Deeplaxmi Jadhav

Others

2  

Deeplaxmi Jadhav

Others

भावकथा

भावकथा

4 mins
3.3K


एका कलत्या दुपारी गाडीने सांगोला सोडले आणि गावाच्या रस्त्याला लागली.   उन्हे आता तिरपी होऊन सांडायला लागली होती. माळरानावर पसरलेला त्यांचा सोनेरी रंग मोहक वाटत होता. गावाकडची वाट सुरु होताच पती देवांनी बालपणीच्या आठवणी सांगायला सुरुवात केली .ठिकाणे आली तशा त्या आपसूकच येऊन समोर उभ्या राहिल्या.   सांगोल्यातील शाळा,चिंधा देवी चा टेक, चोरांनी केलेला पाठलाग, जवळपास कोरड्या माण नदीच्या पात्रात कधीतरी पाणी आल्यावर धरलेले मासे, वाडेगाव चे वाडे, पांदीतल्या वाटे ची भीती आणि बरंच काही...


बऱ्याचदा ऐकून झाल्या तरी त्या त्या ठिकाणी गेल्यावर जाग्या होणार्‍या आठवणी आणि त्यात रमणारा जीव... जिवलगाची भेट झाल्यासारखा!!   मजल दर मजल करत गाडी मळ्यातल्या घरापुढे उभी राहिली आणि स्वागताला समोर फुललेला गुलमोहर🎄🎄 पाहुन मी मोहरून गेले .   केवढा उंच झाला हा... किती हिरवाकंच रंग आहे पानांचा आणि त्यावर दिमाखाने मिरवणारी लालचुटूक फुले ! दोन वर्षात हा पठ्ठ्या गुलमोहोर इतका उंच झाला आणि बहरला सुद्धा🤗 त्याच्याकडे पाहता पाहता गाडीतून उतरायचे भानच राहिले नाही.गाडीचे दार उघडले आणि शेपटी हलवत मोती ,टॉमी🐕🐕 उभे... मुलींना तर आकाश ठेंगणे झाले, गाडी ते घर हे चार पावलांचे अंतर पण घरात यायला आता त्यांना दोन तास लागणार होते. कारण मोती, टॉमी, मनी🐈 आणि तिची दोन पिल्ले पिंगा घालत होती. आता पुढचे दोन दिवस आजी आजोबा आणि हे प्राणी मित्र हेच त्यांचे संपूर्ण जग असणार होतं.  


सामान घेऊन उतरलो आणि घरात जाताना चप्पल काढते तर उजव्या बाजूला मोगऱ्याला आलेली वीस-पंचवीस टपोरी फुले.... नुसते पाहूनच मन सुगंधित झाले . जिवलगांच्या भेटीला आता कुठे सुरुवात झाली होती . चहापाणी झाले आणि शेतातल्या भटकंतीला बाहेर पडलो.    घरातून बाहेर आल्यावर उजव्या हाताला पहिल्यांदा लागणाऱ्या गुलमोहराला प्रेमाने हात लावला .....आपले शेतात एक टुमदार घर असावे ...पुढे ऐसपैस अंगण... आणि त्यात लाल फुलांनी बहरलेला गुलमोहर असावा.... असे एक छोटेसे स्वप्न मी कधीतरी पाहिलं होतं. सहज बोलताना ते मी नवऱ्याला सांगते काय आणि तो गुलमोहराचं रोपे आणून लावतो काय..... बघता बघता हा पठ्ठ्या देखील मोठा होऊन फुलांनी डवरतो काय... "मोठा आनंद देणाऱ्या छोट्या गोष्टी या" ...दुसरं काय?     त्यानंतर पुढे थोड्या अंतरावर लावलेले नारळ जणू बोलवायला लागले. Lockdown मुळे अडीच महिन्यात येणं झालं नव्हतं आणि त्यामुळेच आता त्यांची वाढलेली उंची, हिरवेपण ...त्याचं कौतुकच वाटत होतं .   


पेरू ,निशिगंध ,सोनचाफा ,मोगरा, चमेली यासोबत कढीपत्ता, पुदिना, तुळशी या साऱ्याचा एक गर्भरेशमी हिरवा रंग आणि सोबत ओल्या मातीचा गंध नाकात भरुन राहीला आणि समोर पाहते तर काय लगडलेला आंबा 🥭🥭....आंब्याच्या बागेत जायचे होतेच पण स्वागताला हा इतकी फळे घेऊन उभा असेल असे नव्हते वाटले. पाड उचलले आणि एकामागोमाग एक फलाभाराने तृप्त आम्रवृक्ष मी न्याहाळू लागले .  हौदाच्या मागच्या बाजूला नारळ कितीसा वाढला आहे हे पाहावा म्हणून पाहिले तर... अहो आश्चर्यम!! तिथे एक डौलदार मोर उभा🦚🦚🦚 मोबाईलचा कॅमेरा लगेच सज्ज झाला आणि तो जिवलग फोटोत बंदिस्त झाला.   बांधावरून पुढे चालत गेल्यावर रामफळ ,सीताफळ, डाळिंब, हे जिवलग सुद्धा भेटले. चारीच्या बरेच अंतर पुढे गेल्यावर ओळीने उभ्या असलेल्या अवाढव्य वाढलेल्या चिंचा दिसल्या.   त्या चिंचेखाली केलेल्या अभ्यासाची आठवण पुन्हा एकदा पतीदेवानी सांगितली.   


खालचे घर, मारुती चे शेतातले छोटेसे देऊळ, गड्ड्यातली विहीर ,मधली विहीर या साऱ्यांना ओलांडत तळ्याकाठी आलो.... इथे सहसा कोणी येत नाही. चरणारी जनावरे आणि वाहणारा वारा या खेरीज कुणी नाही. आम्हा दोघांची ही आवडती जागा.  निसर्गाशी संवाद साधायचा असेल किंवा स्वतःमध्ये डोकावायचे असेल तर इथे जरूर यावे. इथून दिसणारा मोहक सूर्यास्त पाहून घराकडे चालू लागतो .   संध्याकाळी तुळशीला दिवा लावून तुळशीवृंदावनाच्या त्या कट्ट्यावर शांतपणे बसावं तर रात राणी चा सुगंध ती सायंकाळ मोहक करून जातो. रानातल्या ताज्या भाज्यांवर येथेच्छ ताव मारून रात्री चांदण्यात बसायला अंगणात यावं आणि समोर उगवणाऱा चंद्र दिसावा ...। हा सुद्धा एक जीवलगच !!   अंगणातल्या चुलीवर कधी झणझणीत मटण भाकरीचा बेत होतो.... अंगणातल्या पंक्ती आणि त्यातल्या गप्पांनी ते खळखळून हसू लागतं... गावाकडच्या घराचं अंगण मुलांच्या खेळण्या ने तृप्त होतं ....प्राण्यांच्या वावरण्याने जिवंत राहते... चांदण्यातील गप्पांनी हरखून जातं.... रातराणीच्या सुवासाने दरवळून जातं.... गुलमोहराच्या फुलांनी डवरुन जातं आणि बघता बघता माझ्यासारख्या एका सुनेचे जिवलग ही बनुन जातं .... हक्काचं विसाव्याचं ठिकाण होतं. आणि मग दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरी अनुभवलेलं या जिवलग निसर्गाचं रूप डोळ्यासमोर तरळून जातं.   एखाद्या कोवळ्या सकाळी पक्षांच्या किलबिलाटाने उठावं तर सकाळचा बोचरा वारा मन प्रसन्न करून जातो. गुलमोहराखाली बसावं आणि ताज्या धारोष्ण दुधाचा चहा पीत ते वैभव न्याहाळत बसावे . उगवता सूर्य आणि जागी होणारी ती झाडं पहावी .  


अशीच एक दुपार.... रणरणतं ऊन असलं तरी आंब्याखाली गर्द सावली असते. दुपारच्या जेवणानंतर जडावल्या अंगाने त्या झाडाखाली चटई टाकून एखादे पुस्तक घेऊन पडावे. मधमाशांचा गुंजारव, गुरांचे हंबरणे , असा एखादा च आवाज आणि पानांची सळसळ यात तल्लीन होऊन जावं .  त्यानंतर येणारी आठवण चांदण्या रात्रीतली . उगवता चंद्र, रात्रीची नीरव शांतता, आणि पुन्हा तोच निसर्गाचा... पानांचा सळसळ आवाज हे सगळे अनुभव म्हणजे जिवलग भेटन्या इतकेच तृप्तता आणि समाधान देऊन जाणारे आहेत. जिवलग म्हणजे फक्त माणसेच असतात का हो ? डोळ्यांना हिरवाईची तृप्तता देणारी झाडे सुद्धा जिवलग च असतात की!   फलाभाराने लगडल्या चा अभिमान नाही की फळे तोडल्याचे दुःख नाही.... नव्या पालवीचे कौतुक नाही की गळणाऱ्या पानांसाठी रडणे नाही.... निसर्गाने दिले ते लेणं आणि जे नव्हतं ते त्याला परत देणे ....स्थितप्रज्ञ पण पूर्ण समाधानी राहणे हेच शिकवतात हे जिवलग मला.  आणि मग या जिवलगांकडे मी पुन्हा पुन्हा जाते प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकून येते.


Rate this content
Log in