SHUBHANGI SHINDE

Romance

3  

SHUBHANGI SHINDE

Romance

प्रेमगंध

प्रेमगंध

4 mins
427


आज घरी प्रिया ला बघण्याचा कार्यक्रम होता.. मामा मामी, काका काकू, दोन मावशी, आई बाबा, लहान बहिण सीमा आणि भाऊ सुजय.. असे सगळेच घरी हजर होते.. कोणी नाश्ता पहातय तर कोणी घराची आवरा आवर, मावशी आपली प्रियाला तयार करण्यात व्यस्त आहे. प्रिया.. घरातली मोठी मुलगी.. गव्हाळ रंग, जेमतेम उंची, कमरे इतपत लांबसडक केस, स्वयंपाक करण्यात एकदम हुशार, graduation संपवून account मध्ये नोकरीला होती.. आज बघण्याचा कार्यक्रम म्हणून छान काठपदराची पोपटी रंगाची साडी नेसली होती.. काळ्याभोर लांब केसांची वेणी घालून त्यावर एक गजरा माळला होता..जो दोन्ही बाजूंनी खांद्यावर सोडला होता. चेहर्‍यावर साधी पावडर आणि कपाळावर एक टिकली.. अगदीच साधी राहणी.. तरीपण साडीवर फार सुंदर दिसत होती..


घर अगदीच साध चाळीतल.. पण घराला घरपण तर घरच्या माणसांमुळे असत ना.. तेव्हाच तर एवढा मोठा कुटुंब एकत्र जमा होता.. काहीवेळाने पाहुणे घरी दाखल झाले.. दोन्ही कुटुंबाच्या ओळखी झाल्या.. मुलामुलींची तोंड ओळख झाली… सागर.. उंच, धिप्पाड, गव्हाळ रंग, सीए परीक्षेत शेवटच्या वर्षाला, शिवाय एका नामांकित कंपनीत नोकरीला होता.. फिकट निळ्या रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची पँट, हातात घड्याळ बऱ्यापैकी रुबाबदार.. ?अगदी प्रियाला शोभेसा होता.. त्यामुळे नाही म्हणण्याच कारणच नव्हत.. तरी मुला मुलीला भेटून घेउ देत म्हणून मामीने दोघांना शेजारच्या काकूंच्या घरी मोकळीक दिली.. आता आपल्या चाळीत घर खूप लहान आणि सिनेमात दाखवतात तस टेरेस गार्डन इथे कुठे मिळणार म्हणून आपल्या शेजारची घर अशावेळीही मदतीस येतात असो…दोघांनीही एकमेकांना बघताच क्षणी पसंत केले होते.. आणि बाकी गोष्टी घरच्यांनी पाहिल्याच होत्या.. दोघेही आपापल्या घरच्यांच्या शब्दाबाहेर नव्हते.. बोलणी करून होकार कळवत तिथेच सुपारी फोडली..

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

घरच्यांच्या नकळत फोन नंबर एक्सचेंज झाले आणि रोज हळूहळू बोलन सुरू झाले.. एकमेकांची आवड निवड कळायला लागली..स्वभाव कळले मन जुळायला लागली.. हळू हळू एकमेकांविषयी ओढ वाढायला लागली.. इथे घरच्यांनी पत्रिका जुळवली तर छत्तीस पैकी छत्तीस गुण जुळत होते.. सगळे एकदम खुश होते.. आठवड्याभराने प्रियाचे मोठे काका मुंबईत आले.. ते गावीच स्थानिक असल्याने आणि बोलणीच्या वेळेस एका कामात अडकल्याने आले नव्हते.. आज खास करून आपल्या गावच्या भटजींना घेऊन आले होते आपल्या लाडक्या पुतणीची पत्रिका परत जुळवून पहायला, कारण त्यांचा इथल्या भटजींवर अजिबात विश्वास नव्हता..


काकांनी मुलाची इत्यंभूत माहिती विचारली.. भटजींनी पत्रिका जुळवणी सुरू केली पण इथेच गफलत झाली..? सागर प्रियापेक्षा पाच वर्षांनी लहान होता.. बस्स काकांनी फर्मान सोडले हे लग्न होणे नाही.. ? या गोष्टीवरून दोन्ही कुटूंबात खूप वादावादी झाली, शिवीगाळ आणि भांडणसुद्धा झाली.. सुपारी फोडली असताना अस अचानक नकार दिला.. मुलाकडच्यांनी मुलीला दोष लावला तर मुलीकडच्यांनी मुलाला दोष लावला.. काका मोठे असल्याने घरात त्यांच्या शब्दाला मान होता.. ते सांगतात तर योग्यच असेल आणि तसही समाजात समजच आहे मुलगी मुलापेक्षा वयाने मोठी असू नये.. हे आमच्या पूर्वजांचे विचार.. त्याच शास्त्रीय कारण वेगळेच आहे.. ते आता मी इथे सांगत नाही..


पण इथे प्रिया आणि सागर नकळतपणे एकमेकांत गुंतले होते .. जीव जडला होता दोघांचा एकमेकांवर.. घरी एवढ रामायण घडल पण तरीही ह्यांच मनकाही वळेना… हे दोघे अधून मधून एकमेकांना भेटत होते.. कधी मुव्ही, तर कधी गार्डन आता तर रोज स्टेशनपर्यंत सोबत असायचे अॉफीस सुटल्यावर.. एक दिवस असच त्यांना एकत्र स्टेशनवर सुजयने पाहील आणि घरी कळाल.. प्रियाने घरी सगळं खर सांगून टाकले..पण घरच्यांना ते मान्य नव्हते… त्यांनी अनेकदा तिला आणि सागरला दमदाटी करून समजावले पण प्रिया आणि सागर प्रेमात अखंड बुडाले होते.. प्रसंगी प्रियाला मारहाणही करण्यात आली.. असच एकदा सर्व गोष्टीला कंटाळून प्रियाने आत्महत्येचा प्रयत्न केला पण सुदैवाने ती यातुन वाचली..


पुढे असा प्रयत्न करू नये म्हणून सतत तिच्या सोबत कुणीना कुणी असायचे.. दोन तीन वर्षे अशीच गेली.. प्रियाने चांगल्या पगारासाठी नवीन नोकरी पकडली.. प्रिया आणि सागर यांनी दोघांनीही आधी स्वतःला फायनान्शियल सक्षम बनवले.. पळून लग्न करण्याचा निर्णय घेतला.. स्वतःसाठी भाड्याने घर घेतले.. काडी काडी करून घरात सगळे सामान घेतले आणि तो लग्नाचा दिवस उजाडला.. लग्न रजिस्टर पद्धतीने करायचे ठरले होते.. प्रिया नेहमीप्रमाणे अॉफिसला जायला निघाली पण आज साडी का नेसली म्हणून आईने विचारले तर नवीन अॉफीसमध्ये काही पुजा आहे अस सांगून वेळ मारली..सागर, प्रिया आणि त्यांचे साक्षीदार मित्रमैत्रिणी रजिस्ट्रार आॅफिसजवळ जमले.. पण प्रियाचे मन काही मानत नव्हते.. ती सर्वांची नजर चुकवून एका कोपऱ्यात गेली आणि तिथून तिने थेट तिच्या वडिलांना फोन केला…


प्रिया : पप्पा मी marriage registration ओफिसमध्ये आहे.. सागर सोबत लग्न करण्यासाठी.. पप्पा हो म्हणा ना.. यापुढे तुमच्याकडे काही नाही मागणार पप्पा.. तुमच्या आशिर्वादाने होऊन जाउ देत ना सगळ.. ( आवाजात एक दर्द होता.. डोळे पाणावले होते)


पोरीच्या या विनवणीने वडिलांचेही डोळे पाणावले.. मुलीच्या मनात आजही आपल्यासाठी तितकाच आदर आहे.. आपण नाही म्हणालो तर?? तिचा विश्वास कायमचा गमावून बसू… वडिलांनी होकार दिला आणि प्रिया खुलली.. मागुन सागर हे सगळ पाहत आणि ऐकत होता.. त्याने प्रियाला धीर दिला आणि दोघांनीही रजिस्टर मॅरेज केले…पूढे काही महिन्यांनी प्रियाच्या घरच्यांनी त्यांचे वैदिक पद्धतीने लग्न करून दिले.. वर्षभराने सागरच्याही घरच्यांनी त्यांना माफ करत त्यांचे लग्न मान्य केले..

..

(सदर कथा वास्तविक घटनेवर आधारीत असून कथेच्या लेखनाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत तरी कथा शेअर करायची असल्यास नावासकट शेअर करावी.. कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि Next पेक्षा कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल, फोटो साभार गूगल )



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance