STORYMIRROR

BHARAT CHOUGALE

Classics

3  

BHARAT CHOUGALE

Classics

साठवण

साठवण

6 mins
498


माझ्या गावचे नाव थड्याचीवाडी ऐकायला व उच्चारायला थोडं विचित्र, असं विचित्र नाव माझ्या गावाला कसं पडलं असावं याच कोड मला बालपणी पडायच माझ्या गावाचं जुनं नाव धाकटं पुणे. एवढ चांगलं मोठ्या शहराचं नाव असताना ते बदलून थड्याचीवाडी ठेवायचं धाडस कोणी बर केलं असावं? त्याला तेच नाव का ठेवावं अस का वाटलं असावं? अन् गावातील सर्वांनी त्या काळी ते मान्य का केलं असावं? असे एक ना अनेक प्रश्न माझ्यासमवेत माझ्या गावातील अनेक सुशिक्षित मुलांना सतावत असायचे. या प्रश्नांच्या उत्तराच्या शोधात आम्ही वारंवार असायचो. गावातील वयोवृद्ध गृहस्थांना यासंबंधी विचारताना त्यांच्यावर असंख्य प्रश्नांचा भडिमार व्हायचा.त्यापैकीच एका गृहस्थानं यासंदर्भात दिलेलं उत्तर असं, कुण्या एकेकाळी श्री मौनी महाराजांचे दोन शिष्य आमच्या गावी राहत असतं. त्या शिष्यानी माझ्या घराच्या वरच्या बाजूला समाधी घेतली. त्या काळातील एका शिल्पकाराने त्या दोन्ही शिष्यांची दोन वेगवेगळी समाधी स्थळ उभारली ती आजसुद्धा आहे. तशीच आहेत. त्या समाधी स्थळांवर श्री शंभुच्या पिंड त्या कालावंताने स्वकल्पनेतून साकारलेली आहे. त्यामुहे त्या समाधी स्थळांना गावकर्‍यांनी महादेवाचे मंदिर म्हणून घोषित केले. एकंदरीत अशा काहीशा पार्श्वभुमीवर माझ्या गावचे नाव थड्याचीवाडी पडले असावे असा प्राथमिक अंदाज त्या गृहस्थांच्या मला दिलेल्या माहितीवरून मी बांधला.

अशा या जेमतेम पन्नास-साठ उंबरा असलेल्या छोट्याशा खेडेगावात माझा जन्म झाला. घरची परिस्थिती श्रीमंत जरी नसली तरी तीन वेळचं पोटभर खावून सुखी असण्याइतपत चांगली होती. माझ्या बालपणी आतासारख्या अंगणवाडी नव्हत्या. तर नवीनच सुरू झालेल्या बालवाडी होत्या. बालवाडीचा अन् माझा छत्तीसचा आकडा. बालवाडी माझ्या चुलत चुलत्यांच्या घरी भरायची. मी शाळेत जायला टाळाटाळ करायचो. पप्पांची नजर चुकवून घरी लपून बसायचो. पप्पा कडगावला बाजाराला जाण्यासाठी शेतातून घरी यायचे. मी बालवाडीत आहे काय पहायचो. शाळेत नसलेला पाहता घरी यायचे, हुडकून काढायचे व बडबदडून काढायचे. पप्पांच्या एक-एका दणक्यासरशी मला आकाशातलं तारे दिसायचे. मी रड रडायचो. त्यावेळी मी पाच वर्षांचा होतो. मी शाळेत जात नाही म्हणून पप्पांनी आमच्या घरात अंगणवाडी आणली. घरात मागल्या सोप्यात बालवाडी भरायची. सोप्यात मोठे लाकडी फळे मुलांना बसण्यासाठी टाकलेले होते. एक दिवस असाच मी खिडकीत डोक्यावर कसलंतरी बोचकं घेवून दडून बसलो. पप्पा कडगावला जाण्यासाठी आले. मागच्या सोप्यात येवून पाहतात तर सगळी मुलं बाया जशा शिकवतील तसं त्याच्या मागोमाग बडबड गीत बोबड्या बोलीत म्हणत होती. आम्ही सर्व मुले आम्हाला शिकविणार्‍या शिक्षिकेला बायानू म्हणायचो. पप्पांनी सर्व वर्गभर पाहिलं असता त्या सर्व मुलांमध्ये मी त्यांना कुठचं दृष्टीस पडलो नाही. पप्पांनी बायांना विचारलं, भरत कुठे गेला? पप्पांचा चढलेला पारा ओळखून बायांनी भीत आताच लघवीला बाहेर गेल्याचं खोटचं सांगितलं. पप्पांनी बायाना विचारले ते वाक्य ऐकून गेल्याचं खोटचं सांगितलं. पप्पांनी बायांना विचारलेल ते वाक्य ऐकून मी मात्र थरथर कापायला लागलो. मनाशीच म्हणालो की, माझी आज काय खैर नाही? पप्पांनी हुडकायला सुरूवात केली.

अखेर मी त्यांना सापडलो. त्यावेळी माझ्या बालमनाचा विचार न करता मला असलं बदडलं की तो मार मला आज सुद्धा आठवतोय. नुसतंच मारलं नाही तर फरफटत ओढत नेलं. त्यावेळी लाकडी फळीचा कोना डाव्या पायाला लागून पायाचं टीचभर सालट गेलं. त्यातून भळाभळा रक्त वाहू लागलं. मला रडायलासुद्धा हुंदका फुटत नव्हता. बायांनी मला जवळ घेतलं व माझी नेहमीप्रमाणे त्यावेळी देखील पाठराखण केली. पण त्यादिवशी पप्पांच्या खालेल्या बेदम माराने व गेलेल्या पायाच्या सालच्याने मला जन्मोजन्मीची अद्दल घडविली. त्यादिवशी माझ्या बालमनाने निर्धार केला की आजपासून जोपर्यंत मी शाळा शिकीन तोपर्यंतचा शाळेचा एक दिवससुद्धा चुकवायचा नाही. संपूर्ण शालेय जीवनात तर तो नियम मी काटेकोरपणे पाळलाच पण तो पण मी आता शिक्षक म्हणून सेवा निभावत असताना सुद्धा पाळतो आहे. मी बालवाडीत जात नसलेल्या दिवशी मला पप्पांनी बेदम मारायचे विशेष कारण म्हणजे माझा थोरला भाऊ घरच्यांच्या लाडामुळे शाळेला गेलेलाच नव्हता. त्यामुळे मीसुद्धा तसंच करून अडाणी होतो की काय? ही चिंता पप्पांना सतावयाची.मला खुप शिकवून मोठं करण्याची महत्त्वाकांक्षा त्यांनी उराशी बाळगली होती. त्यांच्या या महत्त्वाकांक्षेला मी कितपत न्याय देवू शकलो हे माझ्या महत्त्वाकांक्षी वडीलांनाच ठाऊक !

इ. 1 ली ते 4 थी पर्यंतचे शिक्षण गावातीलच प्राथमिक शाळेत घेतले. शेळोलीचे देसाई व कुरूकलीचे कांबळे गूरूजी यांच्या बहूआयामी व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव माझ्या बालमनावर पडला व त्यातूनच माझे व्यक्तीमत्त्व घडायला सुरूवात झाली. चौथीला असताना कांबळे गुरूजींची शिकविण्याची पद्धत, विद्यार्थ्यांप्रती असणारी तळमळ पाहून दहा वर्षांंच्या त्या लहान वयात शिक्षक होण्याची इच्छा मनात उत्पन्न झाली. अवघ्या दहा वर्षाच्या वयातील ती आंतरिक इच्छा मी अथक परिश्रमातून पूर्ण देखील केली. ज्यावेळी तो सुवर्ण दिवस माझ्या जीवनात उगवला. त्यावेळी माझ्यासह माझ्या कुटुंबीयांचा आनं

द गगनात मावला नाही. कारण ती इच्छा केवळ माझी एकट्याचीच नव्हती तर माझ्यासोबत माझ्या पप्पांची सुद्धा होती.

माझ गाव अगदी छोटसं खेडेगाव असल्याकारणानं गावात फक्त चौथीपर्यंतची प्राथमिक शाळा होती. त्यामुळे पाचवीच्या पुढील शिक्षण घेण्यासाठी अध्ययनकर्त्यांला पाच कि.मी. ची पायपीट करावी लागायची. मी पाचवीला कडगाव हायस्कूल शाळेमध्ये प्रवेश घेतला. गावातील प्राथमिक शाळेतील चौथीच्या वर्गातील सात-आठ मुलांमध्ये प्रत्येक बाबतीत अव्वल असणारा मी हायस्कूलमध्ये मात्र थोडे दिवस दचकून राहायचो. त्याला कारण असं की, गावातील अख्खा शालेमध्ये जितकी मुलं होती. त्याच्या दुप्पटीने हायस्कूलच्या प्रत्येक वर्गाच्या प्रत्येक तुकडीत होती. गावातील शाळेत दिवसभर एकच शिक्षक शिकवायचे तर हायस्कूलमध्ये प्रत्येक नवीन तासाला नवीन शिक्षकच चेहरा नजरेसमोर यायचा. वर्गातील काही श्रीमंत घरातील मुले टापटीप शाळेला यायची. ती अगदी मजेने बागेतला चिमुकल्या फुलपाखरासारखी इकडे-तिकडे हुंदडायची. शिक्षकांशी मुक्त मनाने बोलायची. मात्र माझ्या सारखी खेेडेगावातून मध्यमवर्गीय गरीब कुटुंबातून आलेली मुले मात्र भिजलेल्या उंदरासारखी दिवसभर गांगरून बसलेली असायची. शिक्षकांपासून चार हात लांबच असायची.

मला गावातील शिक्षणाचा तेवढा त्रास वाटला नाही. अगदी घराच्या पलीकडेच्या बाजूला मुख्य रस्त्याला लागून एक फर्लांगावर शाळा होती. हायस्कूलचे अंतर मात्र गावापासून 5 किलोमीटर एवढ्या अंतरावर असल्यासनं आणि वाहनाची कोणतीच सोय नसल्यानं 5 वी ते 10 वी पर्यंतचे शिक्षण घेताना चांगलीच तारांबळ उडाली हायस्कूलचे शिक्षण घेण म्हणजे एखाद्या मोठ्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असल्यासारखे वाटायचे. 9 वी, 10 वीचे शिक्षक घेणारी मोठी मुलं भरभर रस्त्याने चालायची तर आम्ही 5 वीला प्रवेश घेतलेल्या दहा-अकरा वर्षांच्या मुलांन तितकं भरभर चालणं जमत नसल्यानं आम्ही त्यांच्या मागोमाग अक्षरश : पळत सुटायचो शाळेत 10 वाजता पोाहोचण्यासाठी सकाळी घर सव्वा आठ वाजताच सोडावं लागायचं. संध्याकाळी शाळा 5 वाजता सुटल्याबरोबर घरी पोहचायला पावणे सात वाजायचे.ऊन वारा पाऊस यांची पर्वा न करता हायस्कूलची सहा वर्षे सुट्टीची दिवस वगळता वर्षांचे बारा महिने हीच रतीब लागलेली असायची सुरूवातीला आम्ही लहान असल्याने चालण्याचा त्रास झाला पण नंतर त्याची शरीरालाच सवय लागली होती.

उन्हाळ्याच्या दिवसानं चालण्याचे काम वाटायचं नाही पण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आम्हा शाळकरी मुलांची चांगलीच फजिती व्हायची. आमच्या शेतातून पुढे सरकत जावून काळ्या ओढ्याला मिळणार्‍या लहानशा ओढ्यावर पूल नव्हतं. पावसाळ्यात मुलांची शाळा बुडू नये, म्हणून गावकर्‍यानी मोठेच्या मोठे तीन चार नळे ओेढ्यात टाकले होते. पावसाळ्यात प्रत्येक दिवशी प्रत्येकाच्या घरातील एक व्यक्ती सर्व मुलांना ओेढा पार करण्यासाठी येत असायचा. संध्याकाळी साडे-सहाच्या सुमारास तीच व्यक्ती पुन्हा ओढ्यावर येवून शाळ ेच्या मुलांची वाट पाहत असायची. कुठल्याही मुलांच्या पायात पावसाळी चप्पल नसायची. प्रत्येकाच्या पायात उन्हाळ्यात घेतलेली स्लीपर असायची. त्या स्लीपरला पट्ट्या अडकवलेल्या असायच्या. जेणेकरून चिखलाच्या चिकळ्या शाळ ेच्या गणवेशावर मागील बाजूने उडू नयेत. रस्ता चिखलानें अशा वेळी पाय स्लिपरमधून हळूच काढून स्लिपर हाताने काढायला लागायचे. पाचवीला प्रवेश घेतलेल्या मुलांनी कितीही जपून चालायचे म्हटले तरी सुद्धा चिखलाच्या चिकळ्यानी शाळेच्या गणवेशावर मागच्या बाजूस नक्षी काढलेली असायची.

माझ्या शाळ ेच्या दिवसात शिक्षकांचा विद्यार्थ्यांचा मोठा धाक असायचा. प्रत्येक चुकीच्या बाबीत चोपून मार बसायला. मुलांच्या डोक्यावरचे केस वाढले की मार ... केसांना तेल नाही लावल की मार..... इन शर्ट निघाला की मार...... शाळ ेत यायला थोडादेखील वेळ झाला की मार... अभ्यास न केला तर काय मग मारचं मार असायचा. त्यामुळे आम्ही सर्व मुले शिक्षकांपासून चार हात लांबच असायचो. शिक्षकांशी फक्त अभ्यासापुरतेच मोजके बोलायचो. त्यामुळे शिक्षकाविषयी आदरयुक्त भिती मनात घर करून राहिली होती. आजसुद्धा मी शिक्षक झालेला असून देखील जेव्हा माझे गुरूवर्य मला भेटतात. तेव्हा माझ्यासमोर एकच यश प्रश्न उभा असतो. कि मी त्यांना काय? आणि कसं विचारू ? तुम्ही कसे आहात? अशी साधी विचारपूससुद्धा करू शकत नाही. त्यांनी विचारलेल्या प्रत्येक नुसतीच मान हलवायची.

विविध संस्काराची शिदोरी प्रदान करणारे माझे शालेय जीवनातील ते दिवस आठवले की अजूनसुद्धा वाटतं की पुन्हा ते दिवस जीवनात यावेत. मनाला नवसंजीवनी देणारे ते क्षण जीवनात मार्गक्रमण करताना प्रत्येक ठिकाणी असावेत. जेव्हा-जेव्हा मी माझ्या जीवनाचे सिंहावलोकन करतो. त्या त्या प्रत्येक वेळी मला ते शालेय जीवनातले दिवस आठवताय. जे मला जगण्याची नवी उमेद देवून जातात. जीवनातले नैराश्य दूर करतात. व एक आत्मबल जागृत करतात.एखादा फोटोग्राफर जसा चांगली नैसर्गिक दृश्य आपल्या कॅमेर्‍यात टिपून ठेवतो. तद्वतच मी देखील माझ्या हृदयाच्या कप्प्यात त्या आठवणींची आठवण करून ठेवली आहे. ज्याचा उलगडा मी विशिष्ठ वेळी करून त्या सोनेरी क्षणांचा मनसोक्त आनंद घेतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics