सोहळा
सोहळा


कॉलेजमधला रोज-डे साजरा करण्याचा दिवस. सगळ्या कॉलेजवर लाल रंगाची उधळण झाल्यासारखं वाटत होतं. तरुणाई विशेष सजून इकडून तिकडे मिरविताना दिसत होती. बऱ्याच प्राध्यापकांनी तास घेतलेच नव्हते त्यामुळे कॉलेज कट्टा, कॅंटीन, लॉनमध्ये तरूणाईचे थवेच्या थवे फुलले होते. श्रुती एका रिकाम्या वर्गात तिच्या मैत्रिणीबरोबर बसली होती. आज तिलाही एक गुलाब मिळालं होतं. तिला एक गुलाब आणि त्याबरोबर छोटंसं ग्रिटींग कार्ड पाठविणाऱ्याने स्वतःचं नाव लिहिलं नव्हतं त्यामुळे दोघी मैत्रिणी मिळून अंदाज बांधत बसल्या होत्या. श्रुतीने तिच्याच वर्गातल्या नीरजला त्या दोघी बसलेल्या वर्गासमोरून दोन-तीन वेळा फेऱ्या मारताना बघितले. तिचे डोळे अचानक चमकले. श्रुतीने एक गंमत करायची ठरवलं. तिने त्या कार्डवर लिहिलं,”थॅन्क यू नीरज” आणि ते कार्ड गुलाबावर ठेवून ती उठली. तिथून जाता-जाता ती मैत्रिणीच्या कानात काहीतरी कुजबुजली आणि त्या दोघी वर्गाबाहेर आल्या. नीरज त्या वर्गात शिरला आणि त्याने त्या कार्डवर झडप घातली. घाईघाईने कार्ड उघडून वाचताना त्याच्या चेहऱ्यावरचे भाव टिपण्यासारखे होते. श्रुती आणि तिची मैत्रीण हसतच आत आल्या आणि त्यांना बघून नीरज अोशाळला.
हा सात वर्षांपूर्वीचा कॉलेजमधील प्रसंग पलंगावर आडव्या झालेल्या श्रुतीच्या डोळ्यासमोर तरळला. छातीवर ठेवलेलं पुस्तक उचलताना तिच्या गळ्यातलं मंगळसुत्र खेचल्या गेलं. तिने पटकन ते हाताने सोडवलं. पुस्तक बंद करुन ती उठली आणि अभ्यासाच्या टेबलाकडे गेली. तिथे वरच्या कप्प्यात हात घालून तिथे ठेवलेली वह्या-पुस्तकं,डायऱ्या आणि सुटे कागद तिने वरखाली केले. त्या सगळ्यांच्या तळाशी तिला रेक्झीनचं एक फोल्डर दिसलं. तिने ते घाईघाईने अोढून बाहेर काढलं आणि छातीशी कवटाळलं. ती जलद गतीने चालत पुन्हा पलंगाकडे गेली. पलंगावर पालथी पडून तिने ते फोल्डर उघडलं. फोल्डर उघडताच सहा-सात छोट्या-मोठ्या आकाराची ग्रिटींग कार्ड्स खाली घरंगळली. तिने त्या फोल्डरच्या मागच्या बाजूला असलेल्या खणात हात घातला आणि त्यातील एक-एक वस्तू ती बाहेर काढू लागली. एक हृदयाच्या आकाराची चंदेरी चावी तिने बाहेर खेचून काढली. त्या चावीकडे प्रेमभराने बघत तिला बाजूला पलंगावर ठेवत तिने परत खणात हात घातला आणि एक हृदयाच्या आकाराचे लाल रंगाचे स्मायली सॉफ्ट टॉय बाहेर काढलं. त्याला चावीच्या बाजूला ठेवून तिने परत हात आत घातला आणि तिच्या हाताला एक सोनेरी पैंजण लागले. पैंजण हातात घेऊन ती पलंगावर झोपली. पैंजण हातात उंच धरून त्याला लटकलेल्या एकुलत्या एक घुंगराला तिने हलकेच हलविले. त्यासरशी मंदशी रुणझुण आसमंतात पळभर घुमली. पैंजण हलवत रुणझूण एेकण्यात ती काहीवेळ रमली. मग त्या खणात सापडलेला केसांना लावायचा एक रबरी कापडी बॅण्ड तिने बाहेर काढला. त्या बॅण्डला ताणून त्यावर नाक घासत ती खुद्कन हसली. मग स्वतःला स्वतःच्या मिठीत घट्ट जखडून ती लाजली तेंव्हा तिचा चेहरा आरक्त झाला होता.
“श्रुती चहा पिणार का ग तू?” सासूबाईंचा आवाज ऐकून श्रुती भानावर आली. तिने इतस्तः पसरलेली ग्रिटींग कार्ड्स गोळा केली आणि परत फोल्डरमध्ये ठेवली. विखुरलेल्या वस्तू परत फोल्डरच्या खणात ढकलल्या आणि ती चहा करायला स्वयंपाकघराच्या दिशेने गेली. जाता-जाता सासूबाईंचा प्रश्न तिच्या कानावर पडला,”राजूचा काही निरोप?”
बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या श्रुतीला अॉफिसला सुट्टी होती. शनिवारची संध्याकाळ होती. राजू त्याच्या अॉफिसच्या कामासाठी दिल्लीला गेला होता. त्याला जाऊन तीन दिवस झाले होते. चहा संपला आणि त्याचा फोन आला. श्रुतीने पटकन फोन उचलला.
“बोल” ती म्हणाली.
“काम अजून दोन दिवस लांबणार असं दिसतंय गं”
“हं...कळलं. ठेवते मी फोन” श्रुती त्याच्या टूरचे दिवस वाढले हे ऐकून दुःखी झाली.
“अगं काय झालं? आता हे माझ्या हातात आहे का? सांग बघू? तु असं कर आई-बाबांना घेऊन कुठेतरी फिरायला जा, टाईम पास होईल”
त्याचा हा सल्ला तिने ऐकला खरं आणि तिच्या नाकपुड्या रागाने थरथरल्या. मग काहीही न बोलता तिने फोन खाली ठेवला.
तिचा फोन परत दोनदा वाजला पण तिने तो उचलला नाही. तिची खात्री असल्याप्रमाणे मग घरातला फोन वाजला. घरातल्या फोनवर आई-बाबांचेच फोन नेहमी येत असल्या कारणाने सवयीप्रमाणे तिच्या सासऱ्यांनी फोनची घंटी वाजताच फोनच्या दिशेने चालायला सुरुवात केली. श्रुतीला कळलं की फोन राजूचाच आहे. ती झपाझप चालत फोनजवळ पोहचली. हळूहळू चालत येणारे सासरेबुवा वाटेतच थांबले.
“हं बोल” ती थोड्याश्या घुश्यात म्हणाली.
“काय चाललंय तुझं श्रुती? हल्ली तुला काय होतंय मला कळतंच नाहीय...नक्की तक्रार काय आहे हे तरी कळू देत ना”
“हेच ते...मीच सांगितलं पाहिजे...तुझं तुला कधी कळणार राजू? अजूनही प्रेम करतोस ना माझ्यावर?”
“तुझ्या म्हणण्याचा रोख लक्षात आलाय मला...पण राणी मी बदललो नाहीय गं” कधीकधी लाडिवाळपणे तो तिला ‘राणी’ म्हणत असे.
त्या दोघांची फोनवर चाललेली धूसफूस सासरेबुवांच्या नजरेतून सुटली नाही. त्यांनी विचारलं,”श्रुती, काय चालंलय गं? तुझं आणि राजूचं काही...”
सासरे पुढे काही बोलायच्या आतच श्रुती म्हणाली,”काही नाही हो बाबा...तुमच्याशी बोलायचं म्हणतोय”
सासऱ्यांच्या हातात फोन देऊन ती तिथून निघून गेली. राजू जायच्या दिवशी तो जाणार म्हणून ती आधीच नाराज होती त्यात त्या दिवशी व्हॅलेंटाईन डे होता, तेंव्हा निदान एखादं गुलाब तरी राजूने आपल्याला द्यावं असं तिच्या मनात होतं पण राजूने तसं काहीही केलं नाही आणि तिला राग आला. तिने रागातच त्याला निरोप दिला तरीही त्याच्या लक्षात काहीही आले नाही. तिच्या नाराजीचे कारण ती काहीही न बोलता त्याला कळावे म्हणून ती आतल्याआत धुसपुसत होती.
