इमारत
इमारत


लहानपणापासून नेहमी या जागी जाते
प्रत्येक वेळेस सोबत कोणी ना कोणीतरी असायचं .
.
आधी प्रश्न पडायचे, कसं बांधलं असेल सगळं? काय काय वापरलं असेल? आता का नाही बांधता येणार?
आधी आईबाबा सोबत जायचो तर ते प्रश्नांना उत्तरं द्यायचे,
इकडे तिकडे त्या भिंतींना हात लावत, कमानींमधून फिरणार,
नजर जाईल तिथपर्यंत वर चारदा पाहत राहणार,
मिनारांवर बसणारे पक्षी मोजत राहणार,
कारंज्यांच्या खड्यात उडी मारून पाहणार,
मग कोणी नवीन नातेवाईक आले की त्यांच्या सोबत जाऊन जेवढं काही माहिती ते सारं एखाद्या खूप माहिती असलेल्या गाईड सारखं त्यांना सांगायचं..
.
.
थोडे शिंग फुटल्यावर आईबाबा किंवा नातेवाईकांसोबत जाणं बंद झालं आणि ती जागा मित्रमैत्रिणींनी घेतली..
हे स्कल्पचर कॅमेराच्या कोणत्या अँगल मध्ये चांगलं दिसेल या प्रश्नांची उत्तरं शोधण्यात इथे वेळ जायचा..
किंवा आधी ज्या कारंज्यात उडया मारायचो त्यातच प्रतिबिंब शोधत फोटो काढायची धडपड करायचो..
.
.
आणि आता मात्र सगळे ज्याच्या त्याच्या कामात बिझी..
म्हणून काही दिवसांपूर्वी एकटीच गेले,
त्याच भक्कम भिंती, तेच दरवाजे,
तेच मिनार..
सगळं तस्सचं उभं होतं..
आज कोणी सोबत नाही याची आजिबातच खंत वाटत नव्हती,
काही लहान मुलं आईबाबांसोबत आले होते,
काही उत्साही पोरं आज त्याच कारंजाच्या पाण्यात वाकून वाकून फोटो काढत होते,
काही प्रश्न आजही होते,
नेहमी सारखं कॅमेराही सोबतच होता, पण आज कुठलाच अट्टहास नव्हता,
आज फार फोटो न काढता किंवा प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पळत न फिरता,
फोटो काढले खरे पण एका क्षणाला तो ठेऊन देऊन एका मिनाराच्या पायथ्याशी तशीच बसले ती भव्य इमारत पाहात..
आज फक्त बसून राहिले..
.
.
आज मी इमारतीला पाहिलं तर माझेच मागचे सारे ठोकताळे ती माझ्यासमोर उभी करत होती,
माझ्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं देत,
एक प्रतिबिंब म्हणून एकाच फोटोग्राफमध्ये,
आणि तिथुन पाय काढतांना, पुन्हा कधी इथे येणार प्रश्नांची उत्तरं सापडायला?, विचारत आजही उभी होती
पण तोपर्यंत तिच्या भिंतींसारखं भक्कम
त्या साऱ्या नक्षीदार दरवाजांसारखं
कमानींसारखं फ्लेक्सिबल
नजर जाईल तिथपर्यंत पण पाया मजबूत असणाऱ्या मिनारांसारखं
मनाला बनवायला सांगत..