अमावस्या
अमावस्या
नेहमीच्या रुटीन मधून थोडे विसाव्याचे क्षण मिळावेत म्हणून विकेंडला बाहेर पडलो.
एखाद्या छान निसर्गरम्य ठिकाणी जाणे, आवडीची पुस्तके वाचणे, त्यावर गप्पा मारणे, निवांतपणे भटकणे आणि निसर्गाची ऊर्जा शरीरात भरून घेणे हा त्यामागचा हेतू!
भोर ला असताना अशाच एका शांत निसर्गरम्य जागेचा शोध लागला होता. राजगडच्या मागच्या बाजूला आणि भाटघर बॅकवॉटरच्या जवळ असणारे 'मळे 'हे ठिकाण!
तिथे develop होणारे रिसॉर्ट आणि बांबू हाऊस! (त्यावेळी अजून डेव्हलपमेंट स्टेजमध्ये असल्याने वर्दळ नव्हती)
अशाच एका विकेंडला 'मळे'ला पोहोचलो. बांबू हाऊस रिसॉर्टच्या किचनपासून दूर पण झकास होते. त्याच्या बाल्कनीत बसून भाटघरचे बॅक वॉटर आणि लांबवर दिसणारे डोंगर न्याहाळणे म्हणजे नेत्र सौख्याची पर्वणीच होती!
दिवसभरात शांतता, पक्ष्यांचा किलबिलाट आणि पानांची सळसळ याशिवाय क्वचितच दुसरा आवाज....
कधीतरी एखाद्या वाहनाचा कधी माणसांच्या बोलण्याचा!
यापूर्वी एकदा धावती भेट दिल्यामुळे इथले वातावरण परिचयाचे होते. जेवणही अगदी अप्रतिम होते. दुपारी वाचन, कॅरम खेळणे आणि वामकुक्षी घेऊन संध्याकाळी बॅकवॉटर साईडला फिरायला गेलो.
तिथे एक "न भुतो" असा नजारा पाहायला मिळाला.
पूर्ण झाडीतून जाणाऱ्या रस्त्यावर एका ठिकाणी फुलपाखरांचे थवेच्या थवे दिसू लागले. किती फुलपाखरे दिसावीत याला काही मर्यादाच नव्हती. हिरवीगार झाडी आणि त्या पार्श्वभूमीवर दिसणारी असंख्य रंगीबेरंगी फुलपाखरे!!!
एकाच वेळी इतकी फुलपाखरे मी प्रथमच पाहत होते. निसर्गाने त्याचा अद्भुत नजराणा पेश केला होता जणू... डोळ्याचे पारणे फेडणारा हा नजारा पाहत पाहत पुढे बॅकवॉटरच्या किनाऱ्यावर आलो.
पुढे दिसणारा राजगड आणि दूरवरची लहान लहान गावे.... सोबतीला आवडीच्या "रे कबीरा" या गाण्याची संगीत साथ.... सारेच रमणीय होते.
संध्याकाळ अशी निवांत घालवून रात्रीच्या जेवणासाठी रिसॉर्टच्या dining रूमला आलो.
"आज शनिवार असूनही कुणीच नाही?" अशी सहज चौकशी केली
त्यावर "अमावस्या आहे ना' हे उत्तर मिळाले.
अर्थातच हे पटण्यासारखे नव्हते. आजच्या काळात कोणी तिथी पाहून आऊटींगला जातात का?
पण तिथला निर्जन भाग आणि अमावस्या अशी सांगड त्या ग्रामीण लोकांनी घातली असावी.
"पण रात्री एक ग्रुप येणार आहे - मुक्कामाला! वीस-पंचवीस मुलेमुली आहेत. सगळे फॉरेनर आहेत. कसला तरी अभ्यास करत आहेत." ही माहिती मात्र समजली.
आमचे बांबू हाऊस थोडे दूर आणि एकाकी होते. रात्री जेवणानंतर थोडा फेरफटका मारावा म्हणून काही अंतर चालून आलो. आणि पौर्णिमेप्रमाणेच अमावस्येलाही सौंदर्य असते हा नवा शोध लागला.
लख्ख चांदण्यांनी गच्च भरलेले आकाश आणि गुडुप अंधार!!
वाटून गेलं पोर्णिमेबद्दल सगळेच लिहितात. अमावस्येबद्दल का नाही? पाहणाऱ्याला तर कशातही सौंदर्य दिसतं तशी ही अमावास्या वाटली. कॉटेजमध्ये रात्री आल्यावर माझ्यातल्या पारंपरिक मनाला खरंतर भीती वाटली. पण विचारी मनाने त्यावर मात केली.
सकाळी लवकर उठून बाहेर आलो तर...... समोर लालबुंद सूर्यबिंब....... धुक्यात पहुडलेला भाटघर जलाशय..... आणि जाग्या होणाऱ्या राजगडच्या रांगा दिसल्या....
वाटले चित्रकला जमायला हवी होती. हे सारं कुंचल्यात साकारता आलं असतं. कारण हे दृश्यच इतकं रमणीय आहे की शब्दात मांडणं शक्य नाही. त्याला कुंचलाच हवा. त्या प्रसन्न वातावरणात चालायला बाहेर पडलो तेव्हा दूरवर मोकळ्या जागेत tent दिसले आणि बाहेर बसलेली ती मुलेही. सगळी 20-25 वयोगटातली होती पण कुठला थिल्लरपणा नाही अथवा आचरटपणा नाही.
काहीजण लिहीत होते, काहीजण वाचत होते. मला वाटून गेले अमावस्या रात्री अनोळखी भागात... असे तंबूत राहताना... यांना भीती नसेल का वाटली? माझे मलाच हसू आले.
माझा नास्तिक नवरा या मुद्द्यावर माझ्याशी बराच वाद घालतो. आणि नेहमी एक प्रश्न विचारतो... अमावस्या जर इतकी निषिद्ध असेल तर आपला सर्वात मोठा सण दिवाळी..... त्यातला सर्वात महत्त्वाचा दिवस लक्ष्मीपूजन..... आणि सर्वात महत्त्वाची देवता लक्ष्मी...... तिची उपासना अमावस्येला का करायची बरं???
आता या प्रश्नाचे उत्तर देण्याइतका माझा शास्त्राचा अभ्यास नक्कीच नाही.
आणि शिवाजी महाराजांनीदेखील त्यांच्या बऱ्याच लढाया अमावस्येला सुरू केल्या आणि जिंकल्यासुद्धा.
पण यावरून इतकेच सांगता येईल अमावस्यासुद्धा तितकिच महत्त्वाची असते आणि म्हणूनच वाटले आजपर्यंत पौर्णिमेचे गुणगान खूप ऐकलं, आपण आपल्या लेखणीतून अमावस्येलासुद्धा थोडा वाव देऊया.
लहानपणापासून ऐकल्यामुळे असेल किंवा आजूबाजूच्या चर्चेतून अमावस्येबद्दल नेहमी गूढ भीतीदायक असेच वाटत आले आहे.
पण मला वाटते अमावस्येच्या काळोखापेक्षा मनातल्या काळोखाला घाबरावं... आणि घाबरवणारी भूतं निसर्गात सापडण्यापेक्षा आसपास वावरणाऱ्या माणसांमध्ये जास्त सापडतात!
अमावस्या ऱ्हासाचा शेवटचा दिवस असतो. त्यानंतरच खरी उत्कर्षाला सुरुवात होणार असते, असा विचार केला तर अमावस्येची निषिद्धता नक्कीच कमी होईल.
अमावस्याची भलावण करणे हा लेखाचा हेतू नसला तरी आपले विचार बदलले की गोष्टी बदललेल्या दिसतात हा नवा अर्थ मला नक्कीच उमगलाय.
त्यामुळेच आता शुभाशुभत्व, मुहूर्त, तिथी या मुद्द्यावर नवऱ्याशी भांडणे मी कमी केले आहे.
त्याच्या नास्तिकतेतच मला नेहमी सुधारणावादी विचारांचा शोध लागतो. आणि असा एखादा विषय मिळाला की लगेच विचारातून शब्दात येतो. मग तो विषय अमावस्या असेल तर काय हरकत आहे.