सासू-सासरे नको-नको म्हणत असताना ती त्यांना जवळच्याच एका मॉलमध्ये घेऊन गेली. तिथून आल्यावर पुढचे तीन दिवस असेच राजूची वाट बघण्यात आणि कामात संपले. राजू म्हणजे ‘नीरजच’ तिचा कॉलेजमध्ये असल्यापासूनचा मित्र, प्रियकर आणि आता नवरा. तो टूरवर जाण्याअगोदरची तिची नाराजी आता तो आल्यावर तरी दूर करेल का? याची तिला खात्री नव्हती कारण दोघांमध्ये काहीतरी बिनसतंय याची जाणीव तिला झाली होती. तिच्या मनात काहूर उठले होते. खरं तर त्याच्या आठवणीने ती व्याकूळ झाली होती. लग्नाआधीचे दिवस आठवून तिचा मनाशीच संवाद चालू होता. “राजू गेल्या तीन वर्षात खूप बदलला आहे, तो पूर्वीसारखा माझ्याकडे लक्ष देत नाही, दोघंही दिवसभर कामात व्यस्त असतो आणि आठवडाअखेर दोघांना मिळून एक रविवारच मिळतो, त्यादिवशीही माझ्यामागे पुढच्या आठवड्याची तयारी, सासू-सासऱ्यांच्या डॉक्टरांच्या भेटीच्या वेळा, माझं ब्युटीपार्लरमध्ये जाणं,खरेदी ही मागे लागलेली असतातच मग उरलेल्या वेळात तरी ह्याने माझ्यासाठी काहीतरी करायला हवे ना? पण कसचे काय? कॉलेजमध्ये मित्र होता तेंव्हा सारखा मागे-मागे असायचा...आम्ही दोघं मिळून तासनतास गप्पा मारायचो, एकत्र अभ्यास करायचो...मग मला प्रोपोज केल्यावर माझा अधिकृत प्रियकर झाल्यावर तर किती बरे प्रेमाचा वर्षाव त्याने केला असावा! प्रत्येक डे ला तो मला आवडणाऱ्या फुलांचा गुच्छ आणि भेटी देऊन माझ्याबरोबर दिवस घालवायचा आणि आता नवरा झाल्यावर एक वर्ष जेमतेम ह्या सगळ्या गोष्टी त्याला कशाबशा लक्षात राहिल्या आणि नंतर हळूहळू सगळे डे विसरायला लागला...मग तो रोज डे असो, व्हॅलेंटाईन डे असो की फ्रेंडशिप डे असो...माझा वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस लक्षात राहतो हेच नशीब...पण त्यादिवशीही सगळं कोरडंच...आता पाच दिवसांनी भेटल्यावर तरी मला खुश करण्यासाठी आधीच्यासारखं फुलांचा गुच्छ आणि भेटी आणायचं त्याला लक्षात नसणार याची शंभर टक्के खात्री आहे माझी…” तिने उठून लग्नाचा अल्बम काढला. त्यात फोटो बघता-बघता ती उदास झाली.
भटजी मंत्र म्हणत होते. तिने त्याच्या उजव्या हाताला स्पर्श केला होता आणि तो ऐकेक करुन भटजी सांगतील तसे समिधा होमात टाकत होता. ती त्याला स्पर्शून बसली होती. तिने त्याच्याकडे नजर टाकली. भटजी बोलत असलेले मंत्र तो विचारपूर्वक ऐकत होता. त्यातला ऐकेक शब्द जणू समजावून घेत होता. त्याला कसे कळले कुणास ठाऊक? तो वळला आणि तिला नजरेनेच “काय झालं?” असा त्याने प्रश्न केला. तिनेही नकारार्थी मान हलवत नजरेनेच “काहीच नाही” असं उत्तर दिलं. लग्नाचे विधी, अंतरपाट, मंत्रोच्चार, सप्तपदी, होम-हवन, तसंच तिला निरोप देताना सगळ्यांचं भावूक होणं सगळं काही चित्रपटाच्या रीळेसारखं तिच्या डोळ्यासमोरुन भरभर सरकले.
तिने अल्बम जागेवर ठेवला आणि ती पलंगावर आडवी झाली. तिच्या मनात विचार आला,”प्रेमविवाह असो की ठरवून केलेलं लग्न असो, लग्नात अक्षता डोक्यावर पडल्या की स्वतःचंच घर ‘माहेर’ आणि जवळची माणसं ‘माहेरची माणसं’ होताना बघणं कुठल्याही मुलीला चुकलं नाही. मग ‘सासर’ आणि ‘सासरच्या माणसांत’ हक्काच्या नवऱ्याकडून प्रियकरासारख्या प्रेमाची थोडी अपेक्षा केली तर बिघडलं कुठे?”
नीरज आला पण त्या दोघांमधला तणाव काही संपेना. रात्री एकांतात श्रुतीच्या मनाचा बांध फुटला. तिने अश्रू ढाळत तिच्या मनातली खदखद त्याच्यासमोर उघड केली. “राजू तुझं माझ्यावर प्रेमच उरलं नाहीय...तो पूर्वीचा राजू मला हवाय...,ते पूर्वीचं प्रेम मला हवंय…” तिने शेवटचं वाक्य उच्चारले आणि तो स्तब्ध झाला. त्याला काय प्रतिक्रिया द्यावी हे कळेना. तिला जवळ घेऊन तो म्हणाला,”राणी हे काय बडबडतेयस तू? माझं अजूनही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे...मी तुझा पूर्वीचाच राजू आहे...” ती फुरंगटून म्हणाली,”अजूनही मला काय हवंय ते तुला कळलेलंच नाही...जाsssमी तुझ्याशी बोलणारच नाही आता” आणि ती तावातावाने झोपायला गेली.
दुसऱ्या दिवशी तिच्यापुढे नेमकं काय मांडून ठेवलंय ह्याची तिला कल्पना नव्हती. स्वतःच्या शरिराला थोडासा व्यायाम व्हावा म्हणून ती ऑफिसला जाताना नेहमी जिने चढूनच जात असे. त्या दिवशी जिने चढताना तिने कसलातरी अावाज झाला म्हणून मागे वळून पाहिलं अाणि तिचा तोल गेला. ती पायऱ्यांवरुन घसरली. तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. नीरजला कुणीतरी फोन करुन तात्काळ कळविलं आणि तो धावतच हॉस्पिटलमध्ये आला. तिच्या शेजारी बसून तिचा हात हातात घेतला तेंव्हा त्याच्या डोळ्यात जमा झालेले अश्रू तिला अर्धवट बेशुद्धीतही दिसले. तिच्या डोक्याला मार लागून ती जखमी झाली होती आणि तिच्या कंबरेचे हाड मोडले होते. ती व्हेंटीलेटरवर होती आणि बोलू शकत नव्हती. नर्सने तिची काळजी कशी घ्यायची आणि तिला खाण्यास काय-काय दिलं पाहिजे हे त्याला समजाविले. त्याने सगळ्या गोष्टी नीट समजावून घेतल्या. पुढचे काही दिवस ती हॉस्पिटलमध्येच राहणार होती. आठवडाभर हॉस्पिटलमध्ये आणि घरी आल्यावर पुढचे काही दिवस नीरज तिची काळजी वाहत होता. त्या दिवसांत तिने पाहिलं की ती लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून तो रोज देवासमोर दिवा लावून हात जोडून प्रार्थना करणं, तिचं खाणं-पिणं, अौषधं यांचं वेळापत्रक सांभाळणं, तिला हळूहळू थोपटत झोपविणं, विनोदी पुस्तकं वाचून दाखविणं एव्हढचं नाही तर आई-बाबांचं सगळं करणं, त्यांना धीर देणं, संपूर्ण घर सांभाळणं, श्रुती रोज करत असलेली कामं करणं...नीरज सगळं-सगळं नीट करीत होता. तिला त्याचा अभिमान वाटला, त्याच्यावरच्या प्रेमाने तिचा ऊर भरून आला. रात्रीच्या अंधारात तिने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. हा पश्चाताप नव्हता तर स्वपरिक्षण होतं.
“आता एक-दोन दिवसात तूला चालता येईल आणि मग धावतच अॉफिस गाठशील बघ” नीरज तिचा हात हातात घेऊन म्हणाला.
तिने हाताची बोटं त्याच्या बोटांत गुंतवून म्हंटलं,”मी आजारी पडल्यावर तू जे काही केलंस तेव्हढ्यावरच काहीतरी निष्कर्ष काढून मी बोलत नाहीय हं...पण मित्र आणि प्रियकराच्या भूमिकेतून निघून लग्न होताना तू नवऱ्याच्या भूमिकेत शिरलास हे मला उमजलंच नाही...नेहमीच तू घरात जी मला कामात मदत करतो, आई-बाबा आणि माझ्यातला संवाद बिघडू नये म्हणून माझी काळजी घेतोस, मला समजावितोस, माझ्या छोट्या-मोठ्या चुकांकडे दुर्लक्ष करतोस, प्रसंगी तुझी चूक नसतानाही माघार घेतोस, तेंव्हा तुझा माझ्यावर होणारा प्रेमाचा वर्षाव साजरा करण्यासाठी मला कुठल्याही ‘डे’ ची गरज नाहीय की फुलांचे गुच्छ आणि भेट घेऊन तो साजरा करण्याचीही मला आवश्यकता नाही...कारण हा माझ्यासाठी एक ‘डे’ नाही तर एक ‘सोहळा’ आहे...तुझ्या प्रेमाचा सोहळा...हे कळलंय आता मला”
तिचं काहीसं स्वतःशीच चाललेल्या बोलण्याचा संदर्भ न लागून त्याने घाईघाईने प्रश्न केला,”आज कुठला डे आहे का?...मी काही विसरलोय का?”
ती नुसतंच हसली आणि त्याच्या कुशीत शिरली.