Ashwini Bachchuwar

Others

3.3  

Ashwini Bachchuwar

Others

पाठीराखा

पाठीराखा

4 mins
497


शलाका न्यूयॉर्क एअरपोर्टवर आपल्या विमानाची वाट बघत थांबली होती. पण दरवेळेस जशी भारतात जातांना ती खूप आनंदी असे तशी आनंदी ती आत्ता नव्हती. या वेळेस जायचे कारण अतिशय दुःखद होते,तिच्या वडिलांचं जयंत रावांच हार्ट अटॅक ने निधन झालं होतं. आत्ता ४ दिवसांपूर्वीच त्यांच्याशी तिचं बोलणं झालं होतं. नेहमीसारखे अगदी उत्साहात ते तिच्याशी बोलले होते. त्यांच्या आवाजानेच कोणामध्येही उत्साह संचारावा. वयाच्या ७० व्या वर्षीही ते अतिशय ॲक्टिव आणि हसतमुख होते. शलाकासाठी तर ते तिचे प्रेरणास्थान होते, आदर्श होते, ताकद होते. बाबांच्या जाण्याने ती सैरभैर झाली होती. तशीही लहानपणापासून ती आईपेक्षाही तिच्या बाबांशी जास्त अटॅच्ड होती. बाबा तिला जास्त समजून घ्यायचे. ती बाबांची लाडकी आणि अमर आईचा. अमर तिचा लहान भाऊ. दोनच वर्षांचा फरक होता त्यांच्यात. किती भांडायचो आपण लहानपणी, मारमारीही करायचो. तिच्या चेहेऱ्यावर किंचित हसू उमटले.


विमानाची अनाउन्समेंट झाल्याने ती तिकडे निघाली. सोबत तिचा ११ वर्षाचा मुलगा अथर्व होता. तिच्या नवऱ्याला आत्ता लगेच सुट्टी मिळाली नव्हती म्हणून मग ती अथर्वला घेऊन निघाली होती. विमान टेक ऑफ झाल्यावर ती पुन्हा आठवणीत रमली.


मागच्या वेळेस भारतात तीन वर्षांपूर्वी गेलो होतो. अमरच्या लग्नानिमित्ताने. विदुला, अमरची बायको. तिला लग्नात पाहिली होती. त्याच्या लग्नानंतर आठच दिवसात ती परत अमेरिकेत परतली होती. नंतर फक्त फोनवर बोलणे व्हायचे. बरी होती स्वभावाला. आईसोबत तिच्या थोड्या कुरबुरी व्हायच्या, पण बाबांचे आणि विदुलाचे मात्र छान पटायचे. आई अधुन मधून तक्रारीचे पाढे वाचायची पण बाबा मात्र कौतुक करून थकत नसत.


चालायचेच, सासू सुनेचे आंबट गोड नाते. पण शलाका ने आईचे बोलणे कधी मनावर घेतले नव्हते. पण का कोण जाणे आता घरी जाताना तिला दडपण आले होते. बाबा होते तेंव्हा ते घर तिला आपलेच वाटायचे पण आता बाबा नसताना.....विचारांनी तिला कसेसेच झाले. ज्या घरात आपण लहानाचे मोठे झालो, खेळलो, बागडलो ते घर अचानक तिला परके वाटायला लागले होते.


विदुला, तिची नी माझी तशी फारशी ओळख नाही. नणंद भावजय असलो तरी आमची एकमेकांसोबत जास्त अटॅचमेंट नाही कारण कधी एकत्र राहायचा योग आलाच नाही, लग्नानंतर भाऊ बदलतात म्हणे खरे असेल का हे? अमर पण बदलला असेल का? विचार करून ती शिणून गेली. नसेल कदाचित, आपला किती लाडका धाकटा भाऊ आहे. पण आता बाबा नाहीत तर कदाचित......काय माहीत.


उलट सुलट विचारात ती भारतात पोहोचली. कॅब करून माहेरी आली. बाबा जाऊन दोन दिवस झाले होते. आईच्या गळ्यात पडून ती रडरड रडली होती. बाबांचे नसणे तिला सहनच होत नव्हते. आईची हालत खूपच खराब होती. चाळीस वर्षांचा संसार होता. आई बाबांचे नाते अतिशय छान होते. दोघांनी एकमेकांना उत्तम साथ दिली होती. शलाका आणि अमर वर चांगले संस्कार केले होते, त्यांना उच्च शिक्षण दिलं होतं. एकमेकांशिवाय त्यांचे पानही हालत नसे. बाबांच्या अश्या जाण्याने ती कोलमडून पडली होती.


शलाकाला आपले माहेर आता संपले असेच वाटायला लागले होते. घरात असल्यापासून तिला बाबांच्या आठवणीने बेजार केले होते. प्रत्येक वेळी बाबा तिच्या पाठीशी उभे राहिले होते, तो शिक्षणा बाबतचा निर्णय असो वा लग्नासारखा मोठा निर्णय घेणे असो. तिच्यावर त्यांनी नेहेमीच विश्वास दाखवला होता. जिग्नेशशी लग्न करण्याचा निर्णय जेंव्हा तिने घरी सांगितला तेंव्हा आई आणि अमर दोघांनीही त्याचा तीव्र विरोध केला होता, फक्त बाबाच तिच्या पाठीशी ठाम उभे राहिले होते. आठवण येताच ती परत दुःखी झाली.


महिना झाला होता.शलाकाचे अमेरिकेत जायचे दिवस जवळ आले होते. परत कधी येणे होणार काय माहीत, आणि कोण आपली इतक्या आतुरतेने वाट बघणार, तिला राहून राहून वाटत होते. आई आहेच. पण आपण येणार म्हणून बाबाही किती खूष असायचे. माझ्या आवडीचे पदार्थ आणून ठेवणे, स्वतः माझ्या आवडीचे बनवून खाऊ घालणे. किती आणि काय काय. जातानाही दोघेजण आई बाबा घराच्या बाल्कनीत मी नजरेआड होईपर्यंत उभे राहायचे.


आता...?


तशी विदुला छान वाटली पण काय माहिती? आपला सगळा वेळ आई सोबतच गेला. तिला सांभाळण्यात, समजावण्यात आपले विदुलाशी फारसे बोलणेच झाले नाही त्यामुळे तिच्या स्वभावाचा फारसा आंदाज आला नाही. पण आई आता बऱ्यापैकी सावरली आहे, ते एक समाधान. नाहीतर तो एक घोर लागला असता.अमरही फारसा बोलला नाही यावेळेस. तोही बदलला की काय लग्नानंतर का तोही दु:खातच आहे म्हणून.


असो...


तिने घराकडे मनभरून पाहिले जणू परत तिला इकडे कोणी बोलवेल न बोलवेल. तसही कोणाला काय फरक पडणार होता ती आली काय न न आली काय.


जायचा दिवस उजाडला. शलाका ताई परत लवकर या. विदुला प्रेमाने म्हणाली. पण शलाकाला तिचे बोलणे कोरडे वाटले.


ताई लवकर ये ग, तुझ्याशिवाय आणि आई शिवाय आता आहेच कोण मला? गहिवरून अमर म्हणाला. शलाका ने मान डोलावली. आईच्या परत एकदा गळ्यात पडली, खाली वाकून आईचा आशीर्वाद घेऊन मन घट्ट करून ती निघाली. सोसायटीच्या खाली येताच वर बघण्याची हिम्मत तिला होईना. दर वेळेस आई बाबा तिथे उभे असायचे. तिथे उभे राहून ती जाई पर्यंत तिला बघत राहायचे. त्यांच्या डोळ्यात तिला तिच्याबद्दल च्या किती भावना दिसायच्या प्रेम, माया,काळजी सोबतच लवकर परत ये असाही भाव दिसायचा.


आता..


तिने जरा हिम्मत करून वर पाहिले, कोणीच नसणार. तिला वाटले.


पण...पण आई बाबांच्या ऐवजी तिथे तिला आज अमर आणि विदुला दिसले. त्यांच्याही डोळ्यात तिला प्रेम, माया, काळजी दिसली त्यासोबतच परत लवकर ये असेही भाव दिसले. इतका वेळ थांबवलेले अश्रू शेवटी ओघळले. आता पाठीशी बाबा नव्हते पण पाठीराखण करणारा भाऊ होताच. तिने निरोपादाखल हात हलवला , आता लवकरच परत येऊ असा विचार करत ती आनंदाने परतीच्या प्रवासाला लागली


Rate this content
Log in