Ashwini Bachchuwar

Others

4.1  

Ashwini Bachchuwar

Others

जावे त्याच्या वंशा

जावे त्याच्या वंशा

4 mins
474


आठ दिवस झाले होते अवंतिकाच्या सासूबाई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत्या. रूमच्या बाहेर खुर्चीवर बसलेली अवंतिका तिच्या डॉक्टर लेकीची वाट पाहत होती. तिची मुलगी डॉक्टर अन्वी याच हॉस्पिटलमध्ये गायनाकॉलॉजिस्ट होती. आजीला तपासून अन्वी रुमच्या बाहेर आली, आईला बाहेर बसलेले बघताच ती म्हणाली," मॉम तू गेली नाहीस घरी, तुला म्हंटले होते जा म्हणून." तिच्या त्या रुक्ष आवाजाने गडबडलेली अवंतिका म्हणाली, " अग ते आजी ऍडमिट....."


"ओ कम ऑन मॉम, आता असे म्हणू नकोस की तुला आजीची खूप काळजी वाटत आहे म्हणून तू थांबली आहेस. अँड फॉर युवर काइंड इन्फॉर्मेशन इकडे तिची काळजी घ्यायला खूप लोकं आहेत. सो, तू गेलीस तरी चालेल." इतके बोलून अन्वी तेथून निघाली.


वेगाने तिकडून निघालेल्या अन्वीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत अवंतिकाने आपली पर्स उचलली एकवार रूमचे दार उघडून सलाईन लावलेल्या आपल्या सासूबाईंकडे पाहिले आणि ती घरी निघाली. अन्वीचे शब्द तिच्या मनातून जात नव्हते.


घरी आल्यावर कसेबसे दोन घास तिने पोटात ढकलले. आजकाल हा घरातील एकटेपणा तिच्या अंगावर येई. शैलेश तिचा नवरा आणि अन्वी हॉस्पिटलमध्ये, अभय तिचा मुलगा ऑफिसला गेलेला. घरी नेहेमी असलेल्या सासूबाई घरी नाहीत. ती बैचेन झाली. या घराला अन् तिला सासूबाईंची किती सवय झाली आहे हे तिला नव्यानेच कळत होते. खूप गृहीत धरलं आपण आईंना. मनातून ती हळहळली. परत एकदा अन्वीचे बोलणे तिला आठवले," मॉम आजीची किती काळजी आहे हे दाखवू नकोस"


बरोबरच बोलली अन्वी तिने कधी मला आईंची काळजी घेतांना बघितलेच नाही, त्यामुळे आत्ता मला खरंच वाटणारी काळजीही तिला खोटीच वाटत आहे. याला जबाबदार आपणच आहोत. अवांतिकला वाटले.


लहानपणापासून मुलांना आजीनेच सांभाळले आणि आपण.. आपण मात्र ऑफिस, काम या सबबीवर मजाच करत राहिलो. मुलांना खुशाल आईवर सोपवून आपण मस्त शॉपिंग, पार्ट्या, गेट टुगेदर, पिकनिक यामध्येच दंग राहिलो. अवंतिकाला वाईट वाटले. मुलांना केवळ जन्म दिला म्हणून त्यांची बायोलॉजिकल आई मी. पण आईची सगळी कर्तव्ये तर आजीनेच पार पाडली. अन्वी आणि अभयच्या जन्मानंतर कसेबसे सहा महिने घरात काढले. आपण नंतर मात्र कामाचा बहाणा करून जास्तीत जास्त घराबाहेर राहू लागलो. मैत्रीणींसोबत पिक्चरला जाणे, हॉटेलिंग, किटी पार्टी यातच आपला वेळ जाऊ लागला. पहिले पहिले शैलेश आणि आई दोघेही म्हणाले मुलांसाठी वेळ काढ, त्यांना तुझा लळा लागणार नाही, तुझी ओढ वाटणार नाही, पण आपण ऐकलेच नाही. शेवटी आपण ऐकतच नाही म्हंटल्यावर दोघांनीही आपल्याला सांगणे सोडले.


मुलांना भरवणे, त्यांची आजारपणे काढणे, त्यांचा जमेल तसा अभ्यास घेणे, त्यांना वेळेत शाळेत पाठवणे, त्यांच्यावर चांगले संस्कार करणे हे सगळे आईंनीच केले. इतकेच काय मुलांच्या शाळेत पेरेंट्स मीटिंगला सुद्धा बऱ्याचदा आईच जात. यात आपण कुठेच नव्हतो. अवंतिकाला लाज वाटली.


मुलांनाही आपल्यापेक्षा आजीचाच लळा जास्त. आपल्यापेक्षा जास्त ते मनमोकळेपणाने आजीजवळ बोलतात. आपण दुरावलोच. अन्वी डॉक्टर झाल्यावर तिच्या पहिल्या पगारातून तिने आपल्यासाठी काही न आणता आईंसाठी साडी आणली होती. किती चिडलो होतो आपण. खरंतर, आपण कधीच आईंविषयी कृतज्ञता दाखवली नाही, त्या आपल्या मुलांना सांभाळत आहेत म्हणून आपण नोकरी करू शकत आहोत हे देखील कधी वाटले नाही. साधी साडी कधी घेतली नाही की प्रेमाचे दोन शब्द कधी बोललो नाही. पण नातवंडांकडून मात्र प्रेमाची पोचपावती त्यांना नेहेमीच मिळाली. अन्वी आणि अभय आजीवर अगदी भरभरून प्रेम करतात, तिची काळजी घेतात.


आत्ता महिन्यापूर्वी अभय पूर्वाला घेऊन घरी आला होता. त्यांचे म्हणे प्रेम होते एकमेकांवर. लग्न करायचे होते त्यांना. पण पूर्वा स्पष्टपणे म्हणाली," खरतर मला आत्ताच लग्न करायचे नाही, अगोदर करिअर करायचे आहे मला, एकदा लग्न झाले की मुलं मग त्यांना वाढवणे, त्यांची आजारपणं काढणे यातच वेळ जातो नी करियर राहतं मग" त्यावर हसून अभय म्हणाला अग मुलांची चिंता सोड तू माझी मॉम आहे की, आम्हाला जसं आमच्या आजीने लहानाचे मोठे केले. तसेच आपल्या मुलांना माझी मॉम बघेन. कित्ती मोठ्याने दचकलो होतो आपण हे ऐकून. मी सांभाळणार? अवंतिकाच्या पोटात गोळा आला. क्षणात तिच्यासमोर सासूबाईंनी मुलांसाठी किती नी काय काय केले ते आले. मला अनुभव नाही काहीच. माझीच मुलं सासूबाईंनी सांभाळली मी काय यांची मुलं सांभाळणार? पहिल्यांदाच सासूबाईंसमोर तिला फार खुजे असल्यासारखे वाटले.


रात्री रूममध्ये आल्यावर पुस्तक वाचत असलेल्या शैलेशला ती म्हणाली," ती पूर्वा फारच स्ट्रेट फॉरवर्ड वाटली मला, तुला कशी वाटली?"


" तीस वर्षांपूर्वीची अवंतिका"


पुस्तकातून जराही डोके वर न काढता शैलेश म्हणाला. सणसणीत चपराक बसल्यासारखे वाटले तिला.


सगळे आठवून अवंतिकाला डोके जड पडल्यासारखे वाटले. उद्या कदाचित सासूबाईंना डिस्चार्ज मिळणार आहे. सकाळी लवकर जायचे होते. तिथे तिची गरज कोणाला नसली तरी तिला जायचेच होते.


सकाळी घाईनेच ती हॉस्पिटलला पोहोचली. रूममध्ये सगळेच होते. शैलेश सुद्धा दिसत होता, यानेही सकाळी जाताना मला सांगितले नाही. अवंतिकाला याचे वैषम्य वाटले. अन्वी, अभय, हॉस्पिटलचा इतर स्टाफ होता आणि पूर्वा सुद्धा आलेली होती. पूर्वा सासूबाईंचा हात हातात घेऊन बोलत होती," आजी अभयने खूप सांगितले तुमच्याबद्दल, तुम्ही किती केलं आहे त्यांच्यासाठी, त्याचा खूप जीव आहे हो तुमच्यात". अवंतिकाला पूर्वा स्ट्रेट फॉरवर्ड वाटली होती. पण पूर्वाला असे हळवे बोलताना बघून तिला आश्चर्य वाटले. रुमच्या दाराशी उभ्या असलेल्या अवंतिकाला तिनेच बऱ्याच वर्षांपूर्वी बोललेले वाक्य आठवले, ती सासूबाईंना म्हणाली होती,' बाहेर जाऊन मी पैसे कमावते, तुम्ही काय कमावता?" याचे उत्तर तिला आज कोणीही न देता समजले होते.


Rate this content
Log in