दैव देते आणि कर्म नेते
दैव देते आणि कर्म नेते
संध्याकाळची वेळ होती न्यूयॉर्क सिटी मधल्या २२व्या मजल्यावरच्या आपल्या अलिशान फ्लॅट मधील बाल्कनीत रॉकिंग चेअर वर कॉफी चा मग हातात घेऊन निहारिका कितीतरी वेळ झाला बसली होती.आज ती अतिशय अस्वस्थ झाली होती, आजही स्लीपिंग पिल्स घ्यावी लागणार होती,त्याशिवाय झोपच येणार नव्हती. हल्ली तिचे स्लीपिंग पिल्स घेण्याचे प्रमाण वाढले होते, आणि आज तर त्याची गरजच होती. हतबल होऊन ती उठली,घाईत रॅक मधून हातात येतील तितक्या गोळ्या काढून पाण्याच्या घोटासह तिने त्या गिळल्या आणि आपल्या भल्या मोठ्या, गुबगुबीत बेड वर येऊन झोपली. झोपेचा तर पत्ताच नव्हता. शेवटी तिने मंद आवाजात तिचा आवडता गायक राहत फतेह अली खान यांची गाणी लावली व उशाला टेकून बसली आणि बघता बघता तिचे डोळे झरायला लागले. कारणही तसेच होते....
आज शॉपिंग मॉल मध्ये तिला वैभव दिसला होता... तब्बल १० वर्षांनी. इकडे फिरायला आलेले वाटत होते. सोबत आई, बाबा त्याची बायको आणि पाच वर्षाची गोड मुलगी होती. इतक्या वर्षांनी त्याला बघून ती आश्चर्यचकित झाली आणि सोबत तिला खूप जास्त आनंदही झाला होता. धावतच ती त्याच्यकडे गेली. वैभव....तिने हाक मारताच त्याने मागे पाहिले.
"निहारिका..तू?" त्याच्या तोंडून हलकेच बाहेर पडले. त्याच्याही चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते आणि सोबतच डोळ्यात हलकी वेदनाही तिला दिसली. खरंच वेदना होती की आपल्यालाच भास झाला,तिलाही कळेना.
"वैभव कसा आहेस तू, अरे किती वर्षांनी भेटतो आहेस? आई बाबा कसे आहेत? सांग ना." उत्साहात ती त्याला प्रश्नावर प्रश्न विचारत होती.
"अगदी मजेत आहोत आम्ही." जवळूनच आलेल्या एका तीक्ष्ण आवाजाने तिने त्या दिशेला पाहिले.
"आई तुम्ही..." ती आनंदाने बोलली.
"खबरदार हं मला आई म्हणालीस तर, जेंव्हा तू आमच्या आयुष्यातून कायमची निघून गेलीस ना,तेंव्हाच आपले नाते संपले आणि आता नसलेले नाते जोडायला जाऊ नकोस."
त्यांचे बोलणे ऐकून निहारिका चा चेहरा खाडकन उतरला. खाली मान घालून ती उभी होती.
"वैभव चल इथून, या बाईशी बोलायची काहीही गरज नाही."वैभव चा हात धरून त्या तिथून निघाल्या.
त्यांचे बोलणे ऐकून जवळच शॉपिंग करत असलेली वैभव ची बायको स्नेहा तेथे आली होती. दूर जात असलेल्या वैभवला न्याहळणाऱ्या निहारीकाला बघत ती म्हणाली, " खूप दूर गेला ग तो तुझ्यापासून,आता परत कधीच येणार नाही परतून. तुझ्याबद्दल मला सगळंच माहीत आहे आणि खरंच मला आत्ता या क्षणी तुझी खूप दया येत आहे. खूप मोठी चूक केलीस तू. इतका सोन्यासारखा नवरा आणि माणसे दूर केलीस, तू लाथाडलेलं दान माझ्या पदरात पडले आणि माझं नशीब उजळल बघ. वैभव सारखं नवरा मिळायला भाग्य असावे लागते. खरंच दैव देतं आणि कर्म नेतं यालाच म्हणत असावेत. इतके बोलून स्नेहाही निघून गेली होती.
घरी परतल्यावर निहारिका चे चित्त थाऱ्यावर नव्हते. राहून राहून तिच्या डोळ्यासमोर वैभव चा चेहरा येत होता. शांत, प्रसन्न, देखण्या वैभव ची तिला खूप आठवण येत होती.
मनाच्या या अवस्थेबद्दल ती कोणाशी बोलूही शकत नव्हती. इथे होतेच कोण तिचे ऐकून घेणारे. इतक्या मोठ्या अलिशान फ्लॅट मध्ये ती एकटीच होती. क्षणभर तिने फ्लॅटवर नजर टाकली. समृद्धी च्या खुणा जागोजागी होत्या. करोडोंचा फ्लॅट, उच्च अभिरुची दर्शविणाऱ्या महागड्या वस्तू, गाड्यांचा ताफा, ब्रँडेड कपडे, ज्वेलरी सगळे काही होते तिच्याकडे नव्हता फक्त तिच्यावर प्रेम करणारा,तिला जमजून घेणारा वैभव.
एकेकाळी तो तिचा नवरा होता, तिच्यावर खूप प्रेम करणारा समजूतदार शांत स्वभावाचा वैभव. मध्यमवर्गीय कुटुंबातला वैभव तिला बघताक्षणी भावला होता. दोघेही एकाच कंपनीत काम करायचे. खरंतर निहारिका ला काम करण्याची काहीच गरज नव्हती. आई वडील दोघेही डॉक्टर. अगदी गर्भश्रीमंत कुटुंब. निहारिका ने डॉक्टर न होता एमबीए करणे पसंद केले. आणि स्वतः च्या हुशारीने तिने नोकरीही मिळवली होती. त्याच कंपनीत तिला वैभव भेटला होता. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला वैभव तिला बघताक्षणी आवडला होता आणि त्यालाही निहारिका आवडली होती. पण निहारिका च्या आईला हा मध्यमवर्गीय जावई पसंद नव्हता. तिला त्यांच्यासारखाच श्रीमंत जावई हवा होता. तिने हरप्रकारे निहारीकला समजावले होते पण निहारिका ने आईचे न ऐकता वैभव शी लग्न केले होते. पण नव्याचे नऊ दिवस होताच तिच्या डोळ्यावरची प्रेमाची धुंदी ओसरायला सुरुवात झाली. अगदी श्रीमंतीत आणि स्वातंत्र्यात वाढलेल्या निहारिका ला वैभवचे घर त्याची माणसे सलायला लागली होती.आत्तापर्यंत कुठल्याही प्रश्नांची उत्तरे न दिलेल्या तिला वैभव च्या आईचे कुठे चाललीस, कधी येणार आहेस या काळजीपोटी विचारलेल्या प्रश्नांचाही राग येत होता. कधी घरकामाचा अनुभव नसल्याने साधे सोपे काम करायलाही तिला अवघड वाटू लागले. नेहेमी फॉरेन टूर्स करणाऱ्या तिला इथेच कुठेतरी फिरणे लो स्टॅंडर्ड चे वाटत होते. जागोजागी हिशोब करणाऱ्या वृत्तीचा तिला राग येऊ लागला. तिच्या आईचे म्हणणे तिला पटू लागले होते. वैभवशी तिच्या कुरबुरी वाढू लागल्या होत्या. वैभवने तिच्याकडे काही वर्ष मागितली होती, सगळे तुझ्या मनासारखे होईल असेही सांगितले होते. पण आपल्याच धुंदीत असलेल्या निहारिकाच्या हृदयापर्यंत त्याची साद पोहचतच नव्हती. शेवटी एका क्षणी तिने वैभवला सोडून जाण्याचा निर्णय घेतला. आणि ती गेली सुद्धा. वैभव कोलमडून गेला होता पण निहारिका ला त्याचे काहीच देणे घेणे नव्हते.
पुढे तिला अभिनव भेटला. तिच्याच सारखा गर्भश्रीमंत. अमेरिकेत सेटल असलेला. त्याच्याशी लग्न करून तीही अमेरिकेत स्थायिक झाली. सुरुवातीचे दिवस खूप मजेत गेले पण नंतर तिला समजले अभिनव खूप संशयी आहे. त्याला तिच्या भावनांशी, प्रेमाशी काहीच संबंध नव्हता. प्रसंगी तिच्यावर हात उगारायला ही तो कमी करत नसे. स्वतः इतका श्रीमंत असूनही त्याला तिच्या पैशात जास्त रस होता. ती एकटी पडत चालली होती. अनेकदा तिला प्रश्न पडे कश्यासाठी मी असे वागले. पैशासाठी, सुखवस्तू जीवन जगण्यासाठी, स्वातंत्र्यासाठी. या सगळ्या गोष्टी कदाचित तेंव्हा कमी असतील वैभवकडे पण या सगळ्यांपेक्षा जास्त त्याच्याकडे होते ते तिच्या प्रती असलेले प्रेम, आदर, समजून घेण्याची वृत्ती.
काही वर्षच त्याने मागितली होती आपल्याकडे तीही आपण त्याला दिली नाहीत. आज या क्षणी त्याच्याकडे आपल्याला हवे ते सगळेच दिसत आहे आणि त्याचसोबत त्याच्याकडे आहेत त्याच्यावर प्रेम करणारी त्याची माणसं.
आपण.....आपली ओंजळ मात्र रिकामी झाली .
रडून रडून रित्या झालेल्या डोळ्यावर आता ग्लानी यायला सुरुवात झाली होती. झोपेच्या गोळ्यांनी त्यांचे काम करायला सुरुवात केली होती. समोरचे सगळे धूसर होत होते. फक्त कानावर तिने लावलेल्या राहत फतेह अली खान यांच्या गाण्याचे मंद बोल पडत होते
मोहब्बत मे दगा की थी, सो काफिर थे सो काफिर है,
मिली हे मंजिले फिर भी, मुसाफिर थे मुसाफिर है,
तेरे दिल के निकाले हम कहॉऺं भटके कहॉ॑ पोहोचे...........
तेरी आखोंके दरिया का उतरना भी जरुरी था.
निहारिका चे डोळे बंद झाले होते.....कदाचित कायमचे.
