सामर्थ्य तुझे महान बाई
सामर्थ्य तुझे महान बाई
हीर - रांझा, लैला - मजनू यांच्या कहाण्या मी ऐकून आहे पाहिल्या नाही .त्या शहाजानने त्याच्या मुमताज साठी ताजमहाल बांधलेलाही मी ऐकून आहे
पण तिच्या राजाचा संसार कोलमडू नये म्हणून अविरत त्याला साथ देणारी ही माय माऊली सदानित वंचित राहते रोजच्या सुखापासून तरीही ती कधीच हट्ट करत नाही कश्याचाच
तिला माहित आहे तिचा राजा लढत आहे अस्मानी, सुलतानी सोबत. कर्जाचा डोंगर अन घरात तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी असलेली लेक, पोराच्या शिक्षणाचा खर्च परिस्थिती नसताना त्याला मोठ्या शहरात शिक्षणासाठी पाठवलेलं आहे कारण उद्याच्या आयुष्याची स्वप्न त्याच्या कडून आहेत . लेकराला सावलीतली नोकरी मिळाली तर त्याच्या आयुष्याची वणवण अशी होणार नाही म्हणून ती झटत असते रोज एका नव्या संकटाला तोंड देत असते . तिला कधीच त्रास होत नाही तिच्या त्या चार दिवसात नाहीतर मी बघत असतो चार दिवस बेड्रेस राहणाऱ्या स्त्रिया अन् एक ती आहे भर उन्हात तप्त ज्वाला सहज अंगावर घेत असते. ना तिला पैठणी हवी असते , ना तिला मनीहार हवा असतो , पायातल्या जोडव्याचा ,गळ्यातल्या मंगळसूत्राचा तिने कधीच केला नाही हट्ट कारण तिला जपायच आहे कपाळावरच कुंकू , उघड्या रानात जपलेली दोन लेकर , पोटातल्या आगीतच जळून गेल्यात तिच्या सगळ्या इच्छा, म्हणे डॉक्टरने सांगितलंय तीला आराम करावा लागेल तुम्हाला तरी ती दोन क्षण सुद्धा थांबत नाही . तिच्या महादेवा सोबत उभी असते पार्वती सारखी ती रोज पित असते परिस्थितीच हलाहल विष तरी ती खचत नाही किंवा रडत नाही .ती एक स्त्री आहे जगाच्या निर्माणच बळ तिला या निरागस निसर्गानं बहाल केलेलं आहे . सोसत जगणे हा गुणधर्म तिला तिच्या आजीने, आईने दिलाय. ती त्या संस्काराच्या ओझ्याखाली रोज दबून मरत असते पण हटत नाही कधीच . अन् माघार तर तिच्या रक्तात अजिबात नाही .काही प्रमाणात स्त्रिया शिकून मोठ्या झाल्याही असतील उच्च पदावर गेल्या ही असतील पण आजही अश्या कितीतरी माय माऊल्या रोज राबत आहेत कपाळावरच कुंकू टिकाव ,लेकरु शिकावं , सावलीतली नोकरी करावी म्हणून लेकीला चांगल्या घरात सून म्हणून पाठवण्यासाठी . ही एक शेतकऱ्याची पत्नी आहे जी शेतात पिकाला पाणी देता याव म्हणून नवऱ्या सोबत गाडीवर पाईप धरून बसली आहे . तिला शेतात जळणार पीक तर दिसतच असेल पण पीक जळाल तर कपाळावरच कुंकू नियतीने हिसकवून घेवू नये म्हणून तिचा हा सगळा प्रयास असावा सलाम त्या माय माऊलीला आणि तिच्या कर्तुत्वाला ..
#जागतिक_महिला_दिनाच्या_शुभेछ्या...
