Vasudev Patil

Drama Others

2.5  

Vasudev Patil

Drama Others

रसवंती

रसवंती

9 mins
1.0K


       भाग :-- चौथा


   शालूचं माहेर तुटलं. आता तिला गजा शिवाय कुणीच वाली उरलं नाही. बाबाचं घरही गेलं. गजा कारखान्यावर हजेरीनं कामावर जात होता. त्यावर त्यांचा संसार सुरू झाला. एका वर्षात गिट्टू झाला. शालू घरीच त्याचा सांभाळ करू लागली.तो मोठा होईस्तोवर तिला मजुरी करणं शक्य होईना नंतर खाणारी तोंड वाढल्यानं व गिट्टूचा खर्च वाढल्यानं निव्वळ हजेरीवर भागवण्यात ओढाताण होऊ लागली. आता एकाचे दोन हात झालेत शिवाय गिट्टू ही हिंडूफिरू लागल्यानं गजा कारखान्यात हजेरीवर कामाला जाण्यापेक्षा वेगळा विचार करू लागला. त्यानं ऊस तोडीला जायचं ठरवलं.पण बैल गाडी घेणं म्हणजे पैसे हवेत.हातात तर छदाम नाही.करायचं काय? कारखाना सुरू व्हायच्या आत ऊसतोड मजूर बैलगाडी घेण्यासाठी बॅंकेत कर्ज प्रकरण करू लागल्याचं त्याला कळलं.त्यानं ही गावातल्या बॅंकेत प्रकरण टाकलं. गावातला पहिला लाॅट निघाला .तो बॅंकेत यादी पाहण्यासाठी गेला.पण त्याचं नाव आलंच नाही. दुसरा लाॅट आठ दिवसात निघणार आहे इतकंच तुटक उत्तर त्याला क्लर्ककडनं मिळालं.तो हताशपणे बॅंकेत बसला. विक्रांत असुरी आनंदानं कॅबीन मधुन पाहतच होता. हात चोळत खाल मानेनं गजा घरी परतला.

 आठ दिवसांनी दुसरी यादी लागली.त्या यादीतही त्याचं नाव नाही पाहून तो संतापला व बॅंकेत तावा तावानं भांडू लागला. 'गावातील त्याच्यानंतर प्रकरण टाकलेल्यांची नावं येतात मग माझं का नाही?' त्याच्या सवालावर क्लर्कनं सरळ हात झटकत त्याला मॅनेजरकडं पाठवलं.

"साहेब माझं प्रकरण का मंजूर झालं नाही?" गजानं संतापात विचारलं. "कसलं प्रकरण?"आपल्याला काहीच माहिती नाही या अविर्भावात विक्रांतनं खोचकपणे विचारलं.

"साहेब, ऊसतोडकरिता बैलगाडीचं प्रकरण टाकलंय, दोन याद्या निघाल्या .मागची प्रकरण पास होत आहेत मग माझं का नाही?"

"अरे गायकवाड!याचं काय आहे पहा जरा!आणि त्या शिपायाला सांग कुणालाही आत कॅबीनमध्ये का सोडतो?"विक्रांत आता कुत्सीत पणानं बोलला.

गजा वरमला व शांत कोपऱ्यात उभा राहिला.

"साहेब याच्या प्रकरणावर नाॅमिनीच्या काही सह्या बाकी आहेत" गायकवाडनं वरच ठेवलेलं प्रकरण काढत सांगितलं.

"साहेब बाईच्या सह्या करूनच प्रकरण टाकलंय मी"गजा घायकुतीला येत सांगू लागला.

"त्याचं काय असतं आम्हास काही सह्याबाबत शंका वाटली तर त्या व्यक्तीस आमच्यासमोर सहीला बोलवतो आम्ही. कारण कर्जदारास काही झालं तर कर्ज फेडणारी ती व्यक्ती जबाबदार असते.म्हणून खोटी सही आहे की काय यासाठी वाटलं तर काहींना बोलवतो,यासाठीच तुझं प्रकरण पेंडींग आहे.

"पण साहेब मग हे जर आधीच सांगितलं असतं तर मी माझ्या बाईला आणलं असतं व या यादीत काम झालं असतं" गजा तिरमीरत बोलला.

"ठिक आहे उद्या घेऊन ये तुझ्या मिसेसला,सही झाली की पास करतो प्रकरण" विक्रांत खुर्चीवर आपलं आखडलेलं अंग आळोखे देत झटकत म्हणाला.

 दुसऱ्या दिवशी गजा शालूस बॅकेंत जायचं म्हणताच शालू थरथरली.त्या नराधमासमोर जायची तिला भिती वाटू लागली.व चिडही वाटू लागली.

"काहो मला कशाला नेताहेत बॅंकेत तुमचं तुमचं तिकडंच उरकता आलं तर?" विनवणी करत ती म्हणाली.

"अगं फक्त सही करून लगेच परत यायचंय" गजानं धीर देत तिला नेलं.

गजा व शालू पायऱ्या चढताच विक्रांतनं बेल वाजवत शिपायाला बोलावून काही सांगितलं.

गजा आत जाऊ लागताच शिपायानं त्याला अडवत 'साहेब कामात आहेत.थोडा वेळ समोर बसा मग आत सोडतो'असं सांगत गजा व शालूस समोर खुर्चीवर बसवलं. शालू खाली मान करत डोक्यावर पदर सावरत अंग चोरुन बसली.विक्रांत काळ्या गाॅगल्समधूनं आधीच गौर शालूची लग्नानंतर खुललेली कांती पाहू लागला.आपण पैशाच्या व खानदानकीच्या मोहात मालविकाला होकार देत हिला नाकारल्याची चूक केल्याचा त्याला पश्चाताप वाटू लागला.पण काय हरकत नाही अजुनही आपण दोन्ही डगरीवर पाय ठेवूयात या खुशीनं तो मनात गाजर खाऊ लागला.

 एक तास झाला तरी शिपाई आत सोडीना म्हणून गजा उठबस करू लागला.शालूही त्याला घरी गिट्टू वाट पाहत असेल म्हणून खुणेनं लवकर आटपायला सांगू लागली.आता गजाचा संयम सुटू लागला.त्यानं मोठ्यानं आवाज करत शिपायाला दटावलं तसं शिपाई 'थांबा साहेबाला विचारतो' सांगत मध्ये घुसला.

शिपायानं बाहेर येत फक्त शालूस कॅबीनमध्ये जायला सांगताच शालूनं गजाचा हात पकडत आर्त डोळ्यानं गजालाही सोबत बोलावलं.तसं गजा शिपायाला बाजूला करत आत घुसला.

शालूकडं पाहणाऱ्या विक्रांतनं बेल वाजवत शिपायाला बोलावलं.

"तुला दिलेल्या सुचना फालो करता येत नाही का?"तो रागात बोलला तसं शिपायानं गजास उठवत बाहेर काढलं.

शालू विक्रांत समोर थरथरत उभी होती.

"बस खुर्चीत " विक्रांत गाॅगल्स काढत म्हणाला.

"कसं आहे ,तुझ्या नवऱ्याचं प्रकरण कधीचच पास केलं असतं पण मला तुला बोलवायची नामी संधी घालवायची नव्हती..."

"सही कुठं करायची?"त्याच्या बोलण्याकडं दुर्लक्ष करत शालू रागानं बोलली.

" शिवाय गजाचं प्रकरण पास झालं ही असतं पण माझं काय?मला माझी फी हवीय पण गजाकडून नाही तर तुझ्याकडुन...,आणि माझी फी काय आहे हे तुला माहीतच आहे.तू येस कर मग पहा गजाला बैलगाडीचं नाही तर घर, शेत, मोठी गाडी सारं सारं देतो" विक्रांत लाळ गाळतच होता.

शालू समजून चुकली सहीचं निमीत्त आहे.आता ती त्याच्या समोर खुर्चीवर बसली व त्याच्या नजरेला नजर लावत करारीपणानं हळुवार गरजली.

"तु नीच आहेस हे मला माहीत होतं पण त्यासोबत लाळघोट्या कुत्रा आहेस हे ही कळलं.पण लक्षात ठेव या शालूपुढं तुझं काहीच चालणार नाही.तुझं घर, शेत ,गाडी तुझ्याच मढ्यात घाल.या शालूच्या मनगटात जोर व पदरात आब शिल्लक आहे अजून.तुला आताही चपलेनं फोडला असता .पण होणाऱ्या तमाशानं होणाऱ्या इज्जतीचा पंचनामा तुला परवडणाराही असेन पण मला परवणारा नाही"

ती बोलून तोऱ्यात उठली.

बाहेर येताच गजानं 'सही झाली का?' विचारलं.

ती एकही शब्द न बोलता निघाली.घरी येताच सर्व दागिने काढून देत 'हे विका व उद्याच बैलगाडी आणा,पण बॅंकेचा नाद सोडा' रडत रडतच ती म्हणाली.गजा काय ते समजला.

"काय केलं त्या माकडानं ते सांग फक्त?" तो कडाडला.

"अहो काही नाही पण तो झांजरवाडीचाच आहे व मागची बाबाची दुश्मनी काढतोय मेला कुत्र्या."

गजाला लग्नानंतर विक्रांतनं बोललेलं आठवलं. इंजिन, बोगी याचं कोडं उलगडू लागलं.त्याच्या अंगाची लाही लाही झाली.

"शाले ,तो काय म्हणाला ते सांग?बाकी नको सांगू"गजा बेफान होत होता.

"अहो ,जाऊ द्या"ती रडतच म्हणाली.

गजा उठला सरळ बॅंकेत गेला शिपाई अडवू लागला.गजानं शिपायाला कानाखाली असा जाळ काढला की त्याच्या डोळ्यासमोर दिवसा लख्ख चांदण्या टिमटिमायला लागल्या.तोवर गजा विक्रांत समोर धडकला.गजाचा अवतार पाहताच विक्रांत समजून गेला .

"बसा, तुम तुमचंचं प्र प्रकरररण झाल ललय..."

गजानं समोरच्या टेबलाला एकच जोरात लाथ घालताच टेबल मोडून विक्रांच्या छाताडावर पसारा पाडला.त्या पसाऱ्यातच गजा शांतपणे विक्रांतच्या मुस्काटात लाथा घालू लागला.साल्या कुत्र्या नकोय मला तुझं कर्ज पण या पुढे शालूच्या सावलीलाही उभा राहिला तर तुझी सावलीच शिल्लक ठेवणार नाही." बाहेरची गर्दी मध्ये येत गजाला आवरू लागली.गजा नंतर तोंडातून एक शब्द बोलला नाही.तो आला तसा निघून गेला. 

 तो जाताच विक्रांत उठत अंग झटकत तोंडातून निघणाऱ्या रक्ताच्या धारेला रूमाल लावत "लोकांचं प्रकरण पास झालं नाही की लोक असा राग काढतात!हे चुकीचं आहे"असं पुटपुटतच गाडीत बसुन तालुक्याला दवाखान्यात निघून गेला. नंतर सर्व जण त्याला केस करण्याचं सांगू लागताच त्यानं नकार देत प्रकरण थांबवण्याचं सांगितलं.पण मनात नागानं डूख धरत ,ज्या लाथांनी माझं मुस्काट फोडलं गेलं त्या लाथा शिल्लक ठेवणारच नाही मी! पण सबुरीनं.

 गजा नाही म्हणत असतांना शालूनं अंगावरील दागिने मोडायला लावत बैलगाडी आणायला लावली.कारखाना सुरू होताच शालू व गजा ऊस तोडायला जाऊ लागली. संसार गरिबीचा का असेना पण सुरळीत सुरु झाला. तीन हंगाम त्या बैलगाडी वर त्यांनी ऊसतोड करत फाटका संसार चालवू लागले.गिट्टू ही मोठा होऊ लागला.लोक आता विक्रांत व गजाचं ते प्रकरणाचं प्रकरण विसरले पण नागाच्या मनात डूख होताच . विक्रांत व मालविका ही आता झांजरवाडी सोडून बालेवाडीतच राहू लागले होते. चावडीत दोन दोन चौकडीचे चार घरं होती.एकात मंदीरात जो लळीत व्हायचा त्या साठी लागणारी सोंगं(मुखवटे)भाले, तलवारी, धनुष्ये, बाण, त्रिशूल ठेवलेली असायची. दुसऱ्यात गजा राहायचा तर तिसऱ्या घरात बबन शेठचं किराणा दुकान टाकलेलं होतं.बबन शेठ एकटाच होता.पुढं दुकान थाटून मागच्या बाजूस त्यानं आपलं छोटंस बिऱ्हाड थाटलं होतं.विक्रांतनं बबनशेठची मैत्री जुळवली.बबनशेठला उलट मोठा माणूस म्हणून चांगलंच होतं.बबनशेठ व विक्रांत याच्यात चांगलीच गट्टी जमली. तो वेळ प्रसंगी रात्री बबनशेठच्या दुकानात उशीरापर्यंत बसून राही.पण तो येताच शालू किंवा गजा आपला दरवाजा बंद करून घेत.त्याचं दर्शनही नको म्हणून.

  चौथा हंगाम सुरू झाला.गजा व शालू ऊस तोडणी करू लागले.संध्याकाळी गाडी भरल्यावर गजानं तिला मुलाला घेऊन नेहमी प्रमाणं स्वयंपाकासाठी घराला पाठवलं. आलेल्या लोकांना बांडी विकून मग शेतातून भरलेली गाडी उपसण्यासाठी तो कारखान्याकडं नेऊ लागला. त्याला चार पाच दिवसांपासून कोणी तरी आपल्या पाळतीवर आहेत याची सुतराम कल्पना नव्हती.अशातच त्याची बैलगाडी शेतात फसली.सोबतचे बरेच पुढे निघून गेलेले. प्रयत्न करून ही निघेना.मग शेवटी त्यानं ऊस उतरवत गाडी बरीच रिकामी केली.मग हळू हळू गाडी चिखलातून काढली.थंडी वाढली तशी रात्र होऊन अंधार ही वाढला.पुन्हा खाली उपसलेला ऊस त्यानं एकट्यानेच वाहून गाडीत कसाबसा रचत भरला.शेवटी काही ऊस तेथेच ठेवत त्यानं गाडी बांधली व आता निघणार तोच काही कळायच्या आत शेजारच्या ऊसाच्या शेतातून पाच सहा तोंड रूमालानं बांधलेली माणसं निघाली.कुणाकडं काठ्या,कुणाकडं धारे,कोयते,तर कुणाकडं कुऱ्हाड. साऱ्यांनी क्षणात गजाला धरत तोंडात फडकं कोंबत रुमाल बांधला.कुणी हात पाठीमागं नेत बांधले व शेतातच आडवा पाडला. नी मग वरुन मार चालला.शेवटी आवाज न करता तो अधमेला होऊन पडताच दोन जणांनी दोन्ही पायावर वार करत पायच तोडले. एक पाय गुडघ्यातून तर दुसरा पोटरीच्या खालून.कष्टानं कमावलेल्या रक्ताच्या थारोळ्यात गजा निपचित पडला.तसाच उचलत त्याला बैलगाडीत ऊसावर टाकून बांधला व बैलगाडी कारखान्याकडं हाकलली.एकानं फोन करत 'साहब आपका काम हो गया. कुत्तेकी दोनो टांग तोड ढाली' सांगत ते आल्या वाटेनं फरार झाले.

बैलगाडी अंधार चिरत आपल्या जखमी मालकाला घेत कारखान्यात उभी राहिली.झाला प्रकार लक्षात येताच कारखान्यात गर्दी झाली. गावात निरोप गेला.स्वयंपाक करून गिट्टूला खाऊ घालत गजाची वाट पाहत उशीरपर्यंत बसलेली शालू रडत, धावतच आली. गजाला तालुक्याला नेण्यात आलं तेथून तीन चार दिवसात जिल्ह्याला नेण्यात आलं. पोटातल्या आतड्यांना मार, डोक्याला मार, अंगावर खोल जखमा. पाय...? पाय तर आधीच तोडून टाकलेले.दिड महिना गजा दवाखान्यात राहिला.काही खर्च कारखान्यानं केला पण बाकीसाठी बैलगाडी विकावी लागली.पुन्हा गजा व शालूचा संसार मोडकळीस आला.

 गजा गावात परतला तोच कुबड्यावर . घरात काहीच शिल्लक राहिलं नाही.शालू आता दुसऱ्याकडं मजुरीला जाऊ लागली.गजाला आपल्यावर हल्ला कोणी करविला हे कळत होतं पण पुरावा काय? शिवाय तोच अधू झाल्यानं बदला कसा घेणार?तो घरात गिट्टूला सांभाळत रडू लागला.

 बबन शेठनं एक दिवस शालू व गजाला रसवंती टाकण्याचा सल्ला दिला.गजा रसवंती सहज चालवेल व तुमचा संसार सुरळीत सुरू होईल. पण रसवंतीचा चरखा घेणं व इतर वस्तू याला ही भांडवल हवं?त्यावर बबनशेठनंच बॅंकेतून लोन काढायला सांगताच मागचा अनुभव कडवट असल्याच सांगत गजानं नकार दिला.त्यावेळेस बबनशेठनं "गजा तू काळजी करू नकोस हवं तर मी तालुक्यातील बॅकेतून तुझं लोन पास करतो" सांगत गजाला धीर दिला.व नंतर कोऱ्या अर्जावर सह्या घेऊन त्यानंच उठबस करून कर्ज पास करून आणलं.गजा व शालूस आनंद झाला.

 चरखा व इतर जुजबी वस्तू आणत घरासमोरच रसवंती सुरू झाली. पाच सहा दिवसातच रसवंती छान गल्ला जमवू लागली. आता शालूही मजूरीला जाणं थांबवत रसवंतीवरच मदत करू लागली.पण गजाच्या पायाच्या जखमा चिखळतच होत्या.तरी तो कुबडीचा आधार घेत रसवंतीवर रस काढत असे. महिने दोन महिने बॅंकेचा हफ्ता त्यांनी बबनकडे जमा केला. 

 विक्रांत बबनकडे येत मागोवा घेतच होता.

एके दिवशी रविवारी दुपारी शालू घरात स्वयंपाक करत होती.रसवंतीवर कोणी नव्हतं. दुपारची गल्लीही सुनी.गजा रसवंतीवर गिऱ्हाईकाची वाट पाहत बसलेला.विक्रांत बबनशेठच्या दुकानात येऊन बसला.सोबत तीनेक माणसं होती.बबनशेठनं गजास चार पाच ग्लासची आर्डर देत दुकानाच्या मागं निघून गेला.गजानं बटण दाबत चरखा सुरू केला ऊस घेत चरख्यात घातला.

""काय बबनशेठ !काय म्हणतात आपले उरलेसुरले पाय!"विक्रांत बबनशेठच्या नावानं गजास सुनावू लागला.गजाच्या कानावर चरख्याच्या व घुंगराच्या आवाजात अस्पष्टसे ते बोल आदळले. तो कुबडीवर थरथर करू लागला.डोळ्यात आसवे तरारली.तत्क्षणी मागून कोणी तरी कुबडीच्या खालच्या टोकास धक्का दिल्याचं गजाला लक्षात आलं तोच त्याचा तोल गेला .तो पडला पण सुरू चरख्यावर त्याचा हाथ पडला व चरख्यात अडकला.बर्फाच्या पातेल्यात हिरव्या रसात लाल रस मिसळला.ऊसाचं चिपाड व्हावं तसं हाताचं चिपाड होत तो चरख्याला लटकत बोंबलू लागताच शालू बाहेर निघत आरडो ओरड करू लागली.दुकानावरच्याच माणसांनी मग येत हळूवार चरखा बंद करत गजाला उचलला.

"अपंग माणसाकडून कशाला काम करवून घ्यावं असा बहुमोल सल्ला देत लोक जमा होऊ लागताच ती निघून गेली.

शालु व गिट्टूचा मुक्काम पुन्हा दवाखान्यात हलला. पाय गेला आता हात ही गेला.आता उभं राहणंच शक्य नव्हतं.पुन्हा बबनशेठ व इतरांकडून कर्ज काढत उपचार सुरू झाले. पायाच्या जखमा चिगळल्यानं राहिलेला पायाचा भाग ही वरून तोडावा लागला. आता गजाचं एका हाताचं धूळ घरी आलं.शालूनं त्याच्यासाठी पांगुळगाडा बनवला.आता पुन्हा फरफट सुरू झाली. रसवंतीवर घर चालू लागलं पण रसवंतीचं लोनचे हफ्ते, दवाखान्यासाठी उचललेलं कर्ज फेडायचं कसं?यात शालू झुरत सुकु लागली.घरात फाके पडू लागले. गजाच्या जखमा चिगळतच होत्या.

बबनशेठ व विक्रांत आता शालूला अधिक मदतीसाठी कसं धावून जाता येईल याची तजवीज करू लागले.विक्रांतला आपल्या मुस्काटात बसलेल्या 'लाथा' तोडल्या गेल्याची तृप्तता वाटत होती पण शालूची आग त्याच्या मनात वाढतच होती.त्याच फिराक मध्ये तो आता होता.

 गजाच्या जखमातून दुर्गंधी यायला लागली तसे रसवंतीचे गिऱ्हाईक कमी होऊ लागले.घरात आता उपवास घडण्या इतपत परिस्थिती उद्भवू लागली.लोनचे हफ्ते थकले. गजाला आपलं मरण जवळ दिसू लागलं. शालूला काय करावं ते सुचेना.

 तोच बबनशेठनं 'वहिनी तुमच्याशी लोनच्या हफ्त्याबाबत बोलायचं जरा, दुपारी सवड काढा व दुकानात या' निरोप दिला. शालूच्या पोटात खड्डाच पडला......


क्रमश:Rate this content
Log in

Similar marathi story from Drama