सखी
सखी


रात्रीचे १२ वाजलेले! "सखीला" झोपच येत नव्हती.
नेमकं काय झाले होते. तिला स्वतःलासुद्धा कळत नव्हते. खूप प्रयत्न केला झोपण्याचा पण तरी तिला झोप येत नव्हती. शेवटी तिने पुस्तक वाचायला घेतले.
पुस्तक वाचताना तिला अचानक एक गोष्ट आठवली-
त्या गोष्टीपासून ती खूप दूर आली होती ती म्हणजे तिचा "आनंद..."
तिने स्वतःबद्दल कधीच विचार केला नाही.. सतत कामात गुरफटलेली असायची,
कुटुंबातला प्रत्येक सदस्य तिचा आनंद वाटत असे. म्हणजे त्याच्यासाठी जे काही करते सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यत त्यामध्येच ती तिचा आनंद मानत होती पण!
त्या रात्री तिला झोप येतच नव्हती कारण तिच्या मनात एकच विचारणा की आपण आपला आनंद घेतच नाही. फक्त इतरांचे काम करण्यातच आपण आनंद मानत आलो. पण! स्वतःचं काय? कधी, कुठे, कुठल्या गोष्टींचा आपल्याला खूप आनंद झाला का? हाच विचार तिच्या मनात घोळत होता. म्हणून शांत झोपही लागत नव्हती.
स्वतःशीची ती एकटी बोलत होती. खरंच आपण आपलं अस्तित्व कधी शोधलंच नाही आणि इतरांनीही माझ्या आनंदाचा विचार केला नाही, आपण तर सर्वांची आवड निवड चोखपणे पाहत असतो.
पण! आपल्या आवडी निवडीचं काय? त्याचा विचार तर कधी केलाच नाही अन् इतरांनी पण केला नाही, सतत घरातल्या जबाबदाऱ्या पेलवत राहिले. पण आज खूप उदास वाटतं. घरातील कामामध्ये एवढी गुंतले की मी स्वतःकडे लक्ष देऊ शकले नाही..
कधी एक दिवस माझ्यासाठी मिळालाच नाही आणि स्वतःसुद्धा स्वतःसाठी वेळ काढला नाही.
स्त्री म्हणजे फक्त घरातली एक मोलकरीण झाली. सांगेल ते काम करणे जसं सांगतील तसं वागणे....।
स्त्री जीवनाची चौकट फक्त चार भिंतीत आहे का?
मोकळ्या सुंदर निरागस वातावरणात तिलाही जगायचं...
इतरांसोबत बालपणीच्या शाळेतल्या गप्पा मारायच्या...
मनातली चौकट तोडायची आणि स्वच्छंदीने जीवन जगायचे...
स्त्रीच्या कल्पनेचा ग्रह
आता निर्माण करायचा
चौकटीतल्या बंधनातून
स्वतःला मुक्त करायचा...