नासा येवतीकर

Tragedy

4.5  

नासा येवतीकर

Tragedy

संक्रांतीची साडी

संक्रांतीची साडी

6 mins
383


आज संक्रांतीचा सण, सर्वांच्या घरात आनंदाचे वातावरण होते, जो तो तिळगुळ घ्या गोड गोड बोला, आमचे तिळगुळ सांडू नका आमच्यासंगे भांडू नका असे म्हणत एकमेकांना तिळगुळ देऊन मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देत होते. घराघरांत आज तीळ आणि गूळ एकत्र करून केलेली पोळी जेवण्यात तयार केलेली होती. बायका हळदी कंकू करण्यात मग्न होत्या तर लहान बच्चे कंपनी पतंग उडविण्यात व्यस्त होती. पण सुनंदाच्या घरात मात्र त्यापैकी काहीच दिसत नव्हतं. तिच्या घरावर जणू संकटाचं संक्रांत आल्यासारखे घर सुनं सुनं वाटत होतं. त्याला कारण ही तसेच घडलं होतं म्हणून तर मकरसंक्रांतीचा सण आला की सुनंदाच्या डोळ्यात दरवर्षी अश्रू गळतात. ती कधी कधी स्वतःवर रागावते तर कधी कधी स्वतःच्या नशिबाला दोष देते. ' मी हट्ट जर केला नसता तर काही घडलेच नसते, मेली मला दुर्बुद्धी कशी सुचली आणि मी हट्टाला पेटली ' असे ती स्वतः शी बडबड करत राहते. पण गेलेला काळ काही परत येत नाही. ती पुन्हा पुन्हा आपले ते आनंदाचे दिवस आठवणीत काढून रडत बसते.

सुनंदाचे नुकतेच प्रकाश नावाच्या एका चांगल्या, सुसंस्कारी आणि नोकरदार व्यक्तीशी तिचे थाटामाटात लग्न झाले होते. दोघांचा संसार सुरळीत चालेल एवढा त्याचा पगार होता. घराचा सारा खर्च भागवून हजार-दोन हजार रुपये मागे पडत होते. दोघे एकमेकांचे मन सांभाळून घेत संसाराचा गाडा चालवीत होते. प्रकाशचे आई-बाबा दुरच्या खेड्यात राहत होते. दोन-तीन महिन्यातून एखाद्या दिवशी तो त्यांना भेटायला जात असत. त्यांना सोबत घेऊन शहरात राहण्यासाठी त्याच्याजवळ तेवढा पैसा नव्हता म्हणून मनात असून देखील तो आई-बाबांना आपल्या सोबत ठेवू शकत नव्हता. ते देखील प्रकाशची समस्या जाणून होते त्यामुळे या विषयावर ते देखील काही बोलत नव्हते. सण, उत्सव आणि समारंभ आले की सुनंदा व प्रकाश गावी जाऊन आपल्या आई-बाबासोबत साजरे करत असत. परिवारासोबत सण साजरे करतांना जो आनंद मिळतो तो एकट्यापणात मिळत नाही. म्हणूनच दिवाळी सणाला सर्व नोकरदार मंडळी आपापल्या गावाकडे जातात आणि मोठ्या धुमधडाक्यात उत्सव साजरा करतात. प्रकाश देखील आपले सारे सण आपल्या गावी जाऊन साजरा करत असे. त्यातच त्याला खरा आनंद मिळत होता म्हणून सुनंदा देखील त्याला साथ देत असे. गेल्यावर्षी दिवाळीला कंपनीने त्याला छान बोनस दिला होता. म्हणून प्रकाशने सर्वाना कपडे घेतले आणि इतर सामानाची देखील खरेदी केली होती. सुनंदाला देखील त्याने छानशी साडी आणि कानातील सोन्याचे झुमके खरेदी केला होता. सर्वाना त्यांच्या मनाप्रमाणे वस्तू घेऊन दिल्याने सारे मजेत होते. त्यावर्षी आनंदात दिवाळी साजरी झाली. प्रत्येक सण आनंदात साजरा होत होता.

पण सुखी कुटुंबाला कोणाची नजर लागली देव जाणो. प्रकाश जेथे नोकरी करत होता, ती कंपनी अचानक डबघाईला आली आणि काही दिवसांत बंद ही पडली. प्रकाशला आता नवी नोकरी शोधावी लागली. त्यासाठी महिना-दोन महिन्याचा काळ उलटला. जवळ जमा असलेला सर्व पैसा नोकरी शोधण्यात खर्च झाला. मिळेल तेथे काम करत प्रकाश पैसे गोळा करू लागला. सुनंदाला याची माहिती होऊ न देता तो रोज सकाळी ऑफिसला चाललो म्हणून बाहेर पडत होता. प्रकाशला घराची काळजी वाटू लागली. काय करावं हे सुचत नव्हतं. बघता बघता दिवाळी तोंडावर आली. गेल्यावर्षी धुमधडाक्यात दिवाळी साजरी केली पण यावर्षी दिवा लावण्यासाठी देखील पैसा नाही याची काळजी प्रकाशला लागली. सुनंदाने दिवाळीला लागणाऱ्या सर्व सामानाची यादी केली होती. ती यादी प्रकाशच्या हातात दिली आणि म्हणाली, ' गावी जाताना हे सर्व सामान आपणाला सोबत न्यावे लागेल, उद्याच्या उद्या घेऊन या.' ' ठीक आहे आणतो ' एवढे बोलून हातात सामानाची यादी घेऊन प्रकाश घरातून बाहेर पडला. जवळ शंभर रुपये देखील नव्हते आणि सामान तर हजार रुपयांच्या वर होणार होतं. एक-दोन दुकानदाराला उधारी देण्याविषयी विनंती केली पण ऐन सणासुदीच्या काळात कोण उधारी देईल ? प्रकाशला कोणताही दुकानदार समान उधारी देत नव्हता. तो चिंताग्रस्त होऊन एका दगडावर बसला होता. तेवढ्यात त्याचा एक जुना मित्र देवासारखा धावून आला. त्याचा चिंताग्रस्त चेहरा पाहून त्याने त्याला मदत केली. मित्राच्या मदतीने त्याने सर्व सामान खरेदी केली आणि घराकडे गेला. यंदाची दिवाळी अशी तशीच साजरी झाली. आई-बाबांना देखील कसे तरी वाटले पण प्रकाश नाराज होईल म्हणून त्यांनी काही बोलले नाही. चार दिवस गावी राहून साधेपणाने दिवाळी साजरी करून प्रकाश आणि सुनंदा शहरात परतले. प्रकाश रोज सकाळी ऑफिसला जात आहे म्हणून घरून डबा घेऊन चालला होता, पण सध्या तो कोणत्याच ऑफिसमध्ये काम करत नव्हता तर मिळेल तिथे काम करून दिवस काढत होता. हे फक्त प्रकाशला आणि त्याच्या मित्रालाच ठाऊक होते. अडीअडचणीला त्याचा मित्र तेवढा त्याला मदत करत होता.

प्रकाश स्वाभिमानी आणि प्रामाणिक होता त्यामुळे मित्रावर कृतज्ञता ठेवून त्याच्या मदतीला त्याने कधी तडा दिला नव्हता. त्याच्याकडून घेतलेले कर्ज तो नियमितपणे फेडत होता. पैश्यावरून आणि काही देण्या-घेण्यावरून घरात धुसफूस चालू झाली होती. दिवाळीला साडी घेतली नाही तेव्हा संक्रातीला मला चांगली साडी घेऊन द्या म्हणून सुनंदाने प्रकाशजवळ हट्ट धरली होती. तर प्रकाश समाजवण्याच्या सुरात कपाटात एवढ्या सुंदर साड्या आहेत त्यापैकी एक घालून संक्रात साजरी कर, यावर्षी जरा तंगी आहे, साडी वगैरे काही मिळणार नाही, समजून घे जरा. पण सुनंदा काही ऐकायला तयार होत नव्हती. त्याच दरम्यान बाबा आजारी पडले म्हणून त्यांना दहा दिवस दवाखान्यात भरती करावे लागले. घरात होते नव्हते तेवढे दागिने गहाण ठेवून प्रकाशने बाबांचा दवाखान्याचा खर्च पेलला होता. त्यात सुनंदाच्या साडीचा हट्ट जरा जोर धरला होता. या प्रश्नाने त्याच्या डोळ्यासमोर अंधारी येत होती. बायकोचे रुसणं दूर करावं म्हणून प्रकाशने एका ठिकाणी काम धरलं होतं. त्या कामाचे त्याला चांगले पैसे मिळाले होते. संक्रांतीच्या दिवशी देखील तो कामावर गेला होता. जातांना सुनंदाला म्हणाला आज सायंकाळी येताना तुला सरप्राईज गिप्ट आणतो. तिळाच्या पोळ्या करून ठेव, आजचा पहिला सण आहे जे की आपण गावी साजरा न करता येथेच करू, लवकर येतो असे बोलून तो घराबाहेर पडला. त्यादिवशी दिवसभर काम केला. सायंकाळी घरी परतण्यापूर्वी आपल्या मित्राची भेट घेतली, त्याचे उधारीचे पैसे देऊन टाकले, सुनंदाला एक छान साडी खरेदी केली आणि सायंकाळी पाच-सहाच्या सुमारास सायकलवरून तो घरी जाण्यासाठी निघाला. प्रकाश सकाळी नाष्टा करून बाहेर पडला होता. दिवसभर पाण्याशिवाय अन्नाचा कण देखील त्याच्या पोटात गेला नव्हता. काही अंतर चालून गेल्यावर प्रकाशला चक्कर आली आणि सायकलवरून रस्त्यावर धाडकन कोसळला. त्याचवेळी त्याच्या मागून येणाऱ्या एका गाडीने त्याला धडक देऊन निघून गेली. त्यात प्रकाशने रस्त्यावरच आपला जीव सोडला. त्याच्या खिशात असलेल्या ओळखपत्रावरून पोलिसांनी त्याच्या डेडबॉडीचा पंचनामा केला, आई-बाबा आणि सुनंदाला बोलावून घेतले. पोस्टमार्टम करून प्रकाशचा मृतदेह घरच्यांना सोपविण्यात आला. सोबत त्याच्याजवळ असलेली पिशवीही देण्यात आली. पिशवीमधील संक्रातीसाठी घेतलेली साडी पाहून सुनंदा जोरजोरात रडू लागली. सायंकाळी येताना सरप्राईज गिप्ट आणतो असे प्रकाशने वचन दिले होते. हे आठवण करीत ती हुंदके देत होती. अंत्यसंस्कारचा विधी पार पडला. तेरावी तिथी संपली. चौदाव्या दिवशी प्रकाशचा मित्र भेटण्यासाठी घरी आला. घरातल्या लोकांना जी बाब माहीत नव्हती ती बाब त्याने सर्वाना सांगितली, ' प्रकाश गेल्या काही महिन्यांपासून खूप संकटात सापडला होता. त्याची कंपनी डबघाईला आल्यामुळे बंद पडली होती आणि प्रकाशची नोकरी गेली होती. म्हणून तो रोज मिळेल ते काम करून पैसे मिळवत होता. बऱ्याच वेळेला त्याने माझ्याकडून पैसे उधार नेले आणि तुमच्या सर्वांच्या ईच्छाआकांक्षा पूर्ण केल्या. अपघात झाला त्यादिवशी प्रकाश खूप आनंदात होता. त्याला त्याच्या कामाचे पैसे मिळाले होते. माझी उधारी पूर्णपणे देऊन, वहिनीसाठी त्याने संक्रांतीची भेट म्हणून चांगली साडी खरेदी केली होती. त्यादिवशी मला तो खूप आनंदी आणि प्रसन्न वाटत होता. पण अचानक अपघाताची ती बातमी कानावर आली ......' हे ऐकून सुनंदा हुंदके देऊन रडू लागली. साडी पाहिजे म्हणून मी उगाच हट्ट केला. मला त्यांची परिस्थिती कळलेच नाही. त्यांच्यामागे साडी पाहिजे म्हणून हट्ट करायला नको होते, माझ्यामुळे असा अनर्थ घडला म्हणून सुनंदा त्या संक्रातची भेट म्हणून जी साडी प्रकाशने घेतली होती त्याला पाहून रडू लागली. प्रकाशची आठवण म्हणून आज ही ती संक्रांतची साडी कपाटात ठेवलेली आहे. ती साडी तिला उभ्या आयुष्यात कधीच वापरता आली नाही. प्रत्येक वर्षी मकरसंक्रांतीच्या दिवशी सुनंदा प्रकाशच्या त्या संक्राती भेटला पाहते आणि आठवणीत दिवसरात्र रडत बसते. संक्रातीच्या दिवशी सुखाची भेट दुःखात परिवर्तन झाल्याची खंत तिच्या मनातून काही केल्या जात नव्हती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy