पाऊलवाट
पाऊलवाट


काल झोपच आली नाही 3 नंतर, शेवटी वाट पाहात बसले उजाडण्याची..
सकाळी 5-5.30 च्या दरम्यान, खिडकीत बसून ब्रश करत असताना खाली जी छोटी चाळ आहे तिथून पायवाटेवरून 2 मुलं जात होती..
साधारण 7 एक वर्षांचा ते छोटं पोर आणि त्याच्यासमोर त्याचा तो बऱ्यापैकी मोठा भाऊ असावा,
एवढ्या लहानशा वयात ते छोटं पोर आपल्या दादाच्या बरोबरीनं कुठूनतरी पाणी घेऊन जात होते, मोठ्या भावाच्या खांद्यावर मोठी कॅन असली तरी या लहान जिवानी पण वयाच्या मानानी मोठाच हंडा पेलला होता..
अर्धी पाऊलवाट संपली होती त्यांची, पण त्याच मातीच्या पाउलवाटेवर अनवाणी पायांनी खडे, दगड हे सगळं सहन करत चाललेला तो छोटा मुलगा दमला, अचानक हंडा खाली ठेवुन बसला आणि त्याच्या दादाला आवाज दिला, पण तो हाकेच्या अंतरावर नव्हता, झपझप पाऊले टाकीत तोही पुढे गेला होता, तरी हाच उठला आणि पुन्हा चालू लागला, मनात वेगळीच कालवाकालव उठली होती, सूर्यदेव येण्याच्या तयारीत होते तरी प्रकाश अजून मंद होता, पाखरं चिवचिवाट करीत होती..
मी तशीच बसून होते, तोंडात ब्रश ठेवून,
तेवढ्यात पुन्हा त्याची एक ताई, त्याचा दादा आणि तो पाणी घेऊन जात होते,
आता मात्र पाण्याचा भार फक्त ताई आणि दादाकडे होता..
ताई सगळ्यात पुढे होती, आणि हा दादाच्या हातात हात धरून अनवाणी पायांनी उड्या मारत जात होता..
उजाडलेल्या सूर्यप्रकाशात आता सगळं स्पष्ट दिसत होतं,
आणि अगदी मी खिडकीतून उठल्यावर माझ्या पायात घातलेली स्लीपर सुद्धा..