म्हणून तो राग आतल्या आत दाबून ठेवला. हे असं तिच्यासारखं आई म्हणुन मला जगता येईल? माझ्यासाठी अगदीच अशक्य आहे.

           मी एक 'मुलगी' आहे, 'पत्नी' आहे, 'आई' आहे म्हणून नेहमी मीच समजूतदारपणा दाखवायचा, मनातुन अस्वस्थ असले तरी हसतमुख रहायचं, मी सदैव शांत रहायचं हे असंच एका आईने जगायचं या कल्पनेचाही मला वैताग येतो. आईला कसं जमतं हे असं जगायला?

       आपल्या भारतीय संस्कृतीत तरी प्रत्येक स्त्रीने आई म्हणुन असंच जगायचं असतं. कुटूंबातल्या स्त्रीने एक गॄहीणी म्हणुन फक्त आपली जबाबदारी पूर्ण करावी, या अशा अपेक्षेच्या आज मला फार त्रास होत आहे. पण आईने तर अगदी आनंदाने ही जबाबदारी पूर्ण केली आहे आणि ती आजही करत आहे. मला अशी तिच्यासारखी परफेक्ट आई होता येणार नाही, मूळात मला तसं व्हायचं ही नाही. कारण आईचं नेहमी तिच्या भावना आतल्या आत दाबून मुखवटे चढवून जगणं मला फार मुर्खपणाचं वाटतं. पण तिने तसं वागावं अशी अपेक्षा मूळातच माझी तिच्याकडुन होती म्हणून स्वत:वर आज फार राग येत आहे. फार मोठं अपराध केल्यासारखं वाटत आहे. अनेक वर्ष हे सर्व तिच्या मनात साचून राहिलेले तिने कोणाकडे बोलावं, तिचं मन मोकळं तरी तिने कुणाकडे करावं? म्हुणनच हा लेख लिहायला घेतला. आजवर आपल्या सर्व ईच्छा, भावनांचा त्याग करून फक्त एक 'आई' म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या सर्व आयांनी उरलेले त्यांचं आयुष्य स्वत:साठी जगावं... उगाच स्वत:चा राग मनात दाबून ठेवण्यापेक्षा तो हक्काने बाहेर येऊ द्या. आई आहात म्हणुन काय झालं ? अस्वस्थ असाल, निराश वाटत असेल तर आपल्या मुलांना ते हक्काने सांगा. जसं ते तुमच्यावर हक्क गाजवता तुम्हाला प्रत्येक वेळी गृहीत धरतात तसं तुम्हीपण कधी कधी अगदी तुमच्या मनाप्रमाणे खरं वागा. कारण आज तुम्ही जितक्या खऱ्या वागणार ना उद्या आम्हालाही आई झाल्यावर मुभा असेल कधीतरी खरं वागायची. सर्वांचे मनं सांभाळण्यासाठी तुम्ही बरोबर मुखवटे चढवून जगता पण त्याने साध्य काय होतं थोडावेळ घरातलं वातावरण शांत राहतं पण तुम्ही आतून किती अस्वस्थ असतात त्याचं काय?

आई जर खमकी आणि खंबीर असते तर तिने आपल्या खऱ्या भावनाही खंबीर पणे दाखवल्या पाहिजे. तुमचं मनातुन सगळं बिघडलं असेल, नीरस वाटत असेल तर कळू द्या की तुमच्या मुलांना, मुलांचा थोड्यावेळेसाठी मूड जाईल, घर डिस्टर्ब होईल ही पण मग 'आई' म्हणून जबाबदारी सांभाळताना तुम्हाला कुठल्याही सपोर्ट सिस्टिमची गरज भासणार नाही. कारण तुमच्या भावनांचा कोंडमारा होणार नाही. आम्हा मुलांना जाणीव असलीच पाहिजे की 'आईला' ही चूका करण्याचा अधिकार आहे. कोणाला काय वाटेल याची पर्वा न करता 'आई' म्हणून तुमची होणारी घुसमट एक व्यक्ति म्हणुन बोलून दाखवा एवढा सर्वार्थीपणा तुम्ही साधूच शकता. कधी जर तुम्हाला एकटं, तुटल्यासारखं वाटलं तर तुमची मुलं जर तुम्हाला सावरायला हवी असतील तर कधीतरी स्वत:चा विचार करून 'नुसतं' एक आई म्हणुन नाही तर एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणुन जगुन बघाच.

आणि हो 'आई' आज अगदी मनापासून मी आणि हा लेख वाचणारे सर्वं मान्य करतील 'आई' होणं सोपं नसतं........


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational