Ashwini Bachchuwar

Inspirational

3  

Ashwini Bachchuwar

Inspirational

जगण्याची उर्मी

जगण्याची उर्मी

5 mins
358


बापरे..किती मोठा तो प्रवास...आले बाई एकदाची घरी. आपल्या प्रवासी बॅगा घरात घेऊन सोफ्यावर टेकत अनुपमा म्हणाली. पाच मिनिटे शांत बसल्यावर तिने मुलगी - जावयाला लंडनला व्हिडिओ कॉल केला, " पोहोचले ग मी घरी, प्रवास व्यवस्थित झाला, काळजी करू नकोस, उद्या सविस्तर बोलू." इतकेच बोलून त्यांनी व्हिडिओ कॉल बंद केला. तिकडे रात्र होती, पण मुलीने ताकीदच दिली होती, मुंबईत पोहोचलीस की फोन कर, इकडे कितीही का वाजले असेनात. म्हणून अनुपमाने अगोदर तिला कळवले होते.


थोडे फ्रेश झाल्यावर तिने जवळच्या लेले उपहारगृहात स्वतःसाठी पिठलं भाकरी आणि ठेच्याची ऑर्डर दिली. अहाहा...किती महिने झाले अस्सल इंडियन फूड खाऊन. आपल्या चवीचे जेवण ते आपल्या चवीचे जेवण त्याला जगात तोड नाही. तसे लंडनलाही एकदा खाल्ले होते पण चव तिला आवडली नव्हती. एक दोनदा मुलीकडे सुद्धा केले होते पण असे आयते आणि चविष्ट जेवण मिळाल्याचे सुख काही औरच. ती आधिरतेने आपले पार्सल यायची वाट पाहू लागली. ते येईपर्यंत कॉफी पिऊ म्हणून तिने तिच्या आवडीची फिल्टर कॉफी बनवली व बाल्कनीत खुर्चीवर येऊन बसली.


आज एकदम मस्त वाटत होते तिला. आपल्या घरी,आपल्या माणसात, आपल्या देशात परत आल्याचा आनंद काही निराळाच. हा आनंद तर होताच, पण इतक्या लांब एकटीने जाऊन परत येणे हेही खूप सुखावणारे होते. तिचा आत्मविश्वास वाढला होता.


एकेकाळी मुंबई ते पुणे हा दोन- तीन तासांचा प्रवासही तिने कधी एकटीने केला नव्हता. आणि आज चक्क.....तिच्या चेहेऱ्यावर हसू उमटले. जे करायचे राहून गेले होते, जगायचे राहून गेले होते तेच तर आता करायचे होते. तिने ठरवलेच होते तसे.


वयाच्या एकविसाव्या वर्षी अनुपमा प्रकाशरावांसोबत लग्न होऊन या घरात आली. ग्रॅज्युएशन झाले होते, पोस्ट ग्रॅज्युएशनचेही एक वर्ष झाले होते. पण लग्न झाले नी सगळ्या आवडी निवडीच बदलल्या गेल्या. प्रकाशरावांचा स्वभाव तापट आणि हेकेखोर. अनुपमावर प्रेम होते पण स्वभावात पुरुषी अहंकार ठासून भरलेला. अनुपमाने कुठे जायचे, काय करायचे काय करायचे नाही याचा निर्णय तेच घेत. तिचे शिक्षणही अर्धवट राहिले, कारण काय तर संसार करताना तुझ्या शिक्षणाचा काय उपयोग असे म्हणाले होते. खरतर तिला वाचनाची आवड, फिरण्याची आवड, विविध कलांची आवड. जीवन भरभरून जगणे आवडायचे तिला, पण या संसाराच्या रहाटगाड्यात हे सगळे मागेच पडले.


त्यात प्रकाशरावांनीही तिचा बाहेरच्या जगाशी जास्त संपर्क येणार नाही हेच पाहिले. त्यांच्या मते बायकांनी घर सांभाळावे बाकी बाहेरचे बघायला पुरुष समर्थ असतात. बायकांनी त्यात लक्षच घालू नये. तिला माहेरीही ते एकटे जाऊ देत नसत, तुला एकटीला प्रवास झेपणार आहे का म्हणत तेच तिला सोडवायला येत आणि भाऊ परत आणून सोडायला येत. एकूणच पंख कापलेल्या पक्षाची अवस्था झाली होती तिची. तेच तेच अंगवळणी पडून तिला देखील दुसऱ्यावर अवलंबून रहायचीच सवय झाली होती. प्रकाशरावांच्या या हेकेखोर स्वभावाला कंटाळून मुलगाही शिक्षण झाल्यावर परदेशी स्थायिक झाला होता आणि मुलगीही लग्न झाल्यावर नवऱ्यासोबत लंडनला गेली होती.


तीन वर्षांपूर्वी प्रकाशरावांचे निधन होऊन अनुपमा एकटी पडली होती. पैशाची काही ददात नव्हती पण इतक्या वर्षात बाहेरच्या जगाशी काही संबंधच नव्हता, बाहेरचे व्यवहार येत नव्हते, माणसांची जास्त पारख नव्हती. मुलांनी म्हंटले होते आमच्यासोबत चल म्हणून, पण हा पर्याय तिने नाकारला होता. शेवटी इथे तिचे घर होते, इतकी वर्ष तिला इथे राहण्याची सवय होती. इथली माणसं तिच्या परिचयाची होती. तिथे जाऊन तिला करमले नसते. मुलांनी खूप समजावले पण ती ठाम राहिली होती. चार सहा महिने जाणे वेगळे पण कायमचे....तिला पटेना.


मुलं इथे होती तोवर तिने त्यांच्याकडून बँकेचे व्यवहार शिकून घेतले होते पण ते गेल्यावर मात्र त्यांच्याशी संपर्क करणे तिला अवघड वाटू लागले. तसे फोनवर बोलता यायचे पण कधी त्यांना बघायची इच्छा झाली तर मुलांचे व्हिडिओ कॉल येईपर्यंत वाट पाहावी लागायची. ऑनलाइन पैशांचे व्यवहार करता येत नसत. तिला स्वतःला काही ऑपरेट करता यायचे नाही. तिने मनाशी निर्णय घेतला आणि वयाच्या ६५ व्या वर्षी तिने कंप्यूटर शिकण्याचा निर्णय घेतला आणि शिकली सुद्धा. आता लीलया ती कम्प्युटर ऑपरेट करू लागली. ऑनलाइन पैशांचे व्यवहार, मुलांना व्हिडिओ कॉल, फेसबूक, व्हॉट्सऍप सगळे सगळे ती वापरू लागली. यातून तिचा वेळही जायचा नी जगात कुठे काय चालू आहे हेही कळायचे. याचबरोबर या ना त्या माध्यमाने ती लोकांशी कनेक्ट होती. नंतर ती स्कुटी सुद्धा शिकली. लोकांनी तर वेड्यातच काढले आत्ता या वयात, नवरा गेल्यावर या बाईला काय काय सुचत आहे. पण अनुपमा खंबीर राहिली तिने दुर्लक्षच केले लोकांच्या बोलण्याकडे. तिच्यात जिजीविषा होती, जगण्याची उर्मी होती. इतकी वर्ष जे करायला मिळाले नाही, मनासारखे जगायला मिळाले नाही ते तिला करायचे होते. भरभरून जगायचे होते. प्रकाशरावांच्या जाण्याचे दुःख होतेच, त्यांची तिला आठवणही यायची. शेवटी कसेही असले तरी त्यांचे तिच्यावर प्रेम होतेच. आणि बेचाळीस वर्षांचा संसार होता. पण म्हणून ती रडतखडत, दुःखात राहणार नव्हती.


