Vasudev Patil

Drama Horror Others

3.6  

Vasudev Patil

Drama Horror Others

पंचक - पाचवा भाग

पंचक - पाचवा भाग

8 mins
1.4K


दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातल्या दैनिकात 'पती व मुलाच्या वियोगानं पत्नीची विहीरीत उडी घेत जिवनयात्रा संपवली' अशा मोठ्या ठळक मथळ्यात बातमी आली.मावशीचा पी. एम. रिपोर्ट उच्च रक्तदाबानं ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू' असा आल्यानं व सुंतीबाबत कुणीच तक्रार न केल्यानं पोलीसांनी सुंतीच्या कलेवराचं पी.एम.करत नंतर सया व अंतूचे वैयक्तिक जाबजबाब घेतले. सयानं 'सुंती पतीच्या व मुलाच्या जाण्यानं एकटी पडली होती व दु:खानंच हे पाऊल उचललं असावं' असा जबाब दिला. तर अंतूला रात्रीचं "अंतू ! मी एकटी आहे, मी सयाला एकटी नाही मारू शकत. तू येशील ना मला भेटायला?" हे आठवताच त्यानंही दत्ता व सदाचं काही एक न ऐकता सयाप्रमाणंच जबाब दिला. कुणी तक्रारच केली नाही म्हणून व प्रथमदर्शनी आत्महत्याच वाटत असल्यानं पोलिसांनी पी.एम. नंतर प्रेत अंत्यविधीसाठी ताब्यात दिलं. अंत्यविधी आटोपताच अंतू क्वार्टरवर न जाता हवेलीवर थांबला. सया चक्रावला. त्याला वाटलं अंतू गरबड करेल. पण त्या दिवशी अंतू शांतपणे वावरला. दुसऱ्या दिवशी क्वार्टरकडे जाताना दत्ता भटजी व सदा सर त्याला भेटायलाआले. त्यांना

 "सवडीनं व सबुरीनं घ्या घाई नको. रात्री क्वार्टरवर या भेटायला" एवढंच कुणाला ऐकू जाणार नाही असं पुटपुटत निघून गेला. दत्ता भट संताप करू लागले. अंतू तक्रार का करत नाही? का हाच सयाला मिळाला असा संशय त्याला निर्माण झाला. सया दुसऱ्या दिवशी ही पोलिस स्टेशनात गेला. अधिकाऱ्यांना गुप्तपणे भेटला. कारण अंतू बोलला नाही अजून पण पुढे बोलणार नाही याची शाश्वती नव्हती व भट? तो शांत राहणार नाही म्हणून अधिकाऱ्यांना भेटला व खूश करू लागला व नंतर पंचकातील दोन..! त्याचा ही त्याला बंदोबस्त करायचाच होता व तोही लवकरच. 


अंतूनं क्वार्टरवर येत दिवसभर पडणंच पसंद केलं.

'अंतू मी वाट पाहतेय रे! येशील ना! एकटी आहे रे मी!' आठवलं. व महादबाच्या मळ्यातील पिंपळाच्या झाडाखालील शेवाळलेल्या हाताचा शेवाळलेला स्पर्श, उग्र दर्प त्याला आठवला. सात वाजता तो उठला व बाहेर येत धरणावर चालणारं थंडावलेलं काम पाहू लागला. जिकडंतिकडं फापटपसारा पडलेला. जेसीबी, डंपर, ट्रॅक्टर उभे होते. काही तुरळक तेलगू कामगाराचे कबिले पत्र्याच्या शेडमध्ये होते. लोखंड, ग्लडर, सिमेंट, दोर, नारळाच्या दोऱ्या काहीबाही पडलेलं होतं. त्याची नजर दोरावर गेली. अंधार पडायला सुरूवात झालेली. तो आत परतला. साडेदहाच्या सुमारास सुंतीच्या आठवणीनं महादबाच्या पिंपळाच्या मळ्याकडं निघाला... तेलगू कामगाराचं कुत्रं त्याला पाहताच जोरजोरात भुंकत विव्हळू लागलं. रात्री जिल्ह्याहून निघतांना

     "सयाजीराव आमच्याकडनं बिनघोर असा! आम्ही स्वत:हून आडात डोकावणार नाहीत फक्त त्या अंतूस व भटास कसं सांभाळायचं ते तुमचं तुम्ही बघा!" असं आश्वासन मिळताच टल्ली झालेला सया तारणीकडं निघाला. बाल्या, काकी, सुंती यांच्यावेळेस ही तो असाच टल्ली होता व आजही... असा टल्ली झाल्यावर त्याला आपला मेंदू अधिक तल्लख होत असल्याचं तो जाणून होता. म्हणून त्यानं परस्परच तारणीत हवेलीत न जाता क्वार्टरवरच जाण्याचं ठरवलं. धरणाच्या कामावर त्याचे तीन जेसीबी ट्रॅक्टर, डम्पर चालूच होते. त्या करीता त्यानं पेट्रोल व डिजेलचे ड्रम भरून जीपमध्ये ठेवले. पेट्रोलपंपाजवळ टिकाव, फावड्याचे लाकडी दांड विकणारा माणूस पडलेला दिसला. सयाच्या मनात काहीतरी तरळलं. आपल्या टिकावाचा दांड परवा आपण विहीरीत फेकला. त्याला हसू आलं. चला हाच दांड आजही वापरायचा असा विचार त्यानं करत त्यानं त्या माणसाकडंनं दांड मांगितला.

"साहब अभी सुबह आव इतनी रात हो गयी"

तरी समोरच्या गठ्ठ्यातून त्यांन दांड उचलत त्याच्या अंगावर पैशै फेकत निघाला. गाडी तारणी जवळ करू लागली. अकराच्या सुमारास तो तारणीच्या फाट्याच्या आसपास आला. आकाश परवाच्या बेमोसमी पावसानंतर स्वच्छ होतं. पण हवेत गारपिटीनं गारठा वाढला होता. आकाशातला चंद्र त्याच्या गाडीसोबत पळतच होता. अंगातली चढत असल्यानं तो विचार करू लागला. आख्खं चाळीस एकर रान नदीपासून लांब असल्यानं रानातलं एक चास ही धरणात बुडणार नाही. फक्त आज अंतूला बुडवावं लागेल. धरण तर होणारच, मग गाव उठलं तरी आपलं रान शाबूत. मग सुंतीसाठी थांबलो होतो पण आता मस्त लग्न उरकू. 


गाडी फाट्याजवळ येताच त्यानं गावाकडच्या फेऱ्यानं जाण्यापेक्षा महादबाच्या मळ्याकडनं कच्च्या रस्त्यानं गाडी टाकली. धरण जवळ येऊ लागलं. महादबाचा मळा आला. रस्त्यापासून थोड्याच अंतरावर विहीर होती. सयानं गाडी थांबवली. त्याला पिंपळाखाली कुणी तरी बसलेलं दिसलं. तो उतरला व त्यानं "कोण आहे रे?" म्हणून आरोळी ठोकली.

"मी अनंत सरोदे"

"अरे अंतू तू? नी इथं काय करतोय या वेळेला?" सया प्याला असला तरी कचरलाच.

"कोण सया का? काही नाही उदास वाटत होतं व सततच्या शहरी वातावरतात राहून असं मोकळं वातावरण ही मिळत नाही म्हणून आलो धरणाकडंनं फिरायला.

सयाची भिती कमी झाली.त्यानं मनातल्या मनात ' जिसे हम ढूंढ रहे थे गली गली...' म्हणत विहीरीकडं निघाला. तोच त्याला अंतूपासून पिंपळाच्या झाडामागं काहीतरी झपाट्यानं सरकल्याचं जाणवलं. 

"अंतू काही तरी हललं का रे?"

"कुठं काय? काहीच नाही"

अंतू शांत बसुन बाटली खाली करत होता.

"बस सया. खूप वर्षांनी असं मोकळ्या वातावरणात आलोय. घे थोडी"

सयानं तरी आजुबाजुला पाहिलंच. कारण काय सांगावं भट व सदा सराची काही चाल असावी.

"बस रे सया काय पाहतोय असं बावचळल्यासारखं!" अंतूनं त्यास भरवसा भरला.

" अंतू काकी, सुंती, जया गेल्यानं आता कशातच भरवसा वाटत नाही रे!"

सयाला माहित करायचं होतं की यानं तक्रार का केली नाही? का हा सुंती व मावशीवरील राग विसरलाच नाही लग्नाबाबतचा?

"सया, मला सुंती काकीबाबत काहीच वाटत नाही. कारण त्यांनी मला दुखवलंच होतं, ते तर तुला ही माहित आहे.

सयाचे डोळे चमकले. त्याला हायसं वाटलं. अंतूनं ग्लास खाली करत सयाला दिला. सया आधीच टल्ली होता.

"अंतू तुला सांगू का? सुंतीनं तुलाच काय पण आमच्या जयाला ही फसवलं"

"बरोबर सया! ती गेली चांगलंच झालं"

आता मात्र सया खुलला. कारण अंगातली ही चढलीच होती

"अंतू भावा तू एक कर आता हे धरण पुर्ण कर नी इथंच रहा. तुला मी काकीच्या नावाचं दहा एकर देतो."

"सया मला शेत नको रे. मी खरं तर येणारच नव्हतो पण यांना मरतांना पहायचं होतं मला, म्हणून आलो मी!"

" अंतू...मित्रा,.. भावा... तुच आता माझा ..जया.. तू ऐक ..त्या भटाचं ऐकू नको... नी तुला सांगतो...शू..शू.. कुणाला सांगू नको... त्या सुंतीला....मी .. मीच मारलं.."

अंतूच्या डोळ्यात आग उतरली.

"सया छान केलंस. तिला तसंच हवं होतं. पण कसं मारलंस रे सया! ती तर आडात कुदली ना?"

अंतूनं पुन्हा ग्लास भरून दिला.

"अंतू आडात ती कशाला कुदेल! त्या रात्री तो भट व मास्तर तिला भेटायला हवेलीमागं आले. सोबत त्यांनी कोणाला तरी आणलं होतं. बहुतेक वकील असावा. मागच्या अंधारात काही तरी कागदं चाळली त्यांनी. माझा हराम चढला. भट व मास्तर गेले. नी ती परत हवेलीच्या मागच्या दाराकडं येऊ लागली. मी टिकावचा दांड मोकळा केला. ती मागचा दरवाजा लावण्यासाठी पाठमोरी फिरली नी घातला जोरानं दांड. डोक्याच्या मागच्या बाजूस बसताच एकाच दणक्यात सुंती लाथा झडकायला लागली. तशीच खांद्यावर घेतली नी फेकली मागच्या आडात. आडातल्या ठेवणीवर डोक्यावर आदळत फपकन आडात पडली"

अंतुच्या हातातला ग्लास फुटला. त्याला शेवाळलेला हात, उग्र दर्प आठवला नी तोच दर्प पुन्हा सुटला.

आतापर्यंत आधी टल्ली झालेला सया अंतू देत असलेली दारू पितच नव्हता पण आहे त्यापेक्षा जास्त टल्ली असल्याचं भासवत होता. त्याला अंतूला इथं लोळवायचं नव्हतं. धरणावरच नेऊन काम करायचं होतं. तोच दर्प सुटताच, "अंतू कसला घाण वास येतोय रे! चल उठ भावा आता धरणावरच जाऊ!" 

सया त्याला उठवू लागला. अंतू व सया गाडीत बसत धरणाकडं निघाले.

.

.

पण त्या आधी बराच वेळेपुर्वी दत्ता भटानं सदा सराला घेत धरण गाठलं होतं. धरणावर क्वार्टरचं कवाड लोटलेल्या अवस्थेत होतं. अंतू जवळच्या ऑफिसच्या कॅबिनसमोर चार एक खुर्च्या टाकून अंगणात बसलेला होता. दत्ताजी व सदा सर त्याच्याजवळ बसले. बसताच कालपासून संतापलेल्या दत्ताजीनं अंतूवर फायरिंग सुरू केली.

"अंतू काय चालवलंस तू? तू त्या सयावर फिर्याद का गुदरली नाहीस. आम्ही इतक्या दिवसांपासून तुला जमीन मिळावी म्हणून मरमर करतोय नी तू खुशाल कालपासून त्या सयाला मिळालास?"

"दत्ताजी बसा आधी. दम खा जरा. काही गोष्टी कशा असतात माहित आहे का? शिकार झपटायची असेल तर चार पावलं मागे जाऊन मोठी उडी घ्यायची असते!"

"अरे पण तुला काय वाटतं? सुंती आडात उडी टाकून मेली असं? नाही तिला या सयानंच मारलं असावं. कारण आम्ही भेट घेऊन वकीलामार्फत जमिनीचं सारं व्यवस्थित केलं होतं रे. नी त्याच रात्री ती गायब होते नी नंतर..."

दत्ता भट रडू लागले. तिकडं तेलगू कामगाराचं कुत्रं क्वार्टरकडं तोंड करून एकसारखं विव्हळतच होतं. तोच उग्र दर्प घुमला नी दोन काळ्या मांजरीचं जवळच भांडण सुरू झालं. सदा सरांनी खडा उचलत मांजरीना उसकारलं.

"दत्ताजी मी त्या सयाला सोडणारच नाही. पण माझ्या पद्धतीनं. तुम्ही निवांत असा"

तोच महादबाच्या मळ्याकडंच्या वाटेनं जीप येतांना दिसली. तारणीत जीप दुसरी कुणाचीच नव्हती. दत्तानं चांदण्यात दुरुनच ओळखली.

"ही तर सयाची गाडी आहे. या वेळेस हे इकडं कसं तरफडलं. जेसीबीसाठी आलाय की आपल्या मागं?" सदा व दत्ता घाबरले.

दत्ताजी तुम्ही तिकडं अंधारात लपा लवकर. त्यानं पाहिलं तर विचका होईल. पळा पळा लवकर. मी पाहतो त्याला. दत्ताजी व सदा सर क्वार्टर मागं अंधारात लपले.

.

.

 जीप उभी राहताच अंतू उतरला.

"अंतू तू चल मी हे ड्रम उतरवतो नी मग येतो. थोडी पिऊ नि मग हवेलीवर जाऊ. तू पण हवेलीवरच थांबायचं आता."

अंतू उतरला व क्वार्टरकडं जाऊ लागला. पण उतरतांना त्यानं गाडीतला टिकावचा दांड हातात घेतला. सयानं अंतू दूर जाताच डिझेल खाली उतरवलं. पेट्रोलचा एक ड्रम गाडीत तसाच राहू देत एक गाडीत आडवा केला. आता फक्त अंत्याला इकडं आणून बसवायचं नी मग धमाकाsss करायचा. अंधारात दबा धरून बसतांना अंतू गाडीकडून आला की गाडीत बसला हे दत्ताजी सदाला समजलं नाही. सया अंतूला गाडीत आणण्यासाठी हाका मारू लागला.

"अंतू चल डिझेल उतरवलं गेलं!"

दत्ताजीला उमजेना आल्या आल्या हे बेणं अंतूला का बोलवतोय.

अंतू येत नाही व दिसत नाही म्हणून सया क्वार्टरकडं आला. त्यानं लोटलेलं कवाड आत ढकललं नी तो जागेवरच चिरकला. वरच्या अँगलला दोर बांधून अंतू झुलत होता. जीभ व डोळे बाहेर आलेले. नी कोपऱ्यात खुर्चीवर टिकावचा दांड घेऊन दुसरा अंतू बसलेला. सयाला खालची जमीन ओली झालेली ही कळत नव्हती. क्षणात हत्तीचं बळ एकवटून त्यानं मागं फिरत सुसाट पळ काढला पण तोच गाडीजवळ मागून अंतूनं मारलेला दांड डोक्यात खणकला. सया गाडीजवळ आडवा - भुईसपाट झाला. मागून दत्ता व सदा सर अंधारातून पाहू लागले. अंतूनं सयाचं मानगुट पकडत त्याला गाडीत बसवलं नी जवळ पडलेल्या नारळाच्या दोऱ्या उचलून‌ गाडीत त्याला जखडलं. सया गयावया करू लागला. तोच उग्र दर्प सुटला नि मांजरी क्वार्टरमध्ये जोरजोरात आरडू लागल्या. सदानं खिडकीतनं अचानक मांजरीच्या आवाजाकडं डोकावलं नी त्याला धाप लागली. तो आकांडतांडव करत दत्ताजीला हातानं ओढत खिडकीकडं पहायला लावू लागला. दत्ताजी अंतू सयाला गाडीत बांधतोय तेच पाहत होता. सदा सरानं त्याचं बखोट धरलं नी त्यांनीही खिडकीत डोकावलं. आतला झुलता अंतू पाहताच त्यांची ही बोबडी वळली. कोणता अंतू खरा? मध्ये लांबलेल्या जिभेनं झुलणारा की सयाला दांडानं आडवा करणारा?


तोच तिकडं अंतूनं गाडीत आगकाडी दूरूनच फेकली असावी. मोठा धमाका होत गाडी जळत होती... सया भरिताचं वांगं शेकोटीत जळून तेल गळावं तसा भाजून गळत होता. अंतू सुंतीचा शेवाळलेला हात हातात घेत महादबाच्या मळ्यातील पिंपळाकडं निघाला. धमाक्यानं धरणावर असलेले किरकोळ तेलगू मजूर व इतर कर्मचारी अधिकारी डोळे चोळतच उठले. पहाट व्हायलाच आली होती.एकच गलका उडाला...


सदा सर सकाळ होईपर्यंत बेशुद्ध होऊ लागले. दत्ताजीनं त्याला शुद्धीवर आणत "सर घाबरू नका. पंचक पुरा झाला." सयाच्या पंचकातला तिसरा व पाचवा बळी वाचला होता व जयाला लागलेला पंचकच पूर्ण होत होता. दत्ता भटानं उसासा टाकत" बेणं सया पंचकातही आग (पेट्रोल) घेऊन फिरत होतं! मग जळणार नाही तर काय होणार!" सदा सरांना बजावत धीर दिला. काही काळातच धरण पूर्ण झालं. पाणी अडवलं गेलं. त्याआधीच तारणी उठली. शाळा ही स्थलांतरीत होऊन सरकारी ताब्यात गेलेल्या तात्याराव नेहेतेच्या चाळीस एकर रानात तारणी व शाळा नवीन जोमानं बहरली. सदा सराच्या मनातील सुंतीबाईचं स्थान अंतूसाठी संगमरवराप्रमाणे आरसपानीच राहिलं.


(ही कथा काल्पनिक व मनोरंजनपर आहे)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama