Sachin Arun Londhe

Horror Tragedy

4.1  

Sachin Arun Londhe

Horror Tragedy

रांजणावरची हडळ

रांजणावरची हडळ

13 mins
785


(ही कथा काल्पनिक असून फक्त मनोरंजनाचा भाग आहे. यातील पात्र व जागा काल्पनिक आहे.)


उन्हाळ्याच्या सुट्ट्या नुकत्याच सुरू झाल्या होत्या. अजय आपल्या मित्रांसोबत खेळून धावतच घरात आला. अजयचे वडील (अनिल) इतक्यातच कामावरून येऊन चहा पित बसले होते. अजय धावतच त्यांच्याकडे आला. बाबा, आज क्रिकेट खेळताना खूप मज्जा आली. मी नाॅट आऊट पन्नास रन्स केले.


अरे वा! म्हणजे माझा मुलगा 'सचिन' होणार.


तेवढ्यात किचनमधून अजयची आई रमा पोहे घेऊन आली. अजय हळूच आईच्या कानात पुटपुटतो, आई विचार ना बाबांना आपण कधी जायचं?


हो.. हो.. विचारते.. थांब जरा.


अनिल चहाचा घोट घेत, हम्म.. रमा, काय विचारायचं बोलतोय अजय?


काही नाही हो, नेहमीचाच प्रश्न आपण आपल्या गावी पिसोट्याला कधी जाणार? या सुट्ट्यांमध्ये तरी घेऊन चला म्हणून मागे लागलाय.


अनिल अजयला जवळ घेतो, हे बघ अजय मी सुट्टीसाठी ऍप्लीकेशन दिलंय, मंजूर झाली की नक्की जाऊ.


बाबा तुम्ही दरवर्षी हेच सांगता, आणि मला घेऊन जात नाही. अजय रागात त्याच्या रूममध्ये निघून जातो.


रमा, याला कसं सांगू आपण का जात नाही ते.


पण मी काय म्हणते ज्या गोष्टीला इतके वर्ष झाले त्यासाठी आपण गावी न जाणं हे मला काय पटत नाही. कदाचित अफवा असू शकते किंवा आपल्याला घरापासून दूर ठेवण्यासाठी तर हे कटकारस्थान नसेल ना? आणि तसं पण या सगळ्या गोष्टींवर माझा विश्वास नाही.


अगं हो पण आई-बाबा वारल्यापासून आपण गावी गेलोच नाही आणि तसंही पिसोट्याला जाऊन काय करायचे आणि जर त्या गोष्टी खऱ्या असतील तर?


मला वाटते जोपर्यंत आपण तिथे जात नाही तोपर्यंत आपल्याला खरं काय ते समजणार नाही. तुम्ही या वेळेस माझ्यासाठी गावी जाण्याचा प्लॅन करा.


अनिल थोडा विचारात पडतो आणि दिर्घ श्वास घेत म्हणतो, ठिक आहे करूया प्लॅन.


दुसऱ्या दिवशी अनिल ऑफिसमध्ये गावी जाण्यासाठी वीस दिवसाची रजा टाकतो. घरी येताच अनिल ही बातमी अजयला आणि रमाला सांगतो. दोघे खूप खुश होतात आणि जाण्याच्या तयारीला लागतात. रविवारी सकाळची सातची गाडी असल्यामुळे रमा आदल्या रात्रीच सर्व तयारी करून ठेवते आणि सकाळी पाचचा अलार्म लावून झोपी जाते. सकाळी ठरल्याप्रमाणे तिघे एस.टी. स्टॅंडवर पोहोचतात.


रमा, तुम्ही इथे थांबा मी गाडीची इनक्वायरी करून येतो, तसा अनिल इनक्वायरी काउंटरच्या दिशेने निघून जातो आणि पाच मिनिटांनी परत येतो.


अगं, गाडी थोड्याच वेळेत तीन नंबरवर येणार आहे, चल पटकन आपण तिथे जाऊ.


तसे दोघे बॅग उचलतात आणि निघतात. अजय सर्व खूप उत्सुकतेनं पाहत असतो आणि तोही आई-बाबांच्या सोबत तीन नंबरच्या दिशेने धावू लागतो. अजय पहिल्यांदाच पिसोट्याला निघाला होता आणि ती उत्सुकता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.


अचानक कर्कश आवाजात अनाउन्समेंट होते, पिसोट्याला जाणारी गाडी तीन नंबरवर आलेली आहे तरी प्रवाशांनी चढून घ्यावे.


अजय, अनिल आणि रमा तिघेही गाडीमध्ये बसतात. आता गाडी पिसोट्याच्या मार्गाला लागते. अजय खिडकीमध्ये बसून पळणारी झाडं, शेत, कौलारु घरं बघण्यात दंग होऊन जातो. पण दुसरीकडे अनिलच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चिंता दिसत होती. तो स्वतःशीच बोलत होता, पिसोट्याला जाऊन आपण चुकी तर करत नाही ना? आणि जे ऐकलंय ते खरे तर नसेल ना? असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात घोंघावत राहतात. रमाला त्याच्या चेहऱ्यावरची चिंता जाणवते.


ती त्याचा हात हातात घेते आणि बोलते, काळजी करू नकोस सर्व ठिक होईल. आपण खूप एन्जाॅय करू आणि बघ अजय पण किती खूश दिसतोय.


गाडी आता वेगाने पिसोट्याच्या दिशेने धावू लागते. थंडगार वारा, हिरवेगार शेत, कौलारू घरं पाहत अजय आणि रमाचा कधी डोळा लागतो हे त्यांनाच समजत नाही. अनिल मात्र अजूनही त्याच विचारात गुंतलेला असतो. काही तासांनंतर अनिलच्या आवाजाने रमाला जाग येते.


रमा ए रमा उठ अगं आलं आपलं गाव. रमा गोंधळून उठते आणि अजयला जागं करते आणि तिघेही गाडीतून खाली उतरतात. एस. टी. त्यांना वेशीवर सोडून निघून जाते. अनिल आणि रमा बॅग उचलतात आणि घराकडे निघतात. अजय आता जास्तच खुश दिसत होता.


बाबा, कुठे आहे आपलं घर?


अरे.. आता तर आपण वेशीवर आहोत अजून इथून दोन किलोमीटर अंतरावर आपली वस्ती आहे.


तिथून तिघेही रस्ता ओलांडून गावाच्या दिशेने चालू लागतात. आजुबाजूला घनदाट झाडी आणि त्यातून जाणारी कच्ची वाट. जसजसे ते आत जातात तसतशी झाडी दाट होत जाते. त्यामध्येच पक्ष्यांचा आवाज कानावर पडत होता. थंड हवेची झुळूक अंगाला स्पर्शुन शहारे आणत होती. एका वळणावर झाडांच्या आत एक पडकं घर अजयच्या नजरेस पडतं. त्या पडक्या घराच्या खिडकीमधून कोणीतरी आपल्याकडे पाहतंय असा भास त्याला होतो. अजय हळूच आईचा पदर ओढतो आणि बोटाने त्या घराकडे इशारा करतो. रमाची नजर त्या खिडकीकडे जाते. तिला तिच्याकडे पाहणारी एक विचित्र आकुती दिसते. ती डोळे बारीक करून नीट पाहण्याचा प्रयत्न करते. त्यात तिला दिसतो सुरकुतलेला काळपट चेहरा, पांढरे शुभ्र डोळे, पाढरे विस्कटलेले केस, ते पाहून रमा दचकते आणि अनिलचा हात जोरात पकडते. तसा अनिल तिच्याकडे पाहतो. अनिलला तिच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसते. तो तिचा आणि अजयचा हात हातात घेत म्हणतो.


रमा, अजय तिकडं पाहू नका पुढे बघून चला पटकन. जसे ते पुढे जातात त्या घरातून मोठमोठ्याने हसण्याचा आवाज येऊ लागतो. तसा तिघेही चालण्याचा वेग वाढवतात. थोडं पुढे गेल्यावर अजय घाबरतच विचारतो, बाबा कोण होते तिकडे? रमालासुद्धा हाच प्रश्न पडलेला असतो.


काही वर्षांपूर्वी या घरात एक कुटुंब राहायचं सदाभाऊंचं. त्यात त्याची बायको, मुलगा आणि सून. पण नेहमी होणाऱ्या भांडणाला कंटाळून त्याचा मुलगा आई-वडिलांना सोडून शहरात गेला. त्याची आई गेली तरी तिच्या अंत्यदर्शनासाठीसुद्धा आला नाही. एकट्या पडलेल्या सदाभाऊच्या डोक्यावर परिणाम झाला. तेव्हापासून ते गावात वेड्यासारखं फिरत आणि त्या घरात त्याच्या बायकोसोबत राहत त्याला अजूनही वाटतंय त्याची बायको तिथेच आहे.


अजय आईचा हात घट्ट पकडतो. आता तिघेही घराच्या दिशेने पटपट चालू लागतात. समोरच त्यांना गावचं मंदिर दिसू लागते.


बाबा, ते मंदिर कसलं आहे हो?


बाळा ते आपल्या ग्रामदेवत भैरवनाथाचं मंदिर आहे.


आपण दर्शन घेऊन पुढे जाऊ. अजयने अनिलच्या कडेवर चढून मंदिराची घंटा वाजवली आणि मंदिरात प्रवेश केला. मंदिरात प्रवेश करताच अनिलला थोडं प्रसन्न वाटलं. तिघांनी हात जोडले आणि देवाला नमस्कार केला. मंदिरातील पुजाऱ्याने अनिलकडे पाहिले आणि दचकून म्हणाला, अरे अनिल तू का आलास?


झालेल्या गोष्टी तुला माहितच आहे तरी तू आलास. हे देवा रक्षण कर यांचं. असे बोलून पुजारी तेथून निघून जातो.


बाबा ते पुजारी काका असे का बोलले. अनिल अजयच्या प्रश्नाला टाळतो.


काही नाही रे.. तू लक्ष नको देऊ त्यांच्या बोलण्याकडे.


आता तिघेही दर्शन घेऊन घराकडे निघतात. एक अरुंद रस्ता आणि आजुबाजूला थोड्या थोड्या अंतरावरची घरं अजय दंग होऊन पाहत होता. पिसोटं गाव तसं खूप छोटं आणि तेथील लोकसंख्यासुद्धा जास्त नव्हती. बहुतेक जन कामा-धंद्यासाठी शहरात गेलेला. अनिल अजूनही पुजारी काकाच्या बोलण्याचा विचार करत होता.


रमा एका जुन्या घराकडे बोट दाखवून बोलते, ते बघ अजय आपलं घर.


अजय खूप खूश होतो आणि घराच्या दिशेने धावू लागतो. अनिल पटकन त्याचा हात पकडतो, सावकाश बाळा, धावू नकोस रस्ता कच्चा आहे पडशील तू.


अजय खूप उत्साहाने घराकडे बघू लागतो. जुन्या पद्धातीचं कौलारु घर. मातीच्या भिंती, आणि घरासमोर मोठा व्हरांडा आणि त्याच्या बाजूला एक छोटी अडगळीची खोली आणि त्याच्याच समोर एक मोठा रांजण पण आता त्यामध्ये खूप माती आणि त्यात झाडं उगवली होती. त्या रांजणाकडे पाहून रमाला अस्वस्थ वाटू लागते. ती लगेच आपली नजर घरावर टाकते.


अनिल आधी सर्व घर साफ करावं लागेल, आपण अजयला शेजारच्या जाधवांच्या घरी ठेवू आणि साफसफाई झाली की आणू त्याला.


हो रमा ठिक आहे. ही घे चावी तू दार उघड मी त्याला सोडून येतो. अनिलच्या घरापासून जाधवांचं घर थोड्याच अंतरावर होते. जसे दोघे घराजवळ पोहोचतात तेव्हा जाधव ताई घर सारवताना त्यांना दिसतात.


अजय बाबांना हळूच विचारतो, बाबा त्या काकू काय करत आहेत.


ते शेणाने घर सारवत आहे. अजयला ते सर्व विचित्र वाटतं कारण याआधी त्याने हे कधीच पाहिले नव्हते.


नमस्कार जाधव वहिनी, कशा आहात? आणि जाधव कुठे दिसत नाही.


तशी ती ताडकन उठते आणि पाण्यात हात बुचकळते आणि आपल्या पदराला हात पुसत म्हणते, अहो अनिल भाऊजी तुम्ही कधी आलात. या आता मध्ये बसा मी पाणी आणते तुमच्यासाठी. अनिल आणि अजय घरात जातात आणि खाली जमिनीवर बसतात.


जाधवताई पाणी घेऊन येतात, अहो हे गेलेत शेतात झाडांना पाणी द्यायला, येतील इतक्यात. पण तुम्ही इतक्या वर्षांनी कसं येणं केलंत.


अनिल पाण्याचा घोट घेत, अजय दरवर्षी गावी जाण्यासाठी हट्ट करायचा यावर्षी म्हटलं चला जावून यावं. आणि वहिनी घरात खूपच घाण आहे तर मी आणि रमा ते साफ करुन घेतो तर तोपर्यंत अजयला इथे ठेवू का?


जाधवताई अजयला जवळ घेत म्हणाली, यात काय विचारायचं आपलंच घर आहे. राहू द्या त्याला इथे तुमचं झालं कि न्ह्या. पण भाऊजी एक विचारु क?


हो वहिनी विचारा ना.


तुम्हाला घडलेल्या घटना तर माहीत आहेत, तरी तुम्ही का आलात? आता आलाच आहात तर जरा काळजी घ्या. अजयला काहीच समजत नाही की हे सगळे असं का बोलत आहेत.


बाबा ते मंदिरातील पुजारी काका आणि आता या काकू असे का बोलत आहेत.


अनिल पुन्हा अजयच्या प्रश्नाला टाळतो. आणि त्याला समजवतो, हे बघ अजय काकुंना त्रास द्यायचा नाही. मी आणि तुझी मम्मा घर आवरतो आणि झालं की तुला घ्यायला येतो. तोपर्यंत नो मस्ती. अनिल अजय ला सोडून निघून जातो.


रमा दार उघडून आतमधला कचरा झाडूने काढत असताना अचानक कौलांच्या आतून मोठा साप तिच्या समोर पडतो. तशी ती दचकून ओरडत बाहेर पडते आणि अनिलला गच्च मिठी मारते. ती इतकी घाबरते की तिला काही सूचतच नाही.


अनिल तिला शांत करत विचारतो, रमा अग घाबरू नकोस मी आहे ना इथे.. शांत हो आधी आणि काय झालं ते सांग.


रमा अडकत अडकत बोलते, अ.. अअ अनिल आत मी एक मोठा साप पाहिला आणि आपल्या माळ्यावरुन तो खाली पडला.


अनिल तिला शांत करतो आणि घरामध्ये डोकावतो, रमा तू इथेच बैस मी आत जाऊन बघतो. अनिल हातामध्ये काठी घेऊन आत शिरतो. आत खूप शोधूनही त्याला काहीच सापडत नाही.


अगं मी सगळीकडे पाहिले पण काहीच नव्हतं. कदाचित तुला भास झाला असेल, रमाचं अनिलच्या बोलण्याकडे लक्षच नसतं. ती एकटक रांजणाकडे पाहत बसलेली अनिलला दिसते. तो तिच्याजवळ जातो आणि खांद्यावर हात ठेवत म्हणतो, रमा ए रमा अगं मी तुझ्याशी बोलतोय लक्ष कुठे आहे तुझं.


तशी तिची नजर अनिलकडे वळते आणि भानावर येते, काय म्हणालात तुम्ही.


अगं मी सगळीकडे पाहिले काहीच नव्हतं तिथे. चल पटकन आवरून घेऊ अंधार पडायच्या आधी. रमा भानावर येते आणि दोघं घर साफ करायला घेतात. आता घर आवरून अनिल अजयला आणायला निघून जातो. रमा आता जेवण बनवायला सुरुवात करते. अनिल आणि अजय घरी परतात. अजय पहिल्यांदाच आपलं गावचं घर पाहत होता. तो बराच वेळ घर न्याहाळत बसतो. आता हळूहळू अंधार पडू लागतो. तिघेही जेवण करुन व्हरांड्यात येऊन बसतात. बाहेर छान थंडगार हवेमध्ये रमाचा शीण क्षणार्धात गायब होतो. अजय आईच्या मांडीवर डोकं ठेवून आकाशातले तारे पाहण्यात दंग होऊन जातो आणि तिथेच झोपी जातो.


रमा मी बिछाना घेऊन येतो आज आपण बाहेरच झोपू. रमाला अनिल ची कल्पना खूप आवडते. अनिल घरातून बिछाना घेऊन येतो आणि बिछाना टाकतो. अनिल अजयला उचलून बिछान्यावर टाकतो. रमा आणि अनिलही बिछान्यावर पडून आकाशात तारे बघण्यात मग्न होऊन जातात. शहरात असं मोकळं आकाश कधी दिसतच नाही. थोड्याच वेळात दोघेही झोपी जातात. मध्यरात्री अनिलला कसल्यातरी आवाजाने जाग येते. पण तो तसाच डोळे झाकून पडून राहतो. तो नीट कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करतो. त्याला त्याच्या आजुबाजूला कुणाच्या तरी चालण्याचा आवाज येतो. कोणी तरी त्यांच्या भोवती गोल गोल फिरत आहे असे जाणवते. काही क्षणानंतर त्याला त्याच्या कानाजवळ जोरजोरात श्वासोच्छ्वास घेत असल्याचे जाणवते. अनिल अजूनही डोळे झाकून शांतपणे त्या हालचाली ऐकत पडून राहतो. नक्की काय करायचे हे त्याला समजत नव्हते. आता तो डोळे उघडायचे असं ठरवतो आणि तेवढ्यात चालण्याचा आवाज बंद होतो. अनिल आता हळूहळू आपले डोळे उघडतो आणि आजुबाजूला पाहायला लागतो. अंधार खूप असल्यामुळे त्याला काही दिसत नाही. अनिल आता उठून बसतो. अचानक त्याची नजर रांजणावर पडते आणि त्यावर त्याला कोणीतरी बसल्याचा भास होतो. एक काळी आकृती, लांब सडक केस आणि त्या केसांमधून दिसणारे लाल भडक डोळे. अनिल घाबरुन आपली नजर फिरवतो आणि रमाकडे पाहतो, ती गाढ झोपेत होती. त्याला समजत नाही काय करायचे ते. अचानक त्याला रमाचा आवाज ऐकू येतो. पण तो बघतो रमा तर झोपली आहे. मग हा आवाज कोणाचा.


अनिल ए अनिल... उठ आठ वाजलेत. अजून किती वेळ झोपणार... अनिल खडबडून जागा होतो आणि रमाकडे पाहतो. रमाला त्याच्या चेहऱ्यावरची भिती स्पष्ट दिसते.


अरे इतकं घाबरायला काय झालं...


अनिल शांत होतो आणि रांजणाकडे पाहतो, काही नाही गं थोडं विचित्र स्वप्न पडलं.


अजय तेवढ्यात घरातून बाहेर येतो, बाबा उठलात तुम्ही? आणि आज कुठं फिरायला जायचं?


हो.. हो जरा आवरु दे मला मग जाऊ आपण डोंगरावरच्या मंदिरात. अजय खूप खुश होतो आणि आवरायला लागतो. अनिल आणि अजय दोघेही सर्व आवरुन डोंगराच्या दिशेने निघतात. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे त्यांना विहीर दिसते आणि अजय अनिलला बोलतो, बाबा चला ना आपण विहीरीमधलं पाणी बघू.


अनिल अजयच्या हट्टासाठी तयार होतो. विहिरीच्या जवळ जाता जाता अनिलला अस्वस्थ वाटू लागते. आता दोघेही विहिरीत डोकावतात. विहिरी अर्धी भरलेली होती. आत डोकावताच अनिलला पाण्यात एका बाईचा मृतदेह तरंगताना दिसतो. ते पाहून अनिल घामाघुम होतो आणि अजयला धरून घराच्या दिशेने धावू लागतो.


अजयला काहीच समजत नाही आणि न राहवून तो विचारतो, बाबा आपण का धावतोय? अनिल काही न बोलता तसाच धावत सुटतो.


अनिल जसा घरी पोहोचतो रमा त्याला तशा अवस्थेत पाहून घाबरते, अनिल काय झालं तुला? इतका का घाबरलाय? अनिल काही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हता. रमा त्याला शांत करते आणि पाणी देते. अनिल घटाघटा पाणी पितो आणि डोळे झाकून बसतो.


रमा अजयला विचारते, अजय काय झालं बाबांना? तुम्ही डोंगरावर जाणार होता ना?


हो आई पण त्या विहिरीकडे जेव्हा आम्ही गेलो आणि बाबांनी विहीरीमध्ये पाहिल्यानंतर ते धावत सुटले, मला समजलंच नाही काय पाहिले त्यांनी. अनिल थोडा शांत झाला होता तो अजयला बाहेर खेळायला पाठवतो.


अनिल आता रमाला सांगायला सुरुवात करतो, रमा मला वाटतं आपण परत आपल्या घरी जावं. मला इथे विचित्र आणि अस्वस्थ वाटू लागले आहे.


पण अनिल असं झालं तरी काय?


अगं आम्ही त्या विहिरीकडे जेव्हा गेलो तर त्यात मला एका बाईचं प्रेत दिसलं. ते पाहून मी अजयला घेऊन लगेच पळत सुटलो. मला वाटतं काही होण्या आधी आपण लगेच इथून जाऊया.


रमा अनिलला जवळ घेते आणि समजावते, अरे असं कसं होऊ शकतं आणि गावातले सगळे तेथूनच पाणी भरतात. पण असे काही असते तर सकाळीच सगळ्यांना समजले असतं. तुला कदाचित भास झाला असेल. अनिलने पाहिलेले ते दृश्य अजूनही त्याच्या डोळ्यासमोरुन जात नव्हतं.


रमा मला कालपासून हेच वाटतंय की आपण इथे नव्हते यायला पाहिजे. रमा त्याला समजवते आणि आराम करायला सांगते. काही तासांनंतर अनिलची झोप उघडते. रमा त्याला म्हणते, उठलास... कसं वाटतंय आता.


हो जरा बरं वाटतं आहे आता.


जा फ्रेश होऊन घे मी चहा टाकते. अनिल आणि रमा व्हरांड्यात संध्याकाळच्या कोवळ्या उन्हात चहा पित बसतात आणि अजय मात्र व्हरांड्यात खेळण्यात मग्न झाला होता.


अनिल आपण ती अडगळीची खोली आणि ते रांजण साफ करून घ्यायचे का?


नको रमा त्यात अजूनही त्यांच्या वस्तू आहेत. आहे तसंच राहू दे उगाच आपल्यामागे काही नको आणि तुही ती खोली उघडू नको. दोघेही बोलता बोलता घरात जातात. अनिल थोड्या वेळाने बाहेर येतो तर त्याला अजय कुठेच दिसत नाही.


तो जोरात रमाला आवाज देतो, रमा ए रमा! बाहेर ये पटकन अजय कुठं दिसत नाहीये. रमा हातातलं काम टाकून धावतच बाहेर येते.


काय हो, कुठे गेला अजय? अगं इथेच खेळत होता आणि आता कुठं दिसत नाही. दोघेही आजुबाजूला खूप शोधतात पण अजय कुठेच दिसत नाही. जाधवताई पण त्यांना शोधायला मदत करते. पण आता अंधार वाढत चालला होता तशी अनिलची चिंतासुद्धा वाढत चालली होती. रमाचे रडून रडून हाल बेजार झाले होते.


अनिल कुठे गेला असेल रे आपला अजय?. अनिललाही सूचत नव्हतं कुठे शोधायचे अजयला. त्याने संपूर्ण गाव शोधून काढलं होतं. अजय कुठे गेला असेल? तो सुखरूप तर असेल ना? असे अनेक प्रश्न रमाच्या डोक्यात गोंधळ घालत होते. आता दोघेही घराबाहेर बसून अजयची वाट पाहू लागले. आता मध्यरात्र झाली होती. दोघेजण बसल्या ठिकाणी झोपी गेले होते. अशावेळेस अजयच्या रडण्याच्या आवाजाने रमाला जाग येते. ती अनिलला जाग॔ं करते. दोघांना अजयच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो पण अजय कुठेच दिसत नाही. ते नीट कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करतात. तो आवाज अडगळीच्या खोलीतून येत असल्याचे त्यांना जाणवते. अनिल खोलीच्या दाराला कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करतो. त्याला आतमध्ये कसली तरी कुजबूज ऐकू येते पण स्पष्ट काय बोलत आहे ते त्याला समजत नाही. अनिल आणि रमाला त्या विचित्र आवाजाने आणखीनच भीती वाटते.


रमा म्हणते, अनिल दरवाजा तर बाहेरून बंद आहे. मग अजयचा आवाज आतून कसं काय येतोय.


अनिल रमाला बोलतो, तू आत जा आणि या खोलीची किल्ली घेऊन ये. रमा आत जाते आणि किल्ली घेऊन येते. अनिल अजूनही दरवाजाला कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करत असतो. आता त्याला आतमधली कुजबूज स्पष्ट ऐकू येऊ लागते.


त्याला एका बाईचं आणि अजयचं बोलणं ऐकू येते, अमर बाळा तू आता मला सोडून जायचं नाही आणि माझ्यासोबत इथेच राहायच. खूप वर्षांपासून तुझी वाट पाहतेय. आता कोणीही तुला माझ्यापासून दूर करू शकणार नाही.


अनिल रमाच्या हातून किल्ली घेतो आणि दार उघडतो आणि दार उघडताच आतून येणारा आवाज बंद होतो. आतमध्ये लाईट नसल्यामुळे त्यांना काहीच स्पष्ट दिसत नाही. अनिल आत जाऊन पाहतो त्याला अजय जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत दिसतो. तो त्याला उचलतो आणि व्हरांड्यात घेऊन येतो. रमा आणि अनिलला अजयची परिस्थिती बघवत नाही. रमा त्याला कुशीत घेऊन रडू लागते. अनिल तिला शांत करतो आणि झोपायला सांगतो. पण दोघांनाही झालेल्या गोष्टीमुळे झोप लागत नाही.


रमा.. मला अजूनही समजत नाही की अजय आत गेला कसा! आणि जो आतमध्ये त्या बाईचा आवाज! पण आतमध्ये कुणीच नाही आणि ती बाई अजयला अमर का बोलत होती. अनिल जसा रमाकडे पाहतो. तर ती तिथे नसते. अजय त्याला जमिनीवर पडलेला दिसतो. आणि अचानक तो त्या खोलीकडे पाहतो. रांजणावर बसलेली रमा त्याला एका वेगळ्याच अवतारात दिसते. केसं सोडलेली, रक्ताळलेले डोळे, चेहऱ्यावर राग असं भयानक रूप त्याच्या समोर होतं.


अनिल जोरात ओरडतो, कोण आहेस तू आणि का आमच्या मागे लागली आहे.?


ती अनिलकडे पाहून जोराजोरात हसू लागते, हा.. हा.. हा.. मी मंदा काही वर्षांपूर्वी या गावात मी, माझा मुलगा अमर आणि नवरा राहायला आलोत. माझी आणि माझ्या सासरकडच्याची नेहमी भांडणं होत. त्यांना वाटायचं माझ्या डोक्यावर परिणाम झालाय. म्हणून आम्ही इथे या गावात आलो. या खोलीत भाडेकरू म्हणून राहत होतो. या घरचे आजी, आजोबा वारल्यानंतरही आम्ही इथेच होतो. काही महिन्यांनंतर माझा नवरासुद्धा मला वेडं समजायला लागला आणि कदाचित ते खरंसुद्धा होतं. एके दिवशी तो बाजारात जातो म्हणून माझ्या अमरला घेऊन गेला तर तो परत आलाच नाही. मी खूप दिवस त्याची वाट पाहिली पण तो आला नाही. रोज या रांजणावर बसून मी त्यांची वाट बघत बसायचे. एक दिवस मी पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेले तेव्हा अमर मला विहिरीच्या पायरीवर बसलेला दिसला आणि वर येताना त्याचा पाय घसरून पडला. मीही उडी मारली. दोन दिवसानंतर माझं प्रेत पाण्यावर आलं. माझा अमर कधी येईल याचीच मी वाट पाहत होती आणि आज तो आला. आता त्याला माझ्यापासून कुणीच दूर नेऊ शकणार नाही. एवढं बोलून रमा रांजणावरून खाली पडते, अनिल तिला पकडतो आणि मांडीवर तिचं डोकं ठेवून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतो.


रमा.. ए रममा उठ गं, बघ अजय बोलतोय तुला उठ चल पटकन. आता हळूहळू पहाट व्हायला सुरुवात झाली होती. रमा हळूहळू शुद्धीवर यायला लागते.


अनिल काय झालंतं रे मला आणि अजय कुठे आहे आपला. मला त्याच्या कडे घेऊन चल.


दोघेही जेव्हा व्हरांड्यात येतात तेव्हा अजय तिथे नसतो. आता दोघेही अजयच्या नावाने ओरडू लागतात. तेवढ्यात जाधवताई येते आणि रमाला बिलगून रडायला सुरुवात करते. अनिल तिला विचारतो वहिनी तुम्ही का रडताय.


ती रडत रडत बोलते, अजय... अजय विहिरीकडे... चला पटकन.


अनिल आणि रमा ते ऐकताच विहिरीच्या दिशेने धावतात. विहिरीच्या भोवती त्यांना गर्दी दिसते. दोघेही विहिरीमध्ये पाहतात त्यांना अजयचं प्रेत तरंगताना दिसते. रमा ते पाहून वेडी होते. अनिलला मंदाचे शब्द आठवतात, आता अमरला माझ्यापासून कोणीही दूर नेऊ शकणार नाही.


-समाप्त-


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror