Deeplaxmi Jadhav

Drama Romance Inspirational

3  

Deeplaxmi Jadhav

Drama Romance Inspirational

प्रेमकथा-फिटे अंधाराचे जाळे

प्रेमकथा-फिटे अंधाराचे जाळे

3 mins
596


रिमझिम पावसाची हलकीशी सर येऊन गेली होती. सारा आसमंत ताजातवाना झाला होता.  कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसून माधव वृंदाची वाट पाहत होता. मेडिकल कॉलेजचे शेवटचे वर्ष होते आणि तो धीट क्षण आता आला होता..... माधवने वृंदाला लग्नाबाबत विचारले.


खरं तर गेल्या चार वर्षापासूनची मैत्री तर होतीच. पण आयुष्याचा निर्णय घ्यायचा तर असा एकदम घेऊन चालणार नाही हे समजण्याइतकी वृंदा नक्कीच परिपक्व होती. थोडे दिवस विचार करुन तिने आपला होकार त्याला कळवला.


दोघेही हुशार, परिपक्व, आवडीनिवडी समान असणारे आणि आयुष्यात काहीतरी महत्त्वकांक्षा बाळगणारे होते. वृंदा सुस्थितीतील मध्यमवर्गीय घरातली मुलगी तर माधव शेतकरी कुटुंबातील आणि आर्थिक स्थिती बेताची असणारा आणि स्कॉलरशिपवर शिकलेला मुलगा होता.


दोघांच्याही घरी एकमेकांचे जाणे झाले होते आणि खरे पाहता विवाहाला आडकाठी येण्याचा काही प्रश्न नव्हता. पण....... एक गोष्ट होती जी वृंदाच्या आई-वडिलांना खटकत होती. माधवला स्पर्धा परीक्षा द्यायच्या होत्या. त्याचा गरिबीतून आलेला महत्त्वकांक्षी स्वभाव त्याला पुढे जाण्याची साद घालत होता आणि वृंदाची त्याला अर्थातच साथ होती. पण स्पर्धा परीक्षा देण्यासाठी लागणारा आर्थिक पाठिंबा देण्याची कुवत दोघांच्याही कुटुंबात नव्हती.  त्यासाठी लागणारा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टींमुळे आपल्या फुलासारख्या जपलेल्या मुलीची परवड तर होणार नाही ना.... त्या कठीण काळात हे नाते टिकेल का? यशाची कोणतीही खात्री नसताना हे पाऊल उचलावे का... यासारख्या विचारांमुळे त्यांनी लग्नाला विरोध दर्शवला.  पण वृंदा ठाम होती. लग्नानंतर पहिली काही वर्षे नोकरी करून तुला आर्थिक पाठिंबा देईन, असे वचन तिने माधवला दिले होते.


मेडिकलचे शिक्षण पूर्ण होताच हो-नाही करत घरच्या लोकांच्या थोड्या नाखुशीनेच दोघांचा विवाह अत्यंत साधेपणाने झाला. पण खरंच प्रेमकथेची यशस्विता विवाह झाला की होते का? खरी परीक्षा विवाहानंतर असते, त्यात यशस्वी ठरला तर ही प्रेमकथा किंवा प्रेमविवाह यशस्वी ठरला असे आपण म्हणू शकतो.


विवाहानंतर वृंदाने पुण्यात एका हॉस्पिटलमध्ये नोकरी सुरू केली आणि माधवने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची तयारी सुरू केली. काटकसरीने संसार सुरू झाला. परीक्षेची काठिण्यपातळी इतकी होती की प्रथम प्रयत्नात अपयश आले तेव्हा नातेवाईकांनी कुचेष्टा करायला सुरुवात केली.


"डॉक्टर असूनही कशाला या बेभरवशाच्या परीक्षा द्यायच्या?" इथपासून ते "वृंदा कशी चुकली..." इथपर्यंत.... सारे काही त्यांना ऐकावे लागत होते. त्यातूनच त्यांचे वादही होत, पण तरीही त्यातून सावरत धडपडत वाटचाल सुरू होती.


लग्नानंतर चार वर्षे झाली तरी मुलबाळ नाही, कोणतीही आर्थिक प्रगती नाही, हे आपल्या समाजाच्या दृष्टीने "काहीतरी प्रॉब्लेम आहे" इतका निष्कर्ष काढायला पुरेसे होते आणि त्याला तोंड द्यावे लागत होते ते दोघांच्या आई-वडिलांना! मग हळूहळू त्यांचे सण समारंभात जाणे कमी झाले. आर्थिक मदत मागतील म्हणून नातेवाईकांनीदेखील तोंड फिरवले. पण एकमेकांवरचे प्रेम, विश्वास या बळावर त्यांचा प्रवास सुरू होता. आर्थिक, सामाजिक, मानसिक पातळीवरची ही लढाई त्यांनी नेटाने सुरू ठेवली. महत्त्वाकांक्षा, जिद्द पूर्ण करायची असेल तर काटेरी वाटेवर जावे लागते हे आजपर्यंत वाचलेले विधान आता ते दोघे प्रत्यक्ष अनुभवत होते.


लग्नाला सात वर्षे झाल्यावर वृंदाने 'अपत्याचा विचार करू'  असे माधवला सांगितले. वाढणारे वय, वाढलेली आर्थिक ओढाताण, स्पर्धा परीक्षेचा तिसरा आणि शेवटचा प्रयत्न, सामाजिक दबाव या सर्वात पूर्ण खचून गेलेला माधव जबाबदारी घ्यायला कचरत होता... पण तरीही दोघांनी तो निर्णय घ्यायचा ठरवला.


घरात बाळ येणार ही खरंतर आनंदाची गोष्ट... पण त्या दोघांना जबाबदारीच्या जाणिवेने चिंतातूर केले होते. त्यातच वृंदाचा नववा महिना आणि माधवची शेवटच्या प्रयत्नाची शेवटची परीक्षा एकत्रच होती. 


पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने त्याने परीक्षा दिली आणि पंधरा दिवसांनी वृंदाने एका गोड मुलीला जन्म दिला. बाळाच्या आगमनाचा आनंद तर होताच पण..... परीक्षेच्या नव्हे तर आयुष्याच्या निकालाचा दिवस जवळ येत होता. बाळाची पाचवी पूजताना वृंदाने देवीला हात जोडले आणि म्हणाली, "देवी सटवाई, आज तू आमच्या बाळाचे नशीब लिहायला येशील ना... तेव्हा आमचेही नशीब लिही..." 


आणि त्याच दिवशी संध्याकाळी माधवला त्याच्या मित्राचा फोन आला. धडधडत्या हृदयाने माधवने फोन घेतला.


फोनवर पहिलं वाक्य ऐकलं, "गड्या जिंकलास रे... तुझं सिलेक्शन झालं... क्लास वन अधिकारी झालास..." माधवने भरल्या डोळ्याने हसत वृंदाकडे पाहिलं. तिला ती बातमी सांगण्यासाठी त्याला शब्दांची गरज वाटलीच नाही.


आज वृंदाचे डोळे आनंदाने वाहत होते... गेल्या सहा-सात वर्षातले कष्ट, यातना, अनिश्चितता सारे वाहून चालले होते. सगळी संदिग्धता संपली होती. समोर लख्ख प्रकाश पडला होता, त्यांची प्रेमकथा यशस्वी झाली होती. त्यांचा विश्वास, एकमेकांची साथ आज सार्थ झाली होती. माधवने त्या दोघांच्या आवडीचे गाणे लावले, "फिटे अंधाराचे जाळे... झाले मोकळे आकाश..."


प्रेमकथेची यशस्विता फक्त लग्न असते का हो? मला नाही वाटत असे. एखादे उच्च ध्येय किंवा जोडीदाराचे स्वप्न जेव्हा तुम्ही प्रेम, विश्वास, परस्पर साथीने पूर्ण करता तेव्हा ती प्रेमकथा अधिक यशस्वी होते नाही का?


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama