यू वेअर राईट गुगल बाई!
यू वेअर राईट गुगल बाई!


आज शेवटचा दिवस मोपेडवर, उद्यापासुन कॅब..
मॅप्सवर स्टार्ट बटन दाबलं,
तसं गुगल सुरू झालं,
"यु शुड रिच युअर डेस्टिनेशन बाय 7:20 पी एम.."
5:50 ला मी आऊट केलं होतं..
4 दिवसांपासून गाडीवर 23किमी किंवा त्यापेक्षाही जास्त येणं अन् तेवढंच वापस जाणं,
कारण गुगल बाबा प्रत्येक वेळेस कमीत कमी वेळे साठी वेगवेगळे रुट्स दाखवत होता..
पण मी पण आज प्रत्येक पॉईंट्स लक्षात ठेवत आले होते येतांना..
बाहेर पडतांना एक कुत्रं मला जेवढं गाडी चालवायला जीवावर आलं होतं त्यापेक्षा कमीच आळशीपणानी रस्त्यावर लोळत होतं,
गुगल बोलत होता, सॉरी होती, 'ती'चाच का आवाज दिला असेल? असो पण ते मी हेडफोन्स कानात टाकून मन लावून ऐकत होते, गूगलला वेड्यात जे काढायचं होतं,
एवढे दिवस मला वेगवेगळे रुट्स दाखवुन मला वेड्यात काढलं,
याचा बदला म्हणून,
ही डील डोक्यात पक्की होती आज..
कंपनीच्या थोडं बाहेर पडे पर्यंत आकाश निरभ्र अन् रस्ता पार मोकळा होता..
एक मोठा आनंदाचा श्वास घेतला,
बाहेर काय पडले,
थोडं लवकर घरी पोहोचेन अन् गुगल मॅप्सला खोटं ठरवेन या आनंदावर हळूहळू विरजण पडायला सुरुवात झाली,
यु नो स्लो पोयसनिंग..!
कोई नही, ट्रॅफिक मागून दिसत होती, पुढच्या 100-150 मीटर मध्ये रस्ता मोकळा असेल ,
पण पुढे पूल होता, हे फक्त गुगल बाईंना ठाऊक होतं..
आनंदात रस्ता मोकळा दिसला अन् गाडीची स्पीड आपोआप वाढली..
700-800 मीटर मध्ये पूल संपला, आणि त्या संविधान चौकात तुफान गर्दी, जीव कासावीस होत होता ते पाहून..
तरी एक तरुण याच संविधान चौकात पोलीस असतांना, सिग्नल सुक्सेसफुली तोडून पसार झाला, पोलिसांच्या हातावर तुरी देत, शाब्बास रे!
आणि मी थांबलीये सिग्नलचा हिरवा लाईट लागायची वाट पाहात..
वाट पाहता पाहता, सरप्राइज म्हणून इंद्र-देव खूप प्रसन्न झाले,
कृपेचा प्रसाद म्हणून सगळ्या IT च्या लोकांनी आपापले ब्रँड न्यू प्रीमियम क्वॉलिटी रेनकोट चढवले..
आता रस्त्यावर त्यांच्या युनिक आयडेंटिफिकेशन मध्ये हेल्मेट आणि गाडीच्या कलर्स सोबत रेनकोटचे पण कलर जमा झाले होते, एकमेकांना ओळखायला..
येताना सुरुवातीच्या रस्त्यावर पाऊस होता आणि जाताना पण..
एकामागे एक थांबलेल्या 4 व्हीलर्स बाजूच्या छोट्या रस्त्यानं जातांना, माझ्या गाडीला मात्र आपण VIP रेड कार्पेट वरून जातोय आणि या 4 व्हीलर्स आपल्या स्वागताला थांबल्या आहेत शिस्तीत तेही असं वाटत होतं..
काही ठिकाणांवरुन इंद्र-देवाचं लॉजिक चुकल्यासारखं वाटत होतं..
पुढच्या सिग्नलवर एक मियाँ आपल्या मुमताजला रामप्यारी नावाच्या मडगार्ड असलेल्या सायकलवर मोठ्या ऐटीत वाट काढत घेऊन जात होता, त्याची स्पीड 4 व्हिलरच्या स्पीडला या गर्दीत मात देत होती..
आता पुन्हा एकदा रस्ता ओला पण मोकळा होता, इंद्र-देव दुसरीकडे बिझी होते, थोडक्यात सर्व्हर लोड बॅलेंसिंग जमलेलं नव्हतं.. तुरळक डोकी दिसणाऱ्या या रस्त्यावर विचारांना आता जागा मिळाली,
गाडी बंद पडली तर?, पंक्चर झाली गाडी तर?, आज अंधार लवकर पडला तर?
क्षणात मन कावरबावर झालं,
इथे स्पीड वाढायची ती विचारांची वाढली आणि गाडीची कमी..
कोणीतरी हिप्नॉटाईस केल्यासारखं खडकी बाजार आला तसं मुंग्यांसारख्या त्या रांगात मी मात्र उद्दिष्ट विसरून एक गाडी मागे एक सगळे जसे जात होते तशी मी पण निघाले..
भलत्याच रस्त्यावर कधी वळाले हे वळल्यावर कळलं,
सगळे रस्ते सारखेच दिसत होते..
बसा आता, गूगल आधी स्वतःच स्वतःला हरवलं होतं,
गूगल बाईंनी बिना खेळता गेम जिंकला होता,
आता तिचंच ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता..
वैतागलेल्या मनस्थितीत इंद्रदेवांची पुन्हा उपस्थिती लागली..
"शिगेला पोहोचलेला राग कोणावर काढणार?
घरी कसं आई-बाबा, भावावर निघतो ? आता कर राग, बोल.."
माझंच दुष्ट मन त्रास देत होतं..
"टेक द नेक्स्ट राईट अँड कँटीन्यू स्ट्रेट ऑन गणेश खिंड रोड फॉर 2 किलोमीटर्स.."
या वेळेला गणेश खिंड म्हणताच डोळ्यासमोर तारे चमकायला लागले..
पिक्चरमध्ये जसा फॉग सोडतात तशी एन्ट्री करत मी अन् सोबतचे लोक निघत होतो,
फक्त फरक होता तो फॉग काळा अन बाजूने जाणाऱ्या ट्रकचा होता..
साऱ्या गाड्या एकाच व्हर्च्युअल बस मधून 20च्या स्पीडने जात होत्या..
याच व्हर्च्युअल बसमध्ये एक होते रागीट अन् पांढरी मिशीवले deo गाडीवरचे काका, आर्मी मध्ये असावेत असा अंदाज..
घुसखोरी करत मार्ग काढत होते, त्यांच्या डाव्या बाजूला मी म्हणून थोडं उजवीकडे वळणार की एक मुलगी उजव्या बाजूने आली..
तिरप्या नजरेनं हळूच त्यांची झालेली अवस्था आणि राग पाहून मनोमन हसू येत होतं.. या ट्रॅफिक मधून बाहेर लगेच निघणं म्हणजे जोक करणं होतं..
मी थोडी पुढे गेल्यावर, डिस्टंट मिरर मध्ये त्यांचा चेहरा अजूनच लाल दिसत होता.. पुन्हा प्रयत्न केले त्यांनी पण नशीब, मागेच राहिले.. असो, पण त्यांचं घर आलं असावं आणि त्यांनी लेफ्ट टर्न घेतला..
आणि रस्त्यावर थोडी जागा वाढली,
ही व्हर्च्युअल बस आता सगळ्यांनाच आपापल्या स्टॉप वर सोडत होती..
पुढचा रस्ता माझ्या सबकॉनशिअस माईंडला अंगवळणी पडलेला होता, गुगल बाई अजूनही कर्तव्यदक्ष होत्या पण साऱ्यांच्या डोळ्यात निद्रादेवी प्रसन्न होती, माझ्या पण..
माडगूळकरांच्या चिमण्या घराकडे परत फिरत होत्या अपुल्या अपुल्या..
"यु हॅव रिचड युअर डेस्टिनेशन", गुगल बाई बोलल्या,
घड्याळात 7:23 pm वाजलेले होते..