एक संध्याकाळ...
एक संध्याकाळ...


लांबसडक मरीन ड्राइव्ह... शांत संध्याकाळ.. समोर निळाशार समुद्र.. दोघांचे हात एकमेकांच्या हातात घट्ट... तिचं डोकं त्याच्या खांद्यावर...
"होईल ना रे सगळं नीट ?... नाही झालं तर?"
"नाही झालं तर मांडलेला सगळा खेळ नीट आवरुन ठेवायचा परत.."
"मला नाही जमणार ते.."
"मलाही "
"आपण खूप पटपट पुढे आलो का?"
"एका जागी थांबून काय करायचं होतं ?"
"इतके गुंतलो तरी नसतो.."
" ..... आणि आतल्या आत कुढलो असतो.... "
"तुला इतक्या पटपट कशी सापडतात उत्तरं?"
"तुझ्यामुळे.."
"पण नाहीच होता आलं मला तुझं तर? "
"मिळवीन मी.. तू कशाला काळजी करतेस?"
"मग मगाशी काय म्हटलास, खेळ आवरून ठेवायचा असं? "
"मग जुन्याच पत्त्यांवर किती दिवस खेळत बसशील? खेळ आवरुन, नव्या पत्त्यांसकट नवीन खेळ सुरू करायचा! खेळगडी तोच.. खेळ मात्र वेगळा! खेळ कुठलाही असो आपण एकत्र राहून जिंकणं महत्वाचं..."
"खूप positivity देतोस तू .. "
तिने शांतपणे डोळे मिटले..
...... खरंच होईल ना सगळं नीट? आता त्याच्या मेंदूत प्रश्न फिरू लागला. ती आता शांत होती. निश्चिंत होती. पण तो एका बाजूला सज्ज होत होता. नवे डावपेच, नव्या रचना, नवे आराखडे बांधत होता..
नव्या पत्त्यांना सामोरं जायला, नव्याने तयार होत होता..
अर्थात, तिचा हात न सोडता....