Avni Khandale

Drama Fantasy Others

3  

Avni Khandale

Drama Fantasy Others

समज - गैरसमज

समज - गैरसमज

7 mins
127


"हो हो..मी निघते लगेच.." मीराने घाईतच फोन ठेवला आणि लगेच दुसरा नंबर डायल केला.

"अवि.. माझं इंडियासाठी तिकीट बुक कर प्लीज..."

"मिरा अगं काय झालं? घाबरलेली का वाटतेयस?"

" मला तातडीने निघावं लागेल अवि प्लीज" मिरा रडत रडत म्हणाली

"हो मी करतो. मी येतोय लगेच. तू तयारी कर" अवि


   मिरा ने तीचं आवरायला घेतलं. अविने तिकीट बुक केलं आणि तो घरी आला. त्याला पाहताच मिरा पुन्हा रडायला लागली. पण या वेळी अवि रागात होता.

"मी गेले तीन वर्षे सांगतोय तुला मिरा, की एकदा तरी जाऊन ये. तुझ्या जाण्याने खुप मोठा फरक पडला असता तिकडे. पण तुझा अहंकार आणि तु..." अवि

"आय अ‍ॅम व्हेरी सॉरी अवि. माझीच चूक झाली. माणुस ओळखायला मी चुकले" मिरा

  तिची अवस्था पाहून अविने आपला राग आवरला आणि तिला जवळ घेतलं.रात्रीच्या विमानाने मिरा भारतात येण्यासाठी निघाली. गेल्या पाच वर्षांत ती एकदाही तिकडे गेली नव्हती. पण आज आलेल्या फोनने तीचं आयुष्य बिथरुन् गेलं होत..खिडकीतून आकाशातली चंद्रकोर पाहता पाहता तीचं मन भूतकाळात गेलं...

तो ईद चा दिवस होता. तिचे वडील रमेश एका मित्राच्या घरून ईदचे जेवण करून नुकतेच आले होते. त्यादिवशी आईनेसुद्धा मिरासाठी शेवयाची खीर आणि थोडी चिकन बिर्याणी केली होती.

 

   मिरा आतल्या खोलीत झोपली होती पण बाहेर चालू असलेलं आई बाबांचं बोलणं तिच्या कानावर पडत होतं.

"स्मिता, तुला किती वेळा सांगितलेय? त्या पोरीचा असला फालतू लाड करत जाऊ नकोस" रमेश मिराच्या आईवर रागाने ओरडत होता.

"मी तुला यापूर्वी सुद्धा सांगितलेय रमेश. ती तिला आवडेल तसचं वागेल." स्मिता म्हणाली

"तुझ्या हट्टापाई मी तिला या घरात ठेऊन घेतलं. आता तिला दुसऱ्या धर्माच्या चाली रीती पण शिकवणार असशील तर मला विचार करावा लागेल"

"तु ठेवून घ्यायला हे घर तु चालवत नाहीस. आणि तिला जो धर्म आवडेल त्यानुसारच ती राहील." स्मिता सुद्धा आता रागात होती.

  त्या वेळी मिरा आठवीला होती. जेव्हा जेव्हा रमेश पिऊन यायचा तेव्हा तेव्हा हा वाद ठरलेला होता. जशी जशी मिरा मोठी होत गेली तसं तिला या भांडणातून समजायला लागलं कि तिचा बाबा तिचा भयंकर तिरस्कार करत होता. पण कारण मात्र तिला माहिती नव्हतं.

   त्या भांडनांना ऐकून तिने स्वतःच मनात वेगवेगळे तर्क लावायला सुरुवात केली. आपला बाबा आपला तिरस्कार करतो आणि आपल्याबद्दल परकेपणाने बोलतो याचा अर्थ मी त्यांची मुलगी नसावी असा समज तिने करून घेतला. त्यामुळे ती स्मिताचा दिवसेंदिवस जास्तच तिरस्कार करू लागली.मीराच्या अश्या वागण्यामुळे स्मिता पूर्ण गोंधळून गेली होती. मीरा अशी का वागते आपल्याशी, अलीकडे आपल्यासोबत जास्त का बोलत नाही हे तिला समजत नव्हते.

