लेव्हल अप
लेव्हल अप
सारखं म्हणत असतोस, "लेव्हल अप हो",
पण मला हे वाक्य नेहमी निरर्थक वाटत आलं..
कित्ती करणार ना लेव्हल अप?,
वाटतं कुठंतरी थांबून जरा श्वास घ्यावा, थोडा वेळ निवांत घालवावा,
या एका इनविसीबील मोजण्याइतकी त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाच्या कक्षेत..
.
.
.
सारखं किती पळायचं?
या कक्षेत मावणारे ४ लोकं जवळ असावेत,
मग त्यात ५ व्या व्यक्तीचा केस मावेल एवढी पण जागा नसावी.
कारण त्या कक्षेचा प्रत्येक बिंदू माझ्या परिचयाचा असावा,
आणि मी तो मोजत असतांना तू ती त्रिज्या खेचतोस.
अजून ठोकताळे करण्यात वेळ जाणार, माझी चिडचिड होते,
पुन्हा सारे कॅलक्यूलेशन बदलणार,
तरीही तू सर्वतोपरी प्रयत्न चालू ठवतोस.
.
.
.
परवा या जागी जाऊन आले,
बाकी सगळे होते, तू नव्हतास..
निघेपर्यंत राहून राहून खूप मोठी पोकळी जमा झाल्यासारखं वाटत होतं,
कानात ब्लॉक झाल्यावर काही ऐकू येत नाही तसंच काहीसं..
निघाल्यावर जास्त लक्ष रस्त्यावरच्या पहाटेच्या दाट धुक्यानं घेतलं.
अगदी जवळच्या गोष्टी तेवढ्या स्पष्ट दिसत होत्या, बाकी सारं दूरचं अदृश्य,
अगदी मला हवं तसं!
खाली गावात गाडी लावून ट्रेकला सुरुवात केली,
पुन्हा कशाचा फोटो काढला नाही, रुखरुख लागायला नको याची काळजी घेत प्रत्येक फोटो काढत वर चढत होते..
थोडं चढल्यावर उजडायला सुरू झालं,
फोटो काढण्यातून उसंत घेऊन मागे वळून बघितलं तर, सेम लेव्हलला असणारा धुक्याचा थर स्पष्ट दिसत होता, अजून वरतीही बरेच होते,
सूर्य अजून वर आला तर कित्ती चांगल्या वेळेला मी मुकणार!
विचार करत पावलं पटापट डोळ्यांच्या हावरट भावनेपायी वर पळू लागली,
प्रत्येक ठिकाणचा फोटो काढायचा या विचाराला सोडून देत
आणि
त्या एका जागेवरून डोळ्यांत सारं सामावून घ्यायचं, या एका विचाराचा ध्यास धरत..
प्रत्येक बिंदू न मोजता मी फक्त वर चढत होते, तू वाढवलेल्या त्रिज्येच्या रस्त्यावरून..
आणि हा फोटो काढतांना डोक्यात प्रकाश पडत होता,
"कक्षेतली पोकळी भरलीये..!"
तुझ्या त्या एका वाक्यानं,
"लेव्हल-अप!"