राखीवाली
राखीवाली


"अरे आलास शाळेतून, चल पटकन हात-पाय धुवून घे, जेवण वाढते तुला."
"आई हे घे."
"काय रे अय्या एवढ्या राख्या कोणी दिल्या?"
"विकत आणल्या."
"विकत... कोणी सांगितले तुला आणायला आणि त्याही एवढ्या."
"किती पैसे झाले?"
"100 रूपये..."
"काय वेडा झालास तू, तुला कोणी सांगितले आणायला आणि पैसे कुठले..."
"माझा पाॅकेट मनी वापरला..."
"काय रे वेड्या एवढ्या कोणी आणतं का..."
"अगं आई तुला मामाला बांधायला पाहिजे ना..."
"एवढ्या, तुला काय एवढे मामा आहेत... कुठून आणल्या तिथे देऊन ये, नको म्हणून सांग."
"ऐक ना आई मी ती राखी एका छोट्या मुलीकडून विकत घेतली. बिचारी राखी विकत होती रस्त्यावर... मला म्हणाली भैय्या राखी घे ना. आई ती एवढीशी पैसे नाहीत म्हणून शाळेत पण नाही जात. अशीच रस्त्यावर काही ना काही विकत असते. मग मला पण वाईट वाटले म्हणून घेतल्या, तिच्याकडे होत्या तेवढ्या राख्या."
"नाही, बरोबर केलंस तू पण खरंच ती गरीब होती ना की तुला वेड्यात काढलं... काय आहे ना त्यांना बरोबर माहित असतं कशा आपल्या वस्तू विकायच्या त्या..."
"नाही गं आई खरंच ती तशी नव्हती..."
"बरं चल जेवून घे..."
(असेच दिवस गेले. येता-जाता दोघांची भेट होऊ लागली. आता तर चेहऱ्याने पक्की ओळख झाली होती)
रक्षाबंधनाचा दिवस होता. नेहमीप्रमाणे राहुल शाळेतून घरी परताताना रेवा राहुलला पाहून पुढे आली...
"भैय्या, अरे हे काय आज रक्षाबंधन ना आणि काय तू राखी नाही बांधलीस... म्हणजे तुझ्या बहिणीने नाही बांधली..."
"मला बहिणी नाही."
"काय?"
"हो, मी एकटाच..."
"मग तू एवढ्या राख्या त्या दिवशी नेल्यास त्या कोणासाठी..."
"माझी आई बांधते ना मामाला..."
"तुला एवढे मामा आहेत..."
"नाही नाही, मला दोन मामा..."
"मग एवढ्या राख्या..."
"अगं, तुला असं राख्या विकताना पाहून वाईट वाटले, म्हणून सगळ्या घेतल्या..."
"भैय्या मग आईने ओरडा दिला असेल ना?"
"नाही, मी आईला सांगितले की तू किती लहान आहेस म्हणून..."
"भैय्या तू माझ्यासाठी एवढं केलंस, मी तुला राखी बांधलेली चालेल तुला..."
"हो चालेल, का नाही..."
"खरंच..."
"हो..."
"भैय्या त्या कठड्यावर बस."
"बरं बाबा."
"तू सांग भैय्या कुठली बांधू."
"अगं कुठलीही बांध."
"बरं ही बांधते, हात दे भैय्या... बघ झाली बांधून... कशी दिसते बघ मस्त तुझ्या हातावर..."
"हे घे..."
"काय चॉकलेट..."
"चॉकलेट, काही तरी त्याला हवे राखी बांधल्यावर..."
"नको भैय्या पण तुला कसं माहित मी तुला राखी बांधणार ते..."
"अगं काल बाबानी चॉकलेटचा बॉक्स आणलेला, त्यातली थोडी चॉकलेट मी बॅगमध्ये ठेवली. आता तरी घे, बहीण ना माझी तू आता मग..."
"मी विसरलो माझे नाव राहुल आणि तुझे?"
"रेवा भैय्या..."
"अच्छा रेवा..."
"मग मी तुला रेवा म्हणू..."
"हो भैय्या..."
"चल मी जातो, आई वाट पाहत असेल घरी."
"बरं भैय्या थँक यु, चॉकलेटसाठी..."
"हे बहीण कधी भावाला थँक यु म्हणत नाही कळलं का..."
(राहुलने आपल्या हाताकडे पाहिले. राखी त्याच्या हातावर शोभून दिसत होती. तिचा तो रंगेबेरंगी रंग राहुलच्या मनातून ओसंडून वाहत होता. आता कधी घरी जाऊन आईला दाखवतो, असे त्याला झाले होते)
"आलास..."
"आई हे बघ..."
"काय?"
"राखी..."
"कोणी बांधली..."
"अगं त्या रेवाने, म्हणजे त्या राखीवाली मुलीने... अगं तिने माझ्या हातात पाहिले आणि विचारू लागली, राखी बांधली का नाहीस. मी सांगितले मला बहीण नाही त्यावर तिने मला विचारले, मी बांधू का राखी तर मी हो म्हटलं आणि आई मी तिला माझ्या बॅगमधले चॉकलेट दिले. नको म्हणत होती पण मी घेच म्हणालो..."
"वाह म्हणजे तुला एक नवीन बहीण मिळाली तर..."
"हो आई..."
"आई आपण तिला नवीन कपडे देऊया का गं?"
"हो नक्कीच..."
"बरं आता तू हात-पाय धुवून ये, मी जेवायला वाढते..."
"पण आई आपण तिला नवीन कपडे कधी द्यायचे..."
"उद्या देऊ आपण, तिलाच घेऊन जाऊ शॉपवर..."
"खरं..."
"हो..."
(ठरल्याप्रमाणे आई, राहुल आणि ती मुलगी नवीन कपडे घेऊन दुकानाच्या बाहेर पडली. मस्त आईसक्रीमवर ताव मारला आणि परतीची वाट धरली)
"बरं रेवा, तुझे घर कुठे आहे सोडतो तुला आम्ही?"
"नाही, काकू जाईन मी."
"अगं एवढ्या पिशव्या घेऊन कशी जाशील..."
"अगं रेवा चल आमच्या कारमधून..."
आणि कार रेवाच्या घराच्या दिशेने वळवली.
(रस्त्यावर कार ठेऊन आई, राहुल आणि पुढे रेवा गल्ली-बोळातून एका चिरेबंदी खोलीकडे येऊन थांबली. रेवाने आपल्या फ्रॉकच्या खिशातून चावी बाहेर काढली. पत्र्याच्या दाराचे कुलूप काढून आत प्रवेश केला. खाली चटई होती. त्यावर राहुल आणि आई बसली.)
"लहान आहे आमचं घर काकू..."
"कोणी सांगितलं असं काही नसतं..."
"बरं तुम्ही कोण कोण राहता?"
"आई, मी आणि बहीण..."
"मग बाबा नाहीत तुला?"
"आहे, पण दारू पितो, काम काही करत नाही. कधी घरी आला तर नाही तर बाहेर असतो..."
"आणि आई?"
"लोकांची धुणी-भांडी करते..."
"आणि तू शाळेत?"
"नाही जात, पैसे नाहीत आणि ही खोली पण भाड्याची आहे..."
"बरं आणि बहीण..."
"ती बी माझ्यासारखी वस्तू विकते..."
"अगं ये रेवा..."
"अगं बाई कोण तुम्ही?"
"आई हाच माझा भैय्या आणि त्याची आई..."
"नमस्कार..."
"अगं पहिलं सांगायचं नाही का, आमची छोटीशी खोली आहे ही..."
"चहा..."
"अहो नको, वाटेत येताना आम्ही खाऊन आलो..."
"आई नवीन कपडे दिले काकूंनी घेऊन..."
"अहो कशाला हे..."
"अहो माझ्या मुलाला रेवाने राखी बांधली, मग भावाने बहिणीला काही द्यायला नको का..."
"हो पण आमच्यासारख्यांना कोण देतं..."
"का, हे बघा रेवाच्या आई तुमच्यासारखे म्हणजे... तुम्ही परिस्थितीमुळे असे झालात, त्यात तुमचा काय दोष आणि मला हे आमचे तुमचे नाही कळत आणि हो निःसंकोचपणे हे कपडे ठेवा..."
"पण बाईसाहेब..."
"आणि बाईसाहेब म्हणू नका, मला राहुलच्या आई म्हणा..."
"बरं..."
"आणि हो आता तुमच्या दोन्ही मुली शाळेत जातील. खर्चाची चिंता करू नका आणि इथे राहण्यापेक्षा आमची एक खोली रिकामी आहे तिथे येऊन राहा..."
"खरंच देवासारख्या आल्या तुम्ही. मला पण नाही आवडत इथे राहायला आणि वाटतं पोरींना शिकवावे पण माझे हात तोकडे पडतात हो..."
"मग आता चिंता नसावी..."
"रेवा मला माझ्या मुलीसारखी, बरं आम्ही येतो..."
"अगं हे काय तू लहान आहेस, पाया वगैरे काय पडतेस..."
"नाही काकू, एका राखीवालीला तुम्ही मुलगी मानली, भैय्याने बहीण मानली. आता तर तुम्ही मला शाळेत पाठवणार..."
"ओह का मोठी झाल्यावर पड पाया..."
"बरं आम्ही येतो..."
"बाय रेवा..."
"बाय भैय्या..."
(आणि राहुल आणि आई घरी परतले)