परीस
परीस
सारं भंगार प्लास्टिकचं सामान एकत्र जमवून ठेवल्यानी जमिनीचा तेवढाच भाग दुरून एका मोठ्या बर्फाळ आयलँडप्रमाणे दिसत होता..
आणि लोकांनी फेकलेल्या खरकट्या पाण्यावर जगून आजूबाजूच्या जमिनीवर छोट्या छोट्या हिरव्यागार निसरड्या शेवाळाच्या बेटांनी जन्म घेतला होता..
आजूबाजूच्या चौफेर गगनी भिडणाऱ्या इमारतींच्या सारख्या दिसणाऱ्या फ्लॅट्स वजा घरट्यांपुढे मध्यभागी ही चाळ ठसठशीत उठून दिसत होती..
आज सतत चालणारा 5 दिवसापासूनचा पावसाचा जोर कमी होऊन सूर्यदेव दर्शनासाठी आले होते,
याचा फायदा उचलत सकाळी उठल्या उठल्या त्या बिऱ्हाडतल्या सगळ्या बायकांनी असतील ते कपडे धुवून एका पत्र्याच्या घरापासून ते दुसऱ्यापर्यंत असलेल्या सुतळीवर वाळत घातले होते,
बाहेर बाजेवर झोपलेल्या राजुला बायकांच्या गोंगाटाने जाग आली..
चिडून राजू दारातून खाली वाकून घरात आला..
त्याच्या मागोमाग मोती कुत्रा शेपूट जोरात हालवत काही खायला मिळेल या अपेक्षेने आत आला,
मोतीला पाहताच आत असलेल्या मंजू मांजरीनं घाबरून आपली स्वारी घराच्या मागच्या बाजूला वळवली..
सकाळ झाली असली तरी पोरं शीला अन ज्ञान्या थंडीनी कुडकुडत झोपली होती,
'मीना, चहा आण की..' राजू बोलणार तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्या अंथरूणाकडे गेलं,
अंथरूण व्यवस्थित करून अगदी नीट ठेवलं गेलं होतं,
आज ती लवकर धुणंभांडी करायला निघून गेलेली होती..
भूक तर लागली होती, पण घरातले सारे डब्बे रिकामेच मिळाले, शेवटी राजुनं चूल पेटवून काळसर बिना दूधचा चहा बनवायला सुरुवात केली..
पत्र्याच्या छोट्या छोट्या छिद्रातून चुलीचा धूर बाहेर पडत होता अन त्याच छिद्रातून सतत पडणाऱ्या पावसानं आतली उंदरांनी केलेली भुसभुशीत जमीन ओली झाली होती..
तोच तोच काळसर चहा राजुने आजही कसाबसा अर्धवट पिला अन आवरून तो कामासाठी निघाला,
तो निघणार तेवढ्यात 1 वर्षाच्या ज्ञान्याला जाग आली आणि राजुला बाहेर जाताना पाहत त्याने सोबत जाण्याचा हट्ट धरत रडू लागला..
आणि त्या आवाजानी शीला पण उठली,
शीला बऱ्यापैकी मोठी आणि समजदार होती,
शाळेत जायचं वय असूनही कामात आईला मदत करायची,
राजुला हे पटत नसलं तरी वेळेचा नाईलाज होता..
शीलाने ताबडतोब उठून प्रसंगावधान राखत ज्ञान्याला बाजूला घेत समजावत बाहेर आली, राजू कामावर त्या चाळीतून पायवाटेने बाहेर पडत होता..
आज येताना मुलांसाठी राम्याच्या दुकानात मिळणारी चांगली बर्फी घेऊन यायची असं ठरवत काम करणं चालू होतं..
आज लोखंडी सामान जास्त असल्यान नफ्याचा आलेख वर होईल, अशा अपेक्षांच्या इमारती राजूचं मन बांधत होतं..
राजुचा भंगार जमा करून विकण्याचा धंदा होता,
आणि शिवाय बाकी तिथे राहणाऱ्या सगळ्याच लोकांचा सुद्धा..
कृष्णा बाहेर टेम्पो घेऊन थांबलेला होताच..
शीला बाजूच्या नळावरून दोन घागरी भरून पाणी आणत होती,
पिवळीच्या पिठाची भाकरी करण्यासाठी तयारी करताना मीना आली,
मीना घरात येताच ज्ञान्यानी पटकन पळत जाऊन तिच्या पायांना मिठी घातली..
रविवार असल्यानं बाजूच्या इमारतीच्या पार्किंग मधून लहान मुलांच्या खेळण्याचे, हसण्याचे आवाज येत होते,
आता शीलाकडे पाहण्याचं धाडस तिच्या डोळ्यांत उरलेलं नव्हतं..
राजू एकदाचा घरी आला की शीलाला आता शाळेत भरती करायचंच असा ठाम निश्चय मनात करून कसंबसं झुरणाऱ्या विचारांना गप्प बसवलं..
धंद्यात थोडा चांगला जम बसला म्ह
णजे, सगळं नीट हवं तसं होईल याची खात्री तिला होती..
संध्याकाळचे 6 वाजल्यापासून मीना राजुची वाट पाहत बसली होती,
6 चे 7 झाले,
तिनं घरातल्या एक कोनाड्यात असलेल्या देवासमोर दिवावात केली..
पत्र्याच्या त्या खोलीतून बाहेर मिणमिणता प्रकाश येऊन काळ्याकुट्ट अंधारात आशेचा एक किरण वाटत होता तो..
वेळ जशी पुढे सरकत होती, मीनाची सारी स्वप्नं एक एक करून मागे होत होती..
8 वाजले तरी राजू घरी पोहोचला नव्हता..
बाजूच्या सखारामला विचारून यावं म्हणून निघणार एवढ्यात टेम्पोचा आवाज कानांवर पडला,
मोठ्या उत्साहाच्या भरात दाराला असलेला साडीचा छोटासा पडदा बाजूला करत ती बाहेर आली,
टेम्पोमधलं सामान जसच्या तसं पाहून काळजाचे पार तडे गेलेले तुकडे सावरत तिची एक नजर राजुच्या हताश चेहऱ्यावर पडली..
तिला काही बोलण्याचा अवधी न देता, 'चालायचंच' म्हणत राजू आत आला..
राजू हातपाय धुवून आला..
घरात चारच लोक असली तरी घर भरल्यासारखं झालं होतं,
मीनानं सगळ्यांना ताट तयार केली, पुन्हा तीच पिवळीची भाकरी, पातळ दाळ पाहून राजू काही क्षण तसाच बसला,
पोरांकडं पाहून जेवायला सुरुवात केली खरी पण एक एक घास दगडं गिळल्यासारखा भासत होता..
जेवणं झाली,
घरातला दिवा आता मालवला होता,
मीना आत पोरांना घेऊन झोपली होती..
दिवसभर गोंगाटाने ग्रस्त असलेली चाळ शांत झाली होती,
दिवसभराच्या श्रमांची जागा झोपेनं घेतली होती,
काही न बोलता थकलेल्या शरीरानं सारं अवसान राजुनं बाहेरच्या बाजेवर टाकलं,
मधूनमधून चाळी बाहेरच्या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचा प्रकाश ये जा करत होता,
सारी शांतता त्याला भयाण जाणवत होती,
बाजेवरचा प्रत्येक दोर त्याच्या पाठीला जाणवत होता,
डोळ्यासमोर फक्त भंगार सामानाने गच्च भरलेला टेम्पो झोपल्यामुळे आडवा दिसत होता..
काहीही झालं तरी उद्या काम झालंच पाहिजे हा एकच विचार मनी ध्यानी घुटमळत होता,
ते नाही झालं तर काय, या विचाराला शिवायचे त्राण त्याला जर्जर करून टाकणारे होते,
तो विचार करणं त्यानं टाळलं होतं..
स्वतः चे गरम न दमलेले श्वास त्या किर्र रात्रीत नकोसे झालेले होते..
अंधार अजूनच जास्त दाटून आला होता, त्या अंधारात कधी झोप लागली त्याला कळलं पण नाही,
रात्र जरा जास्तच मोठी होती..
सकाळीच उठून सारी तयारी राजुनं केली अन बाहेर पडला,
आज धंदा चांगला झाला,
केलेली मेहनत अन कष्टाचं आज चीज झालं होतं,
आज चांगलाच नफा राजुला झाला होता,
लवकर घरी येऊन कधी एकदा मीनाला अन पोरांना भेटतो असं झालं होतं त्याला,
शीलाला आता लवकरात लवकर शाळेत दाखल करायचं,
इथून बिऱ्हाड हलवून थोडं चांगल्या जागी राहायला जायचं,
घरात थोडं चांगलं खायला येणार,
आणि कितीतरी..
येता येता राम्याच्या दुकानातून काल न घेता आलेली बर्फी त्यानं मोठ्या समाधानानं विकत घेतली,
घरी मुलांसोबत त्या बर्फीचा आस्वाद घ्यावा या विचारमंथनानच बर्फीची चव कशी असेल याचा अंदाज बांधत झपाझप पाऊलं घराकडे वळवत होता..
घरी आल्याबरोबर बर्फी पाहून पोरं भलती खुश होती, मीनाच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते..
हातात घेतलेली बर्फी तोंडात टाकणार तेवढ्यात बाहेर टपोऱ्या थेंबांचा पाऊस सुरू झाला,
बाहेर बाजेवर झोपलेल्या राजुची झोप ताडकन उघडली,
आणि पावसाबरोबर पहाट होत होती..