संघर्ष
संघर्ष


रविवारचा दिवस. शहराकडून गावाकडे परत येत होतो. वाटेतच पावसाने झोडपले. मित्रासह ओलेचिंब झालो. वाटेतच माझी बालमैत्रीण प्रीतीचे गाव लागले. अचानक आम्ही तिच्या घरी पोहोचलो. प्रीती मुलाबाळांत रममाण होती. आमच्या अचानक जाण्याने ती आश्चर्यचकित झाली. लगेच भानावर येत तिने आमचे आगत स्वागत केले. मी सहज तिच्या सांसारिक जीवनातील सुख-दुःखाचे विचारणा केली ती जरा थबकली. अन अलगदपणे स्मितहास्य करीत सर्व काही ठीक असल्याचे सांगितले. मात्र तिला तिच्या मनातील वेदना लपविता आल्या नाही. आणि तिच्या आयुष्यातील अविरत संघर्ष भराभर माझ्या दृष्टिपटलावर येण्यास वेळ लागला नाही.
प्रीती बालपणापासूनच खेळकर, उत्साही, मेहनती, चिवट वृत्तीची आणि सामाजिक जाणिवेची सुद्धा. गरिबी आणि हलाखीच्या स्थितीतही तिने परिस्थितीशी कडवी झुंज देत अथक प्रयत्नाने बरेच काही मिळविले आहे इतकेच नव्हे तर ती सर्वांच्या आदरासह प्रेरणेस पात्र ठरली. मात्र तिच्या आयुष्यातील संघर्ष उच्चशिक्षित आणि वैवाहिक जीवनानंतरही संपता संपेना. सर्व जगासमोर आनंदी दिसणारी प्रीती मात्र मनातून पूर्णपणे खचलेली होती पण अशा बिकट परिस्थितीतही तिने सुखाची वाट शोधण्याची जिद्द सोडली नव्हती. तितक्याच धैर्याने ती परिस्थितीला सामोरे जात होती. तिचे अथक प्रयत्न आणि धावपळ निश्चितच नवोदितांना प्रेरणा देणारी आहे.
कुटुंबातील थोरली असलेली प्रीती सर्वांच्याच लाडाची. शिक्षणात हुशार तसेच मनमिळावू परिस्थितीशी समरस होणारी आणि कुणाच्याही सुखदुःखात, अन सामाजिक कार्यातही सहभागी होणारी. म्हणून ती कुटुंबाच्याच नव्हे तर ती इतरांच्याही लाडकी मुलगी झाली होती. ग्रामीण भागात प्रतिकूल वातावरणात राहुनही पदवी-पदव्युत्तर पर्यंत शिक्षण घेतले. शिक्षित असलेल्या प्रीतीला एका खाजगी शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली आणि गावातील पहिली मास्तरीन ठरली. तत्पूर्वी तिने गावातीलच गोरगरिबांच्या मुलांना विनामूल्य शिकविण्याचा उपक्रम सुद्धा चालविला होता त्यामुळे ती सर्वांच्या आदरास पात्र ठरलीच शिवाय अनेकांची प्रेरणास्त्रोत बनली.
काळाच्या ओघात ती लग्नाच्या बेडीत अडकली. स्वयंनिर्भर होईपर्यंत लग्नाचा विचार नसल्याचा प्रीतीचा हा गुणधर्म वर पित्याला चांगलाच भावला. भविष्यात तिला स्वयंनिर्भर करण्याचे आश्वासन वर पित्याने प्रीतीच्या कुटुंबाला दिले. समजुतदार व कर्तव्यतत्पर वाटणाऱ्या वर पित्याच्या शब्दाला शिरोधार्य मानत कमी शिकलेल्या मुलासोबत लग्नासाठी तिने अखेर होकार दिला. रितीरिवाजाप्रमाणे लग्न सोहळा संपन्न झाला.
प्रीतीला संस्कारी व श्रीमंत कुटुंब आणि जेमतेम शिकलेल्या मुलाला उच्चशिक्षित मुलगी मिळाल्याने दोन्ही कुटुंबात उत्साही व आनंदी वातावरणाची निर्मिती झाली. तिचा नवरा सर्वात थोरला होता. दोन दीर आणि एक नणंद सासू-सासरे असे तिचे नवे कुटुंब. प्रीतीचे सासरे तालुक्याच्या ठिकाणी गटविकास अधिकारी. कालांतराने नणंद आणि दिराचेसुद्धा लग्न झाले. धाकटा दीर आणि त्याची पत्नी शासकीय नोकरीत. मधल्या दिराला नोकरी नाही पण पत्नी शासकीय नोकरीत. नणंद स्वतः एका नामांकित कंपनीत गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीवर. दरम्यानच्या कालावधीत प्रीतीलासुद्धा एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेवर अल्पशा मानधनावर नोकरी मिळाली. नवऱ्याला मात्र नोकरी नाही पर्यायाने तिच्या स्वतंत्र कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी ही प्रीतीवर येऊन पडली. म्हणून दोघेही जमेल तसा संसाराचा गाडा पुढे रेटत होते. कुटुंबाच्या वाढत्या गरजा आणि अल्पसे मानधन यात मेळ घालताना प्रीतीची चांगलीच कसरत व्हायला लागली. त्यातच पतीच्या आजाराने अधिक भर घातली. शिवाय तिने उर्वरित शिक्षण पूर्ण करून स्वयंनिर्भरतेकडे वाटचाल सुरू केली असली तरी परिस्थितीशी संघर्ष तिचा पाठलाग सोडायला तयार नव्हता. म्हणून तिची अधिक फरफड व्हायला लागली. त्यातच सासरच्यांना परिस्थितीची जाणीव असतानासुद्धा त्यांच्या वाढत्या अपेक्षेने (त्यांच्या इतर मुला-मुली प्रमाणे) प्रीतीला हा भार पेलणे अवघड वाटायला लागत असले तरी तिची जिद्द आणि चिकाटी कायम होती.
प्रीतीचा विवाह सधन व श्रीमंत कुटुंबात झाला असला तरी प्रीती व्यतिरिक्त सर्वांचे कुटुंब मात्र स्वालंबी होते. विभक्त असलेल्या प्रीतीच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती जेमतेमच होती. मध्यंतरी तिलासुद्धा कायमस्वरूपी नोकरीची संधी चालून आली होती मात्र आर्थिक दुर्बलतेमुळे तीची ही संधी हुकली. अडचणीच्या वेळी प्रीती मदत मागणार नाही अशी स्थिती तिच्या सासरकडील मंडळींनी निर्माण करून ठेवली होती. त्यातच भविष्यात पुढे ही तिच्या कडून आर्थिक स्वरूपाची मदत मागणार नाही अशी गळचेपी करण्याची संधी त्यांनी कधीच सोडली नाही. विशेष म्हणजे प्रीतीची जिद्द मेहनत आणि संघर्षाचे कौतुक करण्याऐवजी तिच्या कर्तृत्वाला आर्थिक निकषात मोजले गेले. ती थोरली असूनसुद्धा मानसन्मानाच्या बाबतीतही हाच निकष लावल्याने तिची चांगलीच घुसमट व्हायला लागली.
प्रीतीचा नवरा कुटुंबातील सर्वात थोरला असल्याने तो अधिक लाडका असेल असा तिचा समज झाला असावा! इतरांपेक्षा साधाभोळा, जेमतेम शिकलेला, समाजामध्ये फारसा वावर नसलेला मुलगा. थोरला असूनही व्यावहारीक ज्ञानापासून अनभिज्ञ असल्याचे तिच्या लक्षात येण्यास फारसा वेळ लागला नाही. पण माहेरकडील जेमतेम आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन, भविष्याचा वेध घेत तिचा अडजेस्टमेंटचा स्वभाव त्यासाठी कारणीभूत ठरला आहे. लग्नानंतर प्रारंभीचे एक-दोन वर्ष वगळता पुढे पुढे सासरकडून कटू अनुभव यायला लागले. थोरली सून असल्याची तिला कधीच जाणीव झाली नाही. सामाजिक रीतीरिवाजा प्रसंगी परिचय देण्यापूरता मान सन्मान तिच्या वाट्याला आला अर्थात तिचे कुटुंबातील स्थान नगण्यच म्हणावे!
अन्य वेळी मात्र तिच्या पदरी निराशा व उपेक्षाच आली आहे. तिच्या नवर्याचेही स्थान प्रीतीपेक्षा फारसे वेगळे नव्हते. सूनेपेक्षा स्वतःच्या मुलाचीच अधिक उपेक्षा व कुचंबना तिला भेडसावत असे व तसे तिने तिचे मत वारंवार नवऱ्यासमोरसुद्धा मांडले. नवऱ्याला पण याबाबतची जाणीव होती पण आई वडिलांच्या कृतज्ञतेपोटी हतबल होता कुणालाही दुखवू नये असा तिच्या नवऱ्याचा स्वभाव. म्हणूनच प्रीती अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगी असूनसुद्धा त्याने आपल्या श्रीमंतीने प्रीतीला आणि तिच्या कुटुंबियांना कधीच डिवचले नाही उलट प्रत्येक कठीण प्रसंगी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. त्यांचा हाच स्वभाव प्रीतीला घट्ट बांधून ठेवण्यास कारणीभूत ठरला आहे. अन्यथा तिचा संसार कधीचाच मोडला असता. निराशेत अनेकदा तिच्या मनात काडीमोड घेण्याचे विचार थैमान घालत असताना नवऱ्याचा अत्यंत चांगला तसेच सहनशील स्वभाव आणि सामाजिक बंधनाने तिला रोखले. पण सासरच्या मंडळींना कधीच तिच्या चांगल्या गुणांची/स्वभावाची जाणीव झाली नाही.
संसार करण्यास असमर्थ असलेल्या मुलासोबत संसाराचा गाडा पुढे रेटत असतानाही तिच्या पदरी मात्र नेहमी निराशाच आली आहे. नणंदेच्या लग्नात तर थोरली सून ही केवळ नाममात्र राहिली. कधी नव्हे इतका अपमान तिच्या वाट्याला आला आहे. घरची थोरली सून असूनसुद्धा तिला स्वतःचे घर परके वाटायला लागले. माहेरच्या लोकांना तर त्यांनी कवडीचीही किंमत दिली नाही. माहेरच्यांनाही आपल्या मुलीची सासरकडे असलेल्या अस्तित्वाची जाणीव त्यांना नक्कीच होती मात्र लेकीच्या प्रेमापोटी/संसारापोटी त्यांनी कुठेही वाच्यता केली नाही. प्रीती मात्र अंतकरणातून पूर्णपणे दुखावली पण हतबल होती.
सासरकडून होणारी उपेक्षा तिच्या जिद्द व मेहनतीला तसेच यशाला रोखू शकले नाही. स्वतंत्र संसार मांडूनही तिच्या प्रगतीचा आलेख पुढे सरकत राहिला आहे. कुटुंबाचाही बऱ्यापैकी जम बसला. पती हा कुटुंबात थोरला असूनसुद्धा फारसे महत्त्वाचे स्थान नाही. संसाराचा/कुटुंबाचा जम बसला असताना सुद्धा पतीच्या प्रतिष्ठेसाठी आणि अस्तित्वासाठी प्रीतीचा संघर्ष मात्र संपता संपेना !!!