रत्ना
रत्ना


तांबड फुटलं पाखरांची किलबिल कानावर येऊ लागली तशी रत्ना झोपेतून जागी झाली."अगं बाई!!! उजाडलं की आज परत उशीर हुनार अन मालक आज परत कावणार " पटापटा आवरायला हवं " बडबडतच ती उठली आणि कामाला लागली. सदा रत्नाचा नवरा आधीच उठून कामाला लागला होता.खुराड्यातल्या कोंबड्याना मोकळं करून दाना टाकला होता.गोठ्यात दावणीला एक म्हैस , एक गाय , चार शेरडं एवढा पसारा होता. सदाने जनावरांच्या खालचं झाडून त्यांना वैरण पाणी बघितलं होत.
"अगं ए !!! रत्ने आवरकी लवकर. आज परत उशीर झाला तर मालक दारात उभा करून घ्यायचा नाही ,चल लवकर " सदा कामावर जाण्यासाठी घाई करत होता..दोघे मिळून घरातलं आवरून दुसऱ्याच्या शेतात रोजगाराने जायचे .परिस्थिती हलाखीची असल्यामुळे दोघे रोजंदारीवर काम करायचे.एखाद्या दिवशी काम नसेल तर उपास पण घडायचा.
सदा आणि रत्नाच्या लग्नाला जवळपास दहा वर्ष होत आली होती, पदरी एक पोरं होत.दोघे मिळून रोजगार करून कष्ट करून पोटं भरत होती.रत्ना शेतातून येताना जनावरांसाठी गवत, वैरण तर कधी जळणं घेऊन येत असे , कधी कधी मालकाला विचारून आणत असे तर कधी कधी न विचारताच.कधी सोय झालीच नाही तर दुसऱ्यांच्या बांधावरून चोरून चुलीसाठी चार काटक्या गोळा करायची. काय करणार ना शेवटी पोटाची खळगी कधी भरत नाहीतच. ते भरण्यासाठी माणूस काहीही करतो.
दुसऱ्यादिवशी ज्यांच जळण , वैरण चोरलेलं असायचं ते घाणेरड्या शिव्या द्यायचे.त्या शिव्या ऐकून तिचा जीव तीळतीळ तुटायचा.
"रत्ने!!! ए रत्ने!!! मला थोडं पैस दी.गावात जाणार हाय आज बाजारचा दिस हाय , थोडं माळवं , अजून घरात लागणार सामान आणतु. सांजच्या पारी येरवाळी(लवकर) परत ईल घरला ". सदा रत्नाकडे पैसे मागत होता.ह्याच्या हातात पैसे दिले तर हा नक्कीच दारू पिऊन येणार हे रत्नाला पक्क ठाऊक होतं म्हणून ती म्हणाली " तुम्ही राहुद्या मीच जाती बाजाराला.माझं काम बी हाय थोडं बाजारात " म्हणत तीच लगबगीनं निघाली.पण दारुड्यानां कुठला दुष्काळ आलाय हो...त्यांना नेहमीच सुकाळ असतो.पैसे नसले तरी कोणी ना कोणी भेटतच असतं पाजणारं.रात्री सदा डुलतच आणि शिव्या देतच घरी परतला.
"आलात का परत पिऊन , अवं कीतीदा सांगितलंय तुम्हाला दारू पिऊ नगा.लेकरू मोठं होतंय तेबी तसचं शिकलं तुमचं बघून." रत्ना कळवळून सांगत होती.
" बरी आलीस मला शिकवणारी , लय शानी हायस हुई .गप गुमान दोन घास खायचं आणि पडून रहायचं कोपऱ्यात .
तुझ्या बा ची पीत न्हाय म्या " , म्हणत त्याने रत्नाचे केस पकडून तिला ढकलून दिल.
"अवं बा पातुर कशाला जाताय.लेकराची तरी काळजी करा.तेला शाळत घातलय तेला शिकवून मोठं करायचं हाय. नोकरी लावायची हाय , मग पैसा नकु का? आन तुम्ही असा पैका दारूत उडवला तर कसं हुयाचं पोराचं ".
" पोरगं आता शिकून मोठं बॅरिस्टर हुयाचं हाय , अगं सरकारनी बी दारूला मान्यता दिली हाय , म्हणूनच तर दारूच्या दुकानावर लिव्हलेलं असतंय " सरकारमान्य दारूचं दुकान " आन तु बरी लागलीस सांगायला मला " म्हणत त्याने रत्नाच्या मुस्काटात मारली.
रत्ना कडे वेदनेने काळवळण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आसवं गाळीत तिला रात्री कधी झोप लागली कळलंच नाही.
सदा रोज संध्याकाळी झिंगत, झोकांड्या खातच घरी यायचा.आरडाओरडा, शिव्या, आदळआपट हा सगळा कार्यक्रम आटोपल्यानंतर गुपचुप कोपऱ्यात जाऊन कुत्र्यासारखा पडून रहायचा. तिला काळजी होती ती तिच्या मुलाची माधवची. माधव तिचा मुलगा.आठ वर्षांचा माधव तिसरीत शिकायचा. अभ्यासात हुशार, जिज्ञासू, चुणचुणीत. रत्नाची काही मोठी स्वप्न नव्हती, माधवला चांगलं शिक्षण द्यावं,त्याने शिकून कुठेतरी चांगली नोकरी करावी. आपल्यासारखे गरिबीचे भोग त्याच्या वाट्याला नको अस तिला वाटायचं.त्याच्या चांगल्या भविष्याची स्वप्न ती बघायची. सदाला दारूचं व्यसन असल्यामुळं तिला भीती वाटायची. लहान मुलं मोठ्यांच बघून त्यांचं अनुसरण करतात.रोजची घरातील भांडणं, शिव्या, दारू पिऊन सदाने घातलेला धिंगाणा बघून माधव ही तसाच बनला तर?
माधवच्या शिक्षणाला, भविष्याला उपयोगी पडतील म्हणून रत्ना सदापासून काही पैसे लपवून ठेवायची. माधवच्या शाळेत कसलीतरी स्पर्धा होती. स्पर्धेची प्रवेश फी भरायची होती म्हणून ती पैसे घेण्यासाठी गेली तर तिने लपवून ठेवलेल्या जागी पैसे नव्हते. तिने घरभर सगळीकडे पैसे शोधले पण तिला सापडले नाही. तिने कपाळावर हात मारून घेतला. पैसे सदा घेऊन गेला होता, आणि तो सगळे पैसे आता दारूवर उडवणार होता.
रात्री सदा नेहमीप्रमाणे दारू पिवूनचं आला. आल्या आल्या शिव्यांचा भडीमार सुरू केला. रत्नाने पैशाबद्दल जाब विचारला असता तिला धरून मारहाण करायला सुरवात केली. बिचारा माधव घाबरून गांगारून एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिला. रत्ना ओरडत होती "अवं ते पैसं म्या पोराच्या शिक्षणासाठी ठिवलं व्हतं. तुम्ही सगळंच दारूत उडवलं. ह्या दारूनं सारी जिंदगी बरबाद करून टाकली आपली, तरी बी डोळं उघडनातं तुमचं. सोन्यासारखी आपली जमीन दारूच्या नशेत हातची घालवली. दोन घोट दारूपायी कोऱ्या कागदावर सह्या करून आला आन त्या सावकारानं डाव साधला, सारी जमीन आपल्या नावावर करून घेतली. पोराच्या भविष्याचा तरी इचार करायचा हुता. आपलं आयुष्य तर असंच तिर्गीमिर्गी करत संपून जाईल. पण म्या माधवला असलं आपल्यासारखं आविष्य नाय जगू द्यायची. म्या त्याला लै शाळा शिकवणार हाय." रत्ना बडबड करतच होती.
रत्नाची बडबड ऐकून सदा आणखीनच चिडला, तावातावाने रत्नाचे केस पकडून तिला जोरात ढकलून दिलं आणि तिला लाथेने मारू लागला.
"मला दारू पिऊ नग म्हणतीयास, मी पेणार, तुला काय करायचं ते कर, हे माझं घर हाय, गप्प गुमान रहायचं, नाहीतर चालतं व्हायचं." म्हणत त्याने परत तिला जोरात ढकलून दिलं. ती जोरात जाऊन कोपऱ्यात ठेवलेल्या ट्रंकेवर आदळली, ट्रंकेचा कोपरा तिच्या डोक्यात घुसला, डोक्यात खोच पडली, त्यातून रक्त येऊ लागलं, पण सदाला काही फरक पडला नाही. तो अजून लाथेनी तिला तुडवतच होता.
अचानक तिला काय झालं कोणास ठाऊक ती ताडकन उठली, तोंडावर ओघळणारे रक्त पुसत धावत जाऊन चुलीतील जळकं लाकूड उचलून त्याच्यावर धावून गेली.
"मला घरातनं जायला सांगता, म्या नाय जायची, म्या काय तुमच्या मागं लागून नाय आलेली. चांगलं लगीन करून आलेली हाय, आजपासन माझ्यावर हात उचलायचा नाय. लै सोसलं म्या, तुमी आज बदलचाल, उद्या बदलचाल या आशेवर तुमचा सगळा अन्याय सहन करत आले. पण आता नाय चालणार. परत जर माझ्यावर हात उचलला तर माझ्या इतकी वाईट बाई कोण नसंल, मला माधवला एक चांगला माणूस बनवायचा हाय, त्याला तुमच्यासारखा बनवून आणखी एका रत्नाला जनम नाय द्यायचा." रत्ना आवेशात येऊन बोलत होती.
सदा तिचं हे रूप पाहून एक क्षण थबकला, दोन पावले मागे सरकला. असं काहीतरी घडेल याची त्याला कल्पनाच नव्हती. आजपर्यंत रत्ना त्याच्या नजरेत एक गरीब गाय होती. पण तिचं आजचं रूप काही औरच होतं, असं वाटत होतं एक जखमी वाघीण त्याच्यावर चवताळून आलेली आहे. तिच्या नजरेत एक दृढनिश्चय दिसत होता. आज तिने अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता. तिला तिच्या मुलाचं भविष्य घडवायचं होतं. त्याला चांगलं शिक्षण द्यायचं होतं. आपल्या मुलांसाठी एक आई कोणत्याही थराला जाऊ शकते हे तिने सिद्ध केलं होतं. आज तिने एक संकल्प केला होता मुलाच्या शिक्षणाचा.
दारू मानवी जीवनाला लागलेली एक कीड आहे, तिचा वेळीच नायनाट करायला हवा नाहीतर ती पूर्ण कुटुंब उध्वस्त करून टाकते.