Smita Bhoskar Chidrawar

Tragedy Inspirational

4  

Smita Bhoskar Chidrawar

Tragedy Inspirational

राधाई...एक हक्काचा आधारस्तंभ

राधाई...एक हक्काचा आधारस्तंभ

9 mins
255


राधाने शेवटी कसाबसा मनाचा निर्धार केला...काळ्याशार अथांग डोहात स्वतःला ती झोकून देणार इतक्यात...एक लहान मुलगी तिच्या पदराला धरून म्हणाली ,"ताई तुम्ही आता इथून उडी मारून देवाघरी जाणार ना...मलाही न्या ना तुमच्या सोबत. माझे आई बाबा आहेत तिकडे आणि आता तर आजी सुद्धा मला सोडून देवाघरी निघून गेली. कालपासून उपाशी आहे .मलाही न्या तुमच्यासोबत देवाघरी. मला एकटीला खूप भीती वाटते..." 


त्या चिमुरडीचा निरागस निष्पाप चेहरा बघून राधा गहिवरून गेली... तिला कुशीत घेऊन ओक्साबोक्शी रडू लागली ...भावनांचा वेग आवरल्यावर तिला 'माऊली' ची सगळी हकीगत समजली...


माऊलीच्या जन्माच्या वेळी तिचे वडील अचानक वारले आणि काहीच दिवसात आईसुद्धा हाय खावून निघून गेली. अशी अपशकुनी पोर म्हणून तिला कोणीच स्वीकारायला तयार नव्हते शेवटी तिच्या आजीने तिला सांभाळले आणि दोन दिवसांपूर्वी आजीला सुद्धा देव आपल्याकडे घेऊन गेला.. एकादशीच्या दिवशी जन्मली म्हणून आजी तिला ' माऊली ' म्हणू लागली...


नवरीच्या वेशातली राधा आणि तिच्या कुशीत निजलेली माऊली दोघीही देवळाच्या पायरीवर बसून होत्या...त्या निरागस जिवाकडे बघून राधाला आपलं दुःख लहान वाटू लागलं.

किती हौसेने तिच्या आई आणि बाबांनी तिचं नाव ' राधा ' ठेवलं. तिच्या रूपाने घरात लक्ष्मी चालत आली होती म्हणून सगळेच आनंदी होते. पण घराण्याला वंशाचा दिवा हवा म्हणून आजीने खूप नवस बोलले पण राधाच्या आईला पुन्हा मुलगीच झाली आणि ती ही अपंग ...एक दिवस शेतात साप चावल्याचे निमित्त होऊन राधाची आई कायमची तिला सोडून निघून गेली...बिचारी अपंग रेणू कोणालाच नको होती. राधा नेहमी रेणुची काळजी घ्यायची पण त्या दोघी बहिणींची साथ फारच थोड्या दिवसांची होती...


काही दिवसातच राधाच्या बाबांनी आजीच्या माहेरच्या नात्यातल्या 'मीरा' शी लग्न केलं ...राधाने नवीन आईला म्हणजे माईला आनंदाने स्वीकारलं. माईसुध्दा राधाशी नीट वागत होती...पण वर्षभरातच ' युवराज ' चा जन्म झाला आणि राधाला उपऱ्याची वागणूक मिळू लागली. घराण्याला वंश देणारी माई सगळ्यांची लाडकी झाली आणि युवराज तर अगदी अती लाडाने वेडाच झाला...

नाही म्हणायला बाबा मात्र राधाशी प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करायचे पण माईपुढे त्यांचं काही चालत नव्हतं. पण राधाची शिकण्याची आवड बघून तिला गुपचूप पुस्तकं नेहमी आणून द्यायचे.


शेजारचा राजन राधाला खूप जपायचा. तो कॉलेजचा अभ्यास सांभाळून राधाचाही अभ्यास घ्यायचा. त्यामुळे राधा खूपच प्रगल्भ झाली होती. तिचे विचार अधिकाधिक समृद्ध होत चालले होते.


दोघांनाही एकमेकांच्या हृदयात जागा मिळवायला सुरुवात होत होती. राधाच्या जीवनात राजन आनंद भरू पाहत होता. त्याच्या हळुवार प्रेमळ सहवास राधाला अगदी हवाहवासा वाटे...पण दोघांमधला प्रेम बंध दृढ होण्याआधीच माईने तिच्या जवळच्या नात्यातल्या श्रीमंत अशा दिलीपशी राधाचं लग्न ठरवलं..दिलीप बिजवर होता ,वयाने मोठा होता. पण राधाला भावनेत अडकवून माईने कुठलीही कल्पना ने देताच राजन बाहेरगावी गेलाय हे पाहून पटकन लग्न उरकून टाकले...


तशीही घरची परिस्थिती फार खालावत चालली होती. अती लाडाने बिघडलेल्या युवराजने थोडी बहुत असलेली संपत्ती वडिलांना धाक दाखवून स्वतःच्या नावे करून घेतली होती आणि एक दिवस घरातले सगळे पैसे घेऊन पळ काढला होता. त्यानंतर त्याचा काहीच पत्ता लागला नव्हता. आई बाबा आणि राधा कसेबसे जीवन कंठत होते...बाबांनी युवराजच्या कृत्याने हाय खाल्ली आणि त्यांची तब्येत खालावत चालली होती...माईला भरपूर पैसे देऊन दिलीपने राधाशी लग्न करायचे कबूल केले. राधा दिसायला सुंदर आणि कामसू असल्यामुळे दिलीप आणि त्याचे घरचे लोक खूप आनंदात होते...


राधा - दिलीपचे लग्न थोडक्यात उरकले...राधाच्या बाबांची तब्येत जास्तच बिघडली होती त्यामुळे माईने कुठलाच गाजावाजा न करता राधाची पाठवणी केली.

वरात निघाली ...रस्त्यात शंकराच्या देवळात देवदर्शन घेऊन मंडळी पुढे निघणार होती. दोन्ही गाड्या पुढे मागेच होत्या...तितक्यात दिलीपला त्यांच्या जमिनीचा मोठा खटला हरल्याचा फोन आला...खूप नुकसान झाले होते...दिलीप सैरभैर झाला ...खूपच नुकसान झाले होते....तो सतत राधावर चिडचिड करत होता...राधाला तिची काय चूक झाली तेच कळत नव्हते...

नवरी नवरदेव मंदिरात पोचले तेवढ्यात दुसऱ्या गाडीला अपघात झाल्याची बातमी आली... ड्रायव्हर गंभीर जखमी झाला ... सुदैवाने बाकी कोणाला फारसे लागले नव्हते . जिवावरचे शेपटावर निभावले होते.


पण दिलीपच्या घरची मंडळी खूपच बुरसटलेल्या विचारांची होती. 'पांढऱ्या पायाची ' ' अपशकुनी ' ' अवदसा ' असे म्हणून राधाला हिणवले गेले. दिलीपने तर "आता तुझा माझा काही संबंध नाही. मी तुला माझ्या आयुष्यातून काढून टाकतोय ... तुझा रस्ता तुला मोकळा आहे ..." असे म्हणून तिथून निघून गेला...

राधा सुन्न झाली .काय घडतंय तिला काहीच कळेना. तिने सगळ्यांना खुप विनवले...हात पाय जोडले ...पण कोणालाच पाझर फुटला नाही...तिला तिथेच सोडून सगळे निघून गेले...

हतबल झालेली राधा शेवटी आत्मघात करण्याचा निर्णय घेते ...पण माऊलीला एकटीला सोडून जाणे तिला नकोसे झाले होते. त्या निष्पाप जीवाला कोणाच्या भरवशावर सोडायचे ? आता पुढे काय करावे या विचारात असतानाच....


" राणी...तू ...? " अशी हाक तिच्या कानावर आली. तिला प्रेमळ अशी हाक मारनारा एकच होता तिचा जिवलग ' राजन...' राजनला बघताच राधाचा बांध फुटला... भावनांचा वेग ओसरल्यावर राधा ने राजनला सगळी हकीगत सांगितली. तो गहिवरला...राधाला गमावण्याच्या विचाराने त्याच्या काळजात चर्र झाले... राजनचा आश्वासक हात तिच्या डोक्यावरून फिरला. झाल्या प्रकारात राधाची काहीच चूक नाही आणि तरीही असा आत्मघाती निर्णय घेण्याचा विचार केल्याबद्दल राजनने तिला प्रेमाने समजावले आणि पुन्हा काहीही झालं तरी असं करणार नाही याचं वचनही तिच्याकडून घेतलं.... दोघेही परत घरी जायला निघाले अर्थातच माऊलीला सोबत घेऊनच....

घरी काही आपले स्वागत होणार नाही हे राधा समजूनच होती...पण तरीही माईने तिला 

"आता तू आम्हाला मेलीस...आल्या पावली निघून जा ...तुला पोसण आता आम्हाला शक्य नाही..." अशा शब्दात तिची बोळवण केली पण कुठून आणि कसे कोण जाणे पण तिचे बाबा धडपडत उठले...


"माझी मुलगी कुठेही जाणार नाही. ती इथेच राहील ." अश्या कडक शब्दात माईला समाज दिली. मीरा काही इतक्यात हार खाणारी बाई नव्हती .तिने नवीन पवित्रा घेतला...' या घरात एकतर राधा राहील किंवा मी ' अशी धमकी दिली. पण यावेळी मात्र बाबा आपल्या निर्णयावर ठाम राहिले. " राधा इथेच राहणार ... तुला कुठे जायचं तिथे जायला तू मोकळी आहेस .आजपर्यंत तुझं ऐकून मी माझ्या पोटच्या गोळ्याशी किती वाईट वागलो. देव मला माझ्या कृत्याची शिक्षा देतोच आहे. आता तरी मला प्रायश्चित करू दे " असे म्हणून राधाला जवळ घेतले. राधासोबत काहीतरी भयंकर घडल्याची जाणीव बाबांना झाली होती.


आता मात्र माईचा नाईलाज झाला. रागाने पाय आपटत ती आत जाऊ लागली...तितक्यात तिची नजर भेदरून कोपऱ्यात उभ्या असलेल्या माऊली वर पडली...


राधाने माऊलीला आत झोपवले आणि बाबा आणि माईला सगळी हकीगत सांगितली.

"म्हणजे आता ही अवदसा आपल्या सोबत राहणार? खायला काळ आणि भुईला भार. आपल्याच खाण्याचे वांदे झालेत आता या पोरटीला कुठून घालायचे खायला ...? " माईने खूप चिडचिड केली , त्रागा केला पण राधा आणि तिच्या बाबा पुढे तिचं काही चाललं नाही. दातओठ खात ती गप्प बसली.

राजनच्या मदतीने राधाने जवळच्या एका शाळेत सेविकेची नोकरी मिळवली. शिक्षण पुर न झाल्यामुळे राधाला नोकरी मिळणे अवघड होते. म्हणून मिळेल ती नोकरी करायचं तिने ठरवलं. माई , बाबा आणि आता तर माऊलीची सुद्धा जवाबदारी आता तिचीच होती. संध्याकाळी तीन घरी स्वयंपाकाचे काम सुद्धा ती करू लागली.


राधाच्या गोड आणि लाघवी स्वभावामुळे लवकरच ती सगळ्यांची आवडती झाली. माऊली सुद्धा आता शाळेत जाऊ लागली.

अचानक एक दिवस एका शिक्षिकेची तब्येत बिघडली .थोड्या दिवसांसाठी नवीन शिक्षिका शोधण्याऐवजी सर्वानुमते राधाला विचारण्यात आले. साहजिकच राधाने आनंदाने होकार दिला. तिची हुशारी बघून तिथल्या प्रिन्सिपॉल ने राधाला पुढे शिकण्याची प्रेरणा दिली. जात्याच तल्लख असलेली राधाची बुद्धी शिक्षणामुळे अधिकच प्रगल्भ झाली.