पण या राहिलेल्या इच्छा तिला स्वस्थ बसू देत नव्हत्या. अगोदर गरज म्हणून ती शिकली पण नंतर मात्र तिला हे आवडू लागले होते. हेच तर पाहिजे होते मला तिला अनेकदा वाटायचे. तिने काही नवीन करायचे म्हंटले की किंवा शिकायचे म्हंटले की लोकांच्या भुवया वर जायच्या आणि या वयात कशाला हवीत नको ती थेरं म्हणूनही हिणवले जायचे. पण आता या गोष्टींकडे लक्ष द्यायचेच नाही तिने ठरवले होते. तिचे आता काही करायचे बाकी नव्हते. संसार झाला होता, मुलांचे करियर, लग्न पार पडले होते. सगळे आपापल्या जीवनात व्यस्त होते. अनुपमानेही स्वतःसाठी जगायचे ठरवले होते. शेवटी आनंदी राहायचं हक्क सगळ्यांनाच असतो. इतक्या वर्षात जे करायचे राहून गेले होते ते करायचे होते आणि हे करत असताना लोकांच्या बोलण्याने ती बधणार नव्हती. ती खंबीरपणे आपली वाट चालणार होती.


आत्ता वर्षापूर्वी मुलीने सांगितले होते, ती परत आजी होणार होती. तिला लंडनला जावे लागणार होते लेकीच्या बाळंतपणाला. लेकीचे बाळंतपण म्हणजे आईच्या जिव्हाळ्याचा विषय. आपला सगळा अनुभव, आपली माया या सगळ्यांचा कस लावून आजी तयार असते बाळाच्या स्वागताला. तीही उत्सुक होतीच. "पण आई एकटी कशी येशील?" लेकीने धास्तावलेल्या आवाजात विचारले होते. "येईन ग मी, तू काळजी करू नकोस" असे म्हणून अनुपमाने तिला विश्वस्त केले खरे पण तीही काळजीत होती. साधा मुंबई- पुणे प्रवास एकटीने कधी केला नव्हता. आता थेट मुंबई ते लंडन प्रवास. तिची छातीच दडपल्या गेली. पण ठरवले...जायचेच.


शेवटी लोकांना विचारून, माहिती काढत, मदत घेत ती लंडनला पोहोचली होती. एअरपोर्टवर घ्यायला आलेल्या मुलीच्या डोळ्यातील कौतुक मिश्रीत आनंदाचे भाव पाहून तिला जग जिंकल्याचा आनंद झाला. तिला ट्राऊझर आणि शर्टवर पाहून तिची मोठी आठ वर्षाची नात म्हणाली 'Grandma you look gorgeous'. जसा देश तसा वेष तिने डोळे मिचकावत म्हंटले होते. नेहेमी आईला साडीत बघितलेल्या मुलीच्या चेहेऱ्यावरही आनंद होता.


पुढे सहा महिने लंडनला मजा आली. लेकीचे बाळंतपण केलेच पण लंडनही फिरून झाले..एकटीने. भिती वाटली पहिल्यांदा पण मग नंतर जावयाने शिकवले आणि मग लोकांशी बोलून विचारून जमून गेले. नातीला शाळेत घेऊन जाणे, इंडियन ग्रोसरी स्टोअर मधून सामान आणणे, लायब्ररीत जाणे सहज जमत गेले. छानच वाटले.


निघताना मुलगी म्हणाली, " आई तू खंबीर होतीस म्हणून सगळे निभावले बघ " तिचे बोलणे ऐकून भरून पावली होती अनुपमा.


आज ती स्वतंत्र होती, समाधानी होती, आनंदात होती. हे सगळे तिने नेटाने निभावले म्हणून. प्रकाशरावांच्या जाण्याने ती खचून गेली असती तर हे जमलेच नसते. तिला जगायचे होते स्वतः साठी, स्वतच्या आनंदासाठी. तिच्या जगण्याच्या उर्मीने हे घडवून आणले होते. शेवटी तिच्या खंबीर राहण्याने तिच्या जगण्याचा आनंद परत मिळाला होता हे नक्की.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational