* पाऊस... *
* पाऊस... *


हल्ली खरंच तुझी आठवण येते. तशात पाऊस...!
चांदणं कुजबुजतं रोज रात्री कानाशी.
कोणीही सहज विचारून जातं, "काय भाऊ सगळं ठीक ना?" मी फक्त हसतो..
दूर कुठेतरी देवळातली घंटा वाजते.. तुझे श्रद्धाळू डोळे आठवतात...
डोळ्यांतून एखादा ओघळ गालावर येतो.
का जगतोय मी? अस्तित्वाला टाके घालत, समोरचा क्षण विणत राहतो रोज. तुझ्याशिवाय...
रस्त्याच्या कडेला भिका-याचं पोर टाहो फोडत असतं. ते मोकळेपणाने, आणि मी आतल्या आत... देवाने इतकीही मोकळीक देऊ नाही का मला? मी विचार करत राहतो...
"का सारखा सारखा विचार करतोयस तिचाच?" मी मनावर ओरडत राहतो.. मन करपलेलं...
हल्ली आभाळही पूर्वीसारखं भरून येत नाही... ढग आपसात गुजगोष्टी करत नाहीत. पानगळीनंतर मोहर पुन्हा फुलत नाही.
पाऊस घेऊन तू आली असतीस तरी चाललं असतं...
पण तुझ्यापर्यंत हे पोहोचतच नाही... पाऊस बिचारा केविलवाणा, मुका नसूनही बोलत नाही. मग असेच कधीतरी डोळे भरून येतात. तुला मारलेली घट्ट मिठी आठवते... पावसातल्या असंख्य आठवणी आठवतात.
हल्ली पत्र्यावरचा त्याचा आततायी आवाज नकोसा वाटतो.. मी दारं -खिडक्या लावून घेतो.. आधीच मी असा.. कोमेजलेला...आणि तशात पाऊस....