शेवटची इच्छा!
शेवटची इच्छा!
गाडी खडखडत होती. सुधाकर साधा पेपर चाळत बसला होता. आधीच बाहेर कोरोनाचा कहर चालू. त्यात पेपरात सुद्धा विशेष वाचण्यासारखं नव्हतं. प्रवासी गाड्या नुकत्याच चालू केल्यामुळे गाडीत फार कमी गर्दी होती. बरोबर कोणीच नसल्यामुळे सुधाकरला या प्रवासाचा फार कंटाळा आला होता. सुधाकर त्याच्या गावी निघाला होता, वैभववाडीला. त्याला त्याच्या गावाचं मुळीसुद्धा कौतुक नव्हतं. वडिलोपार्जित घर होतं, आंब्याची कलमं होती, स्वतःच्या नावाची जमीन होती. आज त्याला गावाला जायला लागत होतं ते तिथल्या घराच्या कागदपत्रांसाठी. वडील गेल्यानंतर ते घर आणि जमीन फुकून टाकायची असं त्याचं इप्सित. पण प्रॉपर्टीचे पेपर्स गावात आणि हा राहणार शहरात! मग कसं व्हायचं? गावाला जाऊन पेपर आणेपर्यंत तीन-चार वर्ष गेली. वडील गेले आणि आणि गावातले लोक विचारू लागले "वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी तुम्ही आला नाहीतच, आता प्रॉपर्टीचे पेपर्स बघायला तरी येणार का?" त्यामुळे एकदाचे ते पेपर्स मिळवायचे आणि काय तो सोक्षमोक्ष लावायचा असं त्याने ठरवलं होतं. आणि म्हणूनच तो गावी निघाला होता. सात ते आठ तासांच्या प्रवासात एकट्याने करायचं काय म्हणून पेपर बाजूला ठेवून आता नुसताच खिडकीबाहेर पाहत बसला होता. एवढ्यात त्याला कोणीतरी विचारलं, काय पाव्हनं, खयसून आलात अन् खयं चाललात?
सुधाकरने मान वळवून पाहिली तर समोर एक बेचाळीशीचा तरुण उभा होता. चेहऱ्यावर गोड हसू, डोक्यावर थोडेसेच केस, डोळ्यांना चष्मा ,
पिवळा शर्ट त्यावर चेक्स, खाली जुनाट वाटणारी पण स्वच्छ पॅन्ट छोटी बॅग आणि हातात कसलासा बॉक्स. सुधाकरला अशा चांभार चौकशा करणाऱ्यांचा फारी राग होता, त्यामुळे काहीशा रागातच त्याने उत्तर दिलं, "मुंबईहून आलोय, वैभववाडीला निघालोय." "आरं वा, हे बाकी बेस् झालं! मुंबईहून गावी निघालात, चाकरमानी आसात् काय? सुधाकरनं कडवट हसु दिलं तरी या इसमाचे संपेना. गप्पा मारायला आल्यागत हाताला सॅनिटायझर लावून समोरच्या सीट वर बसला. काय मग गावी असतत कोन? नाही म्हंजे मी पन वैभववाडीचाच. तुमी राहायला नक्की कुठं? नाही नाही, मी गावी राहात नाही. माझे वडील असायचे, ते ही येऊन जाऊन. मी मुंबईतच सेटल आहे सुधाकरनं उत्तर देणं टाळलं. काय आहे, हल्ली कोणाचा भरोसा देता येत नाही, मग या अनामिका वर तरी कसा विश्वास ठेवायचा? "मुंबईत शेटल काय!मुंबई.. स्वप्ननगरीच ती. कित्येक लोक येतात आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी, कधी स्वतःच्या कुटुंबाचा पोट भरण्यासाठी, कधी फेमस होण्यासाठी, कधी गावात राहायचा कंटाळा शहरात राहण्याची खुमखुमी. मग जातात शेहरात, मुलाबाळांना गावीच ठेवतात. आणि जातात चाकरमानी, पाव्हनं बनून स्वतःच्या गावी! परक्यासारखं! सुधाकरला एव्हाना कळलं होतं की या इसमाचं आणि आपलं पटणार नाही. सुधाकरचा गावावर राग होता आणि हा इसम गावाकडे ओढला गेलेला. सुधाकरने फक्त मान डोलावली. "सोरी सोरी, मी इतका वेळ तुमच्या बद्दलच इचरतोय, तुमी म्हणाल हा स्वतःबद्दल सांगत नाय कसा? मी पण नोकरीनिमित्त गावाहून शेहरात इलय. आमची बायको आणि मूलबाळा असतात गावी. सुटीला तिकीट काढूचा आनि गावी जाउचा असा करत आलो इतके साल. पन आता कसा बघा, पोरबाळांना मुंबईची ओढ जास्त. आमका मुंबईत येऊचा हा, असा म्हणतात. काळाचा महिमा, आनी काय!
"अहो पण त्यांना शहरात यावसं वाटलं तर काय चुकलं त्यांचं? गावात आता राहिलय काय? कनेक्टिव्हिटी नाही ऍक्सॅसिबिलिटी नाही आणि धड सोयीसुविधा नाहीत. मग करायचं काय गावात राहून?" " नाय तूमी म्हणता ते बरोबरच हाय, शेवटी प्रत्येकाची मतं वेगळी नाही का. बरं, तुमचं नाव काय म्हणलासा? नायी म्हटलं एकाचं गाडीतले प्रवासी अपन, जरा नाव माहीत असलेला बरं नाही का. गप्पांच्या नादात मी पण माझा नाव सांगायला इसरलोच की . मी रमाकांत धुरे. फणासबावड्यात धुर्यांचा मोठा वाडा आहे. देवाच्या कृपेने घरची परिस्थिती बेस आहे बघा. बरं तुमचं नाव काय?". "मी सुधाकर पंडित. मुंबईला असतो. माझे वडील गावी होते. ते वारले तिथेच. पण बाहेरची परिस्थिती बरोबर नसल्यामुळे जाता आलं नाही. म्हणून आता जाऊन येतोय". "काय? बापाच्या अंत्यसंस्काराला गेला नाही! देवधर्मावर इस्वास नाही वाट्टं तुमचा!" "नाही मी या गोष्टी मानत नाही." "आसल आसल, प्रत्येकाची मतं वेगळी!
इकडच्या-तिकडच्या बऱ्याच गप्पा आता ते दोघं मारत होते. सुधाकरला वरवर रमाकांतचा राग येत असला तरी कंपनी नाही म्हणून त्याने त्याला चालवून घेतलं. काहीवेळ झाल्यानंतर रमाकांतने सुधाकरला विचारलं," पावनं, वैभववाडीला जाणार ना तुमी? माजं एक काम होतं तुमच्याकडे , हा बॉक्स आहे ना तो माझ्या घरी पोचवायचा आहे." "अहो पण तुम्ही पण वैभववाडीलाच उतरणार ना? घरीच जाणार ना तुम्ही?" "नाही घरी जाता येईल की नाही सांगता येत नाही. तुम्ही तसे भले दिसताय म्हणून म्हटलं तुम्हाला सांगावं. सुधाकर विचार करू लागला, हो म्हणावं तरी पंचाईत नाही म्हणावं तरी पंचाईत. "साहेब हो म्हणून टाका की, इचार कसला करताय. नाही, ह्यात काय हाय, कोणाला द्यायचंय, एवढा अर्जंट हाय काय, हे प्रश्न तुम्हाला पडले असतील त्याची उत्तरं देतो कि मी. हा बॉक्स म्हणजे माझं आणि माझ्या बायकोचं स्वप्न हाय. लग्नाला बरीच वर्ष झाली पण तिला काही देता आलं नाही. म्हणून म्हटलं तिच्यासाठी एखादा दागिना करावा. मग पैसे साठवत गेलो आणि केला दागिना. तुम्हाला वाटेल एवढा किमती दागिना तुमच्याकडे का सुपूर्द करतोय. पण काय आहे, कधी कधी नाईलाज असतोच बघा! शेवटी काय, आपलं इप्सित पूर्ण झाल्याशी मतलब नाही का! माफ करा तुम्हाला थोडा त्रास देतोय तुम्हाला काय ते रिक्षा फेअर वगैरे देतो, पण हा बॉक्स घरी पोचवायचा चालंल का?
सुधाकर अजूनही विचाराधीन होता काय करावं हे त्याला कळत नव्हतं. का माहित नाही पण सुधाकर 'हो ' म्हणून गेला त्याच्या नकळत. हां हे बेस् झाला बघा! माझी बायको लय खुश होईल तुमच्यावर. असं म्हणून रमाकांतने त्याच्याकडे तो बॉक्स दिला . घरचा पत्ता वगैरे सांगितला. बाकी अख्खा प्रवास रमाकांत त्याच्या मुला-बाळांना बद्दल बोलत राहिला होता. आता वैभववाडी स्टेशन येणार होतं. काही पाच-सात मिनिटे उरली होती. तेवढ्यात रमाकांत सुधाकर ला सांगितलं "साहेब मोठ्या कष्टाने हा बॉक्स तुमच्याकडे सुपूर्द केलाय, माझ्या इश्वास तोडू नका बर का! माझ्या घरी व्यवस्थित पोचला पाहिजे एवढं बघा." "हो नक्की तुम्ही काही काळजी करू नका तुमच्या बायको पर्यंत हा दागिना नक्की पोहोचेल." स्मित हास्य करत रमाकांत तिथून निघून गेला. आता वैभववाडी स्टेशन लागत होतं. रमाकांत अचानक कुठे गायब झाला हे सुधाकर ला कळत नव्हतं. पण स्टेशनवर उतरायचं होतं त्यामुळे त्याचा फार शोध सुधाकरने घेतला नाही. ठरल्याप्रमाणे टमटम मध्ये बसून सुधाकर रमाकांतच्या घरी निघाला. वाटेत बरेच विचार त्याच्या डोक्यात येऊन गेले. रमाकांत वैभववाडीला उतरला का नाही, त्याने तो बॉक्स माझ्याकडे का दिला, एवढ अर्जंट काय होतं, विचार करेपर्यंत रमाकांत वाडा आला होता.
तो बॉक्स घेऊन सुधाकर आत मध्ये डोकावला. वाड्यात बरीच गर्दी होती. बायका पुरुष पांढऱ्या कपड्यात उभे होते. कोणाची तरी डावी कार्य चालू होती. तो कोणाला काही विचारणार इतक्यात एका स्त्रीने त्याला हटकलं. आपण कोण असं विचारल्यावर रमाकांत ने पाठवलं असं त्याने सांगितलं. काही न बोलता ती स्त्री त्याला आतमध्ये घेऊन गेली. आतमध्ये आणखी एक स्त्री होती. ती बहुतेक रमाकांतची बायको असावी असा तर्क सुधाकरने लावला. सुधाकरने बोलायला सुरुवात केली.
नमस्कार, मी सुधाकर. मला रमाकांत साहेबांनी पाठवले, त्यांच्या बायकोसाठी खास दागिना घेऊन.
हे ऐकून ती स्त्री रडायला लागली.
अहो काय झालं तुम्हाला रडायला?
"लोक वाईट असतात हे माहिती होतं पण इतके वाईट असतील याची कल्पना नव्हती "ती स्त्री म्हणाली.
"अहो असं का बोलताय तुम्ही"- सुधाकर.
"कारण बाहेरची डावी कार्य चालू आहेत ती रमाकांतचीच आहेत. शहरातून गावी परतत असताना रेल्वे अपघातात रमाकांतचा मृत्यू झाला. आता तेरावा आहे बघा. अजूनही पिंडाला कावळा शिवत नाही. पण बहुतेक आता शिवेल" असं म्हणून त्या स्त्रीने तो बॉक्स सुधाकरकडून घेतला.
ती बाहेर कार्य चालू होती त्या ठिकाणी गेली. तो बॉक्स आणि समोर धरला मनाशी काहीतरी पुटपुटली आणि योगायोग म्हणा किंवा बाकी काही पिंडाला कावळा शिवला. विधी पूर्ण झाले. सुधाकर ह्या सगळ्या गोष्टींमुळे चक्रावून गेला होता. आपल्या बाबतीत काय घडतं हे त्याला कळतच नव्हतं. गाडीत भेटलेला रमाकांत, त्याने दिलेला बॉक्स, त्याच्या घरी त्याची स्वतःचीच चालू असलेली डावी कार्य, या सगळ्या गोष्टींमुळे सुधाकरचं डोकं सुन्न झालं होतं. रमाकांतच्या फोटोला नमस्कार करण्यासाठी सुधाकरला आत नेलं गेलं. सुधाकरने नमस्कार करायला म्हणून फोटोकडे बघितलं तेव्हा त्याला जाणवलं , रमाकांत त्याच्याकडे बघून स्मित हास्य करत होता.
