ओपन माईक वर ओपन माईंड?
ओपन माईक वर ओपन माईंड?
माईकवर बोलतांना कोणी लक्ष देत नाहीये ही प्रचिती आल्यावर शरीरातून वाहणाऱ्या रक्तापासून ते बाहेर तळतापायाला येणाऱ्या घामापर्यंत साऱ्या प्रक्रियांची जाणीव कानापाशी नकळत वाजणारा बीप करून देत होता..
तरीही मी बोलत होते,
उभं राहून बोलू कसं हे सुचणं केव्हाच बंद झालेलं होतं,
हातांत मोबाईल होता, मोबाईलमध्ये जे वाचायचं आहे सगळं होतं,
येईल तशी ओळ वाचत होते, शाळेत जसं धडे वाचायला लावतात तसं..
निदान आजतरी अशी वेळ ओढवेल असं आजिबात ध्यानीमनी वाटलं नव्हतं,
"आपकें पास 3 मिनिट हैं, वक्त में खतम कर देना, अगर टाईमआऊट हुआ तो, यु विल गेट अ फ्लॅश ऍज अलर्ट!", असं तिथे coordinate करणारा आधीच सांगून गेला होता, मला दुसऱ्या क्रमांकावर वाचन सादर करायला बोलावून..
याआधी कधी स्टेजवर बोलायची सवय नव्हती शाळेनंतर,
शाळेत चौथीत असतांना पहिल्यांदा वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता तसं वाटत होतं,
तेव्हा विषय होता - 'गोविंदभाई श्रॉफ'!
ईच्छा नसताना बाबांनी भाषण लिहून दिलं म्हणून भाग घेतला खरा,
पण स्टेजवर गेले, सुरुवात केली, 2 - 3 वाक्यं बोलले,
आणि विसरले पुढे काय बोलायचं..
मनाच्या कोपऱ्यावर पार रडू फुटत होतं,
आज आताही स्थितीत फार फरक जाणवत नव्हता,
फक्त हातात काय बोलायचं हे एवलेबल होतं..
वाचत एक होते, पण विचार भलतीकडेच खेचत होते..
"मी तर त्या coordintor ला विचारलं होतं, शॉर्टलिस्टचा इमेल आल्यावर की, 'मी मराठीत बोलेन, हिंदी - इंग्लिश नाही, शिवाय कविता नाही, माझा अनुभव आहे'..
तो सगळं हो म्हणाला म्हणूनच तर आज इथे उभी आहे"
एकंदरीत हालचालीवरून ज
मलेले सारे जणू परग्रहावरची भाषा बोलत आहे असे माझ्याकडे पाहत होते..
आता फक्त जे काही मोबाईलमध्ये दिसत होतं संपवायचं होतं भराभर अन कधी एकदाची जाऊन बसते, असं असह्य झालं..
थँक्स म्हणलं अन येऊन बसले, फॉर्मलिटी म्हणून टाळ्या वाजल्या,
पुन्हा coordinator ने सूचना दिली, वेळेत संपवा, अर्थात मी थोडा वेळ त्याच्याकडून हिसकवला होता..
मागे हळूच वळून पाहिलं आलेले मित्र मैत्रिणी हे पाहून पसार तर नाही झाले, पण होते तिथेच..
स्वतःवर नाखूष असण्याचं दुःख भलत त्रासिक आणि बोचरं, जी मी तेव्हा होते आणि पहिल्या वक्तृत्व स्पर्धेच्या भाषणात सुद्धा..
माझी झालेली चुकी मन शोधण्यात गुंग होतं, नंतर येणारे काय सादर करत होते यातही लक्ष नव्हतं, मी चांगलं नाही झालं म्हणून आईला मेसेज करून सांगत होते..
पण जेव्हा शाळेत भाषणात मी अडखळले होते तेव्हा सगळे हसायला लागले,
ते हसणं ऐकून दोन मिनिटं शांत थांबले,
भाषण बाबा सांगतांना जसं जसं लिहून घेतलं, त्या शब्दांत ते भाषण मांडलं बाकीचा काहीही विचार न करता,
आजही पुन्हा तेच झालं, फक्त बोलत गेले..
जे बोलत आहे त्याचा अर्थ न समजावून घेता..
शाळेतलं भाषण न अडखळता "जय हिंद..!" म्हणून जेव्हा संपवलं,
मुख्याध्यापिका कांबळे बाईंनी स्वतः उठून पाठीवर शाबासकीची थाप दिली होती, तेव्हा उमगलं आपलं भाषण झालं व्यवस्थित समजेल असं,
आणि आज या साऱ्या अनोळखी गर्दीत खाली बसल्यावर आईला मेसेज करताना पाहून, मागून खांद्यावर एकीने हात ठेवून म्हणलं, "मी पण मराठीतच प्रेसेंट करणार आहे, काळजी नको करू..
छान स्टोरी होती, मस्त बोललीस तू..!"