राधाच्या अविरत परिश्रमाने आणि सत्शील वृत्तीमुळे आता घरची परिस्थिती जरा सुधारत होती. माईसुद्धा आता बदलली होती. राधाबद्दल तिच्या मनात थोडंसं प्रेम जागृत होऊ पाहत होत आणि माऊलीने तर सगळ्यांना अगदी जीवच लावला होता.


राजन मात्र आता राधा पासून दूर दूर राहत होता. राजनशी लग्न करून सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या राधाची स्वप्ने विखुरत चालली होती. राजन आता तीला पूर्वीसारखा भेटत नव्हता..... खूप विचार करुनही राधाला याचे कारण कळले नव्हते.


राधाची मैत्रीण संगीता माहेरी आली होती. तिला भेटायला म्हणून गेलेली राधा दारातच थबकली... मुल होत नाही म्हणून नवऱ्याने परत पाठवलेल्या संगीताला तिथे सख्खे भाऊ सांभाळायला तयार नव्हते. रडत असलेल्या संगीताला राधा घरी घेऊन आली. आजपासून तू इथे माझ्याच सोबत राहशील असे प्रेमाने समजावले. अश्रुभरलेल्या डोळ्याने संगीताने राधाला मिठी मारली.


संगीता सारख्या आणि माऊली सारख्या अनेक सख्या राधाला जणू आम्हालाही चांगलं आयुष्य जगायचंय असं म्हणतायेत असा भास राधाला सतत होऊ लागला. काय करावे काही सुचेना...काहीतरी करायचे होते नक्की पण काय आणि कसे ? नेहेमी संभ्रम चुटकीसरशी दूर करणाऱ्या तिच्या सख्याला तिने साद घातली. पण खरंच राजनला तिने घातलेली साद ऐकू आली ... नेहेमीप्रमाणे तो तिच्या मदतीला धावून आला. तिच्या ओळखीच्या सगळ्या लोकांना आपली अडचण सांगून मदत मागितली. अनेक लोक मदतीला धावून आले आणि मग राधाचं हक्काचं ' आपलं घर ' तयार झालं.

काही दिवसातच ' आपलं घर ' अनेक सख्यांसाठी खुलं झालं .एकट्या , निराधार अश्या अनेक लहानमोठ्या महिला आनंदाने एकत्र राहू लागल्या.


सगळ्याजणी काही ना काही उद्योग करत आनंदाने जगण्याचा प्रयत्न करत होत्या.' आपलं घर ' हे खरंच आता त्यांच्या हक्काचं घर झालं होतं. सगळ्यांच्या आनंदाच कारण ठरलेल्या राधा साठी सगळ्यांचा जीव तळमळत होता.


' आपलं घर ' आता चांगलंच बहरू लागल होतं. आपल्यासारख्या अनेक सख्यांच आयुष्य मार्गी लागाव म्हणून राधा सर्वतोपरी प्रयत्न करत होती.

आज राधाचा सन्मान सोहळा होता... मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राधाला समजकर्यासाठी पुरस्कार दिला गेला. राधा तिच्या सगळ्या सख्यांना बरोबर घेऊन गेली होती. सगळ्यांच्याच डोळ्यात आनंदाश्रू होते...

राधा दाटलेल्या गळ्यानी बोलायला उभी राहिली... 


"आज आनंदान उभ असलेलं ' आपलं घर ' खरंच एका गरजेतून उभं राहिलं आहे. पण या समाजातून जोपर्यंत स्त्रीला कमी लेखण्याची , मानण्याची वृत्ती जोपर्यंत निघून जाणार नाही तोपर्यंत आपल्याला लढायचं आहे. विधवा , परित्यक्ता , पांढऱ्या पायाची ही आणि यासारखी अनेक दूषणं फक्त स्त्रियांनाच का ? काय चूक असते तिची ...खरी चूक तर या समाजाची आहे .. या वाईट प्रथाना वेळीच आवर घालण्याची खरी गरज आहे...आपण सगळ्यांनी साथ दिली आणि खरंच यावर विचार केला तर या वाईट विचारांवर कुरघोडी करता येईल आणि समाजात सगळेजण एकत्र सन्मानाने राहतील...आम्ही सगळ्या तर आता आयुष्य आनंदात जगतोय पण अश्या अनेक स्त्रियांचे , वृद्धांचे , लहान मुलांचे आयुष्य आम्हाला सुखकर करायचे आहे" टाळ्यांचा कडकडाट झाला.... मुख्यमंत्र्यांनी ' आपलं घर ' ला खूप मोठी देणगी दिली आणि यापुढे कुठल्याही गरजेच्या वेळी मदत करण्याची तयारी दाखवली. पुन्हा एकदा टाळ्यांच्या कडकडाटाने सभागृह दुमदुमले.


राधा आता खऱ्या अर्थाने सगळ्यांची लाडकी ' राधाई ' झाली होती.तिच्या भक्कम आधाराने कित्येक आयुष्य आनंदी झाली होती !


राधा डोळ्यातील आनंदाश्रू लपवत सगळ्यांचे आभार मानत असतांनाच दूर एका कोपऱ्यात हसत कौतुकाने बघणारा राजन तिला दिसला. दोघांची नजरानजर होताच तो तिथून बाहेर पडला.... राधा धावतच त्याच्या मागे गेली आणि शेवटी राजन थांबला...गोड हसत त्याने राधाचे अभिनंदन केले. त्याच्या कुशीत शिरून राधा आनंदाश्रू ढाळू लागली... 


" माझी राणी आज खऱ्या अर्थाने सगळ्यांचे दुःख हरणारी , अवघड परिस्थिती लीलया झेलनारी रांनरांगिनी झाली ...मला तुझा खूप अभिमान आहे. अशीच आनंदात राहा " असे बोलून राजन जाऊ लागला... पण त्याचा हात घ धरून राधा म्हणाली " पण माझ्या राजा हे आयुष्य मला तुझ्यासोबत जगायचं आहे .तू मला सोडून कुठेही जाणार नाहीस असं वचन मला दे ..." 


" ते आता शक्य नाही ... तू कायम सुखी राहा. आता तुला माझ्या मदतीची गरज नाहीये. तू आता स्वतः स्वतःसाठी जग. मला विसरून जा. वचन दे मला की तू कायम आनंदात राहशील " तिचा हात डोक्यावर ठेवून वचन घेऊन राजन निघून गेला...त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे डोळे भरून पाहताना राधा पुन्हा एकदा जुन्या आठवणीत हरवून गेली... राजनच्या वागण्याचा तिला काही केल्या उलगडा होईना...


दिवस चालले होते .' आपलं घर ' आता खूप मोठं , सर्व सोईनी परिपूर्ण अस आनंदवन झालं होतं. एक दिवस वृद्धाश्रमात राधाने राजनच्या आईला पाहिलं... त्यांच्या पायावर डोकं ठेवून ती काकूंच्या कुशीत शिरली... राधा काही बोलायच्या आतच काकू म्हणाल्या " राजन गेल्यावर काही दिवस कसेबसे काढले ग मी त्या घरात पण आता नाही सहन होत... मोठ्या सुनेला मी डोळ्यासमोर नको असते त्यामुळे आता मी इथे येऊन राहायचं ठरवलंय . मला माफ कर पोरी पण राजनच्या मृत्यूच सत्य मी तुझ्यापासून लपवलं पण त्यानेच मला स्वप्नात येऊन शपथ घातली होती तशी...." काकूंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ....


राधाला आता राजनच्या वागण्याचं रहस्य उमगल... प्रेम हे नेहमी आपल्या सोबत असतं , संकटांना सामोरे जाण्याची शक्ती देतं याची प्रचिती तिला आली. देवापुढे तिने हात जोडले. राजनच्या आत्म्याला शांती देण्याची प्रार्थना केली. गोड हसणारा राजन तिच्या डोळ्यापुढे आला ...त्याच्या प्रेमरूपी आठवणीत तो सदैव तिच्यासोबत असणार होता...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy