प्रेमवेडे
प्रेमवेडे


राघव आणि निशा दोघेही कॉलेजमधले क्लासमेंट्स, दोघांची ओळख बीएच्या प्रथम वर्षाला झाली. निशा आणि राघव दोघेही त्यांच्या गावात पुढील शिक्षणाची सोय नसल्यामुळे शहरात शिक्षणासाठी आले होते, पण दोघेही वेगवेगळ्या गावावरून. निशा दिसायला सुंदर, लांब काळेभोर केस, नेहमी टॉपटीप राहणारी... आणि विशेष म्हणजे खूप मनमिळाऊ आणि नेहमी हसतमुख असं तिचं एकंदरीत व्यक्तिमत्व... राघव पण उंचापुरा, देखणा, सावळा, बोलक्या डोळ्यांचा पाहताक्षणीच कुणीही त्याच्या प्रेमात पडेल असं व्यक्तिमत्व...
याच वर्षी दोघांचं एमए झालं. आता दोघेही आपआपल्या गावी परतणार. खरंतर दोघेही एकमेकांवर प्रेम करायला लागले होती, पण पहल करण्यास दोघेही धजावत नव्हते. राघवला बरेचदा वाटायचं आपण सांगावं, पण त्याला माहिती होतं, निशा घरची खूप सधन, तिच्या मानाने मी गरीबच... तिच्या घरचे मला कधीच स्वीकारणार नाहीत. म्हणून तो ह्या विषयावर बोलणं टाळायचा. पण त्याला काय ठाऊक, निशासुद्धा त्याच्यावर खूप प्रेम करते.
आज शेवटचा पेपर संपला, सर्व मित्र-मैत्रिणींनी कुठेतरी निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला जायचं ठरवलं. कारण आता सर्वांची भेट केव्हा होणार म्हणून सर्वांच्या सहमतीने दोन दिवसांची ट्रीप अरेंज केली. पण राघव मात्र तयार नव्हता.
निशाने त्याला विचारलं, "का रे, तू नाही येणार ट्रीपला"
राघव-नाही! मी आजच गावाला जायचं ठरवलंय.
निशा- अरे, थांब ना रे दोन दिवस आणखीन! Please माझ्यासाठी!
राघव- दचकून! काय म्हणालीस?
परत एकदा म्हण...
निशा- हो ! माझ्यासाठी...
बरेच दिवसांपासून सांगेन म्हणते, पण तुझ्याकडून होकाराची वाट बघत होते. पण आज मला राहवले नाही.
राघव- हे काय बोलतेस तू निशा!
मी पण तुझ्यावर प्रेम करतो गं... पण... हे शक्य नाही ग... तुझ्या घरचे नाही मानणार...
निशा-ते सर्व माझ्यावर सोड. माझे बाबा ऐकतील माझं, मी सांगेन त्यांना...
राघव- तू खरंच प्रेम करतेस माझ्यावर!
निशा- हो ! आत्ताच तर सांगितलंय....शंका आहे तुला! चलशील ना तू ट्रीपला... तू नाही आलास तर मी पण नाही जाणार.
राघव- अग हो गं राणी... येईन मी...पण एका अटीवर
निशा- आता आणखी कोणती अट?
राघव- तू ना...मला... I Love You बोल... फक्त एकदा... मगच मी येईन.
हे ऐकून निशाच्या गालावर लाली पसरली, हॅट... हे रे काय! म्हणतच ती धावतच मैत्रिणींमध्ये गेली. तिथून ती राघवला बघत होती, आणि राघव पण तिला बघून गालातल्या गालात हसत होता.
आज त्यांची ट्रिप गेली, निशा, राघव, बरेच मित्र मैत्रिणी. छान अंताक्षरी रंगली होती. एक मुलांचा आणि एक मुलींचा ग्रुप. एक से एक गाणे... दोघेही प्रेमवेडे रंगून गेले गाण्यांच्या रंगात. पण राघवला मात्र प्रतीक्षा होती, निशाच्या तोंडून ते "तीन शब्द" ऐकण्याची. निशासुद्धा राघव आपल्याकडे बघतोय, हे बघून अजूनच लाजरीबुजरी व्हायची. तिचं हे लाजणं, मुरडणं राघवला अजूनच घायल करत होतं.
एकदाचं ते ठिकाण आलं... छान हिरवीगार वनराई, विविध पक्षी, पाण्याचे झरे, डोंगरावरून पडताना त्याचा आवाज... मन मोहित करणार ते मनमोहक दृश्य कुणीही पहावं आणि त्याच्या प्रेमात पडावं आणि अशा नयनरम्य वातावरणात ही प्रेमवीर जोडी. दोघेही हातात हात घालून ते दृश्य डोळ्यात टिपत चालले होते.
राघव- निशा!....बोल ना.
निशा- काय?
राघव-"ते तीन शब्द"
तिथे समोरच एक छोटंसं पडकं घर होतं, आजूबाजुला विटांचा ढीग, मातीचा खच पडलेला होता. ती धावत जाऊन तिथे लपली. तिच्या छातीचे ठोके वाढले होते. छाती धडधड करत होती. तिने आपले दोन्ही हात आपल्या छातीवर ठेवले, डोळे गच्च मिटले... आणि दरवाजाच्या आडोशाला उभी राहिली, एक मिनिट स्तब्ध. ती कदाचित मनाची तयारी करीत असावी.
राघव पण लगेच तिच्या मागेमागे आला.पण तो मागच्या बाजूला लपून होता.
निशा आता थोडी सावरली आणि दाराच्या आडोशातून बाहेर बघू लागली आणि तिला तो पाठमोरा उभा दिसला...
ती दबक्या पावलाने त्याच्या मागे जाऊन त्याचे डोळे झाकते, आणि त्याच्या कानात हळूहळू "ते तीन शब्द" म्हणते.
राघव तिचे दोन्ही हात धरून तिला समोर घेतो आणि आजीवन साथ देण्याचं आश्वासन देतो.