   पण रमेशला मात्र मिराच्या वागण्या-बोलण्यातून तिने नेमका काय गैरसमज करून घेतला आहे याचा अंदाज आला होता. रमेशला आधीपासूनच मिरा त्याच्या आयुष्यात नको होती. म्हणूनच त्याने तिच्या या गैरसमजाचा फायदा घ्यायचे ठरवले.

 

   त्याने आता स्मिता सोबतची भांडणं जास्त वाढवली. बऱ्याचदा तो मीरा समोर असताना उघड उघड भांडण करण्याचा प्रयत्न करायचा . पण स्मिता मात्र मिराला समोर पाहून रमेशच्या भांडणाला उत्तर देणं टाळायची. तिच्या अश्या वागण्यामुळे मिराला मात्र तिची शंका खरी वाटू लागली.

    रमेश आणि स्मिता हे दोघे कॉलेज मधील एकमेकांचे मित्र मैत्रीण. कॉलेजमधेच ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी एकमेकांशी लग्न केलं.लग्नानंतर काही वर्षांतच स्मिताला रमेशचा खरा स्वभाव कळू लागला. स्मिता श्रीमंत घरातील, तिच्या नावे बरीचशी प्रॉपर्टी तिच्या आजोबांनी करून ठेवली होती आणि याच पैशाच्या मोहापायी रमेशने स्मिताला प्रेमाच्या जाळ्यात फसवले होते.

  लग्नानंतर वर्षभरातच त्याने ऐशोआरामामध्ये स्मिताचा पैसा उडवायला सुरुवात केली.त्याला बरीचशी वाईट व्यसनं सुद्धा आहेत हे स्मिताच्या लक्षात आलं. स्मिताने पैसे नाही दिले की तो तिला मारहाण करण्याचा प्रयत्न करायचा.अश्यातच एकदा त्याने केलेल्या मारहाणीत स्मिताच्या पोटाला इजा झाली आणि स्मिता आता कधीच आई होऊ शकणार नाही असं तिला डॉक्टरनी सांगितले.

  यावेळी मात्र स्मिताची सहनशक्ती संपली होती. दवाखान्यातून ती रागातच घरी आली आणि तिने रमेशला सोडण्याचा निर्णय घेतला. आपली बॅग घेऊन ती त्याचदिवशी स्वतःच्या घरी निघून गेली.आयतं सोन्याचं अंड हातातून निसटल्यामुळे तो आणखीच चिडला. स्मिताच्या घरी जाऊन त्याने दंगा करायला सुरुवात केली. पण स्मिताने मात्र त्याला अजिबात किंमत दिली नाही. अश्यातच त्याचे व्यसन आणखी वाढत गेले.

   वर्षभरानंतर स्मिताला तिच्या नावे एक पत्र मिळाले . रुक्साना नावाच्या एका स्त्रीने तिला अर्जंट भेटायला बोलवले होते. दिलेल्या पत्त्यावर स्मिता पोहोचली. तेंव्हा तिथे एक तेवीस वर्षांची मुलगी तिच्या हातात नुकतंच जन्मलेलं बाळ घेऊन बसली होती. स्मिताने विचारल्यानंतर रुक्सानाने तिला सांगितलं की वर्षभरापूर्वी तिचा नवरा रमेशने तिला लग्नाचं वचन देऊन फसवलं आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

   तिच्या हातात असणारं ते बाळ म्हणजे रुक्साना आणि रमेशच बाळ होतं. रुक्सानाने असंही सांगितलं की तिला एक गंभीर आजार असल्याने ती आता जास्त दिवस जगू शकणार नाही. त्यामुळे या मुलीला तू सांभाळावस अशी इच्छा तिने स्मिता जवळ व्यक्त केली. सगळं ऐकल्यानंतर त्यावर काय प्रत्युत्तर द्यायचं ते स्मिताला कळत नव्हतं . ती काही न बोलता तशीच सुन्न मनाने तिथून बाहेर पडली.

