सौभाग्याचं लेणं
सौभाग्याचं लेणं
" थांबा...! सरूच्या कपाळावरचं कुंकू कोणी पुसणार नाही. तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्राला हात लावायचा नाही. " राधाबाई जोरात ओरडल्या.
मुलगा देवाघरी गेल्यानंतर सुनेच्या अंगावरील सौभाग्याचं लेणं पुसून टाकायला सरसावलेले हात जागीच थांबले.
" म्हातारीला वेड बीड लागलंय की काय? ", गर्दीतून आवाज आला.
" माझा मुलगा या जगात नाही म्हणून हिने जगणं सोडून द्यायचं का? तसही माझ्या लेकाला हिचं विधवेचं रूप अजिबात आवडणार नाही. हिच्या हिरव्या चुड्याची किणकिण माझ्या पोराला जगण्याचं बळ देत होती. ह्या काळीज चिरणाऱ्या परंपरा कृपा करून बंद करा रे...हिच्या अंगावरच सौभाग्याचं लेणं माझा मुलगा आमच्यासोबत असल्याची आठवण करून देत राहील."म्हणत राधाबाई रडू लागल्या.
जमलेले सगळे लोक त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागले.
सरू धावत जाऊन राधाबाईंना बिलगली. "माझ्या लेकरा" म्हणत त्यांनी तिला प्रेमानं कुशीत घेतलं.
