सौंदर्य बघणाऱ्याच्या नजरेत आहे
सौंदर्य बघणाऱ्याच्या नजरेत आहे
मुंबई-पूना हायवेवरून राघवची कार सुसाट वेगाने धावत होती. आज तो एकदम आनंदी मूड मध्ये होता, तसा तो नेहेमीच आनंदात राहणारा होता. पण हा आय. टी मधला जॉब, कामाचं प्रेशर, टार्गेट यामध्ये तो कधीतरी वैतागून जायचा. पण आज खरंच तो खूप आनंदात होता. बऱ्याच दिवसांनी तो ८ दिवसांची सुट्टी घेऊन घरी पुण्याला चालला होता, आई बऱ्याच दिवसांपासून मागे लागली होती, पण या कामातून काही लवकर वेळ मिळालाच नव्हता, आज फायनली त्याला सुट्टी मिळाली होती आणि तो घरी निघाला होता. त्यात पावसाळी दिवस, नुकताच मोठा पाऊस पडून गेला होता, रिमझिम चालूच होती. हवेत मस्त गारवा पसरला होता, जिकडेतिकडे हिरवीगार झाडे दिसत होती, अधून मधून डोंगरातून पाण्याचे धबधबे दिसत होते. आहा... किती प्रसन्न वाटत आहे, राघव मनात म्हणाला. खुशीत येऊन त्याने एफएम ऑन केले, किशोर कुमारचे गाणे चालू होते, सोने पे सुहागा. आनंदाने त्याने शिळ घातली.
राघव शास्त्री २८ वर्षाचा देखणा, रुबाबदार, सुसंस्कृत तरुण. इंजिनिअर. मूळचा पुण्याचा, सध्या मुंबईत MNC मध्ये ब्रांच मॅनेजर म्हणून कामाला होता. पोस्ट मोठी, साहजिकच कमाचा ताणही मोठा होता. पण या कामाच्या धबडग्यातही त्याने आपले छंद जोपासले होते. त्याला ट्रेकिंग ची खूप आवड होती. कामातून वेळ मिळाला की त्याला निसर्गाच्या सान्निध्यात जायला आवडायचे. निसर्गाचे सौंदर्य पाहून तो भान हरपायचा. नुसता निसर्गच नाही तर त्याला एखाद्या कलाकृती मधील सौंदर्य, संगीतातील सौंदर्य, एखाद्या माणसाचे सौंदर्य ते शरीराचे असो वा मनाचे, एखाद्याच्या विचाराचे सौंदर्य पाहून तो नतमस्तक व्हायचा. त्याला सौंदर्याचे वेड होते म्हणा ना. सौंदर्याचा भोक्ता होता तो.
आवडते गाणे ऐकत अश्या धुंद,प्रसन्न वातावरणात ड्राईव्ह करणे त्याला मनस्वी आवडायचे. मोबाईलच्या बिप ने तो भानावर आला, एका हाताने स्टिअरिंग पकडत,दुसऱ्या हाताने त्याने मोबाईल घेतला, नोटिफिकेशन आले होते, आपली आवडती लेखिका श्वेतल हिने आत्ताच 'तू माझाच ना ' ही कथा सादर केली आहे. क्षणात त्याच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. वा... आजचा दिवसच छान आहे. त्याने आनंदाने परत एकद शीळ वाजवली.
संध्याकाळी राघव घरी पोहोचला. फ्रेश होऊन,आई बाबांशी बोलून तो निवांत आपल्या रूम मधील गॅलरीत इझी चेअर वर बसला. निवांत कॉफी पित त्याने श्र्वेतलची 'तू माझाच ना ' ही कथा वाचायला घेतली. मंत्रमुग्ध होत तो कथा वाचत होता.' काय मुलगी आहे ही यार ' तो स्वतःशीच म्हणाला. इतकं कसं कोणी छान लिहू शकतं? काय लेखन आहे, काय शैली आहे, hats off. भारावल्यागत त्याने ती कथा वाचून संपवली. संमोहित झाल्यासारखा तो बेडवर पडला. खरतर त्याला वाचनाची प्रचंड आवड. लहानपणापासून त्याने अनेक लेखकांनी , अनेक विषयांवरची अगणित पुस्तके वाचली होती. काही त्याला खूप आवडली पण होती, पण...पण या श्वेतल चे लिखाण म्हणजे mind blowing त्याने मनातल्या मनात तिला दाद दिली.
नेहेमीप्रमाणे त्याने वाचलेल्या तिच्या कथेवर प्रतिक्रिया द्यायचे ठरवले. त्याने अतिशय उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली आणि मोबाईल बंद करून तो विचार करू लागला, किती सुंदर लिहिते ही. काही महिन्यांपासून तो तिच्या कथा नियमित वाचत होता. कथांचे विषय, लेखन शैली, अचूक शब्दरचना सारेच अद्भुत होते. जसजसा तो तिच्या कथा वाचत गेला तसतसा तो तिच्या प्रेमातच पडत गेला, या विचारासरशी तो दचकला, नक्की तिच्या की तिच्या लेखनाच्या? त्याला नक्की कळेचना. काही दिवसांपूर्वी कुतूहलापोटी त्याने तिच्याबद्दल काही माहिती गोळा केली होती. ती मुंबईत राहत होती आणि सध्या नोकरी करत होती इतकेच कळू शकले होते. तिच्या प्रोफाईलवर तिचा फोटोही नव्हता त्याऐवजी तिने तिथे एक सुंदर गुलाबाचे फुल ठेवले होते. इतक्या कमी वयात इतके सुंदर लेखन, इतकी समज म्हणजे मानलेच पाहिजे.
तिच्या प्रत्येक कथांतून त्याला सौंदर्याची अनुभूती यायची. इतक्या सुंदर कथा लिहिणारी किती रूपगर्विता असली पाहिजे, तो विचार करू लागला. मनातल्या मनात त्याने तिची एक मूर्ती निर्माण केली. भेटलेच पाहिजे या रूपगर्वितेला एकदा. त्याने क्षणात निर्णय घेतला. पटकन त्याने मोबाईल काढला आणि तिला मेसेज केला. 'मॅडम मी आपल्या लेखनाचा खूप मोठा चाहता आहे. मला एकदा तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे, तुमचा प्रवास जाणून घ्यायची इच्छा आहे. तरी तुम्हाला भेटण्याची एक संधी मला द्यावी ही विनंती आहे. '
उत्तराची तो अधीरतेन वाट बघत होता, पण त्याला काही उत्तर आलेच नाही. तो हिरमुसला. पण त्याने तिच्या कथा वाचणे चालूच ठेवले. तिच्या प्रत्येक कथांवर तो उत्कटतेने त्याचा अभिप्राय द्यायचा, आणि तिला भेटण्याची विनंतीही करायचा. त्यावर तिची छानशी प्रतिक्रिया ही यायची. पण त्याच्या त्या प्रश्नाचे मात्र तिने कधीच उत्तर दिले नाही. पण म्हणतात ना माणसाने मनातून एखादी गोष्ट मागितली की कधीतरी ती मिळतेच, तसेच झाले. नेहेमीप्रमाणे त्याने तिची कथा वाचली, कथेवर अभिप्राय दिला आणि सोबत तिला भेटण्याची विनंती ही केली. दुसऱ्याच क्षणी मोबाईल बीप झाला.आणि चक्क तिने त्याची विनंती मान्य केली होती. त्याला आकाश ठेंगणे वाटू लागले. काय करू नी काय नको असेच झाले. भेटण्याचा दिवस, वेळ नी ठिकाण ठरले. त्याची तारांबळ उडाली. इतके दिवस तो ज्याची वाट पाहात होता तो क्षण आला होता. तो मनातून नर्व्हस झाला. ती रूपगर्विता कशी असेल, आपल्याशी कसे बोलेल, तो गोंधळून गेला.
शेवटी ठरल्या जागी, ठरल्यावेळी तो पोहोचला. तिने सांगितले होते तू मला पाहिले नसलेस तरी मला मी तुला ओळखते. ठरलेल्या जागी पोहोचल्यावर तो उत्सुकतेने इकडे तिकडे पाहत होता. तोच एक हात हलवून त्याला तिच्याकडे बोलावत होता. तो जवळजवळ धावतच तिथे पोहोचला.
मीनल तू..अग तू इथे कशी, पुण्याहून कधी आलीस. मी इथे एका श्वेतल नावाच्या मुलीला भेटायला आलेय, पण ती दिसत नाही कुठे.
अरे थांब थांब किती बोलतोस, मीनल हसून बोलली. तू ज्या श्वेतलला शोधत आहेस ती तुझ्या समोरच आहे.
काय.... राघव जवळपास ओरडलाच. तू...तू श्र्वेतल. अग मग सांगितले का नाहीस इतके दिवस.
घाबरत होते सांगायला. मीनल म्हणाली.
का पण. राघवने अधीरतेने विचारले, मी किती तळमळत होतो तुला भेटायला.
तेच....तुझ्या या तळमळीतून, उत्कटतेतून तुझे प्रेम नकळत व्यक्त होत होते. माझ्या लेखनाच्या प्रेमात असणारा तू नकळत माझ्या प्रेमात पडला होतास. नेहेमी तुझ्या प्रतिक्रिया वाचणारी मी, माझ्या लक्षात या गोष्टी येत होत्या. तुझ्यातला सूक्ष्म बदल या प्रतिक्रियांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहचत होता. घाबरले मी.
आपले कॉलेजचे दिवस आठवले मला.आपल्या ग्रुपमधील, त्या हाय फाय, सुंदर मुली, त्यांचे राहणीमान. त्यांच्या घोळक्यातला तू एक. त्या मुलींचे माझ्या रांगा रुपावरून मला चिडवणे, माझ्या राहणीमानाची केलेली टिंगल मला आठवली. त्यांच्यापुढे मी अतिसामान्य होते. कॉलेजमध्ये तू मला आवडायचास पण कधीच हे सांगायची हिम्मत मात्र झाली नाही. न जाणो तूही कधी त्या मुलींसारखं माझ्या रंगा रूपावरून राहणीमानवरून हिणवलं असतस तर मी सहन करू शकले नसते.
पण आता जेव्हा तुझे प्रेम माझ्या लक्षात आले तेव्हा मी घाबरले. तू माझ्या लिखाणावरून माझ्याबद्दल भलतेच ग्रह करून घेतलेस हे लक्षात आले. तुझ्या येणाऱ्या प्रतिक्रिया वाचता वाचता तु माझ्यात खोलवर गुंतत चालला आहेस हे लक्षात येत होते. तुला थांबवायला हवे होते. म्हणूनच मी आज तुला इथे बोलावले. आणि श्र्वेतल या टोपण नावाने मी लिहीत असल्या कारणाने तुला हे कळण्याचा प्रश्नच नव्हता.
मीनलने एका दमात हे सगळे सांगितले. राघव हे सगळे आश्चर्यचकित होऊन ऐकत होता. झाले तुझे बोलून. आता माझे ऐक, मान्य आहे मला, की तुझे लेखन वाचून तुझ्याबद्दल मी एक पूर्वग्रह केला होता. पण तुला हे कोणी सांगितले की सौंदर्य हे फक्त शरीराचे असते, मनाचे सौंदर्य, विचाराचे सौंदर्य हेही काही असते की नाही. तुझ्या लिखाणाचे सौंदर्य, तुझ्या शब्द रचनेचे सौंदर्य, तुझ्या बुद्धिमत्तेचे सौंदर्य तुझ्या चेहऱ्यावर विलसत आहे. सौंदर्य हे बघणाऱ्याच्या नजरेत असतं, तुझ्यासारखी सौंदर्यवान फक्त तूच आहेस. आणि तुला तर माहीतच आहे की मी सौंदर्याचा किती भोक्ता आहे. मिश्कीलपणे हसून त्याने तिच्याकडे पहिले. मीनलची नजर लाजून खाली झुकली.
क्षणात त्याने विचारले माझे तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. लग्न करशील माझ्याशी. थोडेसे हसून, थोडेसे लाजून मीनलने हळूच त्याला होकार दिला. आणि या सौंदर्यवेड्याला त्याची रूपगर्विता मिळाली होती.