  चार पाच दिवस विचार करून स्मिताने शेवटी त्या बाळाला सांभाळण्याचा निर्णय घेतला आणि ती रुक्सानाकडे निघाली. पण तिथे पोहोचेपर्यंत रुक्साना या जगातून निघून गेली होती. तिच्या शेजारनीच्या हातातील त्या छोट्या बाळाला स्मिताने उचललं आणि तिला घेऊन ती घरी आली.पण त्या बाळाची कायदेशीर दत्तक प्रक्रिया करणे गरजेचं होत. त्यासाठी तिने रमेश बरोबर बोलायचं ठरवलं. आणि याच संधीचा फायदा घेऊन रमेशने आपलं त्या बाळावर किती प्रेम आहे हे स्मिताला दाखवायला सुरुवात केली आणि दत्तक पत्र करण्यास नकार दिला.

    बाळाचे वडील हयात असताना त्यांच्या परवानगी शिवाय स्मिता त्या बाळाला स्वतःकडे ठेवून घेऊ शकत नव्हती. शिवाय तिला रमेशचा खरचं त्या बाळावर जीव आहे असं वाटू लागलं होतं. आपल्याला आपल्या आजी आजोबांनी सांभाळलं आपल्या आयुष्यात आपल्याला वडिलांची पोकळी नेहमीच जाणवत राहिली. तीच पोकळी या बाळाच्या आयुष्यात यायला नको असा विचार करून स्मिताने पुन्हा रमेश सोबत राहण्याचा निर्णय घेतला.

  तेंव्हापासून रमेश मिरासोबत अगदी व्यवस्थित राहायचा पण तो जेंव्हा तो दारू पिऊन यायचा तेंव्हा मात्र स्मिताला त्याच खरं रूप दिसायचं. त्याच्या मनात मिराबद्दल अजिबात प्रेम नाही हे तिला कळून चुकले होतं. पण मिरासाठी म्हणून ती रमेशला सहन करायची. मिरा जसजशी मोठी होत गेली तसं स्मिताने मिराच्या नावे सेव्हींग करायला सुरुवात केली. मिरासाठी तिने वारंवार सणासुदीला दागदागिने सुद्धा घेऊन ठेवले होते. ती मिराचा सख्या आईप्रमाणे सांभाळ करायची. तिच्यासाठी ती हिंदू मुस्लिम दोन्ही सण साजरे करायची.

    मिराच्या नावे असलेली गुंतवणूक आणि दागदागिने पाहता रमेशला आता फक्त मिराचा विश्वास संपादन करणं गरजेचं होत, किंवा त्यापेक्षा सोपा मार्ग होता मिराच्या मनात स्मिताबद्दल असलेला गैरसमज वाढवणं. एक दिवस स्मिता घरी नसलेलं पाहून रमेशने मिराजवळ रडायला सुरुवात केली. मीराला तसंही सत्य जाणून घ्यायचंच होत. त्यामुळे तिने सरळ विषयाला हात घातला. आणि त्यांच्या भांडणाच कारण विचारलं. रमेशने सोज्वळपणाचा आव आणून तिची माफी मागितली आणि माझा राग तुझ्यावर नसून तुझ्या आईवर आहे असं सांगितलं. आणि याचं कारण म्हणजे स्मिताचे बऱ्याच वर्षांपूर्वी एका मुस्लिम पुरुषाशी संबंध होते. आणि त्यातूनच तू जन्माला आली आहेस असं मीराला सांगितलं. हे ऐकून मिराच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यावेळी मिरा वीस वर्षांची होती. स्मितावरच्या तिच्या रागाचं रूपांतर तिरस्कारात झालं आणि तिने ते घर सोडलं. हॉस्टेल मध्ये राहून स्वकमाइने तिने तिचं शिक्षण पूर्ण केलं. 

    तिला रमेश बद्दल खूप वाईट वाटायचं त्यामुळे त्याला भेटण्यासाठी दर महिन्याला ती घरी जात असे आणि रमेश सुद्धा तिच्याशी आता गोड बोलून राहत होता. पण ती स्मिताशी मात्र बिलकुल बोलत नव्हती. स्मिताने कितीही प्रयत्न केले तरी मिराने कधी तिला तिची बाजू विचारली नाही.

   पाच वर्षांपूर्वी मिराने अवी सोबत लग्न केलं आणि ती परदेशात सेटल झाली. भारतातून येण्यापूर्वी मिराने तिचे सगळे दागदागिने आणि बरेचशे पैसे रमेशला दिले. याचीच तर रमेश वाट पाहत होता. हातात इतके पैसे येताच रमेशनेसुद्धा स्मिताला सोडले.

   तीन वर्षांपूर्वी मिराच्या मामाकडून तिला खबर मिळाली की तिची आई एका भयंकर रोगाने त्रस्त झाली आहे आणि आपल्या मुलीची खूप आठवण काढते आहे. मामाने बऱ्याच वेळा विनवण्या करून सुद्धा मिराला स्मिताला भेटावसं वाटलं नाही. तिचं हे वागणं अविला सुध्दा पटत नव्हतं. त्याने देखील मीराला एकदा आईला भेटून ये म्हणून बऱ्याचदा विनवणी केली होती.

   आज सकाळी मात्र तिच्या मामाने तिला भयंकर रागात फोन केला होता. स्मिताची तब्येत फारच गंभीर होती. तिला शेवटचं आपल्या लेकीला बघायचं होतं पण इतकं सांगून सुद्धा मिराच्या बोलण्यातील अहंकार पाहून मामा भयंकर चिडला होता. आणि त्याच रागात त्याने नकळतपणे मीराला सगळं सत्य सांगितलं.

     हे कळाल्यानंतर मात्र मीरा पूर्ण हादरून गेली होती. आणि म्हणूनच ती इतक्या तातडीने आपल्या आईला भेटण्यासाठी निघाली होती. आपल्या एका भेटीने आईचा जीव वाचेल याच आशेत ती होती.डोळ्यातील अश्रू पुसून तिने बाहेर पाहिलं....

   तिचं विमान मुंबई एअरपोर्टवर उतरत होतं. विमानतळावर उतरून तिने लगेचच कॅब बुक केली आणि हॉस्पिटलकडे जायला निघाली.हॉस्पिटल मध्ये पोहोचताच ती धावतच आत गेली. तिने मामाला फोन केला पण त्याने मात्र जशी आली आहेस तशीच निघून जा असं म्हणून फोन कट केला.

   शेवटी रिसेप्शनला चौकशी केल्यावर तिला असं कळालं की, दोन तासांपूर्वीचं तिच्या आईच प्रेत घेऊन नातेवाईक घरी गेले आहेत....

   हे ऐकून मात्र मिराला स्वतःला आवरता आलं नाही. ती तिथेच बसून जीवाच्या आकांताने रडू लागली. आपण आपल्या आईला समजण्यात किती मोठी चूक केली याचा तिला पश्चाताप झाला होता. तिला आईची मनापासून माफी मागायची होती.....पण आता ती संधी तिला कधीच मिळणार नव्हती....


नात्यांना समजून घेण्यात आपण कमी पडलो तर ते नातं पुन्हा जोडता येत नाही. कारण ते नातं जोडण्याची वेळ निघून जाते आणि तो क्षणही........!


(समाप्त)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama